कुमार गंधर्वांचं आजारपण आणि स्ट्रेप्टोमायसीनचा शोध

मम आत्मा गमला हा,
नकळत नवळत हृदय तळमळत
भेटाया ज्या देहा

एकचि वेळ जरी मज भेटला,
जीव कसा वश झाला,
भाव दुजा मिटला
वाटे प्राणसखा आला
परतुनि गेहा

१९४७ साली वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी कुमारांना टी.बी. झाला. यापुढे त्यांना गाता येणार नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं.
मुंबई सोडून कोरड्या हवेच्या ठिकाणी जा, असा डॉक्टरांचा सल्ला होता. कुमारांनी मध्य प्रदेशातील देवासची निवड केली. पुढची अनेक वर्षं त्यांनी आजारपणात घालवली.

एका जागी पडून जे काही कानावर पडेल ते कुमार ऐकत होते. पक्षांची किलबिल असो, पानांचं सळसळणं असो, वाऱ्याचं घोंगावणं असो, मध्यप्रदेशातील लोकसंगीत गात गात जाणारे वाटसरू असोत, हे सर्व कुमार बसल्या बसल्या ऐकत होते, अंतर्मुख होत होते.

गंधर्वांचा आवाज कोणालाही ऐकू जाणार नाही इतपत गुणगुणण्यापुरताच शिल्लक होता.

१९२८ मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग या स्कॉटिश शास्त्रज्ञाने पेनिसिलीनचा शोध लावला. हे जगातलं पहिलं प्रतिजैविक (अँटिबायोटिक). आज प्रतिजैविक औषधं सहज मिळत असली तरी त्याची सुरुवात होऊन अद्याप १०० वर्षेही झालेली नाहीत.

विसाव्या शतकात वैद्यकशास्त्रात जी काही प्रगती झाली त्याची ही एका अर्थाने सुरुवात होती. पण पेनिसिलीन टी.बी. वर चालत नव्हतं. शतकानुशतके लोकांचा जीव घेणाऱ्या या रोगावर अजूनही काही औषध नव्हतं.

टी.बी.चे जिवाणू मातीत टिकत नाहीत एवढं शास्त्रज्ञांना समजलं होतं. सेलमन वॅक्समन हा अमेरिकन शास्त्रज्ञ मातीत हे जीवाणू का टिकत नाहीत याचा वर्षानुवर्षे अभ्यास करत होता. मातीत काही चांगले जीवाणू असतात जे रोगाच्या जीवाणूंना मारतात हे वॅक्समनच्या लक्षात आलं होतं.

सेलमन वॅक्समन

वॅक्समन, त्याचा पीएचडी विद्यार्थी अल्बर्ट शाट्झ आणि इतर विद्यार्थ्यांना १९४३ मध्ये मोठं यश मिळालं. मातीतल्या जीवाणूंपासून एक नाही, दोन नाही तर तब्बल ८-१० वेगवेगळे प्रतिजैविक पदार्थ त्यांनी निर्माण केले.

कोणताही प्रतिजैविक पदार्थ औषध म्हणून वापरण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते. रोगाचे जिवाणू मेले पाहिजेत पण चांगल्या पेशींना मात्र त्रास होता कामा नये.

स्ट्रेप्टोमायसीन हे प्रतिजैविकाचं काम उत्तम प्रकारे करत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी.बी.च्या जीवाणूंना रोखणारं हे पहिलं औषध होतं. टी.बी. वर औषध उपलब्ध असतानाही उपचार वेळेवर न मिळाल्याने आजही जगभर सुमारे १५ लाख लोकांचा जीव जातो.
औषधाशिवाय काय होत असेल याचा नुसता विचार केलेला बरा. यावरून या शोधाचं महत्त्व कदाचित लक्षात येईल.

स्ट्रेप्टोमायसीनच्या सर्व चाचण्या पूर्ण होऊन, औद्योगिक उत्पादनातील सर्व अडथळे पूर्ण होऊन ते भारतात पोचायला १९५२ साल उजाडलं. याच वर्षी वॅक्समनला स्ट्रेप्टोमायसीनच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालं.

औषध चालू होताच कुमारांची तब्येत हळूहळू सुधारू लागली. दीर्घ काळाच्या आजारपणात त्यांचं एक फुफ्फुस निकामी झालं होतं जे परत मिळवणं शक्य नव्हतं. दुसऱ्या फुफ्फुसावर संपूर्ण भार टाकून हळूहळू ते आजारपणातून बाहेर आले. हळूहळू गाणंही सुरू झालं.

गंधर्व तर ते होतेच, पण आजारपणातील एकटेपणात त्यांना काहीतरी वेगळंच गवसलं होतं. पुढची चाळीस वर्षं कुमारांनी जे सांगीतिक विश्व उभं केलं त्याचं माझ्यासारख्या पामराला वर्णन करणं शक्य नाही.

पण एक श्रोता म्हणून ती उंची मी नक्कीच अनुभवू शकतो. स्ट्रेप्टोमायसीनच्या शोधाला आणि औद्योगिक उत्पादनाला थोडासुद्धा उशीर झाला असता तर पुढच्या पिढीने कुमार कदाचित कधीच ऐकले नसते.

एकविसाव्या शतकातील एक महान शोध अगदी अचूक वेळी एका महान गंधर्वाला त्याचा आवाज देऊन गेला. या योगायोगाचं किती ऋण मानू?

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ निमकर

संगणकशास्त्रात पीएचडी आणि गणित अभ्यासक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *