थॅलीस – पहिला ग्रीक तत्त्वज्ञ

आपलं मूळ कशात आहे याचा शोध घेण्याची खाज अनेकांना असते. कोणाला आपलं मूळ गाव शोधायचं असतं, कोणाला वंशावळीचा अभ्यास करायचा असतो, तर कोणाला पार अगदी सजीवसृष्टीच्या उत्पत्तीमागचा हेतु काय असेल वगैरे डोकं बधीर करणारे प्रश्न पडतात. आपल्यासारखी आळशी माणसं अधून मधून विरंगुळा म्हणून अशा विषयांवर विचार करतात आणि शेवटी कंटाळून, ‘‘जाऊदे, असेल काहीतरी.’’ असं म्हणून सोडून देतात. आजवर आपल्या अस्तित्वासंदर्भात एवढे शोध लागलेले आहेत की त्यांचा अभ्यास करून आपण खरं तर अजून खूप खोलात शिरू शकतो. विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या आधारे आपण स्वत्वाचा शोध घेऊ शकतो, आणि जरी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली नाहीत, तरी बऱ्यापैकी नवनवीन विचार आपल्याला स्वत:ची उन्नती साधायला मदत करू शकतात.

तत्त्वज्ञ हा स्वत्वाचा चिकाटीने शोध घेणारा प्राणी असतो. तो ज्या काळात राहतो, त्या काळात मानवाला ठोस माहिती असलेल्या गोष्टींचा आणि प्रचलित गृहीतकांचा आधार घेऊन तो स्वत:च्या शोधार्थ निघतो. वाटेत त्याला अनेक नवनव्या गोष्टी समजतात आणि त्यांनुसार तो स्वत:ची जुनी गृहीतकं झटकून पुढे सरकत राहतो. स्वत:ची नवी गृहीतकं, नवे सिद्धांत मांडत जातो. हे नवे सिद्धांत बरोबर असतीलच असं नव्हे, पण त्यांच्या मांडणीची पार्श्वभूमी भावी पिढ्यांना सत्याच्या जवळ जायला भरपूर मदत करते. दहीहंडीपर्यंत पोहोचायला एकावर एक जसे माणसाचे थर रचून मग ते चढून जावे लागतात, तसंच सत्यापर्यंत पोहोचण्यासाठीही आपल्याआधी होऊन गेलेल्या विचारवंतांचा ‘पाया’ म्हणून उपयोग करावा लागतो, त्यांच्या विचारांचा अभ्यास करावा लागतो.

थॅलीस

आज तुर्कस्तानमध्ये असलेल्या मायलीटस या एकेकाळच्या प्राचीन ग्रीक शहरात इसवीसन पूर्व ६२४ सालात थॅलीस नावाचा माणूस जन्माला आला. हा पुढे मोठा होऊन ग्रीसच्या नावाजलेल्या सात महान साधूंपैकी एक ठरला. तत्त्वज्ञानाचा धार्मिक अंगाने कमी आणि शास्त्रीय अंगाने जास्त विचार करण्यावर भर देणारा, हा पहिला पाश्चिमात्य तत्त्वज्ञ मानला जातो. ‘अरिस्टोटल’ हा प्रसिद्ध तत्त्वज्ञ तर ‘पहिला तत्त्वज्ञ’ म्हणून थॅलीसची स्तुती करतो.

प्राचीन ग्रीक समाजव्यवस्थेत अनेक दंतकथा प्रचलित होत्या. सृष्टीची निर्मिती कशी झाली, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ग्रीक देव-देवतांच्या नावाने गोष्टी रचल्या जात आणि या चमत्कारिक गोष्टी प्रमाण मानल्या जात असत. थॅलीसने या गोष्टींना आव्हान देत सृष्टीची रचना होण्यास नैसर्गिक पदार्थ आणि घटना कारणीभूत असल्याचे सिद्धांत मांडायला सुरुवात केली. अरिस्टोटलच्या मते, थॅलीसने त्याचे सिद्धांत स्वत:च्या निरीक्षणाच्या आणि विचारशक्तीच्या बळावर मांडले, आणि त्यासाठी त्याने ग्रीक दंतकथांचा अजिबात आधार घेतला नाही. थोडक्यात, थॅलीस खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण तत्त्ववेत्ता होता.

ग्रहणाचं अचूक भाकित आणि युद्धनीतीस मदत
ग्रहणाचं अनुमान थॅलीसने कसं लावलं हे आज आपल्याला माहिती नाही.

त्याकाळच्या लिडियन आणि मीडीज या टोळ्यांमधली पाच वर्षं सुरु असलेली लढाई मिटवण्यासाठी थॅलीसने एक चमत्कार करून दाखवला. २८ मे, इसपू ५८५ रोजी सूर्यग्रहण होणार याचा थॅलीसने नेमका अंदाज लावला. हा अंदाज बरोबर ठरला आणि ग्रहणाला घाबरून युद्ध तातडीनं थांबवलं गेलं. एवढंच नव्हे, तर या दोन टोळ्यांमध्ये शांतीकरारही झाला. मात्र या ग्रहणाचं अनुमान थॅलीसने कसं लावलं हे आज आपल्याला माहिती नाही. कारण ती पद्धत पुन्हा वापरली गेल्याची कुठेही नोंद नाही.

लिडियन टोळीचा राजा होता क्रोएसस. शांतीकरार झाल्यावर त्याने मीडीज टोळीशी हातमिळवणी केली. आणि मीडीज लोक ज्या पर्शियन राजाचं मांडलिकत्व स्वीकारून जगत होते, त्या दुसऱ्या कुरुश राजाशी युद्ध करायला दोघांनी पर्शियाच्या दिशेने कूच केली. वाटेत हॅलीस नदी लागली, जी क्रोएससच्या सैन्याला ओलांडता येईना. यावेळी क्रोएससने थॅलीसला आपल्यासोबत आणलं होतं. त्याने त्याच्या पुढे आपली व्यथा मांडली, आणि उपाय मागितला. थॅलीसच्या सांगण्यावरून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नदीला कालवे काढण्यात आले. यामुळे नदीच्या प्रवाहाचा जोर कमी झाला, आणि क्रोएससच्या सैन्याला नदी पार करता आली.

कॅपाडोशियाची राजधानी असलेल्या टेरियामध्ये दोन्ही शत्रुसैन्यं आपापसांत भिडली. क्रोएससने गरजेपेक्षा खूप कमी सैन्य सोबत आणलं होतं. त्याच्या सैन्याला जबरदस्त मार खावा लागला आणि त्याने आपल्या थकलेल्या, दमलेल्या सैन्याला माघारी पाठवून आपल्या मित्रांकडे आणि मांडलिकांकडे सार्डिसमध्ये ताज्या दमाचं सैन्य पाठवण्याची मागणी केली. त्याचा शत्रु दुसरा कुरुश नव्या दमाची तुकडी घेऊन सार्डिसमध्ये येऊन ठेपलासुद्धा. क्रोएसस हे युद्ध हरणार हे थॅलीसला स्पष्ट दिसत होतं. तो स्वत: मायलिटसमध्ये जन्मलेला होता. त्याने मायलिटसच्या लोकांना या युद्धात क्रोएससच्या बाजूने भाग न घेण्याचा सल्ला दिला. मायलिटस तटस्थ राहिलं.

क्रोएसस हरला, दुसरा कुरुश जिंकला. त्याने मायलिटसला हातही लावला नाही. थॅलीसवर तो खुश झाला, आणि त्याने त्याच्याकडून पुढे अनेक बाबींविषयी सल्ले घेतले.

पाण्यावर प्रेम

आज रसायनशास्त्राच्या अभ्यासात माणसाने जेवढी प्रगती केलेली आहे तेवढी थॅलीसच्या काळात झालेली नव्हती. सृष्टीची निर्मिती होण्यासाठी, तिचा वैविध्यपूर्ण पसारा वाढत राहण्यासाठी जे एक मूलद्रव्य जबाबदार आहे ते म्हणजे पाणी होय, असा थॅलीसचा कयास होता. आपण पाहतो ते सारं जग पाण्यापासून बनलेलं आहे, असं थॅलीसने प्रतिपादन केलं होतं. यासाठी त्याने दिलेली कारणं विचारात घेता त्याचा तर्क चुकीचा असला तरी किती सुरेख होता हे आपल्या लक्षात येतं :

• थॅलीसला ‘गुरूत्वाकर्षणाची’ कल्पना नव्हती. समुद्राच्या लाटा सतत उसळत असतात हे त्याने पाहिलं होतं. यावरून पाणी ‘स्वयंप्रवाही’ असतं, असा निष्कर्ष त्याने काढला होता.
• स्थायू, जल आणि वायू या तिन्ही अवस्थांमध्ये पाणी सहज पाहायला मिळतं.
• पाणी सर्व पशुपक्ष्यांसाठी आवश्यक असतं. पाण्याशिवाय जीवन नाही.
• ग्रीकांना समुद्रात अचानक एखादं बेट उगवलेलं दिसायचं, तेव्हा हे कुठून आलं हे त्यांना कळायचं नाही. पाण्यामधले ज्वालामुखी आणि भूकंप यांची ग्रीकांना कल्पना नव्हती. त्यामुळे पृथ्वीचा उगम पाण्यातूनच झाला असावा, आणि पृथ्वी पाण्यावर तरंगत असावी, असा अंदाज थॅलीसने व्यक्त केला होता.

या सगळ्या कारणांमुळे पाणी हेच सृष्टीच्या निर्मितीमागचं मूलभूत द्रव्य आहे, अशा निष्कर्षाप्रत थॅलीस पोहोचला होता.

पाश्चिमात्य संस्कृतीत शास्त्राधारित तत्त्वज्ञानाचा पाया रचणारा विचारवंत म्हणून थॅलीस नावाजला जातो. त्याच्या कारकीर्दीबद्दल बरेच वाद आहेत. त्याने लग्न केलं की नाही, त्याला स्वत:चा मुलगा होता की त्याने दत्तक घेतला, इथपासून ते त्याने किमान दोन हस्तलिखितं लिहिली की कधी काही लिहिलंच नाही इथपर्यंत संशोधकांमध्ये वादावादी सुरु असते. वास्तवात जे असेल ते, थॅलीस हा त्याच्या काळातला एक महत्त्वाचा तत्त्ववेत्ता होता आणि त्याच्या विचारांचा, तर्कांचा आधार घेऊन पुढे अनेकांनी क्रांतिकारी विचार मांडले हे सत्य निर्विवाद आहे.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *