प्रमाणभाषा आणि शुद्धभाषा यांच्यात नेमका काय फरक आहे

प्रमाणभाषा म्हणजेच शुद्ध भाषा असं चुकीचं समीकरण बहुतांश लोकांच्या मनात मूळ धरून बसलंय. दुर्दैवाने शुद्ध भाषेचा आग्रह धरणाऱ्यांनाही हेच समीकरण योग्य वाटतं. या दोहोंमध्ये नेमका फरक काय आहे, आणि हा फरक ठळकपणे मांडणं महत्त्वाचं का आहे ते आता समजून घेऊया.

‘शुद्ध’भाषा हे भाषेचं/बोलीचं विशेषण आहे

तुका काय व्हया ता माका कळूक व्हया’, ‘माका हापूस लय आवडता’ आणि ‘मी आज सकाळी शेतात गेलेलंय’ ही मी अलिकडे ऐकलेली मालवणी बोलीतली वाक्यं. (मला मालवणी येत नाही पण ज्याला येते त्याच्याकडून ही वाक्यं बरोबर लिहिली आहेत का याची खातरजमा करून घेतलेली आहे. तरी जाणकार असणाऱ्यांना यात काही चुका आढळल्या तर कृपया कळवा, सुधारून घेईन.)

या वाक्यांमध्ये मी वऱ्हाडी किंवा इतर एखाद्या बोलीतले शब्द घुसवले तर चालेल का? किंवा ऱ्हस्व-दीर्घ उच्चार चुकवले, तर कसं वाटेल ते ऐकायला?

जेव्हा आपण ‘शुद्ध भाषेचा अट्टाहास नको’ असा अट्टाहास करत असतो तेव्हा तो प्रमाणभाषेपुरताच मर्यादित असतो की इतरही बोलींभाषांना लागू होतो?

तुम्ही मूळचे महाराष्ट्रातल्या ज्या कोणत्या प्रदेशातून आलेले असाल, तिथल्या बोलीमध्ये कोणी बाकी बोलींचे शब्द घुसवले, किंवा त्या बोलीत प्रचलित असणारे उच्चार चुकवले, तर अशी चुकणारी बोलीभाषा तुम्हाला वापरायला/ऐकायला आवडेल का? नाही ना? (हा प्रश्न ‘काय फरक पडतो!’ आविर्भाव असणाऱ्यांसाठी नाही)

शुद्ध भाषा म्हणजे केवळ प्रमाणभाषा नव्हे.

प्रमाणभाषा ही सुद्धा एक बोली आहे, जी मराठीची प्रातिनिधीक बोली म्हणून आपण स्वीकारलेली आहे. (ती आम्ही स्वीकारलेलीच नाही, आमच्यावर लादली गेलीये वगैरे वादावर आपण वेगळ्या लेखात चर्चा करू) पण केवळ प्रमाणभाषा म्हणजेच शुद्ध भाषा असं नसतं.

ज्या भागात जी कोणती बोली प्रचलित असेल तिचा अचूकपणे वापर होण्याचा आग्रह धरणारा प्रत्येक माणूस हा त्याच्या कळत नकळत शुद्धभाषेसाठी आग्रही असतो.

अशावेळी त्या बोलीत सहसा न होणारे उच्चार, किंवा प्रचलित नसलेले शब्द ऐकणाऱ्याच्या कानांना खुपतात.

म्हणून शुद्ध मालवणी, शुद्ध कोंकणी, शुद्ध वऱ्हाडी, यांचा आग्रह त्या त्या बोलीभाषांच्या अधिकारक्षेत्रांत करणं जितकं स्वाभाविक आणि बरोबर आहे, तितकंच शुद्ध प्रमाणभाषेचा तिच्या अधिकारक्षेत्रात आग्रह धरणंही योग्य आहे.

आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही प्रमाणभाषेच्या अधिकारक्षेत्रात असता, तेव्हा तिचा ‘शुद्ध’ वापर होण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

प्रमाणभाषेची अधिकारक्षेत्रं कोणकोणती?

– विविध ठिकाणांहून आलेल्या माणसांची जिथे रेलचेल असते अशा जागा; कारण इथे प्रत्येकाची बोली वेगळी, मग सगळ्यांना समजेल अशी एक सामाईक प्रातिनिधीक भाषा हवी, म्हणून प्रमाणभाषा. यात आभासी जगताचाही समावेश होतोच.

– औपचारिक लिखाण आणि संवाद.

– अमराठी माणसाला मराठी शिकायची असेल तेव्हा.

आता अशा ठिकाणी जे जे शब्दोच्चार, व्याकरण आणि ऱ्हस्व-दीर्घाचे नियम प्रमाणभाषेला स्वीकारार्ह आहेत, त्यांचा आग्रह धरण्यात काहीच गैर नाही. उलट तेच योग्य आहे.

तुम्ही प्रमाणभाषेच्या अधिकारक्षेत्रात आलात आणि तुम्हाला ती नीट जमत नसेल, तरी हरकत नाही. प्रश्न तुमच्या क्षमतेचा कमी आणि तुमच्या आविर्भावाचा जास्त आहे.

कोंकणात गेल्यावर मला कोंकणी येत नाही म्हणून ‘मला कोंकणीत नीट बोलता जमत नाही, चुकलो तर मला समजून घ्या’ असा आविर्भाव ठेवावा, की ‘तुमची भाषा गेली उडत, मी मला हवं तस्संच बोलणार’ असा आविर्भाव ठेवावा? कोणता आविर्भाव ठेवला तर लोक मला आपलंसं करण्याची शक्यता जास्त आहे?

पर्यटक म्हणून फिरत असाल तर तुमच्याकडून निश्चितच कोणी अपेक्षा ठेवणार नाही. पण जर स्थायिक होण्यासाठी एखाद्या प्रदेशात जात असाल, तर तिथे ज्या बोलीचं अधिकारक्षेत्र आहे तिचा मान ठेवायलाच हवा ना? आणि मान ठेवायचा म्हणजे काय, तर ती बोली शिकून आत्मसात करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा.

अर्थातच काहीजण आपल्यावर हसतील, चिडवतील, हिणवतील. पण आपल्या चुका दाखवणारा प्रत्येकजण आपला शुभचिंतकच आहे, असंच मनात ठेवून आपण राहिलो तर आपल्याला कशाचाही त्रास होणार नाही, आणि ज्ञानातही भर पडेल. मग आज आपल्याला खजील करू पाहणारा माणूस उद्या आपल्याला ती बोली नीट जमू लागल्यावर तोंडात बोटं घालून गप्प बसेल.

शुद्धभाषेबद्दल आग्रही असणाऱ्यांनीही आपला आविर्भाव बदलायला हवा.

शक्यतो समोरच्याची चूक दाखवताना तो खजील होणार नाही अशा रीतीने दाखवा. सगळ्यांसमोर चुका काढण्याऐवजी खासगीत काय ते सांगा. ‘आत्ता चुकलास हरकत नाही, पुढच्या वेळी खबरदारी घे. हळूहळू जमेल, प्रयत्न सोडू नकोस’ असा दिलासा द्यायला हवा.

प्रमाणभाषेला आपण प्रातिनिधीक आणि सामाईक भाषा म्हणत असू, तर अशी भाषा सामावून घेणारी हवी. यासाठी प्रमाणभाषेची व्याप्ती वाढवायला हवी. विविध बोलींमधले शब्द ‘समानार्थी शब्द’ म्हणून प्रमाणभाषेने आपलेसे करायला हवेत. पण त्याचबरोबर, प्रमाणभाषेचा आग्रह धरणारे तिचे प्रतिनिधीसुद्धा सर्वांना सामावून घेणारे हवेत.

शुद्ध भाषेसंदर्भातले गैरसमज पसरून समाजात तेढ वाढणार नाही याची काळजी घ्या. आणि या लेखातले मुद्दे पटले असतील तर आपापल्या परीने प्रमाणभाषा व शुद्ध भाषा या दोहोंसंदर्भातला लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक कसा होईल याकडे लक्ष पुरवा.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

5 thoughts on “प्रमाणभाषा आणि शुद्धभाषा यांच्यात नेमका काय फरक आहे

 • December 17, 2018 at 9:00 pm
  Permalink

  छान! वेगळा विषय मांडला आहे.
  खुप कौतुक वाटते कौस्तुभचे!
  खुप खुप शुभेच्छा लेखनासाठी!

  Reply
  • December 17, 2018 at 10:15 pm
   Permalink

   धन्यवाद मॅडम 🙂

   Reply
 • December 27, 2018 at 2:20 pm
  Permalink

  सहमत

  Reply
 • December 27, 2018 at 3:09 pm
  Permalink

  शब्द लेखनात चुका केल्या म्हणजे अशुद्ध भाषा वापरली असे मानणे योग्य नाही.
  ते लेखनदोष असतात. त्यांच्याबाबत सुधारणा अपेक्षित असते

  दोन भाषांमधले शब्द एकत्र करून वापरले तर ती एक नवीन विकसित होणारी मिश्रभाषा मानता येईल. उदा. हिंग्लिश
  अशी भाषासुद्धा अशुद्ध नसते.

  शुद्धभाषा आणि अशुद्धभाषा ह्या संकल्पना चुकीच्या आहेत. गैरसमजांवर आधारित आहेत.
  शालेय शिक्षणात व्याकरणाला चुकीचे महत्त्व दिल्यामुळे समाजात असे गैरसमज पसरले असावेत.

  Reply
 • December 27, 2018 at 3:12 pm
  Permalink

  शुद्धभाषा आणि अशुद्धभाषा ह्या संकल्पना चुकीच्या आहेत. गैरसमजांवर आधारित आहेत.
  शालेय शिक्षणात व्याकरणाला चुकीचे महत्त्व दिल्यामुळे समाजात असे गैरसमज पसरले असावेत.

  लेखनदोष, उच्चारातले दोष किंवा हिंग्लिश्सारखी मिश्र भाषा हे मुद्दे वेगळेच आहेत. ही अशुद्ध भाषेची उदाहरणे नाहीत.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *