सगळ्यांत मोठा खड्डा

सुरुवातीलाच सांगितलेलं बरं की या लेखात डांबरी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांविषयी चर्चा होणार नाहीये. तो विषय महत्त्वाचा असला तरी ते नंतर कधीतरी करू. तूर्तास निसर्गनिर्मितीचा भाग असणाऱ्या खड्ड्यांविषयी बोलूया. हे काही साधेसुधे, पाय मुरगळवणारे खड्डे नव्हेत. ही कुंडं आहेत. भलीमोठी, महाकाय कुंडं!! तुम्ही यांच्यात जाऊन पडलात तर बाहेर निघण्यासाठी तुम्हाला गिर्यारोहण करावं लागेल एवढी महाकाय कुंडं!

ही महाकाय कुंडं तयार कशामुळे होतात?

जमिनीवर एखादा धोंडा जोरात येऊन आदळतो. जोरात म्हणजे ताशी ११,००० किलोमीटरहून जास्त वेगाने तो धोंडा येऊन जमिनीला भिडतो. एवढ्या किंवा याहून जास्त वेगाने येणाऱ्या धोंड्याची वाटेतच वाफ होऊ शकते. पृथ्वीच्या वातावरणामुळे असे बरेच धोंडे वाटेतच विरून जातात. पण काही धोंडे टिकतात आणि येऊन आदळतात. आणि मग जमिनीत एक मोठ्ठाला खड्डा तयार होतो. याला आपण कुंड म्हणतो. महाराष्ट्रातलं लोणार सरोवर हे अशाच कुंडाच्या निर्मितीमुळे तयार झालेलं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर तिच्या वातावरणामुळे सारखे बदल होत असतात. भूखंड इकडून तिकडे सरकतात, पाऊसवाऱ्यामुळे दगडधोंड्यांची झीज होते आणि कालौघात वेगवेगळ्या परिसंस्थांचा अक्षरश: कायापालट होतो. त्यामुळे पृथ्वीवर फारशी कुंडं सापडलेली नाहीत. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आत्तापर्यंत फक्त १८० कुंडंच सापडलेली आहेत.

पर्यटनाच्या दृष्टीने १८० हा आकडा काही लहान नव्हे. पण जर बाकी ग्रहांशी तुलना करून पाहिली तर ‘फक्त १८०’ का म्हणायचं ते लक्षात येईल. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर किमान १ किलोमीटर व्यासाची ६ लाख ३५ हजार कुंडं सापडलेली आहेत. चंद्रावर तर सतत छोटी-मोठी नवनवीन कुंडं तयार होत असतात. चंद्रावरलं वातावरणही नावालाच असल्याने या कुंडांची झीजही होत नाही आणि ती वर्षानुवर्षं टिकून राहतात (अर्थात, त्या ठिकाणी दुसरा धोंडा येऊन नवं कुंड तयार झालं नाही तर).

रेडेफोर्ट – पृथ्वीवरचं सगळ्यांत मोठं कुंड
रेडेफोर्ट कुंड । फोटो श्रेय : NASA

पृथ्वीवरचं सगळ्यांत मोठं आणि प्रचंड जुनं असलेलं कुंड म्हणजे आज दक्षिण आफ्रिकेत असलेलं रेडेफोर्ट कुंड. हे कुंड तयार झालं तेव्हा ३०० किलोमीटर रुंद होतं. याच्या मध्यभागी रेडेफोर्ट नावाचं छोटंसं शहरच वसलेलं आहे. (इथे एकूण चार छोटी शहरं आहेत) या शहरावरूनच या कुंडाला नाव पडलंय. रेडेफोर्ट कुंड किती जुनं असावं? तब्बल २ अब्ज वर्षं! एवढ्या काळात या कुंडाची बरीच झीज झालेली असली तरी त्याची भौगोलिक संरचना बऱ्यापैकी टिकून आहे. अलिकडेच याहूनही जुन्या, म्हणजे जवळजवळ ३ अब्ज वर्षांपूर्वी तयार झालेल्या १०० किलोमीटर लांबीच्या कुंडाचा शोध लागलेला आहे. साधारण ३० किलोमीटर लांबीची उल्का आदळून हे कुंड तयार झालं असावं असा अंदाज आहे. ग्रीनलँडमध्ये सापडलेल्या या कुंडाची निर्मिती जर आज झाली असती, तर आपल्यासकट पृथ्वीवरचे कितीतरी जीव नष्ट झाले असते. {२ आणि ३ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कदाचित आजच्याएवढे सजीव नसतील, पण जीवसृष्टी नक्कीच होती. साधारण साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी तयार झाली, त्यानंतर लगेच समुद्र तयार झाले (लगेच म्हणजे साधारण तेरा कोटी वर्षांनी). पश्चिम ऑस्ट्रेलियात सापडलेल्या सूक्ष्मजीवाश्मानुसार ३ अब्ज ४६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवसृष्टी होती हे सिद्ध झालंय. त्यामुळे ही कुंडं तयार झाली तेव्हाही जीवितहानी झालेली असू शकतेच.}

आता आपण शेजाऱ्यांच्या घरात डोकवूया, मंगळाकडे काय चाललंय ते पाहूया.
हेलास कुंड । फोटो श्रेय : NASA/JPL/USGS

आपण आपल्या वंशजांना मंगळावर राहायला पाठवायची स्वप्नं पाहतोय, आणि त्यादृष्टीने आपली भरपूर तयारीही सुरु आहे. तर या मंगळाबद्दल आणि तिथल्या पर्यटनस्थळांबद्दल (!!!) आपण जरा माहिती काढून घेतलेली बरी, नाही का? मंगळावर ‘हेलास’ नावाचं एक प्रचंड मोठं कुंड आहे. हे २३,४६५ फूट खोल आहे, आणि याचा व्यास २,३०० किलोमीटर एवढा आहे (दिल्ली ते बंगळुरु हे अंतर २१६४ किलोमीटर आहे). सध्या हे मंगळावरचं आणि अख्ख्या सूर्यमालेतलं, दिसत असणारं सगळ्यात मोठं कुंड मानलं जातं. पण याला ठसन देणारं याहून मोठं एक कुंड आहे, आणि तेही मंगळावरचंच आहे. त्याचं नाव आहे ‘युटोपिया’! युटोपियाचा व्यास अंदाजे ३,३०० किलोमीटर आहे. ३ सप्टेंबर १९७६ रोजी नासाचं ‘व्हायकिंग २’ हे अवकाशयान युटोपियामध्ये उतरलं होतं आणि तिथे १३१६ दिवस फिरलं होतं. २०१६ साली, नासाने युटोपियामध्ये जमिनीखाली मोठ्या प्रमाणावर बर्फ साचलेला असल्याची माहिती दिली. पृथ्वीवरचा गोड्या पाण्याचा तिसरा सर्वांत मोठा तलाव असलेल्या उत्तर अमेरिकेतल्या ‘लेक सुपिरियर’मध्ये जेवढं पाणी आहे, तेवढंच पाणी युटोपियामध्ये साचलेलं असल्याचा अंदाज आहे.

बोरिॲलिस कुंड
बोरिॲलिस कुंडाचा नकाशा | फोटो श्रेय : नासा

युटोपियाहूनही मोठं, आणि मोठं म्हणजे कायच्या काय मोठं असलेलं आणखी एक कुंड आहे. हे कुंडसुद्धा मंगळ ग्रहावरच आहे. एकूणच मंगळ हा विक्रमी ग्रह आहे यात वाद नाही. पण हे कुंड उल्का आदळून झालंय यावर एकमत नसल्याने अजून याला सर्वांत मोठ्या कुंडाचा मान दिला जात नाही. बोरिॲलिस कुंड किती मोठं असावं? हे लंबगोलाकार आहे, आणि याची लांबी १०,६०० किलोमीटर आणि रुंदी ८,५०० किलोमीटर एवढी आहे. म्हणजे किती जागा व्यापत असावं? मंगळ ग्रहाचा ४०% भाग नुसत्या या कुंडाने व्यापलेला आहे. जर हे कुंड खरोखर उल्का आदळून तयार झालेलं असेल तर त्या उल्केचं आकारमान मंगळ ग्रहाच्या २% असावं. तिचा व्यास १९०० किलोमीटर असेल. ही खूप मोठी उल्का झाली. एवढी मोठी उल्का पृथ्वीवर आदळली तर मग काय मजाच मजा! मंगळाचे दोन उपग्रह आहेत, फोबोस आणि डायमोस. या उपग्रहांची निर्मिती व्हायला मंगळावरची ही उल्कांची आदळआपट कारणीभूत असू शकते असा एक तर्क आहे. यातला फोबोस हा उपग्रहच एक दिवस मंगळावर आदळणार आहे अशी चिह्नं आहेत (तरीही माणसाला मंगळावर जायची खाज आहे. काय बोलावं!)

या कुंडांना एवढा भाव तरी का द्यायचा? लहान मुलं खेळत असताना साधा फूटबॉल तुमच्या गाडीला आपटून पोचा आला, तरी बोंबाबोंब करता ना? इथे तुमच्या अख्ख्या ग्रहाला पोचे येतायत तर तिथे लक्ष द्यायला नको? ग्रहावर एखादी मोठी उल्का येऊन आपटल्याने तुम्ही-आम्ही गचकण्याची शक्यता असते ते एकवेळ सोडून द्या, ते काही फारसं महत्त्वाचं नाही(!) सहसा जिथे कुंडं तयार होतात तिथे बरीच मूल्यवान खनिजं सापडतात. कुंडनिर्मितीमुळे तिथल्या परिसंस्थेत जे बदल होतात ते अभ्यासण्यासारखे असतात, आणि सहज जाता येण्यासारखं असलं तर ते पर्यटनाचं ठिकाण म्हणूनही विकसित करता येतं.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *