इंग्रजांची डोकेदुखी ठरलेला इजिप्तचा हुकूमशहा आणि सुवेझ कालवा

सुवेझचा कालवा – मानवानं तयार केलेला, आफ्रिका आणि आशिया या दोन महाकाय खंडांमधली सीमा निश्चित करणारा अत्यंत मोक्याचा जलाशय. भारताच्या पश्चिम किनारपट्टीतून निघणाऱ्या जहाजांचे, केप ऑफ गूड होपला वळसा घालून मग युरोप गाठावे लागण्याचे कष्ट वाचवणारा हा अतिमहत्त्वाचा कालवा, इतिहासात जर संघर्षाचा विषय ठरला नसता तर नवलच वाटलं असतं. आज जरा या सुवेझ कालव्यापायी झालेल्या अशाच एका संघर्षामुळे जागतिक राजकारणाने कशी नवी वळणं घेतली, हे आपण थोडक्यात समजून घेऊया.

सुलतान फारुखची उचलबांगडी
सुलतान फारुख, त्याची बायको फरीदा आणि पहिली मुलगी फरियाल

१९४८ साली अरबांमध्ये आणि इस्राईलमध्ये युद्ध झालं. इस्राईल राष्ट्र निर्माण होऊ देण्याला अरब राष्ट्रांचा विरोध होता. या विरोधाची पार्श्वभूमी या युद्धाला कारणीभूत होती. या युद्धामध्ये सहभाग घेतलेल्या अरबी राष्ट्रप्रमुखांना स्वतःचं महत्त्व प्रस्थापित करण्याची खुमखुमी होती. इजिप्तचा सुलतान फारुख याला पॅलेस्टिनची भूमी इजिप्तला जोडून घ्यायची होती. ट्रान्सजाॅर्डनचा सुलतान अब्दुल्ला आपल्याहून वरचढ ठरू नये अशी त्याची इच्छा होती. म्हणून फारूखने युद्धात आधी १०,००० आणि मग वाढवत नेऊन एकूण २०,००० सैन्य जुंपलं. इजिप्तच्या सैन्याधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं होतं की तेल अविव तर आपण दोन आठवड्यांत जिंकून घेऊ. प्रत्यक्षात या युद्धातली इजिप्तची कामगिरी अतिशय निराशाजनक ठरली. इजिप्तचं सैन्य शिस्तबद्ध नव्हतं, त्यांना धड प्रशिक्षणही मिळालेलं नव्हतं. त्यांच्या बहुतेक चढाया निष्फळ ठरल्या, आणि त्यांचे भरपूर सैनिक मारले गेले. फारुखची नाचक्की झाली.

इजिप्तमध्ये फारुकबद्दल रोष वाढीस लागला. फारुक मोठा रंगेल माणूस होता. त्याला युरोपात ऐश आराम करायची भारी हौस होती. आपल्याविरोधात सेनाधिकारी बंड करू पाहतायत, अशी सूचना मिळूनही त्याने त्याकडे ‘हे लोक माझं काय बिघडवणार’ असा आविर्भाव ठेवून दुर्लक्ष केलं. इतकंच नाही, तर युद्धमंत्री म्हणून स्वतःच्या मेव्हण्याची नेमणूक केली.

क्रांतीला सुरुवात

या नेमणुकीमुळे सेनाधिकारी चिडले. २३ जुलै १९५२ रोजी इजिप्तमध्ये क्रांती सुरु झाली. मोहम्मद नागीब आणि गमाल अब्दुल नासीर या दोघांच्या नेतृत्वाखाली सैन्याधिकाऱ्यांनी इजिप्तचा राजा फारुखविरोधात बंड केलं. फारुकच्या अधिपत्याखाली इजिप्त आणि सुदानचा प्रदेश होता.

फारुखने इंग्लंडकडे मदत मागितली, पण ती काही त्याला मिळाली नाही. १९५१ साली इंग्लंडसोबतचा सुवेझ कालव्यासंदर्भात केलेला करार इजिप्तनं धुडकावून लावला होता. स्वतः फारुख इटलीप्रेमी आणि ब्रिटीशद्वेष्टा होता. त्याची उचलबांगडी करण्यात इजिप्तमध्ये असलेल्या काही ब्रिटीशांनीही हातभार लावला होता. शेवटी आपलं राजपद सोडून देऊन त्याने इटलीत आश्रय घेतला. तिथे तो ऐशाआरामात जगला आणि १९६५ साली मृत्यु पावला.

सुवेझचा कालवा

क्रांतीनंतरच्या इजिप्तशी आपले संबंध चांगले ठेवण्याच्या प्रयत्नात ब्रिटिशांनी इजिप्तवरील स्वतःची पकड सैल केली होती आणि सुदानवरचा ताबाही सोडून द्यायचं ठरवलं होतं. ऑक्टोबर १९५४ साली, ब्रिटन आणि इजिप्तमध्ये करार झाला की सुवेझमधून इंग्रज आपलं सैन्य २० महिन्यांत काढून घेतील, आणि सात वर्षं ब्रिटीशांकडे सुवेझकडे परतण्याचा हक्क शाबूत राहील. करारानुसार इजिप्तकडे सुवेझ कालव्याचा ताबा १९६८ पर्यंत येणार नव्हता.

गमाल अब्दुल नासीर हा इजिप्तचा हुकूमशहा झाला. त्याने इजिप्तचा पहिला राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नागीब याला नजरकैदेत ठेवलं. १९५६ साली गमाल नासीरने इजिप्तची सूत्रं अधिकृतपणे आपल्या हाती घेतली. सोविएत रशियाने मध्यपूर्व काबीज करू नये म्हणून नासीरला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न अमेरिकाही करू लागला. त्यांनी नासीरला ३० लाख डाॅलरची लाचही दिली. १९५३-५४ दरम्यानच्या इंग्रज आणि इजिप्तमधील वाटाघाटींमध्ये अमेरिकेने वेळोवेळी इजिप्तची बाजू घेतली.

गमाल नासीर

गमालने आपला मोक्याच्या क्षेत्रावरील प्रभाव लक्षात घेऊन भांडवलवादी आणि साम्यवादी अशा दोन्ही ताकदींना खेळवत ठेवायचं ठरवलं. नासीरला अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं विकत घ्यायची होती, पण ती इस्राईलविरोधात न वापरण्याची अमेरिकेची अट त्याला मान्य नव्हती. अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी सोविएत रशियाकडून आपण शस्त्र घेऊ पाहतोय, अशा जाहीर भूमिका तो घेऊ लागला.

अशाने मध्यपूर्वेतला सोविएत प्रभाव वाढेल हे लक्षात घेऊन अमेरिकेने नासीर आणि इस्राइलमध्ये शांतीकरार प्रस्थापित करायचे प्रयत्न सुरु केले. १९५६ साली असे अनेक प्रयत्न झाले. ब्रिटीश आणि फ्रेंचांचं म्हणणं होतं की नासीरला इंगा दाखवूया, पण अमेरिकेला ते मान्य नव्हतं. ब्रिटीशांचं मध्यपूर्वेतलं वर्चस्वसुद्धा अमेरिकाला कमी करायचं होतं. ते नासीरला चुचकारत राहिले. नासीरला अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं आणि निधी हवाच होता. पण त्याची अरब जगताचा नेता होण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने इस्राइलशी शांतीकरार मान्य करणं शक्यच नव्हतं. तो नुसताच अमेरिकेला झुलवत राहिला.

गमाल नासीर स्वतः समाजवादी विचारांनी प्रभावित होता. २६ जुलै १९५६ रोजी त्याने सुवेझ कालवा सरकारी मालकीचा घोषित करून टाकला. या कालव्यातून इस्राईलकडे होणाऱ्या दळणवळणावर त्याने बंदी घातली. यामुळे अरबी जगात त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली.

पण पाश्चिमात्य देश यामुळे हडबडले. सुवेझ कालवा हे अतिशय मोक्याचं क्षेत्र होतं. दोन्ही महायुद्धांमध्ये या कालव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर तेलाच्या वाहतुकीसाठी या कालव्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता.

युद्धाची पार्श्वभूमी

ब्रिटिशांना आपलं साम्राज्य शाबूत ठेवायचं होतं. फ्रेंचांना आपल्या अल्जेरियामधल्या आपल्या वसाहतीवरचा ताबा सुरक्षित करायचा होता. नासीरने तिथल्या फ्रेंचांविरोधातल्या कुरबुरी वाढवल्या होत्या. नासीरने सुवेझ कालव्याबरोबरच तिरानची सामुद्रधुनी इस्राईलसाठी बंद करून टाकली होती. इस्राईलला ती खुली करून हवी होती. त्यातच नासीरनं रशियाकडून भरमसाट शस्त्रास्त्रं खरेदीचा करार केला होता त्यामुळे इस्राईल हडबडला होता.

म्हणून इस्राईल, इंग्रज आणि फ्रेंचांनी एक युद्धाचा कट रचला. इस्राइलने आधी हल्ला चढवायचा, इंग्रजांनी आणि फ्रेंचांनी आधी निषेध व्यक्त करायचा, आणि मग ऐन वेळी स्वतःही युद्धात इस्राइलच्याच बाजूनं उडी मारायची असं ठरलं आणि ठरल्याप्रमाणे हे सगळं पार पडलं. असं करण्यामागचा हेतु अमेरिकेला अंधारात ठेवणं हा होता. मात्र अमेरिकेचं या सगळ्यावर बारीक लक्ष होतं.

पडसाद

प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाल्यानंतर या तीनही शक्तींनी अत्यंत प्रभावीपणे इजिप्तला नामोहरम करून आपली सैनिकी उद्दिष्टं साध्य करून घेतली. पण आंतरराष्ट्रीय पटलावर त्याचे उमटलेले पडसाद त्यांना महागात पडले. युरोपातल्या ज्या देशांना या भागात कोणताही रस नव्हता तेसुद्धा इंग्लंड व फ्रान्सने केलेल्या या युद्धाविरोधात प्रतिक्रिया देऊ लागले. इस्लामी राष्ट्रं तर खूपच भडकली. पाकिस्तानमध्ये इंग्लंडविरोधात मोर्चे निघाले. इराकने इजिप्तविरोधात मदत केली म्हणून इराकची तेलवाहतूक करणारी पाईपलाइन सिरीयाच्या सरकारनेच उडवून लावली. सौदी अरेबियाने इंग्लंड आणि फ्रान्सला तेल पाठवणं बंद करून टाकलं.

सोविएत रशियानं इंग्लंड, फ्रान्स आणि इस्राइलवर हल्ला करायच्या धमक्या दिल्या. इजिप्तच्या भूमीतून इस्राइल बाहेर निघत नाही तोवर अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या वतीने त्याच्यावर आर्थिक निर्बंध घालायचं ठरवलं. इंग्लंडला IMF कडून हवी असलेली मदतही अमेरिकेने मिळू दिली नाही. नासीरनंही अमेरिकेकडे हस्तक्षेप करण्यासाठी मदत मागितली होती.

ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान अँथनी ईडन यांना राजीनामा द्यावा लागला

२ नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्रानं अमेरिकेचा युद्धबंदीचा प्रस्ताव ६४ मतं बाजूने, ५ मतं विरोधात (ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, फ्रान्स, इस्राइल आणि इंग्लंड) आणि ६ तटस्थ मतं घेऊन पारित केला. यामध्ये भारताचे पंतप्रधान नेहरु यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलिप्त राष्ट्रांच्या वतीने पुढाकार घेत त्यांनी इंग्लंडचे तत्कालिन पंतप्रधान अँथनी इडन आणि युद्धात आक्रमक सहभाग घेणाऱ्या सर्वांचा निषेध केला. ६ नोव्हेंबरला फ्रान्स आणि इस्राइलला न कळवताच इंग्लंडनं युद्धातून पाय काढल्याची घोषणा केली. या सगळ्याची महत्त्वाची परिणती म्हणजे इंग्लंडची जागतिक पातळीवर मोठी नाचक्की झाली. पंतप्रधान ईडन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर इंग्रजांच्या आणि फ्रेंचांच्या अनेक वसाहतींमधील स्वातंत्र्य चळवळींना बळ मिळालं; कारण या देशांवर आंतरराष्ट्रीय दबाव आणता येऊ शकतो हे वसाहतींच्या लक्षात आलं. पुढच्या काहीच वर्षांत अनेक वसाहती स्वतंत्र झाल्या. अमेरिकेचं महत्त्व वाढलं. सुवेझच्या कालव्याची पूर्ण मालकी इजिप्तकडे आली. अरब जगतात सोविएत युनियनचा प्रभाव वाढू लागला.

चीनचा आफ्रिकेच्या राजकारणात प्रवेश

माओच्या चीनवरील अतिक्रमणाला मान्यता देणारा इजिप्त हा पहिला आफ्रिकन देश होता. युद्धबंदीच्या ठरावानंतर सुवेझचा कालवा परत घेताना हातभार लावायला चीनने अडीच लाख लोक इजिप्तच्या मदतीला धाडले होते.

‘सेक्युलर’ नासीरनं केलेला ज्यूंचा छळ

नासीरने युद्धकाळात देशातल्या जवळपास हजार ज्यूंना अटकेत टाकलं आणि ज्यूंचे उद्योगधंदे जप्त केले. इजिप्तच्या मशिदींमधून ‘ज्यू लोक देशाचे शत्रू आहेत’ असे संदेश पसरवले गेले. ज्यू लोकांच्या बँक खात्यांवरही जप्ती आणली गेली. नासीरने सुमारे २५००० ज्यूंना देशोधडीला लावलं. त्यांच्या मालमत्ता इजिप्त सरकारच्या नावे करण्यात आल्या.

सुवेझच्या कालव्यावरून घडलेल्या युद्धाने जागतिक राजकारणात लक्षणीय बदल घडवले. साम्यवादी नासीरच्या लहरी उपद्व्यापांचे जगावर दूरगामी परिणाम होणार होते.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *