नियम विष विज्ञानाचा – अति तिथे माती

कुठल्याही शास्त्रीय विषयाची टॅगलाईन तयार करण्याची जर स्पर्धा निघाली तर ‘टॉक्सिकोलॉजी’साठीची सर्वात परफेक्ट टॅग लाइन असेल “अति तिथे माती“. टॉक्सिकोलॉजी हा तसा सगळ्यांना माहीत नसलेला पण प्रत्येकाच्या आयुष्याला रोज स्पर्श करणारा शास्त्रीय विषय. मराठी आणि हिंदीमध्ये ‘टॉक्सिकोलॉजी’ला “विष विज्ञान” म्हणतात ते मला फारसं पटत नाही. पण वापरायला सोपा आणि ‘रूजेल’ असा वेगळा शब्द मिळेपर्यंत जागा अडवायला बरा आहे. माझी विष विज्ञानाशी ओळख तशी अपघातानेच झाली. एम एस सी ला असताना मी आमच्या प्राध्यापिका डॉ कणसे यांच्याकडे प्रोजेक्ट करत होतो. कणसे मॅडमना तेव्हा आयुर्वेद रस शाळेची ग्रॅण्ट होती, त्यांच्या काही औषधांचं टेस्टिंग करण्यासाठी. रसशाळेला बहुदा ती औषधे बाहेरच्या देशात विकायची होती आणि त्यासाठी ती खरंच उपयोगी आहेत हे प्रयोग करून सिद्ध करून दाखवायचं होतं . ज्यावेळी मी काम करायला लागलो तेव्हा जी दोन तीन औषधं होती ती सगळी लिव्हर सिऱ्होसिस साठीची होती. त्यांची नावं आता नीटशी आठवत नाहीत पण आम्ही जे मॉडेल वापरलं ते मात्र चांगलं आठवतंय. उंदरांना कार्बन टेट्राक्लोराईड नावाचं एक केमिकल आम्ही पंधरा दिवस रोज देत असू, इंजेक्शन मधून. त्यामुळे त्या बिचाऱ्या उंदरांना लिव्हर सिऱ्होसिस होत असे आणि मग आम्ही औषध टेस्ट करीत असू. त्या आयुर्वेदिक औषधांनी ते उंदीर बरे झाले का नाही हे मला आठवत नाही पण मला मात्र कार्बन टेट्राक्लोराइडने लिव्हर सिऱ्होसिस कसा होतो हा मोठा प्रश्न पडला. मॅडमना विचारलं तर त्यांनी मला अजून पेपर्स वाचायला पिटाळलं. जेव्हा वाचन सुरु केलं तेव्हा लक्षात आलं कि नुसतं कार्बन टेट्राक्लोराइड नाही तर जगातल्या प्रत्येक केमिलकचा माणसावर आणि निसर्गावर परिणाम होत असतो आणि त्याचा अभ्यास करणारी शास्त्राची जी स्वतंत्र शाखा आहे ती म्हणजे टॉक्सिकोलॉजी. अशा रीतीनं मला माझा विषय सापडला.

रसायनांचे मनुष्यावर, प्राण्यांवर आणि निसर्गावर होणारे दुष्परिणाम आणि त्यावर उपाय शोधणारं शास्त्र म्हणजे टॉक्सिकोलॉजी – विष विज्ञान. विषाची परीक्षा मानवाने बहुदा त्याच्या उत्क्रांतीमध्येच केली असावी. निसर्गतःच काही गोष्टी आपल्याला हानिकारक आहेत हे त्याने आणि इतर प्राण्यांनी सुद्धा जाणलं असावं. अर्थातच सुरवात झाली असणार ती प्राण्यांच्या विषानेच. साप, विंचू इत्यादी. परंतु पुढे जेव्हा धातूंचा शोध लागला आणि त्याचे विविध वापर चालू झाले तेव्हा मानवाच्या लक्षात आलं की हे धातूही विषारी असू शकतात – जर जास्त वापरले तर. विष विज्ञानाच्या इतिहासात सगळ्यात पूर्वी नोंद केलं गेलेलं विष म्हणजे आर्सेनिक. रोमन इतिहासात ह्याचे अनेक उल्लेख आहेत – विष म्हणून. आणि तसे भारतीय इतिहासात देखील आहेत. चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य आणि विषकन्येची ती स्टोरी तुम्हाला माहीत असेलच. परंतु आज विष विज्ञान ज्या प्रकारे वेगवेगळ्या रसायनाच्या दुष्परिणामांचा अभ्यास करतं त्याची सुरुवात पंधराव्या शतकात झाली. जर्मनीमध्ये. एक अत्यंत चक्रम डॉक्टर होता. फिलिपस ऑरेलियस थिओफ्रॅस्टस बॉम्बस्टस व्हॉन होहेनहाईम ह्या भक्कम नावाच्या ह्या डॉक्टरने त्याच्या काळात बरेच शोध लावले. पण तो येडा फारसा पॉलिटिकली करेक्ट नव्हता. त्या काळातल्या इतर डॉक्टरांचे विचार कसे चुकीचे आहेत हे तो बॉम्बस्टस पणे सांगत असे. अर्थातच त्याला बाकीच्या जर्मन डॉक्टर लोकांनी कट प्रॅक्टिस मधून बाहेर काढला. मग हा हिरो शेजारच्या ऑस्ट्रिया देशात गेला आणि पॅरासेलसस ह्या नवीन नावाने काम करू लागला. थोड्याच दिवसांत डॉक्टर पॅरासेलसस साहेबांना साक्षात्कार झाला जो त्यांनी एका वाक्यात मांडला, अर्थातच लॅटिनमध्ये – सोला डोसीस फॅसीट व्हेनेनम! म्हणजेच “डोस डिटर्मिन्स द पॉईझन“. पॅरासेलसस दादांचे हे तत्त्व आमच्या विष विज्ञानाचे मूलतत्त्व आहे. जगातील प्रत्येक गोष्ट ही विष होऊ शकते, फक्त तिचं प्रमाण ठरवतं की ती विष होणार की नाही. विष विज्ञानातील सगळ्यांत महत्त्वाचा विचार म्हणजे डोस – रसायनांची मात्रा. आणि विष शास्त्रातलं सर्वात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे “मात्रेनुरूप परिणाम” किंवा सोप्या भाषेत “डोस रिस्पॉन्स”! जर मात्रा जास्त झाली तर दुष्परिणामही त्याप्रमाणात जास्त होणार. अति तेथे माती – साधं सोपं तत्त्व!

आपल्या ह्या आधुनिक जगात जवळजवळ दहा कोटी वेगवेगळी रसायनं म्हणजे केमिकल्स आहेत. त्या प्रत्येकाचे मानवावर, इतर प्राण्यांवर आणि एकंदर निसर्गावर वेगवेळ्या मात्रेमध्ये वेगवेगळे परिणाम होतात. काही रसायने अगदी थोड्या मात्रेमध्ये सुद्धा अतिशय विषारी असतात. उदाहरणार्थ जगातल्या तमाम फिल्लमवाल्यांचं लाडकं सायनाईड. इतर काही रसायनं खूप मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्याशिवाय त्यांचे वाईट परिणाम दिसत नाहीत. उदाहरणार्थ आपण नेहमी वापरतो ती औषधं. माझं आवडीचं औषध घ्या – पॅरासिटेमॉल. ह्याची विषारी मात्रा बरीच मोठी आहे. चोवीस तासात ४ ग्रॅम वर पॅरासिटेमॉल घेतलं तर ते लिव्हरला खराब करतं. काही रसायनांची छोटी मात्रा अनेक वर्षं शरीरात गेली तरच ती विषारी ठरते. उदाहरणार्थ आर्सेनिक, पारा, जस्त ह्यासारखे धातू. टॉक्सिकोलॉजिस्ट, विष वैज्ञानिकाचं प्रमुख काम म्हणजे म्हणजे रसायनांची हानिकारकता शोधून काढणे – रिस्क असेसमेंट – हानिकारकता परीक्षण. विष वैज्ञानिक कोणत्याही प्रकारच्या संस्थेत काम करीत असो, त्याचं किंवा तिचं काम नेहमीच रसायनांची हानिकारकता मोजण्याचं असतं. हे परीक्षण खूप महत्त्वाचं असतं कारण त्यावरून ते रसायन औद्यागिक प्रक्रियेत तयार होत असेल तर त्याचा निचरा कसा करावा किंवा ते किती मात्रेमध्ये नदीच्या पाण्यात टाकून द्यावं, औषध असेल तर त्याचं किती प्रमाणात सेवन करावं, कीटकनाशक असेल तर ते किती प्रमाणात शेतात फवारावं इत्यादी निर्णय घेतले जातात. गंमत अशी की आपल्या नकळत आपल्या आधुनिक आयुष्याच्या प्रत्येक पैलुवर विष विज्ञानातील संशोधनाचा बाकीच्या कुठल्याही शास्त्रापेक्षा जास्त प्रभाव पडतो. तुम्ही जेवढ्या जास्त आधुनिक समाजात राहता तितका हा प्रभाव जास्त. युरोप-अमेरिकेतील लोकांच्या जीवनावर जेवढा विष विज्ञानाचा प्रभाव आहे तेवढा भारतातील आयुष्यावर नाही. अन्न, पाणी, हवा, कपडे, औषधं जे जे काही आपण विकत घेतो, तयार करतो, पिकवतो, वापरतो त्या सर्व गोष्टींचं विष वैज्ञानिक सर्वेक्षण केलेलं असतं. आपली एकंदर प्रगती नं थांबवता, मानवाला आणि निसर्गाला कमीतकमी त्रास कसा होईल ह्याचा विचार करणं हे विष वैज्ञानिकांचं काम आहे.

विष वैज्ञानिक तीन प्रकारचे असतात. कंपनीत काम करणारे, सरकारी नोकर आणि माझ्यासारखे मास्तर. कंपनीत काम करणारे विष वैज्ञानिक त्या कंपनीचं जे काही उत्पादन असेल त्याचं एकंदर हानिकारक परीक्षण करतात. सरकारी विष वैज्ञानिक ह्या कंपनीवाल्यांनी केलेलं परीक्षण बरोबर आहे का नाही ह्याची तपासणी करतात आणि सरकारी नियम ठरवतात. आम्ही मास्तर लोक चांगले विष वैज्ञानिक तयार करण्याचं आणि विष विज्ञानातील काही मुलभूत प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी संशोधन करण्याचं काम करतो. आमची इतर शास्त्रीय विषयांसारखीच एक सोसायटी आहे. सोसायटी ऑफ टॉक्सिकोलॉजी नावाची. मी तिथेच लहानाचा मोठा झालो. आमची दरवर्षीची मीटिंग हा माझ्या व्यावसायिक आयुष्यातला महत्त्वाचा भाग. सात-आठ हजार लोक येतात जगभरातून. त्यांचं संशोधन दाखवतात. आम्ही काही बरंवाईट केलं असेल तर ते बघतात. विद्यार्थ्यांना ह्या मीटिंगला जायला बक्षिसं मिळतात, अर्थातच गुणवत्तेनुसार. त्यासाठी संशोधनात्मक स्पर्धा असतात. पल्लवीला लै वेळा ही बक्षिसं मिळाली होती आम्ही विद्यार्थी असताना. मला पण एक दोन लागली होती (कशी काय कोण जाणे). एकंदर मस्त विषारी जत्रा असते.

बॅलन्स, संतुलन हे माणसाच्या जगण्याचं ध्येय असावं असं म्हणतात. कोणत्याही गोष्टीच्या प्रमाणाबाहेर आहारी जाऊ नये असं नेहमी सांगितलं जातं. कारण ‘डोस रिस्पॉन्स’ – मात्रेनुरूप परिणाम! ते जर्मन पॅरासेलसस बाबा लॅटीनमध्ये आणि तुमची-आमची आजी मराठीमध्ये जे एक अफाट सत्य सांगून गेले – ‘डोस डिटरमिन्स द पॉयझन’ म्हणजेच ‘अति तिथे माती’; ते आपलं हे ओ. बै. आयुष्य जगताना लक्षात ठेवलं की झालं!

हा लेख इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *