हत्ती कधी उडी मारताना दिसलाय का?

उडी मारणं ही तशी सोपी क्रिया वाटते. कारण आपल्याला वर्षानुवर्षांची सवय झालेली असते.

नुकत्याच चालू लागलेल्या, कसाबसा स्वत:चा तोल सावरणाऱ्या लहान मुलाला जागच्या जागी उडी मारायचा प्रयत्न करताना पाहाल तेव्हा लक्षात येईल की उडी मारणं वाटतं तेवढं सोपं नसतं.

उडी मारणं हे सायकल चालवायला शिकण्यासारखं असतं. जोवर जमत नाही तोवर खूप कठीण वाटतं, पण एकदा जमू लागलं की ‘हात्तिचा, किती सोप्पंय’ असं वाटू लागतं.

आयुष्यात सोप्या वाटणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात.

हत्तीसारखी बाई उ़डी मारते

हत्ती असा प्राणी आहे ज्याला काही केल्या उडी मारता येत नाही.

याचं मुख्य आणि साधं सोपं कारण म्हणजे त्यांना उडी मारायची गरजच नसते. वर वाळत घातलेली चड्डी काढण्यासाठी आपण हात उंचावून उडी मारतो, पण जर एखाद्या हत्तीला स्वत:ची वाळत घातलेली चड्डी काढायची गरज पडली(!!), तर तो फक्त स्वत:ची सोंड उंचावून ती सहज खाली काढू शकतो.

दुसरं असं, की हत्ती एवढा अवाढव्य असल्याने भक्ष्यासाठी त्याची शिकार करणारे प्राणी फारसे नसतातच. जेवढे असतात त्यांपासून स्वत:चं रक्षण करण्यासाठी आपला अवाढव्य आकार आणि अंगातली ताकद त्यांना पुरेशी असते.

माकडाप्रमाणे टुणकन् उडी मारून कोणाही शिकाऱ्यापासून लांब पळायची वेळच हत्तीवर येत नाही.

तिसरं असं की हत्ती कळपात राहतात. त्यामुळे एखाद्या सिंहाच्या कुटुंबाला हत्तीचं मांस खायची हुक्की आली, तरी एकटा हत्ती गाठणं खूप कठीण असतं. तो गाठला तरी त्याला गारद करणं तितकंच कठीण.

हत्ती उडी मारत नसल्याचं सगळ्यांत स्वाभाविक कारण म्हणजे त्याचं वजन.

चार टनाचं वजन असणारं जाडजूड धूड जमिनीवरून चेंडूचा टप्पा पडावा तसं उडवणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे का!

इतर प्राण्यांच्या पायांच्या रचनेत आणि हत्तीच्या पायाच्या रचनेत जरा फरक असतो. हत्तीच्या पायाची हाडं पुरेशी लवचिक नसतात, आणि इतर प्राण्यांच्या मानानं त्यांच्या पायांचे स्नायू जरा अशक्त असतात. त्यामुळे त्यांच्यावर जोर देऊन उडी मारणं हत्तीसाठी अशक्य असतं.

इतकंच काय, हत्ती फारशी धावाधावसुद्धा करत नाहीत. ते भरपूर चालतात, पण शक्यतो धावणं टाळतात, आणि धावले तर थोडंसंच अंतर धावून जातात.

धावत असतानाही त्यांना उडी मारता येत नाहीच. त्यांचा एक पाय तरी जमिनीला टेकलेला असतोच, त्यामुळे ठरवून उडी सोडाच, पण हत्तींना चुकूनसुद्धा उडी मारता येत नाही.

हत्तीचा पाय

पण हत्तीला उडी मारता येत नाही, हे पूर्णपणे सिद्ध करणंही कठीणच आहे.

तूर्तास अभ्यासकांनी लावलेला हा एक अंदाज आहे. हत्तीने ठरवलं तर त्याला कदाचित उडी मारता येत असेलही, पण उडी मारायला जाऊ आणि तोंडावर पडू; कशाला नसते उपद्व्याप करायचे, त्यापेक्षा ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ असा विचार करून हत्ती उडी मारायच्या फंदात पडत नसावेत, अशीही शक्यता आहे.

सजीवांची उत्क्रांती कालौघात त्यांच्या बदलत्या गरजेनुरुप होते.

एखादा प्राणी उडी मारल्याशिवाय कसा काय राहू शकतो, असा प्रश्न आपल्यासारख्या मर्कटवंशजांना पडणं साहजिक आहे.

उडी मारणं ही आपल्यासाठी एक स्वाभाविक क्रिया आहे. ते आपल्यासाठी केवळ आत्मसंरक्षणाचंच नव्हे, तर मजामस्ती करण्याचंही एक साधन आहे.

पण हत्तीला त्याची गरज नाही. दूरवर उद्भवणारी जमिनीतली कंपनं आपल्या पुढच्या पायांनी हेरणारा हत्ती उडी मारू शकत नसला, तरी निसर्गानं दिलेल्या इतर वरदानांचा पुरेपूर लाभ घेत जगत असतो.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *