प्राचीन भारतातलं पहिलं धरण – सुदर्शन

आजमितीला जगभरात जलसंधारणाची कामे अतिशय धडाक्यात झालेली दिसतात. आजचे आधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने वापरून हे घडवून आणणे ही अगदीच सामान्य गोष्ट झाली. पण ज्या प्राचीन काळी अशी साधने आणि इतके प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते, तेव्हा तत्कालीन राज्यकर्त्यांनी फक्त निसर्गाच्याच कृपेवर अवलंबून राहून ‘त्याच्यामुळे होईल तसे होऊ दे’, म्हणून कारभार चालविला होता का? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. भारतातल्याच अशा एका प्राचीन विकासकामाचे उदाहरण आता आपण या संदर्भात बघणार आहोत.

इ. स. पूर्व चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात ‘चंद्रगुप्त मौर्य’ हा सम्राट होऊन गेला. तत्कालीन ‘नंद’ घराण्याचे ‘मगध’ (आजचा बिहार) येथील राज्य त्याने चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली जिंकून घेतले. वयाच्या २२व्या वर्षी तो मगधाचा राजा झाला. तिथून पुढे २४ वर्षे त्याने राज्यकारभार चालविला. ते राज्य आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने उत्तरोत्तर वाढवित नेले आणि त्याचे रुपांतर एका बलाढ्य साम्राज्यात केले. इथवर इतिहास साधारणपणे अनेकांना माहिती असतो. पण यातली अनेकांना माहिती नसलेली अशी एक विशेष गोष्ट आहे.

चन्द्रगुप्ताने या दरम्यान आपल्या राज्यात अनेक विकासकामे केली. आर्थिक, राजकीय आणि प्रशासकीय स्वरूपाच्या काही मूलगामी सुधारणा घडवून आणल्या. त्यांपैकी ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाचे काम म्हणजे त्याने आजच्या गुजरातमध्ये बांधलेले एक छोटेसे धरण! हे काम ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे अशासाठी, की त्याचे भरभक्कम भौतिक पुरावे आज उपलब्ध आहेत.

या धरणाचे नाव ‘सुदर्शन’! ‘गिरिनगर’ येथे ‘सुवर्णसिकता’ आणि ‘पलाशिनी’ या दोन नद्यांच्या प्रवाहावर ‘ऊर्जयत्’ पर्वताच्या रांगांमध्ये चंद्रगुप्ताने ते बांधवून घेतले होते, अशी नोंद सापडते. कुठे आहे हे ठिकाण? तत्कालीन गिरिनगर, म्हणजे आजच्या सौराष्ट्र-गुजरातमधील ‘गीर’ – जुनागढच्या आसपासचा प्रदेश. सुवर्णसिकता नदी म्हणजे आजची जुनागढजवळून वाहणारी ‘सोनरेखा’ नदी. पण दुसरी पलाशिनी नदी मात्र नेमकी कोणती, ते आज सांगता येत नाही. ऊर्जयत् म्हणजे रैवतक पर्वतांच्या रांगा. आणि ही सगळी माहिती देणारा भौतिक पुरावा, म्हणजे जुनागढला गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेला एक शिलालेख!

रुद्रदामन् राजाचा जुनागढ शिलालेख

हा लेख आहे इ.स.च्या दुसऱ्या शतकातला एक ‘शक’ राजा ‘रुद्रदामन्’ याचा. या लेखातून मिळणाऱ्या माहितीनुसार,

तो ‘सुदर्शन’ तलाव (तडाक) सम्राट चंद्रगुप्ताने (इ. स. पूर्व चौथे शतक) त्याचा गिरिनगरचा प्रांताधिकारी (राष्ट्रिय) ‘पुष्यगुप्त’ याच्याकडून बांधवून घेतला. त्याचा नातू सम्राट अशोक (इ. स. पूर्व तिसरे शतक) याने तो अजून भक्कम केला. त्यासाठी त्याने याला काही मोऱ्या (प्रणाळी) करवून घेतल्या. हे काम त्याने यवन (ग्रीक) राजा ‘तुषास्फ’ याचेकरवी करून घेतले. हा तुषास्फ राजा बहुधा सम्राट अशोकाचा एखादा मांडलिक असावा. पुढे या रुद्रदामन्’ राजाच्या काळात, म्हणजे इ. स. च्या दुसऱ्या शतकात, एके रात्री (मार्गशीर्ष कृ. १, शक संवत्सर ७२, इसवी सन १५०) वादळी पाऊस होऊन सुवर्णसिकता आणि पलाशिनी नद्यांना पूर आल्याने त्याला अतिशय मोठे भगदाड पडून ते फुटले. तेव्हा रुद्रदामन् राजाने ते दुरुस्त करण्याचे ठरविले. पण या कामी त्याच्या सल्लागारांनी आणि कार्यकारी अमात्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही, उलट विरोधच केला. ‘आता हे धरण काही पुन्हा बांधले जाणार नाही’, असे समजल्याने त्या परिसरातले लोक मात्र हवालदिल झाले. परंतु सौराष्ट्राचा प्रांताधिकारी ‘सुविशाख’ याने मात्र या कामात लक्ष घालून सुदर्शनला अधिक चांगला बांध बांधून घेतला आणि ते आधीपेक्षा तिप्पट (!!!) मजबूत आणि अजूनच सुंदर करून घेतले. यासाठी रुद्रदामन् राजानेही आपल्या खजिन्यातून पाण्यासारखा पैसा खर्च केला. तो पुन्हा वसूल करण्यासाठी प्रजेवर कराचा बोजाही टाकला नाही.

ही झाली इ. स. च्या दुसऱ्या शतकातली गोष्ट! त्याच शिलालेखाच्या खाली त्याच खडकावर कोरलेला असाच अजून एक शिलालेख आहे. तो आहे गुप्त घराण्याचा एक राजा ‘स्कन्दगुप्त’ याचा. त्याचा काळ इ. स. च्या पाचव्या शतकातला. स्कन्दगुप्ताच्या काळातही एकदा गिरिनगरच्या लोकांवर पुन्हा तोच प्रसंग गुदरला. त्या लेखातून मिळणाऱ्या माहितीनुसार, “हे सुदर्शन धरण संततधार पावसामुळे भाद्रपद शु. ६, गुप्त संवत्सर १३६, इसवी सन ४५५ रोजी रात्री पलाशिनी नदीला पूर आल्यामुळे पुन्हा फुटले. त्याचा तळ उघडा पडून दिसू लागला. ते मूळचे ‘सु-दर्शन’ त्यामुळे आता ‘दुर्दर्शन’ झाले! लोक पुन्हा हवालदिल झाले. त्यानंतर काही महिन्यांनी पुढच्या ग्रीष्म ऋतूत (म्हणजे गुप्त संवत्सर १३७, इसवी सन ४५६ मध्ये) स्कंदगुप्ताचा ‘सुराष्ट्र’ येथील राजाधिकारी ‘चक्रपालित’ याने अमाप पैसा खर्च करून ते पुन्हा एकदा दुरुस्त करून घेतले, मजबूत दगडी टिकाऊ बांधकाम करून घेतले. इतकेच करून तो थांबला नाही, तर पुढे वर्षभरात (गुप्त संवत्सर १३८, इसवी सन ४५७ मध्ये) त्याने तिथे जवळच विष्णूचे एक मंदिरही बांधले.”

स्कन्दगुप्ताचा जुनागढ शिलालेख

पुढे हे किती काळ टिकले, अजून अशा किती वेळा त्याच्या दुरुस्त्या करण्यात आल्या, याची वेगळी नोंद सापडत नाही. पण चंद्रगुप्त मौर्याचा काळ इ. स. पूर्व चौथे शतक ते स्कंदगुप्ताचा काळ इ. स. चे पाचवे शतक, असे निदान ८ शतके तरी ते नक्की टिकले होते, हे कळते. इतक्या प्राचीन काळात बांधले गेल्यामुळे भारतातले ते पहिले धरण ठरते! सध्या गिरनार पर्वताच्या उतारावर ‘सुदर्शन तलाव’ नावाने हे आजही आपल्याला दिसते. अर्थातच आज त्याचे स्वरूप छोट्या तळ्यासारखे झाले आहे. तत्कालीन बांधाची भिंत, जी इतिहासात दोनदा तरी दुरुस्त केल्याच्या नोंदी दिसतात, ती गाळ साचल्यामुळे गायब आहे, आणि त्याऐवजी त्या जागेवर विविध इमारती उभ्या राहिलेल्या दिसतात. गिरनार पर्वतावर श्रीदत्त पादुका दर्शनासाठी चढण याच तलावापासून सुरु होते, लाखो भक्तगण तिथूनच पुढे जातात. पण हा प्राचीन वारसा यांपैकी बहुतेक अनेकांना माहीतच नसतो!

तलाव की धरण?

प्रस्तुत शिलालेखांत ‘सुदर्शन’चा उल्लेख ‘तडाक’, ‘तटाक’ असा केल्याने अनेकांना तो एक सामान्य जलाशय वाटतो. आजच्या प्रचलित संस्कृतमध्ये त्याचा अर्थही तसाच होतो. पण त्याच्या रचनेचे वर्णन पुन्हा नीट बारकाईने मुळातून वाचले, तर लक्षात येते की – तो एक ‘बांधलेला’ जलाशय आहे, तो दोन नद्यांच्या प्रवाहावर बांधलेला आहे, त्याला पुढून पाणी काढून देण्यासाठी मोऱ्या बांधलेल्या आहेत, तो दोनदा पुराच्या पाण्याने ‘फुटला’ आहे. जमिनीच्या पातळीच्या खाली खणून बनवलेला आणि बाजूंनी भिंती बांधून पक्का केलेला, असा जर तो एक सामान्य ‘तलाव’ असेल, तर पुराच्या पाण्याच्या भरात फार तर तो ओसंडून वाहील, पण त्या वेगाने तो ‘फुटेल’ कसा? पण तो ‘फुटला’! याचा अर्थ तिथे जमिनीच्या पातळीच्या वर काहीतरी बांधकाम केलेले होते, ते फुटले, आत साठलेले सगळे पाणी पर्वताच्या उतारावरून वाहून गेले, आणि म्हणूनच शेवटी त्याचा तळ उघडा पडला! ‘सुदर्शन’ हे एक ‘धरण’ होते, हे नि:संशय! ‘तडाक’, ‘तटाक’ म्हणून केलेला उल्लेख त्या बांधामागे साठलेल्या जलाशयाचा असणार!

या पर्वताच्या दोनेक किलोमीटर अलिकडे सम्राट अशोकाचे शिलालेख असलेला मोठा खडक आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने (Archaeological Survey of India) हा वारसा जतन केला आहे. त्या खडकावर सम्राट अशोकाच्या चौदा राजाज्ञा लेखांच्या स्वरुपात कोरलेल्या आहेत. त्यांच्याच खाली रुद्रदामन् राजाचा आणि अजून खाली स्कन्दगुप्ताचा, असे वर उल्लेख केलेले दोन्ही शिलालेख बघायला मिळतात. अशोकाचे सर्व शिलालेख ‘ब्राह्मी’ लिपीत आणि ‘माहाराष्ट्री प्राकृत’ भाषेत आहेत. रुद्रदामन् राजाचा शिलालेखही ब्राह्मी लिपीत, पण संस्कृत भाषेत आहे. संस्कृत भाषेतल्या उपलब्ध शिलालेखांपैकी हा रुद्रदामन् राजाचा शिलालेख सर्वात प्राचीन मानला जातो. खालचा स्कन्दगुप्ताचा शिलालेखही ब्राह्मी लिपीत आणि संस्कृत भाषेत आहे. आणि विशेष म्हणजे तो पूर्ण पद्यमय आहे! थोडाथोडका नाही, तर अगदी लांबलचक – चांगला ४७ वृत्तबद्ध श्लोकांमध्ये आहे!

अशोक लेखशिला, जुनागढ

 

अशोकाचा जुनागढ शिलालेख

 

आपल्या पूर्वजांची अशी अनेक अचाट कृत्ये काळाच्या उदरात गडप झाली आहेत. त्या गौरवशाली इतिहासाचे या निमित्ताने जरासे स्मरण करूया आणि कोणत्याही निमित्ताने सौराष्ट्रात गेल्यावर या वारसास्थळांना एकदा तरी भेट देण्याचा निश्चय करूया!

 

हा लेख इतरांना पाठवा

वासुदेव बिडवे

शिक्षण आणि उपजीविकेने अभियंता. Embedded Designsच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत. एक Indologist, अर्थात भारतीयविद्या (प्राच्यविद्या) विषयांचा अभ्यासक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *