तिवर म्हणजे काय रे भाऊ???

दिनांक २३ एप्रिल २०१९ रोजी वसुंधरा दिन साजरा केला गेला. पण बहुतेक जणांना ‘वसुंधरा’ म्हणजे काय? असा प्रश्न पडला असेल, तर त्यांच्यासाठी ‘अर्थ डे सेलिब्रेट केला’ असं म्हणूया हवं तर. याच दिवशी एक बातमी वाचनात आली की बुलेट ट्रेनसाठी ५३,४६७ तिवरांची कत्तल करण्यास केंद्राची परवानगी! बातमीने अवाक् होतो न होतो तर एक नवीनच गोष्ट कळली की काही माणसांना तिवर म्हणजे काय हेच माहिती नसतं. काही लोकांना तर हा वृक्ष लागवडीचा प्रकार वाटतोय! म्हणून या विषयावर लिहावंसं वाटलं.

तर, तिवर म्हणजे काय??? जगात सामान्यपणे समुद्रकिनारी, त्याचप्रमाणे खाडीलगत आढळणाऱ्या आणि खाऱ्या पाण्यात वाढू शकणाऱ्या वनस्पतींना सामान्यतः mangroves, कांदळवनं किंवा तिवर असं म्हटलं जातं. खरं म्हणजे आपण तिवर हा शब्द सामान्यपणे समुद्रकिनारी आणि खाडीलगत आढळणाऱ्या, आणि खाऱ्या पाण्यात वाढू शकणाऱ्या सरसकट सर्व वनस्पतींसाठी वापरतो.

भारताच्या अखत्यारीत असलेली बेटं मिळून भारताला ७५१६.६ कि.मी. लांबीचा किनारी प्रदेश लाभलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबईला १६७ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. या समुद्र किनाऱ्यांतर्गत संपूर्ण भारतात आढळणाऱ्या ३५ प्रजातींपैकी महाराष्ट्रात तिवरांच्या एकूण १८ प्रजाती आढळतात. त्यातल्या १३ प्रजाती मुंबई आणि आसपासच्या परिसरात आढळतात. मुंबई आणि जवळपासच्या प्रदेशामध्ये म्हणजे वांद्रे, वर्सोवा, शिवडी, मनोरी, मालाड, मुंब्रा-दिवा, ठाण्याची खाडी, तसंच मिरा-भाईंदर, वसई-विरार या भागांत कांदळवनांचं अस्तित्व आढळतं. बुलेट ट्रेनसाठी कत्तल केली जाणारी तिवरं मुख्यत: मिरा-भाईंदर आणि वसई-विरार या पट्ट्यातली आहेत.

तिवरांची वैशिष्ट्यं:
 • खाऱ्या पाण्यात दलदलीच्या जागी आरामात वाढतात.
 • दलदलीच्या जागी वाढण्याकरिता श्वसनासाठी वेगळी मुळं विकसित होतात. या मुळांना न्युमॅटोफोर्स (Pneumatophores) म्हणतात. खाऱ्या पाण्यातील मीठ बाहेर टाकण्यासाठी विशेष ग्रंथी विकसित झालेल्या असतात.
 • या वनस्पतींच्या बिया वनस्पतीवरच अंकुरित होऊन पूर्ण विकसित झाल्यानंतर जमिनीवर पडतात आणि मग त्यांची वाढ होते. त्यांच्या या क्षमतेला जरायुजता (vivipary) असं म्हणतात. या वनस्पतीवर वाढणाऱ्या बीला प्रोपाग्युल (Propagule) असं म्हणतात.
तिवरांचे प्रकार:

तिवरांचे काळी तिवरं, लाल तिवरं आणि पांढरी तिवरं असे प्रामुख्याने ३ प्रकार केले जातात.

काळी तिवरं सामान्यतः समुद्र किनाऱ्याजवळ जास्त दलदलीच्या प्रदेशात वाढतात. ही तिवरं समुद्र किनाऱ्यापासून दूर, जिथे खारं पाणी कमी प्रमाणात पोहोचतं, तिथेही वाढतात. कांदळवनांमध्ये या वनस्पती प्रामुख्याने आढळतात. या वनस्पतींमध्ये एविसिन्निया (Avicennia) कुळातील वनस्पतींचा समावेश होतो.

लाल तिवरं सामान्यतः समुद्र किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर जिथे खारं पाणी पोहोचतं, तिथे वाढतात. या प्रकारातील वनस्पतींची संख्या कांदळवनांमध्ये कमी प्रमाणात आढळते. रायझोफोरा (Rhizophora) कुळातील वनस्पतींचा या प्रकारात समावेश होतो.

पांढरी तिवरं समुद्र किनाऱ्यापासून लांब अंतरावर जमिनीजवळ आढळतात. यांची संख्या कांदळवनांमध्ये सर्वांत कमी असते.

इतर काही झुडुपांचीही वाढ कांदळवनांजवळ होते. यात प्रामुख्याने मेसवाक (Salvadorapersica), मारंडी (Acanthusilicifolius), वनजाई (Volkameriainermis) इत्यादींचा समावेश होतो.

तिवरांचे उपयोग:

तिवरांमध्ये अनेक बहूपयोगी वनस्पतींचा समावेश होतो. त्यातील काही प्रमुख उपयोग खालीलप्रमाणे:

 • तिवरं अनेक प्रकारच्या माशांसाठी निवारा म्हणून उपयोगात आणली जातात, यातील अनेक मत्स्यप्रजातींचा उपयोग अन्न म्हणून जगभरात केला जातो. तसंच या कांदळवनांचा अधिवास हा बहुतांश जलचरांच्या प्रजननासाठी अत्यंत अनुकूल ठरतो. तिवरं फक्त माशांसाठीच निवारा म्हणून उपयोगी येतात असा तुम्हांला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे, अनेक सस्तन प्राणी (जसे खोकड म्हणजे jackal), अनेक जातींचे पक्षी (जसे रंगीत करकोचा म्हणजे painted stork) सुद्धा तिवरांचा आश्रय घेतात.
 • तिवरांपासून स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर ज्वलनासाठी आणि घरासाठी लाकूड मिळतं. तिवरातील काही वनस्पतींचा उपयोग जनावरांसाठी चारा म्हणून केला जातो. त्याचप्रमाणे काही वनस्पतींचा औषधी म्हणूनही उपयोग केला जातो.
 • कांदळवनांची घनदाट मुळे जमिनीची धूप कमी करतात, त्याचप्रमाणे कांदळवने नैसर्गिक आपत्ती उदा. पूर, सुनामी या मध्ये संरक्षक भिंतीचं काम करून संभावित जीवित आणि वित्तहानी पासून संरक्षण करण्याचं महत्त्वाचं काम करतात.
 • वातावरणातील कार्बन शोषून घेऊन त्यापासून स्वत:चं अन्न तयार करून कांदळवनं प्रदूषणाचा धोका कमी करतात. असं दिसून आलं आहे, की जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींपेक्षा तिवरांची कार्बन शोषून घेण्याची आणि त्याची अन्नाच्या रुपात साठवणूक करण्याची क्षमता जास्त असते.
 • कांदळवनातील विविधतेचं योग्य प्रकारे संरक्षण आणि जतन केल्यास कांदळवन पर्यटनाचा एक नवीन उपक्रम सुरु करणे शक्य आहे. कोकण प्रांतात वेंगुर्ल्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे, तसंच भितरकणिका, ओडिशा इथेही याची चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होत आहे.

कांदळवनांना असलेले धोके:

तिवरांची उपयुक्तता ध्यानात घेता त्यांना बरेच धोके सुद्धा आहेत. त्यातील प्रमुख धोके खालीलप्रमाणे:

 • कांदळवनांमध्ये बांध घालुन भरती ओहोटीचं पाणी आत शिरू न देणं – यामुळे तिवरांची वाढ खुंटते आणि त्यांना धोका निर्माण होतो.
 • कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणं व बेकायदेशीर बांधकामं, अनियोजित नागरी विकास हे सुद्धा कांदळवनांच्या ऱ्हासाचं एक प्रमुख कारण आहे. सरकारने आता तिवरांच्या कत्तलीला दिलेली परवानगी हेसुद्धा अनियोजित नागरी विकासाचंच एक उदाहरण म्हणता येईल.
 • वेळोवेळी समुद्रात होणारी तेलगळती आणि समुद्रातील पाण्याचे होणारे प्रदूषण तिवरांच्या ऱ्हासाला कारणीभुत ठरतात.
 • कांदळवन परिसरात मोठ्या प्रमाणात टाकला जाणारा घनकचरा आणि प्लास्टिक यामुळे कांदळवनांभोवती असलेला विळखा घट्ट होत चाललाय.

हा लेख इतरांना पाठवा

धनंजय राऊळ

नमस्कार, मी धनंजय द. राऊळ, मी वनस्पती शास्त्रातुन माझे पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले असुन मला निसर्गातील जैवविविधता अभ्यासणे आवडते. निसर्गातील विविध घटकांचे छायाचित्रण करण्याचा मला छंद आहे. त्याचप्रमाणे नवनवीन जागी भटकंती करण्याचीही आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *