साबणाचा गुळगुळीत आणि फेसाळ प्रवास जाणून घ्या

नाही निर्मळ जीवन, काय करील साबण!

हा साबण या संतवचनात कसा काय आला याचं औत्सुक्य फार आधीपासून माझा पिच्छा पुरवत आलेलं आहे.

संतशिरोमणी तुकारामांच्या गाथेमधल्या ७५९ व्या अभंगाची सुरुवात वरील वाक्याने होते.

मुळात माझी उत्सुकता अशी की तुकोबारायांच्या काळात, म्हणजे सतराव्या शतकात, साबणाला नक्की साबणच म्हणत असतील का?

कसा असेल तो दिसायला? कसा बनवत असतील हा साबण; म्हणजे, त्या काळी काय काय पदार्थ वापरुन त्याची निर्मिती होत असेल?

तो आजच्यासारखाच छान गुळगुळीत, क्वचित पारदर्शी आणि आल्हाददायक वासाचा असेल का?

कारण तेराव्या शतकातल्या ज्ञानेश्वरीच्या ४६५ व्या ओवीत सामान्य जन अंग धुण्यासाठी माती आणि पाण्याचा उपयोग करीत असत अशी नोंद आहे.

मृत्तिका आणि जळें। बाह्य येणें मेळें।
निर्मळु होय बोलें। वेदाचेनी॥

(वेदांच्या आज्ञेप्रमाणे माती व पाणी यांच्या योगाने बाह्य शरीर निर्मळ होते).

 

मोकळा वेळ बघून साबण माहिती शोध सुरु केला एकदाचा…

मुळात साबण या शब्दाची उत्पत्ती ‘सॅपॉ’ या जुन्या लॅटीन शब्दावरुन झालेली आहे.

साबणाला जगभरातल्या बऱ्याच भाषांमध्ये लॅटीन, स्पॅनिश किंवा पोर्तुगीज भाषांवरुनच काही ना काहीतरी नाव पडलेलं आहे.

हल्लीच्या लॅटीनमधे साबण म्हणजे ‘सॅपोनेम’. पोर्तुगीज भाषेत तो ‘साबॅओ’ किंवा ‘साबोनॅते’ असतो.

ग्रीक भाषेत तो ‘सॅपौनि’ होतो.

अल्बेनियन, क्रोएशियन, बोस्नियन आणि माल्टीझ भाषेत त्याचं नाव आहे ‘सॅपुन्’.

फ्रेंच त्याला ‘सॅव्हॉन’ म्हणतात.

हंगेरीयन त्याचा ‘स्झाप्पन्’ करतात तर वेल्श ‘सॅबॉन’.

आधुनिक स्पॅनिश भाषेमध्ये त्याला ‘क्सॅबॉन’ म्हणतात.

सिंहली आणि बंगाली भाषेत तो ‘साबन’, तर नेपाळी, मलाय, हिंदी, उर्दू आणि तुर्कीमध्ये ‘साबुन’ म्हणून ओळखला जातो.

लाओस देशाच्या लाओ भाषेमध्ये व थायलंडच्या बहासा भाषा समूहात त्याला ‘साबू’ म्हणतात.

जपानी भाषा त्याला ‘सेक्केन’ म्हणते.

त्याचं ‘सोप’ हे इंग्लिश भाषेतलं सोप्पं नाव तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच.

आपल्या मराठी भाषेमधे साबण हा शब्द अरेबिक भाषेवरून आलेला आहे.

जुना साबण

अरब साबणाला साबुन म्हणतात ज्याचं मूळ परत लॅटीन ‘सॅपॉ’ या शब्दामधेच दडलेलं आहे.

हिंदुस्थानचा बाकीच्या जगाशी चालणारा व्यापार हा गेल्या पंधराशे वर्षांपासून सुरू आहे.

तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याच्या काळात भारताचा परकीयांबरोबरचा व्यापार शिखरावर पोचलेला होता.

अनेक नवीन गोष्टी भारतात उपलब्ध होऊ लागल्या व त्याबरोबरच त्या वस्तूंची नावं देखील आपण जमतील तशी स्वीकारली.

सर्वप्रथम अकराव्या शतकात इराणमधील मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केलं व यथावकाश मध्यपूर्वेतून भारतावर होणारी आक्रमणं वाढत गेली.

भाषा बदलत गेली, नवे शब्द वापरात आले, मूळ शब्द बदलले गेले, वाढले, रूढ झाले, वगैरे.

तर, साबण या आजच्या मराठी बोलीभाषेतल्या शब्दाची निर्मिती साधारण याच परचक्र काळात झाली असावी असा तर्क आहे.

शब्दांच्या निर्मितीचे ठोस भाषाशास्त्रीय पुरावे आपल्याकडे फारसे उपलब्ध नाहीत हे एक मोठं दुर्दैव आहे.

आपण आता ख्रिस्तपूर्व २८०० पर्यंत मागे जाणार आहोत.

मेसोपोटॅमिया भागात म्हणजेच आजच्या इराक देशाच्या आसपास चांगल्या साडेतीन वर्ग मैल जमिनीवर बॅबिलोनियन संस्कृती अगदी भरात आलेली होती.

या संस्कृतीचं एक उत्तम वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शोधलेल्या प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित नोंद ठेवणं सुरु केलेलं होतं.

चिकणमातीच्या मृदू तक्त्यांवर नोंद करुन झाली की ते तक्ते सुकवले वा भाजले जायचे.

साबणाच्या शोधाच्या माहितीचा, ख्रि.पू. २२०० च्या सुमाराचा, असा एक फळा उत्खननात मिळालेला आहे.

आम्लाशी संयोग घडवून क्षार निर्मिती करुन तयार झालेली अल्कली, एका प्रकारच्या दालचीनीचं तेल व पाणी यांच्या एकत्रीकरणाने साबण तयार केला जात असे अशी त्या तक्त्यावर नोंद आहे.

मात्र साबण हा पदार्थ सर्वप्रथम केव्हा व कोठे तयार करण्यात आला हे संशोधकांना अजूनही निश्चित करता आलेलं नाही.

ख्रिस्तपूर्व १५५० मध्ये घडवला गेलेला इजिप्तचा पॅपिरस म्हणजे लव्हाळ्यापासून तयार केला गेलेला कागद, हे साबण संशोधन चांगलंच पुढे गेलेलं असल्याचा एक दाखलाच म्हणावा लागेल.

इजिप्शियन लोकांनी त्या अल्कलीयुक्त क्षारांचा जनावरांच्या चरबीपासून निर्माण केलेल्या तेलाबरोबर संयोग घडवून आणण्यापर्यंत बाजी मारलेली होती.

वेगळेपणा म्हणजे त्यांनी त्यात वनस्पतीजन्य सुगंधांचंही मिश्रण वापरलं होतं.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरांची राठ लोकर, केस वा चामडं मुलायम बनवण्यासाठी त्यांनी साबणमिश्रित पाण्याचा वापर सुरु केला होता.

तेव्हापासून ते अगदी आजपर्यंत वस्त्रोद्योगात धाग्यांची प्रत वाढवण्यासाठी साबणाच्या संयुगांचा उपयोग केला जातोय.

Detail of a terracotta cylinder of Nabonidus, recording the restoration work on the temple of Shamash at Larsa. 555-539 BCE. Probably from Larsa, Iraq, housed in the British Museum
नाबोनिडुसने टेराकोटाच्या वृत्तचित्ती वापरुन प्रलेखीकरण केलं

आद्य उत्खनन व पुरातत्वशास्त्रज्ञ आणि बॅबिलोनियाचा शेवटचा राजा ‘नाबोनिडुस’ने रसायनशास्त्रामध्ये क्रांती घडवून जिप्सम (कर्पुरशिलाजित), मिठासारखे क्षार, सोडा, राख, तिळाचं तेल व सुरुच्या झाडापासून काढलेलं तेल यांच्या संकरातून साबण बनवले होते.

या माणसाने टेराकोटाच्या वृत्तचित्ती वापरुन प्रलेखीकरण केलेलं आहे व अश्या अनेक वृत्तचित्ती आजमितीला ब्रिटीश वस्तुसंग्रहालयात जतन केल्या गेलेल्या आहेत.

निवडक काही प्रदर्शनाला मांडलेल्या आहेत.

फ्रान्समध्ये राहणाऱ्या गॉल लोकांनी मलम व वस्तुविनिमयाची गोष्ट म्हणून इ. सन १०० मध्ये साबण वापरला होता.

पाँपी येथील उत्खननामधे तर सुमारे २०२५ वर्षांपूर्वीचा साबण कारखानाच आढळलेला आहे.

रोमन साम्राज्यातही साबणाची विस्तृत माहिती होती. रोमन लोक साबणाचा उपयोग व उत्पादन या गोष्टी भूमध्य सागरी लोकांकडून शिकले होते.

ब्रिटानियाचे रहिवासी असलेल्या केल्ट लोकांनाही या गोष्टी माहीत होत्या.

केल्ट लोक चरबी (वसा) पासून काढलेलं साम्ल व वनस्पतींची राख वापरुन साबण तयार करीत व त्याला सैपो म्हणत.

यावरूनच पुढे “सोप” हा इंग्लिश शब्द आलेला आहे.

रोमन साम्राज्याचे प्रमुख नौदल अधिकारी प्लिनी (थोरले) यांनी इ. सन ७७ ते ७९ मध्ये एक अमूल्य देणगी मानवतेला बहाल केली.

त्यांनी एक मस्त जाडजूड ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे – “हिस्तोरीया नॅच्युरालिस” किंवा “नैसर्गिक इतिहास”.

प्राचीनातली प्राचीन रोमन गुपितं, त्या त्या गुपिताच्या संशोधकाच्या माहितीसह, सूचीबद्धता ठेवून मांडणारा हा एकमेव रोमन ग्रंथ आजच्या घडीला उपलब्ध आहे.

प्लिनींची दुसरी ओळख म्हणजे आजच्या जगातल्या कुठल्याही ज्ञानकोशाचा हा खरा ‘जनक’ म्हणावा लागेल.

या ग्रंथांवर तिसऱ्या शतकापासून ते आजतागायत संशोधन सुरु आहे.

माऊंट वेसुव्हियसचा ज्वालामुखी ७९ साली जागृत झाला नसता तर या इसमाने मानवाला अजून बरंच काही दिलं असतं.

जे त्याने दिलंय तेही एकूण दहा खंड व सदतीस मोठमोठ्या पुस्तकांमध्ये विभागलं गेलेलं आहे.

आपण फक्त “अबब..!” एवढंच म्हणू शकतो.

तर सांगायची गोष्ट म्हणजे, लॅटीन भाषेत लिहिलेल्या या ग्रंथात पहिल्यांदा साबणाचा उल्लेख ‘सॅपॉ’ म्हणून आलेला आहे.

मात्र, हे प्लिनी साहेब या साबण मिश्रणाचा उल्लेख केसांना चोपडायचं पोमेड म्हणून करतात, अंग धुण्याचा साबण म्हणून नाही!

त्यांच्या साबण बनवण्यामध्ये त्यांनी डुकराची वा बकऱ्याची चरबी व राख हे मुख्य घटक वर्णिले आहेत.

त्याकाळचे पुरुषच केस मुलायम ठेवण्यासाठी याचा जास्त वापर कसे करायचे व स्त्रीवर्ग क्वचितच कधी ते मिश्रण केसांना लावायचा असा ‘दुःखद’ उल्लेख प्लिनीने करुन ठेवलेला आहे.

रोमन लोक अंग साबणाने धुण्यापेक्षा अंगाला सुगंधी तेल चोपडून, वाळवून मग तो सुगंधीयुक्त मळ खरडून काढण्यात जास्त खूष असायचे.

अंग धुण्यासाठी साबणाचा वापर साधारण दुसऱ्या शतकापासून नियमितपणे सुरु झाला आणि गॉथिक लोकांनी बनवलेल्या ‘शाकाहारी’ साबणांना त्या काळी प्रचंड मागणी होती.

संपूर्ण युरोपीय जमीन आणि आसपासच्या समुद्रांवर आपली दहशत पसरवणारे आठव्या शतकामधले व्हायकिंग हे नॉर्स चाचे आपल्याला अपरिचित नाहीत.

पार अकराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत त्यांचा हा धुमाकूळ सुरु होता.

व्हायकिंग योद्धे असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जसा अक्राळविक्राळ, अजस्र, शिंगवाल्या मुकुटांआडचे अस्वच्छ केस आणि तशाच लांबलचक घाणेरड्या दाढीची वेणी घातलेला माणूस उभा राहतो तसे ते अजिबात नव्हते.

व्हायकिंग माणसं आणि स्त्रिया अत्यंत स्वच्छ राहात असत.

सकाळचं मुखमार्जन सुद्धा न करणाऱ्या युरोपभर जेव्हा अस्वच्छतेमुळे प्लेग पसरायचा तेव्हा हे लोक युरोपला यथेच्छ हसायचे.

रोजच्या रोज अगदी साबण वापरुन स्व-स्वच्छता करणारी व्हायकिंग ही कदाचित युरोपमधली पहिली जमात असावी.

खरं तर ती एक जमात अशी नव्हतीच म्हणा पण आपल्या सोयीसाठी आपण तसं ठरवून टाकलंय.

जुन्या काळी चिनी माणसं मात्र साबणाचा उपयोग प्रक्षालक म्हणूनच करायची.

त्यात बाभूळासारख्या काटेदार व औषधी ग्लेडिशियाच्या म्हणजेच गिरीपुष्पाच्या शेंगांचा वापर व्हायचा.

अंग धुण्याचा चरबी वा तैलयुक्त साबण तसाही फार अलीकडेच चीनने स्वीकारला आहे.

मध्यपूर्वेत मात्र आठव्या शतकापासूनच साबणाचं व्यावसायिक उत्पादन सुरु झालेलं होतं.

ऑलिव्हपासून ग्लिसरीन मिळवायची ‘गुप्त’ पद्धती शोधून काढण्यात आलेली होती.

त्यामध्ये अल्कलीयुक्त पदार्थ, लिंबूरस वगैरे मिसळून मऊशार साबण बनवला जायचा.

त्याकाळी आजच्या सिरीयामधून आसपासच्या देशांमध्ये ते पार युरोप पर्यंत त्याची निर्यात व्हायची.

तेराव्या शतकापर्यंत दमास्कस, अलेप्पो, फेस इत्यादी ठिकाणी साबण उद्योग एक महत्त्वाचा व्यवसाय बनलेला होता.

युरोप खरं तर सहाव्या शतकापासूनच साबणाला थोडाफार ओळखू लागलेला होता.

सातव्या शतकात मार्सेली, जिनोआ, व्हेनिस व सॅव्होना ही शहरं साबणनिर्मितीची व्यापारी केंद्रं होती कारण तिथं ऑलिव्ह तेल व कच्च्या सोड्याचे साठे विपुल प्रमाणात उपलब्ध होते.

स्पेनचे नवव्या शतकापासूनचे साबण निदान युरोपमध्ये तरी नाव कमावून होते.

बाराव्या शतकात इंग्लंडमध्ये त्याचं उत्पादन सुरु झालेलं होतं.

हे सगळं असलं तरी सुवासिक मृदू साबण कसा बनवायचा ही माहिती युरोपियनांना नव्हती.

त्यासाठी त्यांना मध्यपूर्वेवर अवलंबून राहावं लागायचं.

शेवटी एकदाचं त्यांनी ते जमवलं.

प्राण्यांच्या चरबी ऐवजी ऑलिव्ह सारख्या वनस्पतींची तेलं योग्य प्रमाणात वापरली गेली आणि स्वच्छ, सुवासिक, नाजूकशा साबणाची निर्मिती इंग्लंडमध्ये झाली.

इंग्लंडमध्ये सर्वप्रथम साबणाचं उत्पादन ब्रिस्टॉल येथे बाराव्या शतकाअखेरीस झालं.

तेराव्या व चौदाव्या शतकांत चीपसाइड, लंडन येथे साबण निर्माण करणारी छोटी जमातच निर्माण झाली होती.

जर्मनीत थोड्या प्रमाणात, तर मध्य युरोपात त्याहून कमी प्रमाणात साबण तयार होत असे.

१६७२ मध्ये ए. लिओ नामक जर्मन गृहस्थांनी लेडी फोन श्लीनिटस् यांना इटलीमधून साबण भेटीदाखल पाठवला होता.

तेव्हा हे गूढ द्रव्य कसं वापरायचं याचं तपशीलवार वर्णनही त्यांनी सोबत पाठवलं होतं.

इंग्लंडच्या ॲन राणीच्या काळापासून म्हणजेच सतराव्या शतकापासून ब्रिटनने चक्क साबणावर कर बसवला.

त्यामुळे अगदी इ. सन १८५३ मध्ये तो कर काढून टाकेपर्यंत साबण ही फक्त श्रीमंतांच्या चैनीची गोष्ट होती.

आम जनता क्वचित कधीतरी सार्वजनिक न्हाणीघरात जाऊन अंग भिजवून येत असे.

ही न्हाणीघरं अगदी आजही अस्तित्वात आहेत… पण फक्त बघण्यासाठी!

अनेकांचा आवडता पिअर्स हा साबण, अँड्र्यू पिअर्सने सन १८०७ च्या सुमारास लंडन येथे बनवला.

पुढे १८६२ मध्ये त्याच्या जावयाने या साबणाचा मोठा कारखाना सुरु केला.

विल्यम आणि जेम्स लिव्हर या भावंडांनी १८८६ मध्ये इंग्लंडच्या वॉरींग्टन भागात सुरु केलेला साबण बनवायचा उद्योग त्या वेळेपासून ते आजतागायत जगातला सर्वांत मोठा साबण उद्योग आहे.

आधी तो “लिव्हर ब्रदर्स” हे नाव मिरवायचा आणि आता “युनिलिव्हर” असं नाव झळकावतो आहे.

पिअर्स, पामोलिव्ह हे व असे कित्येक साबण गेली काही शतकं आपापलं नाव टिकवून आहेत.

आपल्या आयुर्वेदामध्ये रिठा या वनस्पतीचा उल्लेख वारंवार येतो.

या झाडाची फळं पाण्यात बुडवून हलवली तर पाणी फेसाळून जातं.

हे पाणी केस व अंग धुण्यासाठी निर्मलक म्हणून गुणकारी आहे व त्यामुळे केसांचे, त्वचेचे विकार बऱ्यापैकी आटोक्यात येतात हे प्राचीन भारतात चांगलंच ठाऊक होतं.

रिठ्याच्या चूर्णाच्या जोडीला मक्षिकामध, चंदनाची उटी, वाळ्याचं तेल, एखादं पपईचं पान, कडुनिंबाची साल वा पानं आणि नखभर कस्तुरी मिसळून उत्तम प्रतीचं साबण द्रव्य तयार केलं जात असे.

डोक्याला लावण्यासाठी, केस धुण्यासाठी, लोखंडी पात्रात रात्रभर भिजवून ठेवलेलं शिकेकाईचं चूर्ण जास्वंदीच्या फुलांबरोबर पाण्यात कालवून वापरलं जायचं.

या सगळ्याच्या जोडीला खोबऱ्याचं तेल व इतर विविध प्रकारची सुगंधी तेलं, समुद्रतळाची वाळूमिश्रीत खारी माती आणि मुलतानी मातीही वापरली जायची.

रंग उजळवण्यासाठी केशर, बेसन, हळद, दही किंवा लिंबू इत्यादी नैसर्गिक पदार्थांच्या एकत्रीकरणाने बनविलेले साबणजल वापरले जायचे.

दह्यातील आम्ल किंवा लिंबातील ‘क’ जीवनसत्व त्वचेतील रंगद्रव्याचं प्रमाण कमी करून त्वचा उजळ करतात हे सुद्धा आपल्याला ज्ञात होतं.

प्राचीन भारतीय रसायन तज्ज्ञांनी त्या वेळच्या बाकीच्या जगाच्या तुलनेत बरीच प्रगती केलेली होती; किंबहुना बाकीचं जग हे ‘जग’ म्हणून फारसं अस्तित्वातच नव्हतं असाही एक प्रवाद आहे.

अलीकडच्या ब्रिटीश राजवटीच्या काळात लिव्हर बंधूंनी त्यांचे साबण भारतात विक्रीसाठी आणले.

पण त्याच सुमारास सन १८९७ मध्ये उत्तरप्रदेशातल्या मीरत येथे नवभारतातला पहिला साबणाचा कारखाना सुरु झाला होता.

त्याचं नाव होतं – नॉर्थ वेस्ट सोप कंपनी.

पुढे जमशेदजी टाटांनी १९१८ साली टाटा ऑईल मिलची स्थापना करुन १९३० च्या सुमारास भारतीय बाजारपेठेत साबण आणायला सुरुवात केली व हळूहळू साबण ही श्रीमंत लोकांच्या रोजच्या वापराची वस्तू बनत गेली.

आज भारतात सातशेहून जास्त साबण उत्पादक असून या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ५५०० करोड रुपयांच्या आसपास आहे आणि दिसामाजी त्यात फक्त वाढच होते आहे.

साबणाचा फेस

आपल्या रोजच्या वापरातल्या साबणाला पाचेक हजार वर्षांचा किंबहुना त्याहूनही जास्त असा इतिहास आहे हे मला तरी नक्की माहिती नव्हतं; फक्त पुसटशी कल्पना तेवढी होती.

आणि हो, तुकोबांच्या काळी साबण हा आजच्या स्वरुपात नक्कीच नव्हता.

राख, वनस्पतीजन्य तेल, चुना, खारी माती, इत्यादी मिश्रणातून साबण-जल तयार होत होतं व ते मुख्यत्वे कपडे धुण्यासाठीच वापरलं जायचं.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्या काळापासून ते आजपर्यंत भारतीय बाजारात मिळणारा साबण वनस्पतीजन्य तेलापासूनच बनवलेला असतो.

भारतातल्या बहुविध धर्माचरणांमुळे साबणात प्राणीजन्य सामग्री वापरण्यावर आपल्याकडे बंदी आहे.

शेवटी, साबण कुठल्याही रंगाचा का असेना त्याचा फेस शुभ्रच असतो हे खरं महत्त्वाचं!

माहिती उत्खनन सुरु केलं आणि ती फेसाळलेली माहिती जमवताना, लिहिताना झालेल्या शंकासमाधानांमुळे मन अधिकाधिक स्वच्छ होत गेलं हे ही नसे थोडके!

हा लेख इतरांना पाठवा

सिद्धार्थ अकोलकर

आयुष्यभर विद्यार्थीदशा जपण्याची व जोपासण्याची प्रामाणिक इच्छा मनामध्ये बाळगावी.

One thought on “साबणाचा गुळगुळीत आणि फेसाळ प्रवास जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *