सात या आकड्यात एवढं विशेष काय आहे?

सात आकडा ही ईश्वरी संख्या समजली जाते. समृद्ध जीवन, आनंद, नूतनीकरण आणि परिपूर्णतेसारख्या अस्तित्वातल्या प्रत्येक सकारात्मक आणि मौल्यवान वस्तूंचं ते एक प्रतीक आहे.
काही अंकशास्त्रज्ञ विश्वासाने असंही सांगतात की सातवा क्रमांक इतका परिपूर्ण आणि सामर्थ्यवान आहे की तो थेट मानवजात व विश्वामधल्या दुव्यात एखाद्या जोड-सांध्यासारखं काम करतो.
क्रमांक सात ही महत्त्वाची आध्यात्मिक संख्या आहे. तिचा उपयोग गूढवाद, आंतरिक शहाणपण आणि सखोल अंतर्ज्ञान वगैरे बाबी जाणून घेण्यात सररास केला जातो.
म्हणूनच की काय पण जगातले असंख्य संदर्भ या सातच्या अवतीभवती रचले गेलेले आहेत आणि त्याचे उल्लेख थोड्याफार फरकाने सात खंडांमध्ये विभागलेल्या या पृथ्वीतलावरच्या प्रत्येक मुख्य धर्मांत आढळून येतात. ते कसे हे आता आपण बघणार आहोत.
मानसशास्त्रीय महत्त्व
१९५६ मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या जॉर्ज मिलर यांनी मानसशास्त्रातील एक अभिजात शोध निबंध लिहिलाय. त्यामध्ये त्यांनी हे सप्रमाण सिद्ध केलंय की बहुतेक लोक त्यांच्या अल्प-मुदतीच्या स्मृतीत अंदाजे सात गोष्टी साठवू शकतात.
मानवाचा मेंदू ज्या कवटीत बसवलेला आहे तिलाही नेमकी सातच भोकं आहेत. दोन कान, दोन डोळे, दोन नाकपुड्या आणि एक तोंड. इतकंच नाही तर सात मुख्य तंत्ररचनांवरच आपलं मानवी शरीर कार्यरत असतं.
मानवाच्या कवटीला सात भोकं असतात

 

स्वप्नात सात हा आकडा दिसणं याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात.
सगळ्यात महत्त्वाचा अर्थ मात्र ‘आपण आपल्या जीवनात बदल करण्याची वेळ आली’ आहे असं सांगतो.
झोपेत सात आकडा दिसणं हे परिपूर्णता दर्शक समजलं जातं परंतु सतत होणारं साताचं दर्शन हे अंतर्मनातल्या कुठल्यातरी संघर्षाची जाणीव करून देत असतं.
वारंवार होणारं हे ‘सप्तदर्शन’ मनामध्ये खोल कुठेतरी दडपल्या गेलेल्या गोष्टीबद्दल आणि त्या गोष्टीमुळे उद्भवू शकणाऱ्या एखाद्या आगामी धोक्याबद्दल आपल्याला पूर्वसूचना देत असतं असं म्हटलं जातं.
सात आकड्याचं गणितातलं महत्त्व
गणितामध्ये सात हा आकडा ‘प्राईम नंबर’ किंवा मूळसंख्या म्हणून ओळखला जातो. हे ‘प्राईम नंबर्स’ केवळ स्वतःने आणि १ या आकड्यानेच विभाजित केले जाऊ शकतात.
पहिल्या दहा संख्यांमध्ये सात ही सगळ्यात महत्त्वाची इष्टतम मूळसंख्या समजली जाते.
तीन पूर्णांकांच्या वर्गांची बेरीज म्हणून दर्शवता न येणारी सात ही सर्वात छोटी नैसर्गिक संख्या आहे.
सात ही खरी तर चौथी मूळसंख्या असूनही ती मर्सेन प्राइम, न्यूमन–शॅक्स–विल्यम्स प्राइम, वुडल प्राइम, फॅक्टोरियल प्राइम, लकी प्राइम, हॅपी नंबर (हॅपी प्राइम), सेफ प्राइम (एकमेव मर्सेन सेफ प्राइम) आणि चौथा हेगनर क्रमांक म्हणूनही ओळखली जाते.
गणितज्ञांना आणि माझ्यासारखा गैर-गणित्यांना या मूळसंख्येनं नेहमीच भुरळ घातलेली आहे.

 

अवकाशातही सात आकड्याचा धुमाकूळ

 

पृथ्वीभोवतालच्या तारका विश्वात सातव्या क्रमांकास एक प्रबळ स्थान आहे. हे स्थान नुसत्या डोळ्यांना दिसू शकणाऱ्या सात ग्रह ताऱ्यांच्या संख्येशी आणि त्या ग्रहांशी जोडल्या गेलेल्या धातूंशी संबंधित आहे.
मंगळ व लोखंड, शुक्र आणि तांबे, शनि आणि शिसे, बृहस्पति आणि कथील, बुध आणि पारा, चंद्र आणि चांदी आणि शेवटचं म्हणजे सूर्य आणि सोने.
हे सगळे ग्रह तारे ज्या आकाशात चमकत असतात त्याच आभाळात क्वचित दिसणारं इंद्रधनुष्य हेही परत सातच रंगांचं!
बारकाईने लक्ष दिल्यास, क्रमांक सात एक रहस्यमयी संख्यासुद्धा भासते.
उदाहरण म्हणजे प्रत्येक चांद्र्यचक्र सात दिवसांच्या चार कालावधींचं बनलेलं आहे.
दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर या एका चक्राचे एकूण दिवस असतात अठ्ठावीस! आता या संख्येवरच्या कल्पित गूढतेचे दार उघडण्यासाठी पहिल्या सात संख्यांची बेरीज करा बरं…
१ + २ + ३ + ४ + ५ + ६ + ७ काय आलं उत्तर? २८!!
हिंदू धर्मात सात या आकड्याभोवती बरंच काही गुंफलेलं आहे.

 

जन्मलग्न पत्रिकेतलं जोडीदाराचं समजलं जाणारं सातवं स्थान,
लग्नातले सात फेरे,
वधू-वराने एकत्र चालायची सप्तपदी,
लग्नातले सात प्रकारचे होम,
दोघांचं सात जन्मांचं नातं,
सप्तश्रृंग गडावरचं देवीचं शक्तिपीठ,
सप्तगिरी – तिरुमलाच्या सात टेकड्या,
कुंडलिनीची सात चक्रं,
सात ऋषी व त्यांची सात तारकामंडळं,
पवित्र अशा सात नद्या व सात समुद्र,
आद्य समजले जाणारे सप्तसूर,
सत् गुण, सात पापं/ व्यसनं,
सात आश्चर्य,
आठवड्याचे सात वार,
सात प्रकारचे स्वर्गलोक तर पृथ्वी धरून सात पाताळलोक,
सूर्याच्या रथाचे सात घोडे,
सात वायू मंडलं,
चिरंजीवी म्हणवले जाणारे, कलीयुगाच्या अंतापर्यंत अमरत्व मिळालेले सात पुरुष,
आयुर्वेदामधले सात मूळ घटक,
अनेक प्रकारचे धार्मिक सप्ताह,
सप्तपुरीमध्ये समाविष्ट असलेल्या सात प्राचीन नगऱ्या,
सप्तद्वीप,
सात मन्वंतरं,
सातशे श्लोकांची देवी स्तुती म्हणजे सप्तशती,
सात मातृका,
भानुसप्तमी,
रथसप्तमी,
वैशाख शुक्ल सप्तमी म्हणजेच गंगोत्पत्तीचा दिवस,
संस्कृत व्याकरणातले छंदरचनेसाठी वापरले जाणारे सात ‘मीटर्स’, इत्यादी व असे असंख्य ‘सप्तोल्लेख’ हिंदू जीवनपद्धती व सनातन धर्मात दिसून येतात.
समग्र बायबल हा धर्मग्रंथ मुळात सात प्रमुख भागांमध्ये विभागलेला आहे.

 

१) कायदा
२) संदेष्टे
३) लिखाण किंवा स्तोत्रे
४) शुभवर्तमान व कायदे
५) सामान्य पत्र
६) पाॅलचे पत्र आणि
७) प्रकटीकरण पुस्तक.
बायबलमध्ये उल्लेखल्याप्रमाणे ही सृष्टी निर्माण करायला प्रभूला एकूण सात दिवस लागले होते.
ग्रंथात याच्या जोडीला स्वर्गातले व नरकातले सात दिवस, नोहाच्या (आपला मनू) बोटीवरच्या सात जोड्या, सात सैतान, सात महान पातकं, सात पवित्र दिवस, येशूचे सात अंश, येशूने दयाबुद्धीने दिलेले सात आशीर्वाद, केलेले सात चमत्कार असे कित्येक उल्लेख सात आकड्याभोवती गुंफलेले आढळतात.
प्रकटीकरणाच्या पुस्तकात सात चर्च, सात देवदूतांना वाटून दिलेले आहेत. इतर उल्लेखांमध्ये सात प्रार्थना मंडळं, सात शिक्के, सात रणशिंगं, सात मेघगर्जना व शेवटच्या सात पीडा आहेत. मृतांचं प्रथम पुनरुत्थान, चर्चसाठी तारण पूर्ण करणाऱ्या सातव्या कर्ण्याच्या आवाजावर सोपवलेलं आहे. संपूर्ण बायबलमध्ये सात या संख्येचा उल्लेख एकूण आठशे साठ वेळा केला गेलेला आहे.
इस्लाम धर्मामध्येही सात ही संख्या महत्त्वाची आहे.

 

मनुष्य निर्मितीसाठी देवाला लागलेले सात दिवस,
बायत अल् हिक्मा (house of wisdom) चे सात आधारस्तंभ,
पृथ्वीची सात आवरणं,
सात स्वर्ग व नरकाचे सात दरवाजे वा पायऱ्या,
पवित्र कुराणाच्या पहिल्या धड्यातल्या सात आयता,
हज आणि उम्रा यात्रेदरम्यान काब्याभोवती मारायच्या सात पवित्र प्रदक्षिणा,
मिना या जागी सैतानरूपी प्रतीकावर तीन वेळा फेकून मारायचे प्रत्येकी सात गोटे,
रोज सकाळी सबलीकरणासाठी खायचे सात खजूर, बालकाच्या सातव्या दिवशी करण्यात येणारा नामकरण विधी या उल्लेखांसोबतच कला, वास्तुकला, लोकसाहित्य, साहित्य आणि विधी पद्धतींसह अनेक धर्मनिरपेक्ष आणि धार्मिक मुस्लिम सांस्कृतिक निर्मितींमध्ये सात हा क्रमांक आहे.
पवित्र कुराणात सात या क्रमांकासाठी अंदाजे पंचवीस संदर्भ आहेत.
हे संदर्भ सहसा सात अवकाशं, सृष्टीचे सात कालखंड, सात गोष्टींचे गट किंवा इफिसससारख्या सात व्यक्तींबद्दलचे आहेत. कुराणातील सातव्या क्रमांकावरील स्पष्टीकरणात सर्वशक्तिमान निर्माता म्हणून देवाचा उल्लेख समाविष्ट आहे.
अशा प्रकारे, सातवा क्रमांक थेट दैवी सामर्थ्याशी जोडलेला आहे आणि मुस्लिम विश्वास आणि देवाचे चमत्कार यांची अभिव्यक्ती म्हणूनही त्याचं एक प्रतीकात्मक मूल्य आहे.
सात या संख्येने ब्रह्मांड व्यापलेलं आहे.

 

साधा जुगार खेळायचा फासा घेतला तरी त्याच्या कुठल्याही दोन विरुद्ध बाजूंची बेरीज सातच येते. कमी श्रम करून पैसे मिळवण्याचा सरकारमान्य मार्ग म्हणजे लाॅटरी. पाच रूपये द्या आणि पन्नास हजार कमवा. मजा म्हणजे जगभरात लाॅटरी वा जॅकपाॅटच्या (७७७) तिकीट आरक्षणात सगळ्यात जास्त बेटींग सात आकड्यावर लावलं जातं.
मध्ययुगात टॉवर ऑफ लंडनमध्ये टॉवर ग्रीनवर सात सरदारांना फाशी देण्यात आली आहे. रोमन अंक प्रणालीत सात अक्षरं वापरली जातात (I, V, X, L, C, D आणि M). संगीत सिद्धांतातल्या डायटॉनिक स्केलवरही म्हणजेच स्वरसप्तकात (F, C, G, D, A, E आणि B) सातच शुद्ध स्वर आहेत. रसायनशास्त्रातल्या आवर्त सारणीतही आवर्तांच्या सातच ओळी असतात. जपानमध्ये सर्वात लकी समजल्या जाणाऱ्या सात देवता आहेत आणि त्या सॅंटाक्लाॅजसारख्या नववर्षाच्या पहाटे खजिना भरलेल्या जहाजातून येतात आणि गोग्गोड जपानी बच्चेकंपनीला भेटवस्तू देतात. हातून आरसा फुटला तर पुढची सात वर्षं कमनशिबी जातात या साहेबी अंधश्रद्धेबरोबरच आपल्या साडेसातीचा उल्लेखही करून ठेवतो.
साहित्य

 

बाल साहित्यात, परीकथांत, ‘सिंदबाद आणि सात सफरी’, ‘हिमगौरी आणि सात बुटके’ सारखी सात आकड्याभोवती फिरणारी असंख्य कथानकं आहेत.
रोलिंग बाईंच्या हॅरी पाॅटर मालिकेत व्होल्डेमॉर्टने काळी जादू वापरून अमरत्व मिळवण्यासाठी एकूण सात हॉरक्रक्सेस तयार केलेले दिसतात.
‘सेव्हन पेजेस टू सक्सेस’ हे सात पानी, सात डाॅलरला मिळणारं पुस्तक कोणे एके काळी ‘बेस्टसेलर’ होतं.
नावामध्ये सात आकडा असलेली अनेक पुस्तकं त्या त्या वेळेच्या ‘बेस्टसेलर’च्या यादीत चमकून गेलेली आहेत. अगदी हेच नातं जगभरातल्या सिनेसृष्टीत आणि सात या संख्येत आहे.
अमेरिकेतल्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यावरही सात आकड्याचा बराच प्रभाव आहे.

 

तिच्या मुकुटावरती सात ‘स्पाईक्स’ आहेत. ते जगातल्या सात समुद्रांचं प्रतिनिधित्व करतात.
तिच्या मुकुटाखाली पंचवीस खिडकीवजा झरोके आहेत.
पाच आणि दोन, बेरीज सात. तिच्या हातातल्या मशालीभोवती सोळा पानं आहेत. एक आणि सहा, बेरीज सात.
या स्मारकाची उंची १५१ फूट आहे. करा बेरीज या अंकांची. उत्तर परत सातच!
MS Dhoni

 

भारतीय क्रिकेटमधला यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सात या आकड्याचं जवळचं नातं आहे.

 

धोनी साताला त्याचा नशीबवान क्रमांक मानतो.
एकतर माहीचा जन्म जुलैचा म्हणजे सातव्या महिन्यातला आणि त्यातही परत सात तारखेचा.
त्याच्या जर्सीचा क्रमांक, अगदी आयपीएलच्या जर्सीचासुद्धा सातच.
त्याने भारतीय संघाचं कर्णधार पद सांभाळायला सुरुवात केली ती २००७ साली आणि पहिल्या २०-२० विश्वचषकाचं जेतेपद देशाला मिळवून दिलं तेही २००७ मध्येच!
त्याने एकदिवसीय सामन्यातल्या सात हजार धावा पूर्ण केल्या तेव्हा ती पायरी गाठणारा तो भारताचा सातवाच फलंदाज होता. त्याच्या नावाचा एक परफ्युम आहे आणि त्याचं नाव देखील ‘7 by MS Dhoni’ असं आहे.

 

तर असा ‘सात’बद्दल शोधायला लागलो आणि हीऽऽ सगळी माहिती जमा झाली.
अजूनही बरीच माहिती आहे पण त्या सगळ्याच माहितीला ठोस आधार नसल्याने सगळाच उल्लेख लेखात केलेला नाही.
हे सगळं करूनही सर्व ठिकाणी सातचा आकडाच तेवढा जास्त महत्त्वाचा का याचं उत्तर काही अजून सापडलेलं नाही. बघा, तुम्हाला या संबंधी काही माहिती असेल तर अवश्य सांगा. समजावून घ्यायला, वाचायला आनंदच होईल.

हा लेख इतरांना पाठवा

सिद्धार्थ अकोलकर

आयुष्यभर विद्यार्थीदशा जपण्याची व जोपासण्याची प्रामाणिक इच्छा मनामध्ये बाळगावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *