अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि जॉर्ज वॉशिंग्टनच्या कवळ्या

जॉर्ज वॉशिंग्टन हे नाव ऐकलं नसणारी मंडळी तशी कमीच असतील. अशांसाठी म्हणून सांगायला हवं, की जॉर्ज वॉशिंग्टनअमेरिकेचापहिला राष्ट्राध्यक्ष होता. आपण ऐकतो, वाचतो की ४ जुलै १७७६ रोजी अमेरिका हा स्वतंत्र देश जन्माला आला. प्रत्यक्षात ४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील तेरा वसाहतींनी ब्रिटिशांविरोधात स्वत:स स्वतंत्र म्हणून घोषित केलं होतं. त्याच्या वर्षभर आधीपासूनच, म्हणजे १९ एप्रिल १७७५ रोजीच ब्रिटीश आणि वसाहतींमधल्या युद्धाला तोंड फुटलं होतं. १७७८ साली या युद्धात फ्रान्स अमेरिकन वसाहतींच्या बाजूने, तर १७७९ साली स्पेन फ्रान्सच्या बाजूने या युद्धात उतरला. हे युद्ध ३ सप्टेंबर १७८३ रोजी पॅरिसचा तह झाल्यावर संपुष्टात आलं. या युद्धात वसाहतींच्या बाजूने लढणाऱ्या सैन्याची स्थापना १४ जून १७७५ रोजी झाली होती. संपूर्ण युद्धभर या सैन्याचं नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टनकडे होतं. या सैन्याचं नाव होतं कॉन्टिनेन्टल आर्मी.

फोटो स्रोत : pixabay.com

स्वतंत्र अमेरिकेच्या पहिल्या दोन्ही राष्ट्रीय निवडणुकांमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आला. १७८९ ते १७९७ एवढा काळ राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याची कारकीर्द होती. जॉर्ज वॉशिंग्टन अतिशय उंच आणि धिप्पाड, बळकट शरीरयष्टीचा, रुंद छाती आणि सिंहकटीचा माणूस होता असं त्याचं वर्णन केलं जातं. तो उत्तम घोडेस्वार होता. पण विशीतल्या वयातच त्याचे दात अशक्त व्हायला लागले होते. वयाच्या २४व्या वर्षीच त्याचा एक दात काढून टाकावा लागला होता. तशी त्याच्या रोजनिशीत नोंदही आढळते. राष्ट्राध्यक्ष असताना त्याचा फक्त एक खरा दात उरला होता. साहजिकच तो कवळ्या लावत असे. त्याच्याबद्दल वदंता अशी आहे की त्याच्या कवळ्या लाकडाच्या होत्या. पण हे खरं नसल्याचं आता उघडकीला येतंय. जॉर्ज वॉशिंग्टनकडे बऱ्याच कवळ्या होत्या आणि त्यांपैकी एकही लाकडाची नव्हती, हे आता इतिहास संशोधकांनी सिद्ध केलंय.

 

 

 

बरं मग? काय त्यात एवढं?

या कवळ्या कशापासून तयार करण्यात आल्या होत्या, हे समजलं की त्यांत विशेष काय हे लक्षात येईल. त्यांतले घटक पदार्थ वाचूया – सोनं, हस्तिदंत, शिसं, कथील आणिमाणसांचे, घोड्यांचे आणि गाढवांचेदात. माणसांचे म्हणजे नक्की कोणाचे बरं? असा कोण माणूस असेल ज्याची एवढी दैन्यावस्था झाली असेल, की पैसे मिळावेत यासाठी तो स्वत:चे निरोगी दात विकून टाकेल? अमेरिकेच्या बाबतीत उत्तर सोपं आणि स्वाभाविक आहे.

 

जॉर्ज वॉशिंग्टनच्या हिशेबवहीत ‘निग्रों’कडून १२२ शिलिंग्ज देऊन ९ दात विकत घेतल्याची नोंद आहे.

फोटो स्रोत : nytimes.com

विचार करा – स्वातंत्र्य, मानवाधिकार आणि समता या मूल्यांचा पुरस्कार करणारा नेता, अमेरिकेचा राष्ट्रपिता मानला जाणारा माणूस स्वत:च्या कवळ्यांसाठी आफ्रिकन गुलामांचे दात काढून घ्यायचा. इतकंच काय, तर घोड्यांचे आणि गाढवांचे दातही वापरायचा. ही माहिती नव्याने कळल्यावर अर्थातच एकविसाव्या शतकातील बहुतेक अमेरिकन नागरिकांना धक्काच बसला असेल. पण त्याकाळी स्वत:च्या कवळ्यांसाठी गुलामांचे दात काढून घेण्याची प्रथा उच्चभ्रू अमेरिकनांमध्ये खरोखर प्रचलित होती. जॉर्ज वॉशिंग्टन त्याला अपवाद का ठरावा? जे १२२ शिलिंग्ज दिल्याची नोंद हिशेबवहीत आढळते, ते तरी त्या निग्रो गुलामांच्या खिशात गेले, की त्यांच्या मालकांच्या, हे आपल्याला माहिती नाही.

 

 

अमेरिकन स्वातंत्रयुद्ध

पण या कवळ्यांमागचा हा व्यथित करणारा इतिहास सोडला तर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या संदर्भात त्यांचं आणखी एक महत्त्व आहे. जॉर्ज वॉशिंग्टन आपली प्रतिमा जपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असे. त्यामुळे त्याच्या दातांच्या अडचणी हा राष्ट्रस्तरीय पातळीवर गोपनीय ठेवण्यात आलेला विषय होता. युद्धादरम्यान जो पत्रव्यवहार चालायचा, त्यात एकदा जॉर्ज वॉशिंग्टनने आपल्या डेंटिस्टकडून कवळ्या साफ करायच्या वस्तू मागवल्या होत्या. या पत्रासोबत इतर अनेक पत्रं ब्रिटिशांनी वाटेत हस्तगत केली. असा पत्रव्यवहार शत्रुकडून पळवला जाण्याची शक्यता असल्याने खूपदा त्याला गंडवण्यासाठी चुकीचे, खोटे संदेश पाठवण्याची पद्धत असतेच. आणि सहसा शत्रुलाही त्याची कल्पना असते. ‘‘आपण फिलाडेल्फियाला जाण्याच्या शक्यता धूसर असल्याने दात घासायची साधनं न्यू यॉर्कच्या वेशीवरच पाठवावीत’’ असा उल्लेख वॉशिंग्टनच्या पत्रात होता. हे वैयक्तिक पत्र आहे, तर ते खरं असणार असं मानून त्याबरोबर पकडलेली इतर सगळी पत्रंही खरी असतील असा ब्रिटिशांचा समज झाला. त्यावरून न्यू यॉर्कभोवती असलेलं अमेरिकन आणि फ्रेंच सैन्य दक्षिणेकडे यॉर्कटाऊनला लॉर्ड कॉर्नवॉलिस या एकट्या पडलेल्या सेनानीच्या दिशेने कूच करणार नाही, असा अंदाज ब्रिटिशांनी बांधला. जॉर्ज वॉशिंग्टनने मात्र यॉर्कटाऊनवरच धाड टाकली, आणि १९ ऑक्टोबर १७८१ रोजी यॉर्कटाऊनला ब्रिटिश पूर्णपणे पराभूत झाले.

नायक आणि खलनायक या कल्पना आपल्या मनात असतात. इतिहास मात्र निर्विकार असतो. पण विशेष लक्षात घेण्यासारखी बाब ही की हे वास्तव समोर आल्यानंतर अमेरिकेत ‘हिंसक’ प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. बाल्टिमोरमधल्या ज्या दंत संग्रहालयाने कवळ्यांविषयीचं हे सत्य बाहेर आणलं, त्या संग्रहालयाची तोडफोड झाली नाही, किंवा संशोधकांना धमक्या दिल्या गेल्या नाहीत. यातून आपण काय तो बोध घ्यायला हवा.

 

 

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *