सर्वांत तरुण देश – दक्षिण सुदान

स्वातंत्र्य कोणाला नको असतं? भारतालाही 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. पण भारत-पाकिस्तानाची फाळणी झाली. कोणत्या तर्कावर झाली? लोकांच्या धर्मावरून झाली. तोच वारसा पुढे चालू आहे. पूर्वीच्या सुदानच्या उत्तरेत मुस्लिम जास्त होते, तर दक्षिणेत ख्रिश्चन जास्त होते. 2011 साली जानेवारी महिन्यात एक जनमत चाचणी घेण्यात आली. दक्षिण सुदानात. या चाचणीत 98% हून अधिक लोकांनी दक्षिण सुदानच्या स्वातंत्र्याची मागणी केली. मग काय, 2011च्या जुलै महिन्यात 9 तारखेला दक्षिण सुदान हा वेगळा झाला. स्वतंत्र झाला. आता दक्षिण सुदान आणि उत्तर सुदान हे दोन वेगळे देश झाले. आफ्रिकेतला हा 54वा स्वतंत्र देश ठरला.

आफ्रिकेच्या मध्यभागात असलेला हा देश चारही बाजूंनी जमिनीने वेढलेला आहे. उत्तरेस सुदान, पूर्वेस इथिओपिया, दक्षिणेस युगांडा तर पश्चिमेस सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आहे. नैऋत्येला कॉंगो आहे. देशाच्या दक्षिणेस जुबा हे शहर आहे. हेच देशातलं सर्वांत मोठं शहर आणि देशाची राजधानी. व्हाईट नाईल ही देशातली प्रमुख नदी असून पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. मध्य भागात सपाट प्रदेश असून दक्षिण वेशीवर डोंगररांगा आहेत. दक्षिण सुदान सरकारच्या मते देशात तेलाच्या अनेक खाणी आहेत आणि त्यातल्या कितीतरी (म्हणजे 50% हून अधिक) अजूनही उकरलेल्यासुद्धा नाहीत. म्हणूनच परदेशातून दक्षिण सुदानात या खाणींच्या उत्खननांसाठी गुंतवणूक यावी यासाठी या देशाच्या सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

दक्षिण सुदान

साम्राज्यवादी चीननं गुंतवणुकीच्या पायाभरणीला सुरुवातदेखील केलेली आहे. सध्याचं भारत सरकारसुद्धा दक्षिण सुदानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पावलं उचलत आहे. अलीकडेच भारताचा दक्षिण सुदानशी महत्त्वाचा संबंध आला तो म्हणजे ‘ऑपरेशन संकटमोचना’च्या वेळी. सुदानमध्ये यादवीमुळे तणावाची परिस्थिती होती. त्यावेळी विदेश मंत्री सुष्मा स्वराज यांनी दक्षिण सुदानमध्ये असलेल्या भारतीयांना संदेश दिला की ‘आत्ताच जर तुम्हाला बाहेर नाही काढलं तर नंतर पंचाईत होईल.’  म्हणून जुलै 2016 मध्ये सी-17 ग्लोबमास्टर या विमानांमधून जवळजवळ 600 भारतीयांना ‘एअरलिफ्ट’ करण्यात आलं.

राष्ट्रपती साल्व्हा कीर मायार्दीत । फोटो श्रेय : Stein Ove Korneliussen

दक्षिण सुदानने स्वतंत्र झाल्यावर संघीय गणराज्य पद्धतीचा स्वीकार केला. राष्ट्रपतीने पूर्वीचे कायदे संपुष्टात आणून नवीन संविधान अंमलात आणल्याची घोषणा केली. तिकडच्या राष्ट्रपतीलाच सरकारचा प्रमुख, राष्ट्राचा प्रमुख आणि लष्कराचा प्रमुख बनवण्यात आलं. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदी सर्वोच्च न्यायालयास बसवण्यात आलं. पहिला राष्ट्रपती झाला त्याचं नाव ”साल्व्हा कीर मायार्दीत”.

कीरचे राज्य सुरु झाले आणि दोनच वर्षांत त्याच्या कॅबिनेटमध्ये त्याने अनेक उपद्व्याप सुरू केले. 2013 मध्ये अख्खी कॅबिनेट त्याने विसर्जित केली ! उप-राष्ट्रपतीसकट ! अर्थात जनतेत शंकेचं वातावरण तयार झालं. त्यातला जो उप-राष्ट्रपती होता, रीक मचर, त्याने कीरवर आरोप केला. हुकूमशाहीचा आरोप ! मग काय, त्याला बंडखोर ठरवण्यात आलं. 2013 मध्ये दक्षिण सुदानात बंडखोर विरूद्ध सरकार असं वातावरण तयार झालं. आणि दक्षिण सुदानमध्ये यादवी सुरु झाली.

उप-राष्ट्रपती रीक मचर । फोटो श्रेय : Hannah McNeish

ही यादवी पुढची 5 वर्षं तरी चालू राहिली. 2015 मध्ये कीरने मचरला जुबा शहरामध्ये संधी करण्यासाठी बोलवलं. मचर तिथे येत असतानाच अचानक दोघांच्या समर्थकांमध्ये परत भांडण सुरु झालं. हे ऐकताच मचरने जुबा शहरातून काढता पाय घेतला. तो तिथून गेला तो सरळ भूमिगतच झाला. हास्यास्पद बाब म्हणजे तो पायी पळत होता आणि पोलीस त्याचा हेलिकॉप्टरमधून पाठलाग करत होते. तरीही तो निसटला. तिथून तो खार्तुम या उत्तर सुदानच्या राजधानीत आश्रयाला होता. 2018 पर्यंत ही यादवी अशीच चालू राहिली. जुलै 2018 मध्ये मचरने शांतता करारातल्या काही अटी मान्य करायची तयारी दर्शवली. परंतु 27 ऑगस्ट रोजी पलटला आणि त्याने शांतता करारावर सही करण्यास नकार दिला. परत काही कारणांमुळे तो आता तयार झाला आहे. मचरची अट आहे की त्याला पुन्हा उप-राष्ट्रपती करावं. पण त्याने अजून सही केल्याची बातमी आलेली नाही.

हा देश तसा गरीबच. जवळजवळ 51% लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. इकडच्या लोकांचं दरडोई उत्पन्न दिवसाला ₹ 50 पेक्षा पण कमी आहे. बहुतेक लोक अडाणी आहेत. सरासरी साक्षरता 27% इतकीच आहे. अर्थात शहरी भागात ती 53% पर्यंत जाते. इतर अनेक आफ्रिकी देशांप्रमाणेच हा देशही यादवी युद्ध, गरिबी, अशांतता या प्रकरणांत अडकून पडलेला आहे. देशाकडे मोठ्या प्रमाणांत नैसर्गिक संपत्ती आहे. मनुष्यबळही व्यवस्थित आहे. आता त्याचा वापर हा जगातील सर्वांत तरुण देश कसा करतो यावर त्याचं भविष्य ठरलेलं आहे.

हा लेख इतरांना पाठवा

ओमकार बर्डे

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *