अनुभव : देवकुंड धबधब्याचा ट्रेक

देवकुंडाचा ट्रेक करायचा हे फार वर्षांपासून मनात होतं, पण योग जुळून येत नव्हता. अखेर जेव्हा सावे टूर्सने देवकुंड ट्रेकच्या बॅचची तारीख जाहीर केली तेव्हा कसलाही विचार न करता मी बॅग भरली आणि शनिवारी रात्री सावे टूर्सची बस पकडली.
तसे सगळे अनोळखीच होते. पण कधीकधी प्रवासात अशी माणसं भेटतात की त्यांच्याशी अगदी घट्ट मैत्री होऊन जाते. आणि याच अनुभवांच्या जोरावर पूर्वी लाजरी बुजरी, भित्री भागुबई असणारी मी आता बिनधास्त एकटीने फिरायला लागले होते.

साधारण १२-१२.३० च्या दरम्यान आमचा प्रवास सुरू झाला. रात्रभर बसमधल्या त्या दीड फुटाच्या सीट वर, रामदेवबाबांच्या मला माहिती असलेल्या सगळ्या आसनांचा प्रयोग करून झाल्यावर, उशिरा केव्हातरी मला तासभर डोळा लागला. जाग आली तेव्हा पहाटेचे ५ वाजले असावेत. खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा मिट्ट काळोखात चांदण्या लुकलुकत होत्या आणि त्यांना साथ देत होते किर्र ओरडणारे रातकिडे.

आम्ही बेस व्हीलेजला, म्हणजेच भीरा गावात पोहोचलो होतो. नाश्ता करण्यासाठी गावातल्या शेलार मामांच्या घरासमोर बस थांबली. पहाटेच्या गारव्यात, चांदण्यांनी गच्च भरलेल्या आकाशाखाली बसून गरमागरम कांदेपोह्यांचा आणि कडक चहाचा आस्वाद घेताना, स्वर्गसुख म्हणजे हेच का? असं नकळत मनात येऊन गेलं.

भरपेट खाऊन झाल्यावर आम्ही भीरा धरणावर फेरफटका मारायला खाली उतरलो. एव्हाना उजाडायलाही सुरुवात झाली होती. आदल्या दिवशी पडलेल्या पावसाने निसरड्या झालेल्या पाऊलवाटेवरून हळूहळू पावलं टाकत आम्ही पाण्याजवळ पोहोचलो. दूरवर पसरलेलं ते भीरा धरण आणि त्यापलीकडचे उंच डोंगर सावकाश धुक्याच्या दुलईतून बाहेर पडत होते.

फोटो काढत, एकमेकांशी ओळख करून घेत आता सगळेच छान रमायलाही लागले होते. धरणावर थोडा वेळ घालवून आम्ही वर आलो. ट्रेक लीडर, सिद्धेश सावे याने छोटे छोटे खेळ खेळायला लावत नकळत सगळ्यांची एकमेकांशी मैत्री करून दिली. तेवढ्यात ग्राम पंचायतीच्या लोकांनी येऊन जंगलाचं दार उघडलं आणि आम्ही जंगलात प्रवेश केला.

दुतर्फा असलेल्या दाट झाडांमधून दूरवर गेलेल्या ओबडधोबड पायवाटेवरून आमचा ट्रेक सुरु झाला. साधारण ६-७ किलोमीटरचा पल्ला होता.

लहान मोठे वेडेवाकडे वाहणारे ओढे पार करत आम्ही चालत होतो. आळसाटलेल्या ताम्हिणीच्या जंगलाला हळूहळू जाग येत होती. मोबाईलचं नेटवर्क केव्हाच बंद झालं होतं. पण, त्यामुळे निसर्गाकडे डोळसपणे पाहता येत होतं.

मोठाल्या वारुळातून ये-जा करणाऱ्या मुंग्या, नाजूकपणे विणलेल्या कोळ्यात शिकार खाण्यात मग्न असणारी मादी कोळी आणि दुरून तिला स्वस्थपणे पाहणारा नर, पानावर पडलेल्या दवाच्या थेंबाला हलकेच स्पर्श करणारे सूर्यकिरण.. तसं पाहिलं तर आपल्यासाठी अगदीच क्षुल्लक असणाऱ्या या गोष्टी.. पण मोबाईलमध्ये पोर्ट्रेट मोड वर मनाजोगता शॉट काढला की अपलोड करण्याच्या उत्साहात चालू लागणाऱ्या आमच्या या पिढीला, काही क्षण थांबून निवांतपणे जेव्हा स्क्रीन बाहेरचं जग बघायला मिळतं तेव्हा याच छोट्या छोट्या गोष्टींचंही कुतूहल वाटू लागतं.

पाऊस पडून गेल्याने वातावरणात छान गारवा होता. असं म्हणतात की पावसामुळे दरवर्षी जंगलातले ओढे आपला रस्ता बदलतात आणि मग ज्या ओढ्यांच्या खाणाखुणा लक्षात ठेऊन आपण देवकुंडाचा रस्ता मनात साठवलेला असतो, त्या खाणाखुणाच नाहीशा झाल्यामुळे बऱ्याचदा अनुभवी ट्रेकर्सही गोंधळात पडतात.

पण सिद्धेश लीड करत असल्याने आम्ही अगदी निर्धास्त होतो.

कधी फूटभर पाण्यातून तर कधी ७-८ फूट उंच कपारीतून आम्ही चढत होतो. वाटेत वाळलेल्या लाकडांचा पूल लागला. हा पूल इतका नाजूक होता की एका वेळेस केवळ एका माणसाचंच वजन पेलवू शकेल. एक एक करून आम्ही पलीकडे गेलो.

आता अंधारबनाचे डोंगर दिसू लागले. डाव्या बाजूने वाहणारी कुंडलिका नदी आणि उजव्या बाजूने भक्कमपणे उभे असणारे अंधारबनाचे डोंगर! हा रस्ता संपूच नये असं वाटू लागलं. ऊन वाढायलाही चांगली सुरुवात झाली होती.

आम्ही देवकुंडाच्या बऱ्यापैकी जवळ पोहोचलो होतो.

माती संपून चांगल्या ४-५ फूट उंच गुळगुळीत दगडांची रांग चालू झाली. दगडांमधून वाहणारं पाणी इतकं नितळ स्वच्छ होतं की ते पाणी पिण्याचा मोह मला काही आवरला नाही. एरवी बोअरिंगच्या पाण्याचा एक थेंबही न पिणारी मी, देवकुंडाचं पाणी मात्र ओंजळी भरभरून पीत गेले. प्रत्येक पावलावर, देवकुंड माझ्यातल्या मला भेटवत होता. आणि म्हणूनच त्याला पाहण्याची माझी ओढही पावलागणिक वाढत होती.

जसजसा देवकुंड जवळ येऊ लागला, तसा आमचा उत्साह अधिकच वाढू लागला. आता शेवटची एक चढण राहिली होती.

ट्रेकभर, पाठीवरची बॅग सावरत, दगडांचा आधार घेऊन, पायातले शूज ओले होणार नाहीत याची सर्वतोपरी काळजी घेऊनही स्वभावधर्माप्रमाणे अगदी शेवटच्या चढणाच्या वेळी मी गुडघाभर पाण्यात धडपडले!

उठून सावरेपर्यंत कानावर जोरजोरात आवाज येऊ लागले. घाईघाईने मी समोरच्या झाडाची फांदी वाकवून पलीकडे नजर टाकली, तर समोर २५०-३०० फुटांवरून पांढराशुभ्र देवकुंड गर्जना करत कोसळत होता. तो अनोखा नजराणा डोळ्यात साठवत मी काही क्षण स्तब्ध झाले.

कोपऱ्यातल्या एका काळया कातळावर, पाय सोडून, मी काही वेळ एकटक धबधब्याकडे निरखत बसले. हेच ते कुंडलिका नदीचं उगम स्थान.

कपारीतून सुरु होणारी पाण्याची पांढरीशुभ्र धार, खाली पडल्यावर मात्र हिरव्यागार पाचुप्रमाणे चमकत होती. कातळाच्या त्या खोल कपारीत सूर्याची किरणं पोहोचणं अशक्यच होतं. कदाचित म्हणूनच देवकुंडाचं पाणी बर्फाप्रमाणे गार होतं. असं म्हणतात की देवकुंडाची खोली मोजण्याचा आजवर अनेकांनी प्रयत्न केला, पण नक्की खोली किती हे आजही गूढच आहे. वरून पडणाऱ्या पाण्याचा दाब इतका प्रचंड आहे की काही वर्षांपूर्वी तिथे बुडालेल्या एका व्यक्तीचं शरीर वर आलंच नाही. तब्बल दोन दिवस शोध घेतल्यानंतर ते बाहेर काढण्यात यश आलं. काळया कातळात देखण्या दिसणाऱ्या देवकुंडाचं असं रौद्र रूपही आहे.

 

देवकुंडाच्या अवाढव्यतेकडे एकटक पाहताना एक मात्र नक्की जाणवलं. निसर्गाच्या जवळ जा, त्याला समजून घ्या. तो तुम्हाला भरभरून देईल. पण जेव्हा त्याच्या अधिवासात, त्याच्या मनाविरुद्ध पाऊल टाकाल, तेव्हा होणारे परिणाम हे भयंकरच असतील.

 

माझ्या या ट्रेकच्या अनुभवाची चित्रफीत पाहा :

हा लेख इतरांना पाठवा

स्नेहल शेट्ये

सोमवार ते शुक्रवार, कॉर्पोरेट क्षेत्रात प्रोडक्ट डिझायनर म्हणून काम केल्यावर एका सॉलिड ब्रेक ची गरज भासतेच. हा ब्रेक मला भटकंतीमधून मिळतो. संधी मिळेल तेव्हा मी नवनवीन जागांच्या शोधात फिरते आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचवते. भटकंती शिवाय माझे इतर उद्योग म्हणजे बाईक रायडिंग, वाचन आणि पेंटिंग्ज काढणं.

4 thoughts on “अनुभव : देवकुंड धबधब्याचा ट्रेक

 • November 11, 2019 at 3:37 pm
  Permalink

  Nice flow of writing. I like it. What is the degree of difficulty in doing the trek. Superb photos.

  Reply
  • November 11, 2019 at 10:22 pm
   Permalink

   Thankyou. The level is easy to moderate. Approximately walking distance is of 6-7 Kms. Please check out vlog for complete details.

   Reply
  • November 12, 2019 at 10:30 pm
   Permalink

   स्नेहल…. खरच खूपच छान लिखाण आहे. मोजक्या शब्दात सुंदर प्रवास वर्णन. मला खुप आवडले. नक्कीच तुझे पुढचे वर्णन वाचायला आवडतील…

   Reply
   • November 15, 2019 at 9:06 pm
    Permalink

    धन्यवाद..

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *