सियाचीनचा इतिहास – ऑपरेशन मेघदूत आणि सद्य परिस्थिती

सियाचीन हिमनदी ७६ किमी लांब असून काराकोरममधील सर्वाधिक लांब आणि जगातील ध्रुवेतर भागांमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी हिमनदी आहे. हिमालयाच्या पूर्व काराकोरम पर्वतरांगांमध्ये स्थित आणि NJ ९८४२ च्या (भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेचे सर्वांत उत्तरेकडील टोक) ईशान्येस असलेली एक हिमनदी आहे. हिची उंची समुद्र सपाटीपासून साधारण ७,५०० मीटर ते ३,६२० मीटर यादरम्यान आहे. पर्यायाने येथील तापमान -५०° से. पर्यंत खाली घसरते.

याच प्रदेशात “ऑपरेशन मेघदूत” या सैनिकी मोहिमेला १३ एप्रिल, १९८४ रोजी प्रारंभ झाला आणि सियाचीन पृथ्वीवरील सर्वाधिक उंचीवरील युद्धक्षेत्र झाले. इथे पाकिस्तान आणि भारत ही दोन शेजारील राष्ट्रे, एप्रिल १९८४ पासून एकमेकांविरोधात उभी ठाकली आहेत. ऑपरेशन मेघदूत ही जागतिक सैन्य इतिहासातील दीर्घकाळ चाललेली एक मोहीम आहे. भारत समुद्र सपाटीपासून ६,४०० मीटर पर्यंत या प्रदेशात कायमस्वरुपी आपले सैन्य तैनात ठेवतो. संपूर्ण सियाचीन, सर्व प्रमुख खिंडी आणि शिखरं १९८४ पासून भारताच्या नियंत्रणाखाली आहेत (ज्यावर पाकिस्तानकडून कायम आक्षेप घेतला गेला आहे).

तिबेटी भाषेत “ला” म्हणजे खिंड. त्यामुळे बहुतेक उंच भागातील मार्गांच्या नावापुढे “ला” हा प्रत्यय जोडला जातो. उदा. खार्दुंग ला, झोजी ला, इत्यादी.

भौगोलिक परिसर

हा प्रदेश अतिउंचावर असल्यामुळे निर्मनुष्य आणि ओसाड आहे. येथील परिसर वर्षाचे बारा महिने बर्फाच्छादित असल्यामुळे कित्येकदा वैमानिकांच्या डोळ्यांदेखत आभासी 2D चित्र तयार होते. ज्यामुळे तेथील शिखरं आणि पठारं एकसमान उंचीवर असल्याचा भास होतो, परिणामी अपघाताची शक्यताही दाट असते. या परिसरात अगदी सहज, कोणतीही पूर्वकल्पना न देता, अचानक १६० किमी प्रति तास एवढ्या वेगाने वारे वाहू शकतात. सुरुवातीच्या काळात भारताच्या बाजूने रस्त्याचे जाळे उपलब्ध नसल्याने वाहतुकीसाठी फार अडचणी येत असत. नजीकच्या काळात मनाली-लेह-खार्दुंगला-सियाचीन मार्गासह भारतीय सैन्याने सियाचीन प्रदेशात पोहोचण्यासाठी विविध साधने विकसित केली आहेत.

चुकीचा नकाशा

याच प्रदेशात विविध प्रकारच्या साहसी मोहिमा आखल्या जात. अशाच काही मोहिमा भारतातील १९७५-१९७७ या काळातील अणीबाणी हटवली जाताच पुन्हा एकदा सुरू झाल्या.

१९७७ साली एक जर्मन साहसी पथक नुब्रा नदी पार करण्याच्या उद्देशाने भारताच्या बाजूने मोहिमेची योजना आखण्यासाठी HAWS (High Altitude Warfare School) चे तत्कालीन प्रमुख (कमान अधिकारी) कर्नल नरिंदर “बुल” कुमार यांना भेटले. त्या पथकाने सोबत त्या भागाचे काही नकाशे आणले होते. कर्नल कुमार यांना जर्मन पथकाकडून अमेरिकन बनावटीचा एक भारताचा नकाशा सापडला. तेव्हा त्यांना असे आढळून आले की NJ ९८४२ पासून भारताची सीमा उत्तरेकडे न जाता ती ईशान्येकडे काराकोरम खिंडीला सरळ जोडली गेली आहे. ह्याचाच अर्थ पाकिस्तान NJ ९८४२ पासून काराकोरम खिंडीपर्यंतच्या उत्तरेकडील प्रदेशावर स्वतःचा हक्क दाखवत होता का?

आणि शंकेची पाल चुकचुकली!


कर्नल कुमार यांनी काही पैशांच्या मोबदल्यात तो नकाशा विकत घेतला व उपलब्ध साहित्याच्या आधारे जुळवाजुळव करून तपासला. स्वतः शहानिशा करून त्यांनी ही माहिती दिल्लीतील मेजर जनरल छिब्बर आणि ब्रिगेडियर मेहता या सेना वरिष्ठांना दिली. तो नकाशा पडताळताना त्या अधिकाऱ्यांच्या असे लक्षात आले की, महाराजा रणजीत सिंह यांच्या काळातील भारताची सीमा आणि त्या नकाशात असलेली सीमा यामध्ये खूप तफावत होती. वास्तविक १९४९ च्या कराची करारानुसार सुद्धा NJ ९८४२ पर्यंत नियंत्रण रेषा स्पष्ट होती व पुढे तिचा उल्लेख “उत्तरेकडे सरकत जाणारी” असा करण्यात आला होता. अगदी अलीकडेच झालेल्या १९७२ च्या शिमला कराराने या १९४९ च्या नियंत्रण रेषेमध्ये कोणताही बदल केला नव्हता. त्यामुळे ती सीमा, नकाशाशास्त्रानुसार नैसर्गिक भूप्रदेशाचे (म्हणजेच भौगोलिक जलप्रवाह, पर्वत रांगांचे) पालन करीत उत्तरेकडे जाणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात नकाशात काही वेगळेच दाखवण्यात आले होते. मुख्य म्हणजे पाकिस्तान या भागावर गेली कित्येक वर्षे आपला हक्क सांगून विविध साहसी गिर्यारोहण मोहिमांसाठी परवाने देत होता आणि भारत ही निव्वळ एक नकाशातील चूक समजत होता.

Kashmir Jammu Map
संपूर्ण प्रदेश देखरेखीखाली!


त्या भागाचे भौगोलिकदृष्ट्या महत्त्व लक्षात घेता असे ठरवण्यात आले की या भागामध्ये हळूहळू विविध मोहिमा आखल्या जाव्यात, जेणेकरून त्या भागाचा आढावा घेता येईल. त्याप्रमाणे कर्नल कुमार यांच्या नेतृत्वाखाली १९७८ ते १९८१ या काळात तीन मोहिमा आखल्या गेल्या. तिसऱ्या मोहिमेत त्या पथकाच्या संरक्षणाची जबाबदारी ९व्या पॅरा कमांडो आणि लडाख स्काऊट्सच्या तुकडीला देण्यात आली होती. सोबत गोपनीय पद्धतीने फिल्म्स विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांचे गट सामील झाले होते. १९८४ पर्यंत भारत विविध प्रकारे सियाचीनच्या परिस्थितीशी मिळत्याजुळत्या वातावरणात आपल्या सैनिकांना प्रशिक्षण देत होता. १९८२ मध्ये भारताने आपल्या सैनिकांचा एक गट प्रशिक्षण मोहिमेसाठी अंटार्क्टिका येथे पाठवला होता. १९८३ मध्ये भारताने उत्तरेकडील लडाख प्रदेश तसेच काही पर्वतरांगांमध्ये अर्धसैनिक बल तैनात केले होते. १९८२ आणि १९८३ मध्ये या दोन्ही मोहिमांसाठी भारताने या प्रदेशात लागणाऱ्या व अत्यावश्यक अशा विशिष्ट सामग्रीचे जोड खरेदी केले होते. भारताच्या तेथील वाढत्या मोहिमा लक्षात घेता पाकिस्तानकडून दोन वेळा हा प्रदेश सोडून जायचा इशारा देणारे संदेश भारतीय पथकाला सापडले. याचा अर्थ सरळ होता, पाकिस्तान या प्रदेशावर आपला हक्क सांगत होता आणि त्यावर ठाम होता.

सियाचीनमधील काही हिमविदरे (Crevasses) एवढी खोल आहेत की सूर्यप्रकाशही तळापर्यंत पोहोचत नाही. काहींची खोली २०० फुटांपेक्षा जास्त आहे. म्हणून भारतीय सैनिक या प्रदेशात बहुतांशवेळा गस्त घालताना हिमविदरांमध्ये पडण्यापासून वाचण्यासाठी एकमेकांना दोरीच्या साह्याने जोडले गेलेले असतात आणि साधारण आठ जणांची तुकडी एकमेकांना कायम दोरीच्या साह्याने सतत एकत्र ठेवते.

फोटो स्रोत : PTI

अशाच एका प्रसंगाचे वर्णन येथे वाचा.

“रॉ”चे मोलाचे योगदान!


दरम्यान “रॉ”च्या सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली. पाकिस्तानला त्याच्या सैन्यासाठी विशिष्ट सामग्रीचे १५० संच खरेदी करायचे होते. त्यासाठी पाकिस्तानने लंडनच्या पुरवठादाराकडे प्रस्ताव ठेवला होता. नेमका योगायोग असा की याच पुरवठादाराकडे भारताने याआधी केलेल्या मोहिमांसाठी कंत्राट दिले होते. “रॉ”चे तत्कालीन श्रीनगर विभाग प्रमुख ‘विक्रम सूद’ यांनी तत्काळ लेफ्टनंट जनरल ‘प्रेम नाथ हून’ ह्यांची भेट घेऊन त्यांना याची कल्पना दिली. याचा भारतीय सैन्याला रणनीती आखण्यास खूप मोठा फायदा झाला. युरोपात जाऊन भारतीय पथकाने विशिष्ट सामग्रीचे ३०० संच खरेदी केले (व ही सर्व साधनसामग्री मोहिमेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सैनिकांना देण्यात आली).

आणि ऑपरेशन मेघदूत सुरू झाले!


१९८३ मध्ये पाकिस्तानने “ऑपरेशन अबाबील” (म्हणजे गिळंकृत) द्वारे सियाचीनच्या प्रमुख शिखरांवर हिवाळा संपल्यानंतर ताबा मिळवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एप्रिल महिन्याचा उत्तरार्ध निश्चित करण्यात आला होता. याचा सुगावा भारतीय गुप्तचर यंत्रणांना लागताच चक्रे वेगाने फिरली आणि चोख उत्तर द्यायचा निर्णय घेण्यात आला. या सर्व योजनांमध्ये ब्रिगेडियर विजय चन्ना, मेजर जनरल अमरजीत सिंग, लेफ्टनंट जनरल प्रेम नाथ हून, लेफ्टनंट जनरल चिमा आणि लेफ्टनंट जनरल मनोहर लाल छिब्बर यांचे मोलाचे योगदान होते. आणि या मोहिमेस “ऑपरेशन मेघदूत” असे नाव दिले गेले!

सुरुवातीच्या नियोजनानुसार सियाचीनवर दाखल केलेल्या तुकड्या हिवाळा सुरू होण्याआधी पुन्हा एकदा खाली मुख्य तळावर आणल्या जाणार होत्या. परंतु पाकिस्तानी सैन्याचा तेथील वाढता वावर लक्षात घेता, कायम स्वरूपी सैन्य तैनात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज विविध रेजिमेंटच्या तुकड्या सियाचीन प्रदेशातील विविध तळांवर तैनात आहेत.


जाहिरात

Sterlomax

सुरुवातीला या संपूर्ण मोहिमेत मुख्यत्वे तेथील स्थानिक लोकांचा जास्त भरणा असलेल्या लडाख स्काऊट्स आणि कुमाऊ बटालियनचा वापर करण्यात आला होता. सैनिकांच्या एका तुकडीवर सैन्याचा मुख्य तळ ते सियाचीन यामधील प्रदेशात सैनिकी तळ उभारण्याची जबाबदारी दिली गेली. त्याप्रमाणे काही सैनिक कित्येक दिवस चालत ठरावीक अंतरावर तळ ठोकत नियोजित ठिकाणी पोहोचले. तर मुख्य तुकडीतील जवानांना १३ एप्रिल १९८४ ला हवाई मार्गाने “बिलाफोंड ला” येथे उतरवले गेले. या तुकडीचे नेतृत्व तत्कालिन कॅप्टन संजय कुलकर्णी यांनी केले. पाकिस्तानातील रडारवर भारतीय सैन्याच्या हालचाली टिपल्या जाऊन मोहिमेची गोपनीयता धोक्यात येऊ नये यासाठी, भारतीय वायुदलाकडून याआधी हवाई मार्गाने सुविधा पुरविल्या गेल्या नव्हत्या. “बिलाफोंड ला” येथे उतरल्यानंतर तीनच तासांत त्या तुकडीचा रेडिओ ऑपरेटर प्रतिकूल हवामानाने त्रस्त झाला आणि त्याला तातडीने हवाई मार्गाने पुन्हा मुख्य तळावर उपचारासाठी आणण्यात आले.

तेवढ्यात तेथील हवामान बिघडत गेले. पुढील काही दिवसांत हवामानात सुधारणा होताच भारतीय वायुदलाने जवान व साधनसामग्री पोहोचवण्यासाठी एका दिवसात विक्रमी ३२ फेऱ्या केल्या. आणि मोहिमेच्या प्रारंभापासून चारच दिवसांत म्हणजेच १७ एप्रिल, १९८४ रोजी मेजर अजय बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली लडाख स्काऊट्सच्या एका तुकडीने “सिया ला” वर ताबा मिळवला. परंतु तोपर्यंत “बिलाफोंड ला” येथे प्रतिकूल हवामानाचा पहिला बळी गेला होता. ही माहिती पोहोचवण्यासाठी जेव्हा रेडिओवरून संदेश देण्यात आला, तो संदेश पाकिस्तानी यंत्रणांना कळल्यामुळे त्यांची हेलिकॉप्टर्स भारताने नुकत्याच काबीज केलेल्या सर्व तळांवर घिरट्या घालू लागली. परंतु तेथील भारतीय सैन्याची कुमक पाहून त्यांना माघारी परतावे लागले.

आणि अशाप्रकारे पाकिस्तानी सैन्य त्यांच्या निर्धारित मोहिमेस निघण्याच्या ४८ तास अगोदरच भारतीय सैन्य नियोजित शिखरांवर पोहोचले होते. यानंतरही पुढील काही वर्षांत अशाच प्रकारे आणखी काही महत्त्वाचे तळ नियंत्रणाखाली ठेवायच्या उद्देशाने भारताकडून अनेक मोहिमा आखल्या गेल्या, ज्यामध्ये ऑपरेशन राजीव, ऑपरेशन वज्रशक्ति यांचाही समावेश होता.

पाकिस्तानकडून झालेले प्रयत्न


१९८४ आणि १९९९ दरम्यान पाकिस्तानकडून महत्त्वाचे तळ काबीज करायच्या उद्देशाने सतत छोटे-मोठे प्रयत्न झाले. सर्वप्रथम २५ एप्रिल १९८४ रोजी बिलाफोंड ला वर प्रयत्न करण्यात आला परंतु भारतीय सैन्याकडे उंचीचा फायदा असल्यामुळे, पाकिस्तानचा हा वार निष्फळ ठरला. त्यानंतर २३ जून १९८४ रोजी पाकिस्तान कडून जोरदार हल्ला चढवला गेला, यामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व उखळी तोफांचाही समावेश होता. पाकिस्तानकडून केला गेलेला हा पहिला सगळ्यात मोठा हल्ला होता. परंतु तोही भारतीय सैनिकांनी परतवून लावला. असेच मोठे हल्ले १९८७ आणि १९८९ मध्येही केले गेले परंतु ते सर्वच निष्प्रभ ठरले.

२००३च्या संघर्ष विरामानंतर दोन्ही बाजूंनी होणारा गोळीबार थंडावला असला तरी १९८७ च्या “ऑपरेशन वज्रशक्ति” दरम्यान “अशोक” व “यु कट” या तळांवर होणारा हल्ला रोखण्यासाठी भारताकडून तेथे तैनात तोफखाना दलाच्या नऊ तोफांनी तीन दिवसांत विक्रमी ३००० तोफगोळे डागले होते.

सद्य स्थितीनुसार भारत ७६ किलोमीटर लांब सियाचीन तसेच साल्तोरो पर्वतरांगेच्या सर्व मुख्य खिंडी, मोक्याची ठिकाणे आणि शिखरांवर नियंत्रण ठेवतो. सिया ला, बिलाफोंड ला, ग्योंग ला या काही महत्त्वाच्या खिंडी मानल्या जातात; तर “बाणा टॉप”, “सोनम”, “अमर”, “अशोक”, “यु कट” असे काही भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे तळ आहेत. TIME मासिकाच्या मते, १९८०च्या दशकातील सियाचीनमधील सैनिकी कारवाईमुळे भारताने १००० वर्ग मैल पेक्षा जास्त क्षेत्र मिळवले.

१९८४ आणि १९८७ मधील पराभव पाकिस्तानी जनतेच्या एवढा जिव्हारी लागला की तेथील राजकीय नेत्या ‘बेनझीर भुत्तो’ यांनी पाकिस्तानी सेनेला, भर सार्वजनिक सभांमधून टोमणे मारायला सुरुवात केली.

हवामानाची गंभीर प्रतिकूल परिस्थिती


तथापि, लढण्यापेक्षा या क्षेत्रातील कठोर हवामानाच्या परिस्थितीमुळे अधिक सैनिक मरण पावले आहेत. २००३ आणि २०१० दरम्यान सियाचीनजवळ झालेल्या हिमवादळांमध्ये पाकिस्तानी सैन्याने ३५३ सैनिक गमावले. तसेच, २०१२ मधील गायारी भागातील हिमवादळामध्ये १४० पाकिस्तानी सैनिक ठार झाले.

जानेवारी २०१२ आणि जुलै २०१५ दरम्यान, प्रतिकूल हवामानामुळे ३३ भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत. नोव्हेंबर २०१६ मध्ये भारतीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, १९८४ च्या “ऑपरेशन मेघदूत” पासून, त्या भागात ९२२ सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यापैकी केवळ २२० भारतीय सैनिक शत्रूच्या गोळ्या लागून हुतात्मा झाले आहेत. यावरून तेथील प्रतिकूल परिस्थितीचा अंदाज येईल. अशाच एका “सोनम” तळावरील हिमस्खलनामध्ये लान्स नायक हनमंतप्पा ६ दिवस अडकून पडलेले असताना बचाव पथकाला बेशुद्धावस्थेत सापडले होते. दुर्दैवाने पुढील काही दिवसांत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू ओढवला. यावर मात करण्यासाठी भारतीय सैन्याने तसेच DRDO ने (Defence Research and Development Organisation) विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतून उद्भवणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आता कमी झाले आहे.

या भागात जाणार्‍या प्रत्येक सैनिकाबरोबर एक उपकरण दिले जाते, जे सतत विशिष्ट लहरी परावर्तित करते. जेणेकरून हिमस्खलन होऊन त्याखाली अडकले गेल्यास त्या उपकरणामधून येणाऱ्या लहरींद्वारे सैनिकाची अचूक जागा ओळखली जाऊ शकते. आणि वेळेत उपचार देऊन प्राण वाचवले जाऊ शकतात.

समुद्रसपाटीपासून २१,००० फूट (६,४०० मी) उंचीवर असलेल्या “सोनम” येथील तळावर भारताने जगातील सर्वाधिक उंचीवरील हेलीकॉप्टर तळ बांधले आहे आणि त्याचा वापर सैन्यास रसद पुरवण्यासाठी केला जातो. अतिउंचीच्या पर्वतरांगा ओलांडण्यात येणाऱ्या सततच्या समस्येमुळे, “शक्ती इंजिना”द्वारे चालविण्यात येणाऱ्या भारतीय बनावटीचे ध्रुव एमके ३ हेलीकॉप्टर विकसित करण्यात आले. याच भागात भारताने जगातील सर्वाधिक उंचीवर असलेला दूरध्वनी संच देखील स्थापित केला आहे. अशा उणे तापमानाच्या ठिकाणी सतत लागणारे इंधन पोहोचवण्यासाठी आता पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत.

GyongLaNJ9842

आज ऑपरेशन मेघदूतला प्रारंभ होऊन ३५ वर्षे उलटून गेली आहेत. कारगिल सारख्या युद्धाचे मूळ कारण असलेल्या या सियाचीन प्रदेशातील आपले वर्चस्व कमी करणे म्हणजे भविष्यातील अजून एका युद्धाची नांदी असेल, असे काही तज्ज्ञांच मत आहे. त्यामुळे भारताने हे वेळोवेळी स्पष्ट केले आहे की, ११० किमी लांब प्रत्यक्ष स्थिती रेषा (Actual Ground Position Line – AGPL) प्रमाणीकृत, चित्रित आणि अधिकृतरीत्या सीमांकित होईपर्यंत भारत सियाचीनमधून आपले सैन्य माघारी घेणार नाही.

हा लेख इतरांना पाठवा

वैभव आपटे

भारतीय. वाणिज्य पदव्युत्तर शिक्षणप्राप्त (एम. कॉम.) सनदी लेखापाल अभ्यासक्रमाचा विद्यार्थी.

4 thoughts on “सियाचीनचा इतिहास – ऑपरेशन मेघदूत आणि सद्य परिस्थिती

 • April 13, 2019 at 8:33 pm
  Permalink

  #दर्जा … महत्वपूर्ण माहिती👌👍

  Reply
  • November 18, 2019 at 10:45 pm
   Permalink

   खुप मस्त लेख, माहितीचा फराळ असाच येउदेत

   Reply
   • January 25, 2020 at 7:15 pm
    Permalink

    मनःपूर्वक आभार. तसे प्रयत्न चालूच राहतील.
    विलंबासाठी क्षमस्व

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *