सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण : चांगलं की वाईट?

सेमी इंग्रजी नावाचं माध्यम अस्तित्त्वात नाही, सेमीच्या वेगळ्या शाळा वगैरे नसतात, सेमीचे वर्ग/तुकड्या मराठी शाळांमध्ये भरतात.

सेमी इंग्रजी या प्रकारालाच जागतिक पातळीवर बायलिंग्यूअल शिक्षणपद्धती म्हटले जाते.

भारतात केंद्रीय शाळांमध्ये हीच शिक्षण पद्धती अस्तित्त्वात आहे.

गेली ५० वर्षे महाराष्ट्रात सेमीतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज आजोबा झालेले आहेत, त्यांची नातवंडे आता सेमीतून शिकत आहेत.

माझी स्वतःची बहीण हडपसरला साधना मुलींच्या शाळेत शिकली, आठवीला तिच्या अनेक मैत्रिणींना सेमी इंग्रजी तुकड्या मिळाल्या होत्या.

सेमीची तुकडी मिळण्यासाठी आयुष्यात प्रथमच पालकांची प्रचंड चढाओढ पाहिली.

ही आत्ता २००३ च्या आसपासची गोष्ट आहे. त्यामुळे हा प्रकार आपल्याला अजिबात नवीन नाही तर केवळ आपले अज्ञान आहे.

आपल्या भाषिक प्रेमाच्या आणि पोकळ अस्मितेच्या हट्टासाठी सेमी इंग्रजी या उत्तम पर्यायाला सुरुंग लावण्याचे काम काही अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या लोकांकडून आणि काही भाबड्या लोकांकडून अजाणतेपणे सतत सुरू आहे.

त्याबद्दल मी अनुक्रमे निषेध आणि दुःख या भावना व्यक्त करतो.

सेमी म्हणजे इंग्रजीतून गणित, विज्ञान शिकवणे असा अर्थ होत नाही तर सेमी म्हणजे दोन भाषांमधून गणित, विज्ञान शिकणे; इंग्रजी आणि मराठी!

या भाषांचा समतोल कसा राखायचा हे संबंधित शिक्षकाचे कौशल्य आहे.

मराठी माध्यम म्हणजे केवळ पुस्तके मराठी माध्यमाची असणे असा संकुचित अर्थ मुळीच नाही.

असे असेल तर महाराष्ट्रातील वाड्या वस्त्यांवर बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा मातृभाषा असणाऱ्या मुलांनी काय करावे?

त्या बोलींमधून पुस्तके तयार झालीत? या बोली मराठीपेक्षा कितीतरी पटीने भिन्न आहेत.

पण ती मुले मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकतात कारण आपले शिक्षक!

आपले शिक्षक त्यांच्या बोली समजावून घेतात, शब्दकोश बनवतात, स्वतः अशा भाषा समजून घेतात आणि मग त्या मुलांना त्यांच्या भाषांमधून शिकवतात.

मातृभाषेचे माध्यम म्हणजे शिक्षकांनी मुलांशी, मुलांनी एकमेकांशी मातृभाषेतून संवाद साधणे, मुलांच्या अभ्यासातील अडचणी त्यांच्या मातृभाषेतून त्यांना समजावून सांगणे.

मातृभाषा केंद्रस्थानी ठेवून त्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणणे होय.

मराठी माध्यमाच्या सेमीच्या तुकड्यांमध्ये हे होत नाही, असे म्हणणे हास्यास्पद आहे.

७५% पेक्षा जास्त शिक्षक सेमीच्या वर्गांना शिकवताना सररास मराठीचा वापर करतात, मुलांना मराठीतून प्रश्न विचारण्याची, चर्चा करण्याची मुभा देतात आणि हेच अपेक्षित आहे!

ज्या शिक्षकांना अजून सेमीबाबत शंका वाटते किंवा सेमीबाबत गैरसमज आहेत, अजून जाणून घ्यायचे आहे, त्यांनी महाराष्ट्रातील शिक्षकांनी, शिक्षणतज्ज्ञांनी, भाषातज्ज्ञांनी, बालसंगोपनतज्ज्ञांनी एकत्र येऊन लिहिलेले, ग्रंथाली प्रकाशनाचे ‘सेमी इंग्रजी का व कसे’ हे पुस्तक वाचावे.

सेमी इंग्रजीतून शिक्षण

सेमीचे वर्ग सुरू झाले आणि माझ्या शाळेतली विद्यार्थी संख्या सुधारली म्हणणारे शेकडो शिक्षक आज शिक्षणक्षेत्रात आहेत.

सेमीइंग्रजीमुळे विद्यार्थी इंग्रजी माध्यमाकडे वळत आहेत म्हणणारे, सेमीइंग्रजी सुरू केलं आणि त्यामुळे मराठी शाळा बंद पडली म्हणून ओरडणारे शिक्षक औषधालादेखील सापडत नाहीत.

पुन्हा सांगतो, इथे मराठीला स्वतःचा इगो हर्ट करून घ्यायची गरज नाही, दोन भाषांचा समतोल साधून सेमीत शिकवणे अपेक्षित आहे. फक्त इंग्रजीतून नाही…

डॉ. पॅट्रीशिया रायन अरब देशांमध्ये गेली ३० वर्षे अध्यापनाचे कार्य करत आहेत.

त्यांनी सांगितलेला एक रंजक किस्सा डोळ्यात अंजन घालणारा आहे. शिवाय द्वैभाषिक शिक्षणाचा म्हणजेच सेमीचा फायदा यातून अधोरेखित होतो..

२ ब्रिटिश शास्त्रज्ञ जनुक शास्त्राशी संबंधित प्रयोग करत होते. प्राण्यांच्या पुढच्या आणि मागच्या पायांवर अभ्यास चालू होता, पण अपेक्षित परिणाम मिळत नव्हते. त्यांना काय करावे समजेना त्याचवेळी तिथे एक जर्मन शास्त्रज्ञ आले. त्यांनी ताडले की हे दोघे शास्त्रज्ञ दोन अवयव म्हणजेच २ विभाग असल्याप्रमाणे अभ्यास करत आहेत. पण जनुकशास्त्र अशी विभागणी करत नाही. तसेच जर्मन भाषादेखील नाही.

यस्स त्यांना उत्तर सापडलं!!! चूक कुठे होत होती ते शास्त्रज्ञांच्या लक्षात आणून दिलं.

पूर्ण व्हिडीओ बघाच!  हा किस्सा ७.२५ ते ८.०३ या वेळेत सांगितलेला आहे.

(या रायन आज्जी इंग्रजीच्या विरोधात नाहीत, पण इंग्रजी अडसर म्हणून उभा करण्याच्या विरोधात आहेत, याची नोंद घ्यावी नाहीतर इथेही सर्वसामान्यांची दिशाभूल करणारे अनेकजण सोशल मीडियावर आहेत. व्हिडीओचा गैरवापर होऊ नये म्हणून अगोदरच खबरदारी!)

इंग्रजी चोरांची भाषा आहे, इंग्रजी वापरणे म्हणजे पारतंत्र्याचे प्रतीक आहे, गुलाम मानसिकता आहे वगैरे आरोप करणारे अनेकजण सेमीला विरोध करत आहेत हे लक्षात घ्या.

यात विशिष्ट वैचारिक कंपूच पुढे आहे.

आपण या वैचारिक कंपूचा भाग व्हायचं की नाही हे स्वतः ठरवा.

आता यावरून एक मजेशीर उदा. देतो.

कंपू हाच शब्द अगोदर घेऊ – कंपू हा भारतीय शब्द आहे. यावरूनच कॅम्प हा इंग्रजी शब्द आलाय.

असाच अजून एक शब्द म्हणजे बंगला! बंगला हा देखील बंगाली शब्द आहे, आपल्याकडून इंग्रजांनी उचलला आणि आज जगभरातले लोक बंगलो हा शब्द सररास वापरतात.

कॅश हा शब्ददेखील मूळचा संस्कृत! चक्कर आली ना? कर्ष वरून कॅश आला आहे.

कर्ष म्हणजे सोने चांदी मोजायचे एक माप असा अर्थ आहे.

कर्षापना म्हणजे तांब्याचं नाणं.

इच्छुकांनी हॉब्सन-जॉब्सन डिक्शनरी बघावी. यात इंग्रजांनी हजारो भारतीय शब्द, इंग्रजी भाषेत नेल्याच्या आणि इंग्रजीनेपण हे सर्व शब्द हसत स्वीकारल्याच्या नोंदी आहेत.

मग आपण इंग्रजीचे उपकार मानायचे की इंग्रजीने भारतीय भाषांचे उपकार मानायचे?

काल बीबीसीला जगदीशचंद्र बोस यांचा फोटो ब्रिटिश नोटांवर छापला जाणार म्हणून बीबीसीवर बातमी होती, कसली आली आहे गुलामगिरी?

कसलं आलंय पारतंत्र्य? या मानसिकतेतून कधी बाहेर येणार आपण?

हे म्हणजे आपलीच मोरी अन मुतायची चोरी असा प्रकार झालाय…

वर सांगितल्याप्रमाणे मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीच्या तुकड्या असतात आणि या पर्यायी आहेत.

ज्या पालकांना हव्या आहेत ते पालक इथे प्रवेश घेऊ शकतात.

पण असे असतानादेखील सेमी विरोधकांना सेमीची भीती का वाटते?

कारण सेमीचा पर्याय असला की पालकांच्या त्यासाठी उड्या पडतात, शाळा प्रशासनाशी पालक या तुकड्यांमध्ये प्रवेशासाठी भांडतात, यावरून सिद्ध होतं, की सेमी हा पर्याय बंद केला तर असे हजारो पालक इंग्रजी माध्यमाची वाट धरतील.

तुमचा सेमी इंग्रजीला विरोधच, ‘सेमी इंग्रजीमुळे मराठी शाळांचे नुकसान होते आहे’, ‘मराठी शाळा बंद पडत आहेत’ या आरोपांना उत्तर आहे.

सेमी हा सुवर्णमध्य आहे, ज्यांची ‘खाईन तुपाशी नाहीतर उपाशी’ मानसिकता आहे त्यांनी सेमी इंग्रजीच्या नावाने उर बडवत बसावे.

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून दिले गेले पाहिजे! बालकांचा हक्क आहे!!! बालकांचा हक्क आहे!!! बालकांचा हक्क आहे!!!

असा धोसरा एका सेमी विरोधकाने लावला आहे.

मी विचारतो, अरे मित्रा, मग कुणी हिसकावून घेतलाय हा हक्क?

का लोकांची दिशाभूल करतोयस तू?

सेमीचे वर्ग सहावीपासून सुरू व्हायला हवेत, पहिलीपासून नाही!

प्राथमिक शिक्षण सहावीला संपते. मग कोणत्या शिक्षणशास्त्राच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे?

जिथे पहिलीपासून सेमीच आहे तिथे शाळेला मराठी तुकडी माग; नसेल देत शाळा तर दुसऱ्या शाळेत प्रवेश घे! शाळेची तक्रार कर!

सेमी म्हणून फक्त गणित विषय प्राथमिकला शिकवला जातो, म्हणजे प्रश्न आहे फक्त गणित विषयाचा, तर मग गणिताच्या सेमीच्या वर्गात जाऊन एकदा दिवसभर बसून तरी बघायला काय हरकत आहे?

बघ तरी शिक्षक कसा शिकवतोय? वापरले चार इंग्रजी शब्द तर बिघडले कुठे?

इंग्रजांनी आपले हजारो शब्द उचलले मग आपणच काय घोडं मारलंय?

आणि हो मित्रा, जरा शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, पुस्तके, शाळा यांचा थोडातरी अभ्यास कर.

उगाच लोक भाषेसाठी चळवळी करतात म्हणून मी करतो असे म्हणून अर्धवट ज्ञान पाजळू नकोस!!

आपल्याकडे सरकारची अनास्था आहे. सर्वच शाखांचे उच्च शिक्षण इंग्रजीतून आहे.

११ वी-१२ वी ला विज्ञानशाखेला प्रवेश घेतल्यावर आम्हाला प्रचंड अवघड गेलं, अशा तक्रारी आपण नेहमीच ऐकतो.

आज लाखो मुले मराठी शाळांमधून सेमीच्या वर्गांमध्ये आनंदाने शिकत आहेत.

ही मुले सेमीत शिकली असं कुणी म्हणणार नाही, मराठी माध्यमात शिकली हेच म्हटले जाईल.

मग त्यांना सेमीच्या वर्गात योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने सेमीचे विषय शिकवायला नकोत?

सेमीचे वर्ग बंद होत नाहीत, त्यांना सेमीची पुस्तके मिळत नाहीत मग आपल्याच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडायचे?

पाच लाख मुले आज सेमीतून शिकत आहेत.

कौतुकाची बाब म्हणजे, बोर्डात येणारी मुले बहुतेक सेमीची आहेत.

असे असताना सेमी बंद करा म्हणणे आणि त्याहून गंभीर म्हणजे सेमीला शिवीगाळ करणे करंटेपणाचे लक्षण आहे.

शिवाय जे लोक सेमीला विरोध करत आहेत ते पुढे उच्च शिक्षण मराठीत नाही म्हणून आपल्या मुलांना घरी बसवणार आहेत काय?

दुसऱ्याच्या सेमी इंग्रजी विरोधी कमेंट्स लाईक ठोकायच्या आणि स्वतःच्या मुलांना सेमी इंग्रजी वर्गातच शिकवायचे, असे अनेक दुटप्पी लोक सोशल मीडियावर आहेत.

अशा सेमी विरोधी प्रचार करणाऱ्यांना आणि त्यांचं पोकळ समर्थन करणाऱ्यांना किती महत्त्व द्यायचं हे प्रत्येकाने आपलं आपण ठरवावं.

शेवटी प्रश्न तुमच्या मुलांच्या भविष्याचा आहे…

काही जण म्हणतील मग इंग्रजी माध्यम का नाही म्हणताय?

तर अप्रशिक्षित-सरकारी प्रशिक्षण न मिळणारे शिक्षक, ५० टक्केच्या वर डी.एड. देखील न झालेले शिक्षक, अनुदानित नसल्याने शाळांची कसलीही पाहणी नाही, वरचेवर शिक्षक बदलणे, शिक्षकांना पूर्ण वेतन नाही, मातृभाषेतून शिक्षण नाही, मराठी बोलल्यावर शिक्षा, मराठीतून समजावून सांगितले जात नाही, प्रचंड फी, पालकांना अपमानास्पद वागणूक, इ. इतकी कारणे इंग्रजी माध्यमात शिक्षण न घेण्यासाठी पुरेशी आहेत.

आपली प्राथमिकता सेमी किंवा मराठी यावर न भांडता, येणाऱ्या पिढ्या या इंग्रजी शाळांच्या मगरमिठीतून सोडवणे हीच असली पाहिजे.

त्यांना झोडायचं सोडून मराठी शाळांचं कसं नुकसान होईल यासाठी काही लोकांनी कंबर कसली आहे, हा आत्मघातकीपणा आहे.

लोकांनी मराठी शाळेत मुलांना शिकवावे पण मराठी अस्मितेचे झेंडे खांद्यावर घेऊन नाही, तर मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून, उच्चशिक्षित-सरकारकडून प्रशिक्षित शिक्षकांकडून शिक्षण घेता यावे म्हणून, सेमी इंग्रजी तुकड्यांचा लाभ घेता यावा म्हणून, भविष्यात अनेक भाषा शिकण्याचा पाया असलेली मातृभाषा पक्की करण्यासाठी म्हणून!

मराठी शाळा दर्जेदार शिक्षणाच्या पॉवरहाऊस प्रमाणे आहेत, उत्तम व्यक्तिमत्त्व विकास केंद्र आहेत!

म्हणूनच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकवावे.

या मित्रांनो, अजूनही वेळ गेली नाही, हत्यारे खाली टाका, तलवारी म्यान करा, मतभेद विसरा, एकत्रितपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांविरुद्ध लढूया!!!

सर्व प्रतिमा : अक्षयपात्र फाऊंडेशन

हा लेख इतरांना पाठवा

2 thoughts on “सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण : चांगलं की वाईट?

 • March 8, 2019 at 10:48 pm
  Permalink

  लेख भारी आहे. विषयही जिव्हाळ्याचा.
  पण लेख जरासा ताणला गेलाय. वाचताना कंटाळा येत गेला. आणि तेच तेच उल्लेख बरेचदा येत गेले आहेत असं वाटलं. म्हणजे, लेखक मला विचार करायला न देता मला पटवण्याचा प्रयत्न करतोय असं वाटलं. 🙂

  Reply
  • March 10, 2020 at 9:16 pm
   Permalink

   प्रथम दर्शनी पटविण्याचा प्रयत्न आहे दिसत आहे पण पचनी पडणे कठीण आहे खरा.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *