स्थलपद्म – जमिनीवर उगवणारं कमळ

स्थलपद्म हे नाव वाचून गोंधळला असाल – तुम्ही म्हणाल जमिनीवर कमळ कधीपासून फुलायला लागलं?

पण खरोखरच हे जमिनीवर फुलणारं कमळ आहे बरं का! हे काही ठरावीक कालावधीतच बघता येतं.

खरं सांगायचं तर हे कमळ नाही. पण हिंदीमध्ये याला स्थलपद्म असं नाव आहे.

प्रत्यक्षात हे आहे एक ऑर्किड वर्गीय फूल! याचं शास्त्रीय नाव आहे नरवेलिया अरागोना (Nervilia aragoana Gaud).

याच नरवेलियाला हिंदीमध्ये स्थलपद्म म्हटलं जातं, ते त्याला येणाऱ्या कमळाच्या आकाराच्या पानामुळे.

तशी याला बरीच नावं आहेत. संस्कृत भाषेमध्ये याला पद्मकारिणी म्हणतात, मराठीत दुडूकी आणि काही गावरान भागात म्हणजे कोंकणात वगैरे याला म्हणतात ‘एका पानाची भाजी.’

फूल कधी पाहता येतं?
स्थलपद्म कधी पाहता येतं

वर उल्लेख केल्याप्रमाणे हे फूल तुम्हाला वर्षातले बारा महिने दिसू शकत नाही. त्याचे स्वत:चे असे ठरावीक दिवस असतात, तेव्हाच हे फूल उमलतं.

त्या फुलाचं जे काही १०-१५ दिवसांचं आयुष्य असतं, ते ते शांतपणे जगतं आणि अनंतात विलीन होतं. फूल जरी कोमेजून गेलं तरी याची पानं तुम्हाला बराच काळ दिसू शकतात.

पण फूल बघायचा अट्टाहास असेल, तर मात्र तुम्हाला योग्य तो मुहूर्त साधावाच लागेल.

तुम्हाला जागा माहिती आहे आणि तुम्ही योग्य वेळी त्या जागी नसाल तर कितीही चकरा मारा, तुम्हाला या फुलांचं दर्शन होण कठीणच आहे.

तुम्हाला एकवेळेस गुलबकावलीचं फूल मिळेल पण हे स्थलपद्म पाहायचं असेल तर तुम्ही योग्यवेळी आणि योग्यठिकाणी असणं खूप गरजेचं आहे.

पावसात सुरुवातीच्या २-३ सरी बरसून गेल्या म्हणजे जून महिन्याच्या साधारण दुसऱ्या आठवड्यात स्थलपद्म हळूच जमिनीतून वर डोकावतं.

याची वाढ जास्त होत नाही, फार फारतर १५-२० सेंमी. आणि फुलोरा येतो. याला एकावेळी १०-१५ फुलं येतात. जमिनीलगतची फुले आधी फुलतात आणि नंतर याची वाढ फुलोराच्या वरच्या बाजूला होत जाते.

संपूर्ण फुलोरा फुलायला ३-४ दिवस लागतात. इतर ऑर्किड वर्गीय वनस्पतींप्रमाणे याची फुलंसुद्धा परागीभवन होईपर्यंत टवटवीत असतात.

एकदा का परागीभवन झालं की स्थलपद्माची फुलं सुकायला सुरुवात होते.

परागीभवन झाल्यानंतर फुलोऱ्यावर २-३ फळं येतात. ही फळं सुकल्यावर तडकतात आणि या वनस्पतीचा बीजप्रसार होतो.

एका फळातून कोट्यवधी बिया निघत असल्या तरीही या वनस्पतीची बी रुजण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, आणि वातावरण योग्य नसेल तर बी रुजण्यात अडचणी निर्माण होतात. यामुळे ही वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही.

स्थलपद्म ही बऱ्यापैकी नखरेल वनस्पती आहे.

स्थलपद्म नखरेल वनस्पती आहे

हिला जिथे पोषक वातावरण असेल तिथेच ती वाढते. कधी कधी एखाद्या मोठ्ठ्या सागाच्या पायाशी किंवा आंब्याच्या मुळाशी ही चवऱ्या ढाळत असलेली आपल्याला दिसते.

पानं कुजून भुसभुशीत झालेली जमीन आणि सावली असेल अशा ठिकाणी ही वनस्पती आपलं बस्तान बसवते.

स्थलपद्माची फुलंसुद्धा नाजूक पिवळट हिरव्या रंगाची असतात. त्यामुळे बऱ्याचदा रानातून फिरताना स्थलपद्म फुलला आहे हे सहसा ध्यानात येत नाही.

ऑर्किड वर्गीय असल्याने याच्या आतील पाकळीवर पांढऱ्या रंगावर गुलाबी किंवा जांभळट रंगाचे पट्टे असतात.

विमानाला उतरण्यासाठी जशी धावपट्टी आवश्यक असते, त्याचप्रमाणे परागीभवन करण्यासाठी येणाऱ्या कीटकांना मार्गदर्शक म्हणून या पाकळीचा उपयोग होतो.

इतर वनस्पतीमध्ये आधी पानं येतात आणि नंतर फुलं फुलतात पण स्थलपद्माच्या फुलाची तऱ्हाच निराळी!

स्थलपद्म पान

याला आधी फुलं येतात आणि फुलं कोमेजल्यानंतर जमिनीतून एकच पान वर येतं.

फुलांचं आयुष्य १०-१५ दिवसांचंच असलं तरी याचं पान मात्र फुलांच्या मानाने दीर्घायुषीच म्हटलं पाहिजे.

जमिनीखाली याचे कंद असतात. त्यात मागच्या वर्षी केलेल्या अन्नाचा साठा यावर्षीच्या फुलोऱ्यासाठी वापरला जातो.

फुलं सुकल्यानंतर येणारं पान डिसेंबरपर्यंत प्रकाश संश्लेषण करून कंदातील संपलेला अन्नसाठा पूर्ववत करून ठेवण्याचा प्रयत्न करतं.

त्यानंतर हे कंद पुढील पावसाळा येईपर्यंत सुप्तावस्थेत पडून राहतात.

ही वनस्पती प्रामुख्याने पश्चिम घाटातील घनदाट जंगलात मिळते.

स्थलपद्म या वनस्पतीचा उपयोग सर्दी, अस्थमा, अतिसार, उलट्या होणे, मानसिक स्वास्थ्य यासारख्या आजारांवर होतो.

वर उल्लेख केल्याप्रमाणे याची भाजी करूनही जेवणात वापरली जाते. या सर्व कारणांमुळे स्थलपद्म या वनस्पतीची संकटग्रस्त प्रजाती म्हणून नोंद करण्यात आलेली आहे.

पावसाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या आजूबाजूला काळजीपूर्वक बघा. कदाचित तुमच्या आसपासच कुठेतरी हे स्थलपद्म तुम्हाला दिसू शकेल.

 

 

हा लेख इतरांना पाठवा

धनंजय राऊळ

नमस्कार, मी धनंजय द. राऊळ. मी वनस्पती शास्त्रातून माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून मला निसर्गातील जैवविविधता अभ्यासणे आवडते. निसर्गातील विविध घटकांचे छायाचित्रण करण्याचा मला छंद आहे. त्याचप्रमाणे नवनवीन जागी भटकंती करण्याचीही आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *