एका माणसाच्या शरीरात वाढत होतं चक्क एक झाड

लहानपणी आपण खूप धसमुसळे असू. एखादं फळ खाताना चुकून त्याची लहानशी बी आपण गिळून टाकायचो. मग आपली मोठी भावंडं आपल्याला चिडवायची, ‘‘आता तुझ्या पोटात झाड उगवणार.’’ मग आपण तसं खरोखरच होईल अशी कल्पना करायचो, आणि आपली घाबरगुंडी उडाली, की रडवेलं तोंड करून ‘‘आईऽऽऽऽऽ’’ म्हणून भावंडांची चुगली करायचो.

प्रत्यक्षात असं काहीही होणार नाही हे आपल्यालाही जरासं माहिती असायचं. तरी उगाच जोखीम का पत्करा, म्हणून आईने आपली समजूत घातलेली, आणि आपल्या भावंडांना ओरडा मिळालेला आपल्याला हवा असायचा.

एका माणसाच्या बाबतीत मात्र हा प्रकार खरोखर घडलाय.

आर्टयोम सिडोर्किन नावाच्या रशियन तरुणाच्या फुफ्फुसांमध्ये चक्क एक झाड वाढत होतं.

आर्टयोमची छाती खूप दुखायची. त्याच्या खोकल्यातून रक्तही पडत होतं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली, एक्सरे वगैरे काढला. त्यातून असा निष्कर्ष आला की आर्टयोमच्या फुफ्फुसांमध्ये कर्करोगाची मोठी गाठ तयार झालेली आहे.

आर्टयोमच्या एक्स-रे मध्ये झाड दिसत होतं. डॉक्टरांना वाटलं ही कर्करोगाची मोठी गाठ असावी.

डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही गाठ काढायची ठरवली. फुफ्फुसांचा एक मोठा भाग वेगळा करण्यापूर्वी, रुग्णाची बायोप्सी, म्हणजेच ऊतिपरीक्षा करायची असते. ती करत असताना त्यांना धक्काच बसला. आपल्याला भास तर होत नाहीये ना, असंच त्यांना वाटलं.

जिथे कर्करोगाची गाठ असायला हवी होती, तिथे त्यांना चक्क शंकुवृक्षजातीतलं ‘फर’ हे झाड वाढताना आढळून आलं. खातरजमा करावी म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्याला बोलावून घेतलं. त्यालाही धक्का बसला.

आर्टयोमच्या फुफ्फुसात सापडलेलं ५ सेंमी लांबीचं झाड

फर ही सदाहरित शंकुवृक्षाची एक जात आहे. या झाडाला बारीक काटे असतात. हे काटे लागून आर्टयोमच्या केशिका फाटून त्यांतून रक्तस्राव होत होता. हेच रक्त आर्टयोमचा खोकल्यातून बाहेर येत होतं. डॉक्टरांनी ही कल्पना कुठून करावी? त्यांना वाटलं हे कर्करोगाचंच लक्षण आहे.

आर्टयोमला कर्करोग नाही हे तर बरं झालं. डॉक्टरांनी असा तर्क केला की कदाचित झाडाची बी श्वासावाटे आर्टयोमच्या फुफ्फुसांत गेली असावी आणि तिथेच मूळ धरून तिचं या झाडात रूपांतर झालं असावं.

आर्टयोमला त्रास तर खूप सहन करावा लागला. पण डॉक्टरांनी हे झाड त्याच्या फुफ्फुसांतून काढून टाकल्यावर त्याला खूप हायसं वाटलं. त्याला वाटलं होतं की त्याला कर्करोग झालाय, पण निघालं काय, तर झाड.

कल्पना करा, घरच्या मंडळींना सांगताना किती मजेशीर किस्सा घडला असेल. ते बिचारे आर्टयोमच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत बसलेले असतील, आणि तेवढ्यात डॉक्टरांनी येऊन सांगितलं असेल, ‘‘कर्करोग वाटला होता, पण निघालं भलतंच. भलतंच म्हणजे, काळजी करण्यासारखं काही नाही, एक झाड वाढत होतं त्याच्या शरीरामध्ये, एवढंच.’’

आपण म्हणतो, की झाडं हीच आपल्या पृथ्वीची फुफ्फुसं असतात. या उदाहरणात मात्र झाडच एका माणसाच्या फुफ्फुसाचा चोथा करत बसलं होतं.

तेव्हा वाचकहो, जरा जपून राहा बरं. श्वास घेत असताना चुकून नाकात एखाद्या झाडाची बी तर घुसत नाही ना, याकडे लक्ष द्या.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *