पक्षी नेमके खातात कसे? त्यांना दात का नसतात?

पक्षी फळांचे रस पिऊन तर जगत नाहीत. छोटे मोठे कीटक, उंदीर, घुशी, साप, मासे हे पक्ष्यांचं मुख्य अन्न असतं.

अशी भक्ष्यं खाऊन ती पचवायची तर ती नीट चावायला नको? पण पक्ष्यांना तर दात नसतात.

मग पक्षी ही भक्ष्यं कशी पचवतात? आणि मुळात पक्ष्यांमध्ये आणि आपल्यामध्ये असा फरक का?

पक्ष्यांची पचनसंस्था

पक्षी चोचीनं त्यांच्या भक्ष्याचे छोटे छोटे तुकडे करून मग त्याचे घास अख्खे गिळतात.

पक्ष्यांच्या जठराचे दोन भाग असतात.

एक भाग आपल्या जठरासारखाच असतो, ज्यामध्ये खाल्लेल्या अन्नाचं विघटन करण्यासाठी विविध विकर (एन्झाइम्स) स्रवले जातात.

Gizzard of Chicken
कोंबडीची पेषणी
पण पक्ष्यांच्या जठराचा एक दुसरा भाग असतो, जो माणसांच्या शरीरात आढळत नाही. या पीळदार अवयवाला पेषणी म्हणतात.

पेषणीमध्ये पक्ष्यानं गिळलेल्या अन्नाचं दळण होतं.

थोडक्यात, माणसाच्या शरीरात जे काम दातांचं, तत्सम काम पक्ष्यांच्या शरीरात पेषणी करते.

अंड्यातून बाहेर आणणारा दात

Poicephalus senegalus -egg tooth -two weeks-21July07
अंड्यातून बाहेर पडून दोन आठवडे झालेलं पोपटाचं पिल्लू. चोचीच्या टोकाशी अंडं फोडण्यासाठीचा दात दिसतो आहे.
जवळजवळ सगळ्या पक्ष्यांना अंडं फोडून बाहेर येण्यासाठी मदत व्हावी म्हणून चोचीवर एक दातसदृश किंवा शिंगसदृश अवयव उगवतो. एकदा अंडं फोडून बाहेर आले, की कालांतराने हा ‘दात’ गळून जातो नाहीतर चोचीतच बुजून जातो.

याला अपवाद आहे किवी हा पक्षी. किवी पक्ष्याला अंड्यातून बाहेर पडायला मदत करणारा दात नसतो. म्हणून त्याचं पिल्लू सीआयडीमधल्या दयासारखं लाथा मारून अंड्यातून बाहेर पडतं.

टोमिया – म्हटलं तर दात, म्हटलं तर भलतंच!

काही पक्ष्यांच्या तोंडामध्ये दातासारखी रचना असते खरी, पण आपल्याला दातांकडून अभिप्रेत असतं तसं या दातांचं काम नसतंच. उदाहरणार्थ, युरोपात आणि पश्चिम आशियात आढळणाऱ्या ग्रेलॅग हंसाला दात असतात, पण अन्न चावून चावून खाण्यासाठी त्यांचा वापर होत नाही.

Greylag goose (Anser anser) head
ग्रेलॅग हंस
दातांच्या पूर्ण रचनेसाठी एनॅमल नावाचं नैसर्गिक दंतकवच आवश्यक असतं. म्हणून आपले दात एवढे टणक असतात.
हंसांना असलेल्या या ‘दातांना’ एनॅमलचं कवच नसतं.

शास्त्रज्ञ या दातांना टोमिया म्हणतात. या तोतया दातांचा उपयोग हंसांना गवत तोडायला आणि गोगलगायीसारखे निसरडे प्राणी घट्ट पकडून ठेवायला होतो.

पण तोंडात घेतलेल्या घासाचा चावून चावून चोथा करणं हे या टोमियांचं काम नव्हे.

पेंग्विन पक्ष्याचं वैचित्र्य – जिभेवर दात

इथेही पुन्हा तेच! म्हटलं तर हे दात आहेत, कारण दिसतात तरी तसेच. पण दातांचं काम करत नाहीत, तर दात म्हणावं तरी का? खाण्यासाठी जे भक्ष्य पेंग्विनने तोंडात पकडलेलं असतं, ते गिळण्यापूर्वीच निसटून जाऊ नये, म्हणून पेंग्विनच्या जिभेवर हे दात किंवा काटे असतात.

African Penguin (30879934488)

नाहीतरी भक्ष्य गिळायचंच असतं, आणि कदाचित म्हणूनच पक्ष्यांना फारशा चवी कळत नाहीत. त्यांच्या चवीच्या ग्रंथी तेवढ्या विकसित नसतात.

बहुतेक पक्ष्यांना आंबट, कडू, खारट आणि चमचमीत हे चारच स्वाद ओळखता येतात (पक्ष्यांना गोड चव कळत नाही); पण पेंग्विन पक्ष्याच्या नशिबात एवढीही खवय्येगिरी लिहिलेली नसावी.

तो बिचारा फक्त आंबट आणि खारट या दोनच चवी ओळखू शकतो. यासाठी तो ज्या तापमानात राहतो ते कारणीभूत असू शकतं असा अंदाज आहे.

एकेकाळी पक्ष्यांना खरेखुरे दात असायचे

पेलॅगॉर्निस चिलेन्सिस या अवाढव्य पक्ष्याचा जीवाश्म चिले देशामध्ये सापडला.

हा पक्षी एवढा मोठा होता की त्याने पंख पसरले की त्याची लांबी ५.२ मीटर म्हणजेच १७ फूट एवढी व्हायची.

Pelagornis chilensis 1
पेलॅगॉर्निस चिलेन्सिस
पेलॅगॉर्निस चिलेन्सिस या पक्ष्याच्या तोंडामध्येही मोठ्या दातांसारखी रचना होती. हा पक्षी पेलॅगॉर्नीथिडे कुळाच्या पक्ष्यांमध्ये गणला जातो. पेलॅगॉर्नीथिडे हे अस्तंगत झालेल्या भव्य सागरी पक्ष्यांचं कुळ आहे. या पक्ष्यांना तोतया दात असत.

Archaeopteryx lithographica (Berlin specimen)
आर्किओप्टेरिक्स जीवाश्म
आर्किओप्टेरिक्स हा सगळ्यांत जुना पक्षी मानला जातो. १५ कोटी वर्षांपूर्वी आजच्या दक्षिण जर्मनीचा भूखंड विषुववृत्ताजवळ असताना तिथे या पक्ष्याचं वास्तव्य होतं.

त्याचा पहिला जीवाश्म (फक्त एक पीस) १८६१ साली सापडला.

या पक्ष्याचे आत्तापर्यंत अकरा जीवाश्म सापडले आहेत.

आर्किओप्टेरिक्स हा डायनोसॉर आणि पक्षी यांमधला दुवा मानला जातो. पहिला पक्षी असल्यामुळे हा रचनेमध्ये आजच्या पक्ष्यांपेक्षा त्याच्या पूर्वज डायनोसॉरांएवढा जास्त होता.

ही स्थित्यंतरातून जाणारी जात होती. या पक्ष्याची सगळ्यांत मोठी जात १ फूट ८ इंच इतकी लांब वाढू शकत होती.

महत्त्वाचं म्हणजे, आर्किओप्टेरिक्सला छोटे छोटे दात असायचे.

मग पक्ष्यांच्या तोंडामधून हे दात गेले तरी कधी?

दातांच्या रचनेसाठी आवश्यक असणाऱ्या सहा जनुकांनी पक्ष्यांच्या जनुकीय रचनेमध्ये दांडी मारायला कधीपासून सुरुवात केली हे शोधायला शास्त्रज्ञांनी कंबर कसली.

त्यासाठी आजच्या पक्ष्यांच्या सर्व जातकुळींचं प्रतिनिधीत्व करू शकतील अशा ४८ जातींच्या जनुकीय रचनेचा, तिच्या इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला, आणि दातासाठी आवश्यक जनुकं निष्क्रीय करणारे बदल कसे झाले याचा शोध घेतला.

त्यातून असा निष्कर्ष निघाला की पक्ष्यांनी साधारण ११ कोटी ६० लाख वर्षांपूर्वी एनॅमल आणि डेंटिन (दंतिन) हे दातांच्या रचनेतले अत्यावश्यक घटक गमावले.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *