खरा अशोक । वनी वसे ते…

आपण सगळीकडे उंच, एकसंध बांध्याचे अशोक (म्हणजे अशोकाची झाडं) बघतो तो खरा अशोक नाहीच! रावणाने सीतेला ज्या अशोकवाटिकेत ठेवलं होतं, तोच खरा अशोक : सीता-अशोक. ह्या दोहोंच्या पानांमधल्या साम्यामुळे दोघांना एकच नाव पडलं असावं.

हिंदू पुराणात अनेक प्रसंगी सीता अशोकाचा संदर्भ आहे. गौतम बुद्धांचा जन्म ह्याच झाडाखाली झाला असं मानलं जातं. बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या आवारात हे झाड असतंच, ह्याशिवाय मंदिरातल्या शिल्पांमध्ये हा अशोक आणि त्याच्यासोबतची यक्षिणी आढळून येते. तिने झाडाच्या बुंध्यावर पाय ठेवलेला आणि झाडाची फुललेली फांदी हाताने धरलेली अशी मनमोहक शिल्पं अनेक ठिकाणी सापडतात. ही यक्षिणी वंशवृद्धी करणारी देवता आहे असंही मानलं जातं. सीता अशोक स्त्रीप्रजनन संस्थेच्या स्वास्थ्यासाठी गुणकारी असल्याने हा संबंध रास्त आहे. कामदेवाच्या ५ फुलांच्या मदनबाणांतलं एक फूल सीता अशोकाचं आहे. चैत्र महिन्यात ह्या पवित्र झाडाची पूजा केली जाते.

ओळख

सह्याद्रीचे डोंगर आणि दक्षिणेचं दख्खन पठार हे सीता अशोकाचं उगमस्थान. तिथूनच तो त्याच्या सुंदर पानाफुलांमुळे देशभर पसरला. आता सगळीकडे लागवड केलेले सीताअशोक दिसत असले तरी जंगलांमध्ये मात्र तो नामशेष झाला आहे. सीताअशोकाचं वैज्ञानिक नाव Saracaasoca, family Caesalpiniaceae ( गुलमोहोर, बहाव्याची).

फोटो – सई गिरधारी

सीता अशोकाचं झाड अतिशय रेखीव दिसतं. बेताची उंची, फांद्यांचा डेरेदार नीटनेटका पसारा आणि सळसळणारी हिरवीकंच पानं हे त्याचं नेहमीचं रुपडंही मनाला गारवा देतं. पानं ५ ते ६ जोड्यांची असतात. कोवळी लालसर, नाजूक आणि झुकलेली पानं मोठी होतात तशी गडद हिरवी होत जातात. जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान ह्या रुपाला अजूनच उभारी येते. इतर झाडांच्या नवीन फांद्यांना किंवा फांद्यांच्या टोकांना येणाऱ्या फुलांपेक्षा ह्याचा बहर वेगळाच असतो. सीता अशोकाची सुंदर केशरी फुलं चक्क झाडाच्या मुख्यखोडावर आणि जुन्या फांद्यांवर येतात! ही फुलं आधी पिवळसर आणि वय वाढेल तशी केशरी, लाल होतं जातात. गडद राखाडी खोडावर हे केशरी फुलांचे गुच्छ अत्यंत देखणे दिसतात. झाडाचं रूपच बदलून जातं. त्याच्या गडद हिरव्या पानांमध्ये ही फुलं एवढी उठून दिसतात, की पाहणारा मंत्रमुग्ध होऊन बघत राहतो! त्याच्या सुंदर रुपामुळेच कदाचित त्याचं संस्कृत नाव ‘अशोक’, म्हणजेच कधीही दुःख न देणारं असं पडलं असावं.

उपयोग

सीताअशोक किती औषधी झाड आहे, हे आयुर्वेदात त्याला दिलेल्या महत्त्वावरून लक्षात येतं. झाडाची सालं, बिया आणि फुलांची पूड, काढा, काथा रोग बरे करण्यासाठी दिले जातात. हे झाड प्रामुख्याने स्त्रियांच्या प्रजनन संस्थेच्या आजारांवर गुणकारी आहे. सीता अशोक एस्ट्रोजेन ह्या हॉर्मोनचा वनस्पतीस्रोत मानला जातो. गर्भाशयाचं दुखणं, रक्तस्राव, गाठी कमी करण्यासाठी हे झाड उपयोगी आहे. मासिक पाळी नियमित आणि वेदनारहित करण्यासाठी सीता अशोकाचा रस उपयोगी पडतो. कोरफड आणि सीता अशोकाचं योग्य मिश्रण स्त्रियांना गर्भारपणात मदत करतात. रक्तात लाल पेशींच्या कमतरतेवरही सीताअशोक इतर वनौषधींसोबत गुणकारी आहे.

इतर आजारांवरही सीताअशोक उपयोगी आहे. शरीराला थंडावा देऊन थकवा, शीण, हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होणार त्रास शमतात. रक्त शुद्धीकरण होऊन त्याच्या अशुद्धतेमुळे जोडणारे सगळे विकार दूर होतात. पित्तदोष होऊन होणारी जळजळ, जास्त तहान, घाम, चिडचिड सारं काही शांत होतं. सीता अशोकाच्या सेवनाने पोटाचे विकारही दूर होतात. रक्तस्राव आणि हृदयविकारांवरही सीताअशोक औषधी आहे, हृदयविकाराने पिडीत व्यक्तींनी ह्याची नोंद नक्की घ्यावी.

झाडाचे माणसाला असंख्य औषधी उपयोग असल्याचा झाडाला फायदा हा की लाकडासाठी त्याची तोड होत नाही. सीताअशोकाचं लाकूड ठिसूळ असल्याने फारसं उपयोगी नसतं. फुलापानांचा देवाला वाहण्यासाठी वापर होतो तर बिया सुपारीसारख्या खाल्ल्या जातात.

फोटो – सई गिरधारी

आपल्याकडे वृक्षलागवडींमध्ये गुलमोहोर, सोनमोहोर, Palms ह्या बाहेरच्या झाडांचाच समावेश केला जातो. त्याऐवजी ह्या सुंदर आणि बहुपयोगी भारतीय झाडांचा विचार केला जाण्याची गरज आहे. अनेक माश्या, किडे, प्राणीपक्षी आपल्याकडच्या झाडांना सरावलेले असतात. त्यांच्या ओळखीची झाडं सोडून इतर झाडं लावली तर फक्त ते झाडच नाही तर हे सर्व जीवही दगावले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे बाग, शेतांसोबतच सह्याद्रीच्या जंगलांमध्येही सीता अशोक टिकून राहावा ह्यासाठी त्यांचा अधिवास जपायला हवा. त्यासाठी करण्याजोगे सर्व प्रयत्न करायला हवेत.

सीताअशोकाला एखाद्या सुंदर स्त्रीने लाथ मारली तरच त्याला फुलं येतात, असं मानलं जातं. तुम्हाला हे झाड दिसलं तर तुमच्या सौंदर्याची पावती मिळवायला विसरू नका!

हा लेख इतरांना पाठवा

सई गिरधारी

वनस्पतीशास्त्र पदवीधर आणि अभ्यासक.

One thought on “खरा अशोक । वनी वसे ते…

  • March 20, 2019 at 2:05 pm
    Permalink

    मार्मिक माहिती वनस्पतींची, सीता अशोकाच्या लागवडीची क्रुपया माहिती द्यावी.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *