ट्रॅपिस्ट १ : लघुताऱ्याला खेटून गवसणी घालणारे सात ग्रह

१९९७ ते २००१ या काळात संपूर्ण अवकाशाचं इन्फ्रारेड किरणांनी सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणाचं नाव ‘टू मायक्रॉन ऑल स्काय सर्वे’ किंवा 2MASS असं ठेवण्यात आलं.

१९९९ साली अवकाशशास्त्रज्ञांना एक अतिशय जुना, स्वत:चं तेज हरपत चाललेला लाल लघुतारा (रेड ड्वॉर्फ) मिळाला. जुना म्हणजे किती जुना? ५.४ ते ९.८ अब्ज वर्षं जुना. म्हणजे आपल्या सूर्याहून जवळपास दुप्पट वयाचा!

असं असलं तरी या ताऱ्याचं आकारमान गुरू ग्रहाहून जरासंच मोठं आहे. सूर्याचं आकारमान याच्या बारापट आहे. हा तारा आपल्या सूर्यमालेपासून अवघा ४० प्रकाशवर्षांच्या अंतरावर होता.

लघुताऱ्याचं बारसं

या ताऱ्याला शास्त्रज्ञांनी नाव दिलं : 2MASS J23062928-0502285 (हो, तुम्ही हे आकडे वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत याची कल्पना आहे.)

Comparison between the Sun and the ultracool dwarf star TRAPPIST-1
सूर्याच्या तुलनेत ट्रॅपिस्ट १ तारा

२०१६ साली, चिले देशामधील वेधशाळेतून ट्रॅपिस्ट नावाच्या दुर्बिणीतून शास्त्रज्ञांनी या लघुताऱ्याभोवती फिरणारे तीन ग्रह हुडकून काढले. तेव्हापासून या ताऱ्याचं नाव बदलून ट्रॅपिस्ट १ असं ठेवलं गेलं. किती सोपं झालं ना नाव!

सात ग्रह सापडले!

हबल स्पेस दुर्बिणीतून असं लक्षात आलं की या तीनपैकी दोन ग्रह खडकाळ असावेत, कारण वायुचे गोळे असणाऱ्या ग्रहांवर हायड्रोजन आणि हीलियमचा सुळसुळाट असतो.

पण या ग्रहांवर तसं काही दिसत नव्हतं. त्यामुळे कदाचित या खडकाळ ग्रहांवर पाणी असण्याचीसुद्धा शक्यता होती.

मग २०१७ साली असं लक्षात आलं, की तीन नव्हे, तर तब्बल सात ग्रह ट्रॅपिस्ट १ ताऱ्याभोवती फिरतायत.

विशेष म्हणजे, या सातही ग्रहांची कक्षा बुधाच्या सूर्याभोवतीच्या कक्षेहून लहान आहे. म्हणजेच बुध आणि सूर्य यांमध्ये असलेल्या अंतराहून कमी अंतरावर या ग्रहांचं भ्रमण सुरु असतं.

PIA22093-TRAPPIST-1-PlanetLineup-20180205
ट्रॅपिस्ट १ ग्रहमालिका
कित्तुसा तारा, कित्तीशी त्याची उष्णता

कल्पना करा, एखाद्या ताऱ्याच्या एवढ्या जवळून जाणाऱ्या ग्रहांवर किती तापमान असेल? बुध हा सूर्यमालेतला दुसरा सर्वांत तप्त ग्रह आहे (पहिला कोणता, हे शोधण्यासाठी आपल्या अवकाशज्ञानाची उजळणी करून पाहा).

पण गंमत अशी, की ट्रॅपिस्ट १ हा लघुतारा आहे. सूर्य जेवढी ऊर्जा चहुदिशांना धाडत असतो, त्याच्या केवळ ०.५ टक्के ऊर्जाच ट्रॅपिस्ट १ मधून प्रारित होत असते.

त्यामुळे त्याच्या भोवती फिरणारे सगळे ग्रह जरी बुधाहून कमी अंतरावरनं प्रदक्षिणा घालत असले, तरी ते बुधाएवढे तापलेले नसावेत. त्या सात ग्रहांमधला सगळ्यांत लांबचा, म्हणजेच सातवा ग्रह ट्रॅपिस्ट १ भोवती फिरायला १९ दिवस घेतो.

बुध ग्रहाला सूर्याभोवती फिरायला ८८ दिवस लागतात. असं असूनसुद्धा हा सातवा ग्रह चक्क गोठलेला असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

या सातपैकी तीन ग्रह ट्रॅपिस्ट १ लघुताऱ्याच्या निवासयोग्य क्षेत्रामध्ये आहेत असं दिसतं.

निवासयोग्य क्षेत्र म्हणजे ताऱ्यासभोवतालच्या कक्षेतला तो भाग जिथे एखादा ग्रह असला तर त्या ग्रहावर द्रवरूपात पाणी असण्याची, आणि म्हणूनच कदाचित सजीव जगू शकण्याची किमान शक्यता निर्माण होते.

जर ग्रह त्याच्या ताऱ्याच्या अतिजवळ असेल, तर अतिउष्णतेमुळे पाण्याची वाफ होऊन जाईल. त्याउलट जर ग्रह अतिलांब असेल, तर त्यावरचं पाणी गोठून जाईल. एखादा तारा किती तप्त किंवा किती थंड, यानुसार त्याचं निवासयोग्य क्षेत्र ठरतं.

ट्रॅपिस्ट मालिकेतल्या पाचव्या ग्रहावरील दृश्य कसं असेल । प्रतिमा स्रोत : NASA/JPL-Caltech

मात्र हे ग्रह आपल्या ताऱ्याच्या एवढ्या जवळ असल्याने त्यांच्या परिभ्रमणाच्या पद्धतीवर त्याचा निश्चितच परिणाम झालेला असणार. शास्त्रज्ञांच्या मते, या सातही ग्रहांची एकच बाजू ट्रॅपिस्ट १ ताऱ्यासमोर येत असेल.

चंद्राचं आभासी दोलन

पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र जसा आपली एकच बाजू पृथ्वीला दाखवतो, आणि दुसरी बाजू कायम पृथ्वीवर रुसून बसलेली असते, त्यातलाच हा प्रकार.

ग्रहांच्या बाबतीत हे तेव्हा होतं जेव्हा त्यांचा परिवलन काळ (स्वत:भोवती फिरण्यासाठी लागणारा काळ) त्यांच्या परिभ्रमण काळाएवढाच (ताऱ्याभोवती फिरण्यासाठी लागणारा काळ) होतो.

सुरुवातीला हे दोन्ही काळ वेगळेही असू शकतात, मात्र ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होऊन ही ग्रहताऱ्याची जोडी संकालित होते. आपल्या चंद्राचंच उदाहरण घ्यायचं, तर तो पृथ्वीभोवती फिरायला २७.३२२ दिवस घेतो, आणि स्वत:भोवती फिरायलाही साधारण २७ दिवसच लावतो.

अर्थात, चंद्राची कक्षा थोडीशी लंबगोल असून तो पृथ्वीच्या किती जवळ किंवा दूर जातो त्यानुसार त्याच्या परिवलनाचा वेग कमी जास्त होत राहतो.

चंद्र पृथ्वीच्या अतिजवळ आला, की त्याचा वेग कमी होऊन त्याची थोडी पूर्वेकडची, एरवी न दिसणारी बाजू दिसू लागते, आणि चंद्र अतिलांब गेला, की त्याचा वेग वाढून त्याची पश्चिमेकडची एरवी न दिसणारी बाजू दिसू लागते. या प्रकाराला चंद्राचं आभासी दोलन म्हणतात.

Pluto-Charon System
प्लुटो आणि त्याचा उपग्रह कॅरॉन
पृथ्वीवरचा दिवस मोठा होतोय

पण हे भाग्य फक्त चंद्राच्याच नशिबात आहे असं अजिबात नाही बरं. पृथ्वीवरही चंद्रसूर्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतोय, आणि तिचा परिवलन काळ गेल्या शंभर वर्षांच्या तुलनेत १.७ मिलिसेकंद या दराने वाढलाय.

एक काळ असा येईल, जेव्हा पृथ्वीचा परिवलन वेग चंद्राच्या परिभ्रमण वेगाएवढा असेल. तेव्हा पृथ्वीवरचा एक दिवस म्हणजे आजचा एक जवळ जवळ महिना असेल.

कालांतराने पृथ्वीचा परिवलन वेग सूर्याभोवतीच्या परिभ्रमण वेगाएवढा झाला, की पृथ्वीवरचा एक दिवस आजच्या एका वर्षाएवढा होऊन बसेल.

असं झालं, तर पृथ्वीची एक बाजू कायम सूर्यासमोर उजेडात राहील, आणि एक बाजू कायम अंधारात. सूर्यासमोर असणाऱ्या बाजूवर १०० अंश सेल्सियस हून कितीतरी जास्त तापमान असेल, आणि उलट बाजूवर -१०० अंश सेल्सियसहून कितीतरी कमी तापमान.

अशा परिस्थितीत पृथ्वीवर जीवन टिकून राहू शकेल का? चला, कदाचित असे सजीव निर्माण होतीलही, जे अशा परिस्थितीत टिकून राहू शकतात. पण आपलं काय? माणूस अशा परिस्थितीत जगू शकेल का?

परग्रहावर राहणं सोपं नव्हे

आता मुळात ही कल्पना का करायची? कारण काहीशी अशीच परिस्थिती ट्रॅपिस्ट १ मालेतील ग्रहांवर पाहायला मिळू शकते.

आज आपण मंगळ ग्रहावर वसाहती स्थापन करायची स्वप्नं पाहतोय (आपण म्हणजे इलॉन मस्कसारखी माणसं); तशी उद्या तंत्रज्ञानाने झेप घेतली समजा, आणि भलत्याच सूर्यमालेतल्या एखाद्या ग्रहावर जाऊन राहायची संधी मिळाली (किंवा संपूर्ण मानवजातीसमोर दुसरा पर्यायच उरला नाही), तर ज्या ग्रहावर जाऊन राहू, तिथली परिस्थिती राहण्याजोगी असायला हवी ना?

त्यामुळे ट्रॅपिस्ट १ मालेतील तीन ग्रह जरी निवासयोग्य क्षेत्रात असले, तरी त्यांच्यावर जाऊन राहणं तितकंसं सोपं नसेल. त्यातच पुरेशा वातावरणाच्या अभावी अतिनील किरणांची भीती आहे ती वेगळीच.

पण म्हणून कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. तंत्रज्ञानाचा विकास होत राहीलच, आणि कधी ना कधी जवळच किंवा दूरवर असलेला, मानवासाठी किंवा किमान जीवनासाठी अनुकूल असा एखादा ग्रह आपल्याला गवसेलच.

तो दिवस उजाडेपर्यंत आपल्या परीने संपूर्ण तयारी करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच ट्रॅपिस्ट १ मालिका अतिमहत्त्वाची ठरते.

४० प्रकाशवर्षांच्या अंतरावरच असल्याने नमुन्यादाखल अभ्यास करण्यासाठी या मालिकेचा प्रचंड फायदा आपल्याला होतो आहे.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *