मुंग्यांना गुलाम करून त्यांचा जीव घेणारी झॉम्बी बुरशी

तुम्ही कधी दोरीच्या बाहुल्यांचा खेळ पाहिलाय का? प्रत्यक्षात नाही तर किमान एखाद्या सिनेमात किंवा चित्रात किंवा इंटरनेटवर तरी?

त्या खेळामध्ये बाहुल्या वेगवेगळ्या प्रकारे हातवारे करत असतात, पण त्यांना ते हातवारे करायला लावणारा भलताच असतो.

असाच प्रकार तुमच्याबाबतीत झाला तर?

तुमचा मेंदू तुम्हाला कोकलून सांगत असेल की बाबा स्वस्थ बस, हलू नकोस.

पण तरी तुम्ही उभे राहून चालू लागलात आणि तुम्हाला स्वत:ला थांबवताच येत नसेल तर?

तुमच्या शरीराचा ॲक्सिलरेटर, ब्रेक, स्टिअरिंग आणि गिअर यांपैकी काहीच तुमच्या ताब्यात राहिलं नाही तर एखाद्या व्हिडिओ गेममधला ऑटोप्ले बघितल्यासारखं खरं आयुष्य जगावं लागेल, नाही का?

थायलँड आणि ब्राझीलच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये ‘झॉम्बी फंगस’ नावाची एक बुरशी मुंग्यांच्या विश्वात काहीसा असाच धुमाकूळ घालत असते.

तिचं शास्त्रीय नाव ‘ऑफिओकॉर्डिसेप्स युनिलॅटरिस’ आहे.

कॅम्पोनोटिनी प्रजातीच्या मुंग्यांना या बुरशीचा संसर्ग झाला की त्यांची काही धडगत नसते.

बुरश्यांचे बीजाणू हवेत सेकंदाला तीस हजार एवढ्या दराने पसरू शकतात.

झॉम्बी बुरशीचा एखादा बीजाणू नेमका मुंगीच्या शरीरावर जाऊन पडला, आणि तिथे तो स्थिरावला, की मग त्या मुंगीचं छळसत्र सुरु होतं.

अशा मुंगीच्या स्वभावात बदल होतो.

मुंगी हा एक शिस्तबद्ध, वारुळातला साठा भरण्यासाठी रांगेमध्ये खाद्य गोळा करणारा कामगार प्राणी असतो.

आता ही मुंगी पछाडल्यागत विचित्र वागू लागते.

कारण ती मुंगी आता झॉम्बी बुरशीला वश झालेली असते.

बुरशी तिला हवी तशी मुंगीला नाचवते.

बुरशीच्या वाढीला अनुकूल अशा ठिकाणी मुंगीला जायला ती भाग पाडते.

बुरशीला हवा तेवढा ओलावा, बुरशीला हवा तेवढाच प्रकाश; जमिनीपासून साधारण २५ सेंटीमीटर उंचीवर लटकणाऱ्या एखाद्या पानाच्या मधल्या शिरेभोवती, किंवा एखाद्या खोडावर स्वत:ची नांगी खोचून बसते – आणि मरते.

तिच्या शरीरातल्या बुरशीला वाढण्यासाठी हवं असलेलं खाद्य ही मुंगी स्वत:च्या प्रेतामार्फत पुरवत राहते.

मुंगीच्या शरीरात शिरकाव केलेल्या झॉम्बी बुरशीचे बीजाणू सुरुवातीला स्वतंत्र एकपेशीय जिवाच्या स्वरूपात वावरत असतात.

ते स्वतंत्रपणे प्रजनन करत सुटतात, कालांतराने एकमेकांना जोडले जातात, आणि हळूहळू मुंगीच्या शरीरात स्वत:ची अख्खी वसाहतच निर्माण करतात.

ही वसाहत मुंगीच्या स्नायूंवर ताबा मिळवते.

गंमत म्हणजे, मुंगीच्या हालचालीवर ताबा मिळवणारी ही बुरशी मुंगीच्या मेंदूत मात्र शिरत नाही.

संशोधकांच्या मते ही बुरशी अशी रसायनं स्रवत असावीत, ज्यामुळे मेंदूकडून शरीराला इशारे मिळणंच बंद होतं.

त्यामुळे शेवटपर्यंत मुंगीचा मेंदू शाबूत असतो, पण तो बिनकामाचा असतो, मुंगीचं शरीर आता बुरशीचं गुलाम झालेलं असतं.

नांगी खोचून बसलेल्या मुंगीच्या डोक्यातून साधारण वीसेक दिवसांनी एक देठ उगवतो.

या देठाला बोंड येऊ लागतात, आणि हे बोंड फुटले की त्यांतून हजारो बीजाणू हवेत पसरतात.

Ophiocordyceps unilateralis

जर ही मुंगी बुरशीची बळी पडताना तिच्या वारुळाजवळच असली, तर बुरशीचं काम आणखीनच सोपं होतं.

एका मुंगीमधून निघणारे बीजाणू आजुबाजूच्या अनेक मुंग्यांना गुलाम करून घेतात आणि बुरशीची वसाहत फोफावत राहते.

एका चौरस मीटर क्षेत्रात सरासरी २० ते ३० मुंग्या या बुरशीला बळी पडू शकतात.

जर्मनीमध्ये एका अतिप्राचीन जीवाश्म (fossil) पानावर अशाप्रकारे मुंगीच्या दंशाच्या खुणा सापडल्या आहेत.

हे पान ४.८ कोटी वर्षं जुनं आहे. कल्पना करा, या बुरशीने आत्तापर्यंत कित्येक कोटी मुंग्यांचा जीव घेतला असेल!!

जीवो जीवस्य जीवनम् हा सृष्टीचा नियम आहे हे मान्य!

पण निसर्गाने नेमलेल्या या स्वच्छता कामगारावर असे हाल हाल होऊन मरायची वेळ यावी, हे किती दुर्दैवी आहे!

असं मरण कोणालाही येऊ नये!

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *