सुरिनाम – दक्षिण अमेरिकेतल्या या देशात हिन्दुस्थानी भाषा बोलली जाते

काही वर्षांपूर्वी, गूगलवर, हिंदू लोकसंख्या जास्त प्रमाणात असलेले भारतेतर देश कोणते? हे शोधत होतो. बरेच देश सापडले! नेपाळपासून मादागास्करपर्यंत. त्यात सुरिनाम हा देश सापडला. बाबांच्या तोंडातून याबद्दल थोडीशी माहिती ऐकली होती पण काय ऐकलं होतं ते आठवत नव्हतं. तसा हल्लीच सुरिनामबद्दलचा राजीव मल्होत्रांचा एक व्हिडीओ पाहिला. त्यावरून परत आठवण झाली आणि पुन्हा एकदा सुरिनामबद्दलचा शोध घ्यावा असं वाटलं. म्हणून मी कुतूहलाने सुरिनाम देशाबद्दल आणखीन शोध घेतला.

सुरिनाम हा देश दक्षिण अमेरिका खंडात मोडतो. दक्षिण अमेरिका खंडाच्या अगदी उत्तरेस असलेला छोटासा असा हा देश. देशाची लोकसंख्या जेमतेम ५ लाख. त्यामुळे जगाच्या राजकारणात याचा फारसा काही प्रभाव नाही. पण एक देश म्हणून जाणून घेण्यासारखा आहे.

सुरिनाम

या जागेवर फार पूर्वीपासून म्हणजे जवळ जवळ २००० ते ३००० ख्रिस्तपूर्व काळापासून वस्ती असल्याचं आढळून आलेलं आहे. तेव्हापासून ते १६व्या शतकापर्यंत फार काही घडामोडी झालेल्या सापडल्या नाहीत पण जेव्हा जगात सर्वत्र युरोपीयांनी वसाहतीकरण करायला सुरुवात केली तेव्हापासून इकडेही वसाहतीकरण चालू झालं. सुरुवातीला इंग्रज, स्पॅनिश आणि फ्रेंचांनी वसाहती बांधल्या. पण फार काळ ते तिथे रमले नाहीत. एका शतकभरानंतर इंग्रज आणि डच येऊन स्थायिक झाले. पुन्हा त्यांच्यातही भांडणं झाली आणि त्यात डचांचा विजय झाला. १६६७च्या तहान्वये सुरिनाम देशाचा ताबा डचांकडे आला. तिकडे लोकांना शेतमळे वसवायची सक्ती केली गेली. या मळ्यांमध्ये त्यांना तंबाखू, भात, कापूस, साखर अशी पिकं घेणायची सक्ती आणली गेली. डच लोक शेतमजुरांकडून जबरदस्ती मजुरी करवून घेत असत. मजुरी कसली गुलामगिरीच होती ती! सुरुवातीला हे मजूर आफ्रिकेतून आणलेले मजूर होते. पण नंतर हे मजूर पळून जाऊन जंगलात लपत असत. आफ्रिकन मजुरांनी तिथल्या स्थानिकांसोबत एक समाज स्थापन केला आणि तो बऱ्याच अंशी आपले हक्क मिळवण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे डचांना गुलामांची उणीव जाणवू लागली. म्हणून त्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनी कडून भारतीय मजूर मागवले. त्यांनाही अशी आशा दाखवण्यात आली की भारतापेक्षा सुरिनाममध्ये तुमची परिस्थिती खूप चांगली असेल आणि खूप पैसे मिळतील. हे मजूर आजच्या बिहारमधील भोजपुरी बोलणारे मजूर होते. इंडोनेशियामधूनही जावानीस वंशाच्या लोकांना अशाच आशेवर आणण्यात आलं. पुढे हे सर्व तिकडेच स्थायिक झाले.

दुसऱ्या महायुद्धानंतर डचांची परिस्थिती खालावली आणि त्यांनी सुरिनामला वेगळ्या देशाचा दर्जा दिला. वेगळा देश म्हटलं गेलं पण स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. सुरिनामला डच साम्राज्यातील एक देश असं म्हटलं गेलं. स्थानिकांना हे मान्य नव्हतं. त्यांनी स्वतंत्रतेची चळवळ चालू ठेवली आणि शेवटी १९७५ मध्ये डच साम्राज्यापासून त्यांना मुक्ती मिळाली. स्वातंत्र्यानंतरची पुढची १० वर्षं सुरिनामच्या खर्चाचा भर नेदरलँड उचलेल असं ठरलं.

पुढे १९८० मध्ये सुरिनामच्या सेनेतील काही अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्षाविरोधात उठाव केला. सेनेच्या ताब्यात कायदा घेतला होता आणि बरीच अनागोंदी माजवली. राष्ट्राध्यक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्याला शिक्षा दिली. अशा बऱ्याच घडामोडी मध्यंतरीच्या काळात घडल्या. पण शेवटी सर्व काही शांत झालं.

डच वसाहत होती म्हणून आजही ६० टक्क्याहून अधिक जनता डच भाषा बोलते. लिहिण्या वाचण्याची त्यांची तीच प्रमुख भाषा आहे. इतर दुसऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. सुरिनाममध्ये एका विशिष्ट अशा धर्माचा पगडा नाही. अर्थात ४८% लोक ख्रिश्चन असल्यामुळे तो ख्रिश्चन देश ठरवला जातो. पण हिंदूंची संख्या २३% इतकी आहे. त्यामुळे हिंदूंच्या सर्व प्रकारच्या जाती आणि पंथ तिथेही आहेत. अगदी भारतात आहेत तितके. इकडचा सर्वात मोठा समाज हा हिंदुस्थानी आहे. आजचा त्यांचा उप राष्ट्रपती – अश्विन अधीन, एक हिंदू आहे. डच नंतर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे भोजपुरी. भारतातील भोजपुरी सिनेमे आणि हिंदी सिनेमे तिथेही चालतात.

भारत आणि सुरिनामचे संबंध छोट्या आणि मोठ्या भावासारखे राहिलेले आहेत. याची सुरुवात १९७६ पासून सुरु झाली. १९७७ मध्ये भारताने पॅरामारीबोत तर २००० मध्ये सुरिनामने दिल्लीत दूतावास उघडले. सुरिनामाला भारताने बऱ्याच क्षेत्रांत मदत केली आहे. भारताने सुरिनामात एक सांस्कृतिक संस्था सुरु केली आहे जीत भारतीय कला आणि परंपरांचं वैविध्यपूर्ण शिक्षण मिळतं. इंडियन कल्चर सेंटर असं त्या संस्थेचं नाव आहे. भोजपुरी आणि त्रिनिदादी कलांचं मिश्रण होऊन ‘बैठक गाना’ या संगीत प्रकाराचा उदय सुरिनामात झाला आहे. राजकीय पातळीवरही भारताने सुरिनामाला बरीच मदत केली आहे. समाजव्यवस्थेच्या बांधणीसाठी भारताने सुरिनामला कैक कोटींचं कर्ज देऊ केल आहे. भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळावं यासाठी सुरिनामाने आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्याबरोबरच १ मार्च २०१६ पासून सुरिनामने भारतीयांना आगमनावर व्हिसा मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्यापारातही भारत मोठ्या भावाची भूमिका बजावत आला आहे. २०१५-१६ या वर्षांत भारताची आयात १,२८,६०,००० अमेरिकन डॉलर्स इतकी होती ती वाढून २०१७-१८ मध्ये १,७३,८०,००० अमेरिकन डॉलर्स इतकी झाली. तर निर्यात २०१५-१६ मध्ये ४,३३,००,००० अमेरिकन डॉलर्सवरून ९,२७,६०,००० इतकी वाढली. भारत सुरिनामला गाड्या, बॉयलर्स, औषधोत्पादनासंबंधीची साधनसामग्री, विद्युत उपकरणं, चहा, कॉफी, मसाले, तंबाखू, कागद, कापड, रबर इत्यादी वस्तू निर्यात करतो. सुरिनामातून भारतात लाकूड आणि अल्युमिनियमची आयात केली जाते.


जाहिरात

Sterlomax
पार्मारिबोतील एक हिंदू मंदिर

आता जरा अजून जाणून घेऊया, सुरिनामातील हिंदूंबद्दल. १८६३ मध्ये जरी डचांनी गुलामी बंद करण्याची घोषणा केली तरी तेथील व्यापाऱ्यांना/शेतमळ्याच्या मालकांना अशी सवलत देण्यात आली की तुम्ही तोवर आफ्रिकन गुलामांना ठेवू शकता जोवर त्यांच्या जागी दुसरा कोणी माणूस येत नाही. आता या आफ्रिकन लोकांच्या जागी त्यांना एकच पर्याय दिसत होता तो म्हणजे भारतीयांचा.

त्या काळातही भारत हा दाट लोकसंख्येचा प्रदेश होता. इंग्रजांनी वसाहतीकरण आणि आधुनिकीकरण भारतात आणल्याने भारतात शेतीसारखे अनेक परंपरागत धंदे बंद पडत होते. त्यामुळे भारतात बेरोजगारी आणि बकाली वाढत होती. सततच्या रोगांच्या साथींमुळे भारतीयांचं सरासरी वयोमान अचानक घसरलं होतं. भारताच्या उत्तर प्रदेश भागातून लोकांना नवीन नोकऱ्या शोधणं भाग होतं. डचांनी आणि ब्रिटिशांनी आपल्या इतर वसाहतींमध्ये कमी पडणाऱ्या मनुष्यबळाची गरज इथून भागवायला सुरुवात केली. निरोगी आरोग्याचं आणि भरपूर पगाराचं आमिष दाखवून या भारतीयांना नेण्यात आलं. उत्तर प्रदेशासोबत बिहार आणि बंगालातून भारतीयांना नेण्यात आलं. सुरिनामातही तेच झालं. गुलाम बंदी लागू होण्याच्या आत डचांनी भारतीय पगारी मजुरांना सुरिनामात आणलं आणि आफ्रिकन गुलामांच्या जागी बसवलं. त्यामुळे जगाला दिसलेली गुलाम बंदी प्रत्यक्षात मात्र कधी झालीच नाही.

१८७३ ते १९१६ या काळात जवळ जवळ ४०,००० भारतीय तिकडे गेले होते. त्यांच्या ने-आणिचा खर्च त्यांच्या होणाऱ्या मालकांकडून वसूलण्यात आला होता. त्यांच्या बायका-पोरांचा खर्चही त्यांच्या खिशातून काढण्यात आला होता. अशा प्रकारे भारतीयांचं स्थलांतर तिकडे झालं. नंतर त्यातले एक तृतीयांश लोक ५ वर्षांचा मजुरी-करार संपल्यावर भारतात परतले पण बाकीच्या लोकांना तिथे राहिल्यावर त्यांच्या नावावर जमिनी मिळाल्या. शेती करण्याचे अधिकार मिळाले. अशाप्रकारे हे भारतीय मजूर, सुरिनामचे रहिवासीच झाले. आज ते मजूर नसून तिकडच्या देशाच्या राजकारणात, समाजकारणात आणि इतर गोष्टींत सक्रिय सहभाग घेणारे इमानदार नागरिक आहेत. आपली हिंदू संस्कृती जपून ते इतर लोकांसोबत सुखाने राहत आहेत! त्यामुळे इतक्या वर्षानंतर हिंदू संस्कृती आता सुरिनामचा अविभाज्य भाग झालेली आहे असं म्हणता येईल.

हा लेख इतरांना पाठवा

ओमकार बर्डे

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *