भारतीय सेना – संरचना

भारतीय सेना ही जगातील चौथी सर्वांत मोठी सेना आहे. सैन्यबळाचा विचार करायला गेलं तर २०१७ च्या आकडेवारीनुसार भारतीय सैन्यात सुमारे १३,००,००० सक्रिय सैनिक तर ९,६०,००० राखीव सैनिक आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ व्यवस्थापन करायचं असेल तर संस्थेची रचना कशी असावी हे भारतीय सेनेकडून शिकता येईल. चला आज आपण पाहूया भारतीय सैन्याची संरचना.

भारतीय सेनेचं मुख्यालय भारताची राजधानी दिल्ली इथे आहे. सेनेशी निगडित सर्व प्रकारच्या यंत्रणा या मुख्यालयाशी संलग्न आहेत. सैन्याशी निगडित कोणत्याही प्रकारचा महत्त्वाचा आदेश या मुख्यालयातूनच पाठवला जातो. भारतीय संविधानातील कलम ५३ अन्वये भारतीय सेनेचे “कमांडर इन चीफ” म्हणजे सर्वांत वरिष्ठ अधिकारी हे भारताचे राष्ट्रपती असतात. त्यानंतर “ चीफ ऑफ द आर्मी स्टाफ ” यांचं पद येतं आणि मग त्याखालोखाल इतर पदं येतात.

भारतीय सैन्यातील विविध पदं (ranks):

एखाद्या सैनिकाचा पदभार त्याचा अनुभव, वय आणि क्षमता यांवर अवलंबून असतो. सैन्यात भरती होण्याचे विविध प्रकार असतात. सैन्यात भरती होण्यासाठी कोणत्या परीक्षा दिल्या त्यावरून सैनिकांची भरती कोणत्या पदावर होईल हे ठरवलं जातं. पदोन्नतीचे निकषही ठरलेले असतात. त्या क्रमानुसारच सैनिकांची बढती होऊ शकते. आता आपण सैनिकी पदांचे प्रकार आणि त्यांचे गणवेश त्यांच्या कार्यभाराच्या चढत्या क्रमाने पाहू.

सुरुवातीच्या फळीत येतात ते शिपाई, लान्स नाईक, नाईक आणि हवालदार. शिपायाच्या गणवेशात अंगाखांद्यावर कोणतंही निशाण नसतं तर लान्स नाईक, नाईक आणि हवालदार यांच्या हातावर अनुक्रमे १, २ आणि ३ पट्ट्या असतात. प्रत्येक फळीतील सैनिकाच्या खांद्यावरची पट्टी विशिष्ट प्रकारची असते.

त्यानंतरच्या फळीत येतात ते जुनिअर कमिशन्ड ऑफिसर. नायब सुभेदार, सुभेदार आणि सुभेदार मेजर अशी यातील ३ पदांची नावं आहेत. या तिघांच्याही गणवेशात खांद्यांवर एक पट्टी असते. या पट्टीच्या वरती नायब सुभेदाराच्या गणवेशावर एक, तर सुभेदाराच्या गणवेशावर २ पंचतारांकित चिन्हं असतात. सुभेदार मेजरच्या गणवेशावर मात्र तारे नसून राष्ट्रीय प्रतीक असतं.

त्यानंतर येते कमिशन्ड ऑफिसर्सची फळी. यात समावेश होतो लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल आणि कर्नल या पदाधिकाऱ्यांचा. NDA किंवा CDS ची परीक्षा देऊन लेफ्टनंट पदावर थेट नियुक्ती मिळवता येते. लेफ्टनंटच्या गणवेशात खांद्यांवर दोन पंचतारांकित चिन्हं असतात आणि कॅप्टनच्या खांद्यांवर ३. मेजरच्या गणवेशात खांद्यांवर फक्त एक राष्ट्रीय प्रतीक असतं. या फळीतील कोणाच्याही खांद्यांवर पट्ट्या नसतात. लेफ्टनंट कर्नलच्या खांद्यांवर १  पंचतारांकित चिन्ह आणि त्याच्यावर एक प्रतीक तर कर्नलच्या खांद्यांवर २ पंचतारांकित चिन्ह आणि एक प्रतीक असतं. कर्नल पदावरून बढती मिळाल्यावर ब्रिगेडियर पद येतं. ब्रिगेडियरच्या गणवेशात खांद्यांवर त्रिकोणी रचनेत ३ पंचतारांकित चिन्हं तर त्यांच्यावरती १ राष्ट्रीय प्रतीक असतं.

या नंतर येते ती फळी उच्च पदांच्या कमिशन्ड ऑफिसर्सची. यात आहेत मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल आणि जनरल (चीफ ऑफ द आर्मी स्टाफ). मेजर जनरलच्या गणवेशावर खांद्यांवर आहे ते एक पंचतारांकित चिन्ह आणि त्याखालोखाल लाठी-तलवारीचं चिन्ह. लेफ्टनंट जनरलच्या गणवेशात खांद्यांवर आहे एक राष्ट्रीय प्रतीक आणि एक लाठी-तलवारीचं चिन्ह. सर्वोच्च पदाच्या गणवेशावर म्हणजे जनरलच्या गणवेशावर आहे ते एक लाठी-तलवारीचं चिन्ह, त्यावर पंचतारांकित चिन्ह आणि त्यावर राष्ट्रीय प्रतीक. विशेष म्हणजे या फळीतील सर्व ऑफिसर्सची जी चिन्हं/प्रतीकं आहेत त्या सर्वांच्या कडा लाल असतात तर उर्वरित फळीतील सैनिकांच्या गणवेशावरील चिन्हांना कोणतीही बॉर्डर किंवा काठ नसतो.

Lt Gen Om Prakash
२०१५ सालातील लेफ्टनंट जनरल ओम प्रकाश

या सर्वांहून वर एक पद येतं ते म्हणजे फील्ड मार्शल. हे पद सहसा रिक्त असतं. ऐतिहासिक कामगिरीनंतर/ युद्धकाळानंतर दिलं जाणारं हे मानाचं पद आहे. फील्ड मार्शलच्या गणवेशात खांद्यावर असतं एक राष्ट्रीय प्रतीक, आणि त्याखाली कमळ आणि ब्लॉसम फुलांच्या पुष्पचक्रामध्ये (wreath) असलेलं लाठी-तलवारीचं चिन्हं.

a>

भारतीय सेना
संस्थेची संरचना:

वर पाहिली ती आहे वैयक्तिक पदानुसार आखलेली संरचना. पण एक संस्था म्हणून विचार केला तर संरचना वेगळी आहे. यात कमांड्स, कॉर्प्स, डिव्हिजन, ब्रिगेड, बटालियन, प्लाटून, कंपनी, सेक्शन असे विविध भाग आहेत. या सगळ्यांची मिळून पिरॅमिडसारखी संरचना तयार होते. या पिरॅमिडच्या सर्वांत वर कमांड्स आहेत तर सर्वांत खाली सेक्शन्स आहेत.

कमांड्स: भारतीय सेनेची स्थापना १८९५ मध्ये झाली तेव्हा तिची रचना वेगळी होती. आज जी संरचना अस्तित्वात आहे ती १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यावर करण्यात आली होती. भारतीय सैन्यात एकूण ७ कमांड्स आहेत. यातल्या ६ ऑपरेशनल ( थेट यु्द्धात सहभागी होऊ शकणाऱ्या) कमांड्स आहेत आणि एक ट्रेनिंग कमांड आहे. प्रत्येक कमांडचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल करतो.

भारतीय सेनेच्या सात कमांड्स व त्यांची मुख्यालयं पुढीलप्रमाणे :

१. सेंट्रल कमांड – लखनऊ

२. नॉर्दन कमांड – उधमपूर

३. सदर्न कमांड – पुणे

४. वेस्टर्न कमांड – चंडीमंदिर

५. ईस्टर्न कमांड – कोलकाता

६. साऊथ-वेस्टर्न कमांड – जयपूर

७. ट्रेनिंग कमांड – शिमला

 

या सात कमांड्स फक्त सैन्यदलाच्या असून नौदल आणि वायुदलाच्या वेगळ्या अशा अजून १० कमांड्स आहेत.

कॉर्प्स: प्रत्येक कमांडच्या अखत्यारीत साधारण २ ते ३ कॉर्प्स असतात. स्ट्राईक, होल्डिंग किंवा मिक्स्ड असे कॉर्प्सचे प्रकार आहेत. भारतीय सैन्यात अशा एकूण १४ कॉर्प्स आहेत. कॉर्प्सचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल करतात.

कॉर्प्स आणि त्यांची मुख्यालये पुढीलप्रमाणे:

I कॉर्प्स – मथुरा

II कॉर्प्स – अंबाला

III कॉर्प्स – दिमापूर

IV कॉर्प्स – तेजपूर

IX कॉर्प्स – धरमशाला

X कॉर्प्स – भटिंडा

XI कॉर्प्स – जालंधर

XII कॉर्प्स – जोधपूर

XIV कॉर्प्स – लेह

XV कॉर्प्स – श्रीनगर

XVI कॉर्प्स – नगरोटा

XXI  कॉर्प्स – भोपाळ

XXXIII कॉर्प्स – सिलिगुरी

XVII कॉर्प्स -पानगड

 

 

डिव्हिजन, ब्रिगेड, बटालियन : कॉर्प्सनंतर रचनाक्रमात येते ती डिव्हिजन. भारतीय सैन्यात एकूण ४० डिव्हिजन आहेत. यातली प्रत्येक डिव्हिजन मेजर जनरलच्या नेतृत्वाखाली असते.

एका डिव्हिजनमध्ये ३ ते ४ ब्रिगेड येतात. ब्रिगेडचं नेतृत्व ब्रिगेडियर करतो.

एका ब्रिगेडमध्ये ३ ते ४ बटालियन किंवा रेजिमेंट असतात. एका बटालियन किंवा रेजिमेंटमध्ये ८०० ते १२०० सैनिकांची भरती असते. एक बटालियन ३ ते ५ कंपन्यांची बनते, आणि या बटालियनचा नेता कर्नल असतो. एका कंपनीमध्ये सहसा ३ प्लॅटून्स असतात आणि ती जवळपास १०० ते १२० सैनिकांची बनलेली असते. कंपनीचं नेतृत्व करत असतो मेजर किंवा लेफ्टनंट कर्नल. ३० ते ३५ सैनिकांचं एक प्लॅटून असतं आणि त्यात ३ सेक्शन्स असतात. या प्लॅटून्सचं नेतृत्व जुनियर कमिशन्ड ऑफिसर करतो. एका सेक्शनमध्ये १० सैनिक असतात आणि त्यांचं नेतृत्व हवालदार करतो. सेक्शन हे भारतीय सेनेचं सर्वांत छोटं अंग आहे.

अशाप्रकारे

१० सैनिकांचं सेक्शन

३ सेक्शनचं प्लाटून

३ प्लॅटून्सची कंपनी

३ ते ५ कंपन्यांची बटालियन

३ ते ४ बटालियनची ब्रिगेड

३ ते ४ ब्रिगेडची डिव्हिजन

३ ते ४ डिव्हिजनची कॉर्प्स

२ ते ३ कॉर्प्सच्या कमांड्स

६ कमांड्सची भारतीय सेना

असा संरचनेचा पिरॅमिड उभा राहतो.

 

हा लेख इतरांना पाठवा

ओमकार बर्डे

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *