खंडाळ्याची राणी : वाघचौरा । वनी वसे ते…

एकदा पाऊस सुरु झाला की निसर्गप्रेमी मुक्तपणे वावरायला आतुर असतात. पाऊस हा एक वेगळाच ऋतू आहे. थंडी आणि उन्हामुळे काळवंडलेली आणि रापलेली ही धरती पाऊस आला की जणू कात टाकून उत्साहाने सळसळू लागते. हा पाऊस एकटा येत नाही बरं, तो आपल्याबरोबर घेऊन येतो असंख्य रंगीबेरंगी पाहुणे – म्हणजेच अगणित रंगीबेरंगी फुलं, निसर्ग पावसाळ्यात अगदी विविध रंगीबेरंगी फुलांची उधळण करत असतो. पावसाळ्याच्या सुरूवातीला हे प्रमाण कमी असलं तरी एकदा श्रावण, भाद्रपद सुरु झाले की निसर्गाचं ते रूप ज्याला भुरळ पाडत नसेल असा माणूस एकतर खोटारडा असेल किंवा अगदीच अरसिक. अशाच फुलांमध्ये एखाद्या रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या उतारावर आपल्याला खंडाळ्याची राणी आपली वाट पाहत उभी असलेली दिसेल.

भारताचा पश्चिम घाट हे एक अजब रसायन आहे एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला जमीन आणि दोघांमध्ये अडकित्त्यात सुपारी अडकावी तसा अडकलेला पश्चिम घाटाचा डोंगराळ प्रदेश. या प्रदेशात अनेक नानाविध फुलं, पक्षी, फळं, प्राणी बघायला मिळतात. म्हणूनच युनेस्कोच्या जागतिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीत याचा समावेश होतो. याच घाटात मिळणाऱ्या नानाविध फुलांमध्ये खंडाळ्याच्या राणीचा म्हणजेच ‘वाघचौरा’ या ऑर्किड वर्गीय फुलाचा समावेश होतो.

प्रतिमा : धनंजय राऊळ

खंडाळ्याची राणी ही ऑर्किड कुळातली वनस्पती आहे. पावसाचा बहर अंतिम टप्प्यात असताना यांचा बहर चालू होतो. म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर पर्यंत अधून मधून ही वनस्पती फुलत असते. या वनस्पतीला बरीच नावं आहेत, कोणी हिला वाघचौरा म्हणतं, तर कोणी खंडाळ्याची राणी, इंग्रजीत तर या झाडाला Butterfly Orchid किंवा Lady Susan’s orchid असंही म्हणतात. आदिवासी लोक या वनस्पतीला वाघचौरा म्हणतात. पेक्टीलीस या प्रकारचे १०४ उपप्रकार संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेले आहेत. यातील ३५ वनस्पती या प्रदेशनिष्ठ (Endemic) आहेत. पेक्टिलीस प्रकारातील वनस्पतींची घनता जास्त पाऊस असलेल्या खंडाळा-लोणावळा, महाबळेश्वर-चांदोली-कोयना आणि आंबोली-राधानगरी अशा प्रदेशांत आढळते.

वाघचौरा ही वनस्पती ३ फुटांपर्यंत उंच वाढते. त्याचप्रमाणे ही वनस्पती जमिनीवर गवताळ प्रदेशा आणि दलदलीच्या प्रदेशात वाढते. या फुलांना मंद मोहक सुगंध येतो. मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर जमिनीत सुप्तावस्थेत असलेल्या दोन कंदांपासून मजबूत हिरव्या खोडासहित चपटी पानं असलेले अंकुर फुटतात. या अंकुराची पूर्ण वाढ झाल्यानंतर या खोडाला कळ्या येतात, कधी कधी या फुलोऱ्याला सहा फुलं आलेली सुद्धा बघण्यात आलेली आहेत. या वनस्पतीची फुलं पश्चिम घाटात मिळणाऱ्या कोणत्याही ऑर्किड वर्गीय फुलापेक्षा मोठी असून त्यांचा पांढराशुभ्र रंग मन आकर्षून घेतो.

प्रतिमा : धनंजय राऊळ

ही वनस्पती हलका सुगंध व आकर्षक रंग आणि उत्सवांच्या काळात या वनस्पतीला येणारा बहर यामुळे बऱ्याच ठिकाणी गणेशोत्सव व इतर उत्सवांमध्ये या फुलांचा उपयोग केला जातो. जंगली जनावरं उदाहरणार्थ, डुक्कर वगैरेसारखे प्राणी जमीन खोदून याचे कंद खातात. त्याच प्रमाणे ही वनस्पती फुलली असता असंख्य कीटकांना आकर्षित करते.

सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेली रस्ते रुंदीकरणाची कामे, लागवडीखाली येणाऱ्या वन्य जमिनी आणि त्यातून नष्ट होणारे अधिवास, प्रदूषण, हवामान बदल या सर्व घटकांमुळे या वनस्पतीची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या सर्वांमुळे या वनस्पतीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.

पण ही वनस्पती बघायची तर पावसाळ्याची वाट बघावीच लागेल. वर उल्लेख केल्याप्रमाणे पावसाचे अंतिम दिवस आणि या फुलांच्या बहराचे दिवस एकत्र सुरु होतात, हा बहर मग हिवाळ्याची सुरुवात होईपर्यंत टिकतो. त्यानंतर मात्र एकदा फुलून झाला आणि जमिनीतील कंदात पुरेसा अन्नसाठा साठवून झाला की या वनस्पतीची पानं अन् फुलं सुकू लागतात आणि ही वनस्पती जमिनीच्या मायेच्या कुशीत विसावते, पुन्हा पुढच्या वर्षीच्या पावसात नव्या जोमाने तरारून येण्यासाठी…

हा लेख इतरांना पाठवा

धनंजय राऊळ

नमस्कार, मी धनंजय द. राऊळ. मी वनस्पती शास्त्रातून माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून मला निसर्गातील जैवविविधता अभ्यासणे आवडते. निसर्गातील विविध घटकांचे छायाचित्रण करण्याचा मला छंद आहे. त्याचप्रमाणे नवनवीन जागी भटकंती करण्याचीही आवड आहे.

4 thoughts on “खंडाळ्याची राणी : वाघचौरा । वनी वसे ते…

 • April 25, 2020 at 12:48 pm
  Permalink

  अप्रतिम…

  Reply
 • April 25, 2020 at 10:59 pm
  Permalink

  धन्यवाद.

  Reply
 • July 18, 2020 at 6:26 pm
  Permalink

  सुंदर लेख 👌
  आपल्या स्थानिक वनस्पती प्रजातींची मराठीत माहिती वाचायला खूप छान वाटतं.

  Reply
  • August 4, 2020 at 10:13 am
   Permalink

   धन्यवाद.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *