एखादी कृती कायद्यानुसार गुन्हा कधी ठरते हे जाणून घ्या

फौजदारी न्यायशास्त्राची (criminal jurisprudence) काही वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे, जो गुन्हेगार असतो त्याचा गुन्हा करण्यामागचा ‘हेतू’ खूप महत्त्वाची भूमिका निभावतो. त्यातही प्रत्यक्ष गुन्हा करतेवेळी आपण करत असलेल्या कृत्याचे भान आणि पुढे होणाऱ्या परिणामांची जाणीव गुन्हेगारास असणे, हे त्याला योग्य त्या शिक्षेस पात्र ठरवण्यासाठी खूप गरजेचे असते.

गुन्हा करण्यामागे असलेल्या ह्या हेतूला लॅटिनमध्ये mens rea असे म्हणतात. एखाद्याचा हेतू काय आहे, हे त्याने कृती केल्याशिवाय आपण जाणून घेऊ शकत नाही. अशी गुन्हेगारी कृती घडणे ह्याला actus reus असे म्हणतात.

म्हणून mens rea + actus reus = Crime हे फौजदारी न्यायशास्त्राचे मूलभूत सूत्र आहे.

म्हणजे गुन्हा घडण्यासाठी mens rea (हेतू) आणि actus reus (कृती) ह्या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. ह्या दोहोंपैकी एकाचाही अभाव असेल, तर तो गुन्हा ठरत नाही. म्हणजे जर समजा, एखादा माणूस हा फक्त विचार करतोय, की त्याला एका अमुक माणसाला ठार मारायचे आहे, पण ते फक्त त्याच्या डोक्यात आहे. ते जो पर्यंत कृतीत उतरत नाही (actus reus होत नाही), तो पर्यंत तो गुन्हा ठरत नाही. ज्या क्षणी ते कृतीत उतरलं, त्याक्षणी तो गुन्हा घडतो. इथे ‘कृती होणे’ म्हणजे त्याने प्रयत्न जरी केला, तरी तो गुन्हा ठरेल (भले ही तो प्रयत्न असफल का असेना !)

ह्यात फौजदारी स्वरूपाच्या निष्काळजीपणाचा (criminal negligence) देखील समावेश होतो. म्हणजे एखाद्याकडून निष्काळजीपणे गाडी चालवताना जर कुणाचा मृत्यू झाला, तर त्यात जरी ठार मारण्याचा हेतू नसेल, तरी निष्काळजीपणा हा फौजदारी स्वरूपाचा असल्यामुळे तो खून जरी नसला तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मात्र ठरेल. (सदोष मनुष्यवध – culpable homicide not amounting to murder म्हणजे निष्काळजीपणामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि खून – murder म्हणजे जेव्हा ठरवूनच एखाद्याला हेतुपूर्वक ठार मारले जाते)

आपण पाहिले की जेव्हा गुन्हेगारी हेतू (mens rea) असतो, पण कृती (actus reus) घडलेली नसते, तेव्हा तो गुन्हा ठरत नाही.

ह्याच्या उलट, जेव्हा फक्त कृती (actus reus) असेल पण त्यामागे हेतू (mens rea) नसेल तर?

म्हणजे गुन्हेगारी कृती घडलेली आहे, तसेच समोरच्याला (victimला / बळी ठरलेल्याला) जे नुकसान व्हायचे ते सुद्धा झालेले आहे. तरीही ती कृती करणारा मात्र, हेतू (mens rea) नसल्यामुळे गुन्हेगार ठरणार नाही!! हे प्रथमतः ऐकायला थोडे विचित्र वाटेल. पण उदाहरणांसकट सांगितल्यावर ते पटू शकेल.

गुन्हेगारी कृती (actus reus) घडलेली आहे, परंतु त्यात गुन्हेगारी हेतूचा (mens rea) अभाव आहे असे कायदा केव्हा मानतो ?

 

१. सात वर्षांखालील वय असलेल्या बालकाच्या हातून घडलेली कोणतीही कृती भारतीय दंड संहितेचे कलम ८२ नुसार अपराध मानली जात नाही.

तसेच भारतीय दंड संहितेचे कलम ८३ नुसार, जर वय ७ ते १२ मध्ये असेल तर मुलाची समजण्याची क्षमता किती आहे हे पाहिले जाईल.
जरी मुलगा समजण्याइतपत सक्षम असेल तरी त्याला पूर्ण शिक्षा न होता, वय १६ वर्षांच्या आत असलेल्या मुलांना ज्युव्हेनाईल (अल्पवयीन) जस्टीस कायद्यानुसार जास्तीत जास्त ३ वर्षे सुधारगुहात पाठवले जाईल.

म्हणजे इथे कायद्याने गृहीत धरलेले आहे की इतक्या अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी हेतू (mens rea) असू शकत नाही. परंतु दुसऱ्या कुणी वयस्क माणसाने अल्पवयीन मुलास प्रवृत्त केल्यास अथवा उत्तेजन/प्रलोभन दिल्यास त्याच्या हातून गुन्हा घडण्याची (किंवा घडवून आणला जाण्याची) शक्यता आहेच. पण तरी त्या गुन्ह्याची शिक्षा त्या मुलास न होता ज्याने प्रवृत्त केले (abettor) त्याला होईल.

२. मनोविकल व्यक्तीची कृती (IPC Section 84):

हे थोडं मजेशीर आहे. आपण ह्यात कायद्याचा दृष्टिकोन (Legal insanity) आणि मनोविकलतेबद्दल वैद्यकशास्त्राचा असलेला दृष्टिकोन (Medical insanity) ह्यातील फरक जाणून घेऊ.

IPC मधले कलम ८४ हे मनोविकल व्यक्तीने (unsound mind) केलेल्या कृतीला गुन्हा मानत नाही. (त्याने केलेल्या कृत्याच्या परिणामांची त्याला जाणीव नसल्यामुळे त्याला संरक्षण देते) पण इथे प्रश्न उभा राहतो की मनोविकलतेची व्याख्या काय आहे?

ह्या कलमामध्ये फक्त legal insanity चाच समावेश होतो (म्हणजे ते कृत्य करतेवेळी त्याचे परिणाम समजून घेण्यास मानसिकरीत्या अक्षम असणे). त्यात medical insanity अंतर्भूत नाही. Medical insanity म्हणजे मनोविकारांमध्ये काही विकार असे देखील आहेत (जसे OCD – Obsessive compulsive disorder) ज्यामध्ये कृत्य करतेवेळी, त्या कृत्यामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव मनोरुग्णाला असते, परंतु तरी तो त्या कृतीवर नियंत्रण करू शकत नाही.

उदाहरणार्थ kleptomania (क्लेप्टोमेनिया) हा असा विकार आहे, ज्यात मनोरुग्णाला सतत चोरी करावीशी वाटते. तो छोट्या छोट्या गोष्टींची चोरी करत राहतो, ज्याच्या परिणामांची त्याला जाणीव असते, परंतु त्याचे त्यावर नियंत्रण नसते. अशावेळी कलम ८४ हे त्याला संरक्षण देऊ शकणार नाही.

काही प्रगत देशांमध्ये अशा medical insanity साठी (गुन्हा पूर्ण माफ नसला तरी) कमी शिक्षेची तरतूद आहे. तसेच भारतामध्ये देखील Law Commission ने ह्या कलमात Medical insanity चा अंतर्भाव करण्यात यावा असे सुचवलेले आहे.

३. कुणी एखाद्याला त्याच्या नकळत जर मादक पेय किंवा नशेचा पदार्ध/औषध दिले असता अशा नशेतील अवस्थेत त्याच्या हातून घडलेली कृती (IPC Section 85):

जर तुम्हाला कुणी तुमच्या नकळत मादक पेय किंवा नशेचा पदार्ध/औषध दिले आणि परिणामी अशा नशेतील अवस्थेत तुमच्या हातून काही गुन्हेगारी कृत्य घडले, तर त्यासाठी तुम्हाला दोषी ठरवले जाणार नाही.

पण जर तुम्हीच मुद्दाम दारू प्यायलात किंवा मुद्दाम नशेचा पदार्थ घेतलात, तर अशावेळी मात्र तुम्ही केलेल्या गुन्हेगारी कृत्यासाठी दोषी ठराल! (IPC Section 86).

कारण असा नशा घेतेवेळी संभवणाऱ्या परिणामांची तुम्हाला जाण होती असे गृहीत धरले जाईल आणि अशा निष्काळजीपणाबद्दल तुम्हाला दंडित केले जाईल!

हा लेख इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *