ही ॲप्स मराठी भाषेमध्ये वापरता येतात! मग तुम्ही का वापरत नाही?

आपण रोजच्या आयुष्यात आपल्याहून जास्त हुशार होऊ पाहणाऱ्या स्मार्टफोनमधली ॲप्स वापरत असतो.

या ॲप्सच्या उत्पादकांना त्यांची ॲप्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असतात. आणि त्यासाठी जास्तीत जास्त भाषांमध्ये अशी ॲप्स उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

अर्थातच, ॲपमधल्या कितीतरी बाबींचं भाषांतर करताना हे लोक मजा-मजा करून ठेवतात.

पण सगळीकडेच अशा चुका होत नाहीत.

किंबहुना, एखादं ॲप आपल्या भाषेत उपलब्ध आहे हे कळल्यावर, अशा चुका असणारच, हे गृहीत धरूनच आपण ते ॲप आपल्या भाषेत उघडून पाहतो… सहज कुतूहल म्हणून.

मग एक जरी चुकीचा शब्द आढळला, किंवा भाषांतर करताना एखादा अवजड वाटणारा, किंवा आपल्या सवयीचा नसलेला शब्द दिसला, की ‘कसलं भयंकर भाषांतर केलंय! आपल्याला नाही बुवा जमणार…’ असं म्हणून लोक लगेच ॲपची भाषा बदलून पुन्हा इंग्रजी ठेवतात.

त्यामुळे होतं काय, की या ॲपच्या उत्पादकांना भाषांतरातल्या त्रुटी सुधारण्यासाठी वापरकऱ्यांकडून प्रतिसादच मिळत नाही.

मग ते तरी कशाला ती भाषा सुधारत बसण्यासाठी आणखी मेहनत घेतील?

बरं, आपली रोजच्या वापरातली कितीतरी ॲप्स मराठीत उपलब्ध असतात, हे लोकांना माहिती तरी असतं का?

व्हॉट्सॲप, फेसबुक हल्ली बहुतेक सगळ्यांकडेच असतं, पण त्यातले किती जण त्याची भाषा बदलून स्वत:च्या मातृभाषेत वापरण्याचे कष्ट घेतात?

आकडेवारी माहिती नाही. पण फार कमी असेल एवढं नक्की.

एखादं ॲप मराठीतून का बरं वापरावंसं वाटत नसेल? असं काय भयंकर भाषांतर केलेलं असतं? चला एक नजर टाकूया.

असं काय बरं ‘भयंकर’ आहे या भाषांतरांमध्ये? जे काही केल्या समजतच नाही?

मान्य, की काही वाक्यरचना आपल्या सवयीच्या नाहीत, आणि चुकासुद्धा नक्कीच आहेत – ज्या ढळढळीतपणे दिसतायत; पण या चुका जर सुधारून हव्या असतील तर आधी त्या सुविधेचा वापर करायला तरी सुरुवात करा.

मग प्ले स्टोरवर ॲपचं रेटिंग देताना तुम्ही प्रतिक्रियेत लिहू शकता की मराठीत भाषांतराच्या त्रुटी आहेत त्या सुधारा.

सरळ सरळ गूगल ट्रान्सलेटर वापरण्याऐवजी जरा चांगले अनुवादक कामाला लावा.

जास्तीत जास्त उत्पादनं आणि सेवा मराठीत वापरायला सुरुवात करू तेव्हाच आपण दबावगट निर्माण करू शकू.

आणि मगच भाषेच्या संदर्भातील गुणवत्ता सुधारेल.

फेसबुकने तर मस्तच सोय केलेली आहे.

एका अर्थी वेठबिगारीच ती, पण ती जर केली तर आपल्या आणि आपल्या भाषेच्या पथ्यावर पडणारी.

फेसबुकवरच्या वेगवेगळ्या सूचनांसाठी आणि पर्यायांसाठी मराठीत प्रतिशब्द किंवा वाक्यं लिहून आणि बहुमताने निवडून देण्याची सोय फेसबुकने केलेली आहे. त्याची माहिती या पानावर मिळेल

पण लोकांच्या पुढाकाराशिवाय हे व्हायचं कसं? अनेकांना तर पडलेलीच नसते, नाही का?

‘जाऊ दे ना, काय फरक पडतो!’ असा आविर्भाव असतो.

तर अशा लोकांना सोडून, मराठी भाषेविषयी थोडासा तरी कळवळा असलेल्या इतरांना माझी एकच विनंती आहे.

आपलीच भाषा आपल्याला समजणं अवघड होईल अशी परिस्थिती जर स्वत:वर आणायची नसेल, तर निग्रहाने ही ॲप्स मराठीत वापरायला सुरुवात करा.

फार काही कठीण नसतं हो स्वत:चीच भाषा समजणं.

आपल्याला आपल्याच भाषेत असे पर्याय अशा ॲप्सवर पाहायची सवय नसते, म्हणून सुरुवातीला थोडं वेगळं वाटतं.

पण नंतर आपोआप सवय होते, सारं काही अंगवळणी पडतं, आणि तुम्हाला परत भाषा बदलावीशी वाटतच नाही.

हे मी स्वानुभवानं सांगतो.

एक-दोन किंवा फार तर फार चार दिवस पुरतात ॲप मराठीतून वापरायची सवय व्हायला.

मी माझ्या फोनमधली जी जी ॲप्स मराठीत वापरता येतील, ती सगळी मराठीत वापरतो.

अगदी डेस्कटॉपवरही जीमेल आणि युट्युबपासून सगळं मी मराठीतच वापरतो.

अजिबात गैरसोय होत नाही. आणि सहज सवय होते.

तेव्हा वाचकहो, तुम्हाला कळकळीची विनंती आहे, की आपल्या भाषेला व्यावहारिक मूल्य मिळवून द्या, तिची मागणी वाढवा.

जागतिकीकरणामुळे, आणि भारतीय मध्यमवर्ग आर्थिकदृष्ट्या प्रबळ होत असल्याने, भारतीय ग्राहकाचे हट्ट पुरवायला सध्या अवघं जग आसुसलेलं आहे.

अशा वेळी या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या भाषांचं महत्त्व वाढवायची ही नामी संधी आहे.

आंतरराष्ट्रीय उत्पादकसुद्धा सगळ्या सुविधा न मागता उपलब्ध करून देत आहेत.

फक्त आपणच कच खातोय, असं नको व्हायला.

आज जागोजागी आपल्या मातृभाषेचा वापर करणं आपल्या लोकांना व्यावहारिक (म्हणजे ‘प्रॅक्टिकल’) वाटत नाही.

स्वकीय भाषेविषयीची ही उदासीनता बदलायची ही सुवर्णसंधी आहे.

अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. ती वाया जाऊ देऊ नका.

फार कष्ट लागत नाहीत.

ॲपच्या सेटिंग्जमध्ये जा.

तिथे ॲप लँग्वेज (App Language) नावाचा पर्याय दिसेल.

त्यात जाऊन मराठी निवडा.

काहीकाही ठिकाणी फक्त हिंदी हाच पर्याय उपलब्ध असतो.

हरकत नाही, प्रयोग म्हणून तोसुद्धा निवडून पाहा.

पुरवठा होतोय, त्याला तोडीस तोड मागणीसुद्धा निर्माण करा.

चला, तुमच्या-माझ्या मराठी भाषेला सोन्याचे दिवस यावेत यासाठी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलूया.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

One thought on “ही ॲप्स मराठी भाषेमध्ये वापरता येतात! मग तुम्ही का वापरत नाही?

 • December 12, 2018 at 2:53 pm
  Permalink

  उत्तम माहिती. मी स्वतः मोबाईल ची भाषा मराठी केलेली आहे.
  त्यामुळे बरेचसे app आपोआप मराठी हीच भाषा घेतात.
  आता यात सवयीचा जो मुद्दा तुम्ही मांडला हा खरच खूप महत्त्वाचा आहे. मला स्वतः आता इतकी सवय झालीये की मराठीत हे सगळं वापरणं जास्त छान वाटतं.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *