जग संपणार आहे हे कळल्यावर चांगलं राहणं खूप कठीण असतं.

काही माणसांना कसं जमतं स्वत:चा एकच एक स्वभाव जपून ठेवणं? माझ्या बाबतीत मला नेहमीच जाणवत राहतं की मी व्यक्त होतो तो एक आणि आत दडवून ठेवतो तो दुसरा असतो. जेव्हा मी धिंगाणा घालत असतो तेव्हा खूपदा मला शांत बसायला हवं असतं आणि जेव्हा शांत बसलेलो असतो तेव्हा मला खूप नाचायचं असतं. स्वत:वर नियंत्रण ठेवून राहणं हे एक कसब असतं आणि स्वत:ला परिस्थितीच्या स्वाधीन करून निश्चिंत होण्याचा मोह क्षणाक्षणाला माणसाला टाळावा लागतो.

लोक किती प्रकारच्या वेदनादायी अनुभवांमधून जात असतात हे पाहायचं असेल तर नुसतं इंटरनेटवर एखादं ‘कन्फेशन पोर्टल’ शोधून काढायचा अवकाश – माणसातला सैतान रडत रडत बाहेर येताना दिसतो. आणि फक्त स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्या वेदनांनीही व्यथित होणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. खोलवर आत वाटत राहतं की दुसऱ्यांची अवस्था पाहून रडणारे लोक प्रत्यक्षात स्वत:सकट दुनियेला फसवत असावेत, पण जेव्हा तुम्ही निनावी व्यक्त होत असता तेव्हा जे म्हणाल ते खरंच असतं. तेव्हा कळतं, की माणूस कस्साही असू शकतो. त्यावर कोणतीही बंधनं नसतात.

© 2012 – Focus Features

सीकिंग अ फ्रेंड फॉर द एंड ऑफ द वर्ल्ड’ या चित्रपटात परिस्थितीसमोर तुम्ही हरणं निश्चित आहे हे कळल्यावर माणूस कसा वागत सुटेल याच्या विविध कल्पना रंगवल्या आहेत. अर्थातच पावणेदोन तासांत सगळ्या शक्यता सामावून घेता येणं शक्य नाही, पण तरीही आवश्यक तेवढ्या सगळ्या शक्यता योग्य प्रमाणात उलगडवून दाखवलेल्या आहेत.

काही लोकांचं वागणं अतर्क्य असतं, काहींचं अगदीच ओळखू येण्याजोगं. आपण तीन आठवड्यांनी मरणार हे कळल्यावर, मरणाचं रोजचं भय सहन न होऊन आजच आत्महत्या करणारे लोकही या जगात आहेत, आणि एखाद्या रोगाने सहा महिन्यांनी आपण एकटे मरणार होतो पण आता दोन आठवड्यांत अख्ख्या जगासोबत शेवटचा श्वास घेणार आहोत याबद्दल खुश असणारे लोकही या जगात आहेत. तसं पाहता अशा दोघांचीही बाजू समजून घेता येण्याजोगीही आहे. पण समोरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असूनही धीरोदात्तपणे तिला सामोरं जाणं, आणि स्वत:वर, स्वत:च्या स्वभावावर, स्वत:मधल्या सैतानावर तरीही नियंत्रण ठेवत राहणं हे काहीतरी अजब रसायनानं घडलेल्या माणसालाच जमू शकतं.

विचार करा ना, समजा तुमचं जग लवकरच संपणारआहे, तुम्हाला नेमकी तारीखही माहिती आहे. तर तुम्ही हातातल्या सगळ्या जबाबदाऱ्या झटकून तुमची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करण्याच्या नादी नाही का लागणार? जी माणसं भांडणं, गैरसमज, अहंकारअशा कारणांनी दुरावलेली असतील त्यांना सगळं विसरून जवळ नाही का करू पाहणार? आणि समजा तुमचं स्वत:चं कोणी नसेल, किंवा तुम्हाला तसं वाटत नसेल, आणि तुमच्या आत दडून राहिलेला या जगावरचा प्रचंड राग व्यक्त करायला आत्तापर्यंत तुम्हाला कोणतीही सूट मिळाली नसेल, तर आता मिळालेल्या संधीचा फायदा तुम्ही नाही का घेणार?

पण दैव तुमच्याशी एक अजबच खेळ खेळलं तर? जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात सारं काही आलबेल असताना भेटायला हवी होती, ती तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना तुमच्या जीवनात आली तर? ते शेवटचे दिवस कसे जातील? तुम्ही कशावरून हे ठरवू शकाल की ती व्यक्ती नक्की तुम्हाला हवी होती तश्शीच आहे, आणि तुम्ही केवळ अगतिकतेपायी घाई करत नाही आहात?


हे चित्रपट अभिप्रायही वाचून पाहा :

फॉलोइंग – अंगाशी येणारा पाठलाग

द पर्क्स ऑफ बीइंग अ वॉलफ्लॉवर – एक सुंदर अनुभव


शून्यवादी माणसांसाठी तर जग संपणार आहे यासारखी पर्वणी नाही. ‘काय फरक पडतो?’ हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांना प्रत्यक्ष जगायला मिळतं. कोणत्याही विचारसरणीचा किंवा संप्रदायाचा प्रचार किंवा प्रसार न करता अख्खं जग एका येऊ घातलेल्या घटनेमुळे शून्यवादी होतं. यासारखा विजय कोणाला साजरा करता येणार आहे?

‘गोलमाल ३’ हा चित्रपट विशेष उल्लेखनीय नाही. त्यातल्या एका गाण्यातली ओळ अशी आहे, ‘‘अपना हर दिन ऐसे जियो, जैसे कि आखरी हो.’’ यामध्ये आपल्या आयुष्याचा हा अखेरचा दिवस आहे हे माहिती असणारा माणूस शेवटच्या क्षणांत सुखाच्याच शोधात असेल हे गृहीतक आहे. पण लोक मुळात सुखाच्या शोधात नसतात. समोर निश्चित मरण ठेपलेलं असतं, तेव्हा लोक जिवंतपणाची जाणीव करून देणारे अनुभव शोधत असतात. जिवंतपणाची सर्वाधिक जाणीव वेदनेतून होत असते. अतोनात छळ होत असलेल्या एखाद्या कैद्याला किंवा अतिवेदनादायी रोगामुळे अंथरुणाला खिळलेल्या एखाद्या रुग्णाला ते ‘जिवंत’ असल्याची अभूतपूर्व आणि असह्य जाणीव होत असते. म्हणूनच यापेक्षा ‘मेलेलं बरं’ असं माणसाला वाटू लागतं.

© 2012 – Focus Features

पण परिस्थिती बदलणं आपल्या हाती नसताना परिस्थितीच्या स्वाधीन होणं यासारखी दुसरी घोडचूक नसते. ‘शॉशँक रीडम्प्शन’ नावाच्या चित्रपटात पन्नास वर्षं तुरुंगवास भोगलेल्या माणसाची सुटका होण्याची वेळ येते तेव्हा त्याला बाहेर पडावंसं वाटत नाही. स्वत:ला त्याने आपल्यावर बेतलेल्या परिस्थितीच्या एवढं स्वाधीन केलेलं असतं की तिच्यावर त्याचं आयुष्य अवलंबून असतं आणि अशी परिस्थिती बदलू नये, बाहेरच्या अज्ञात जगात आपल्याला जावं लागू नये आणि आपला तुरुंगवास वाढावा, यासाठी, केवळ यासाठी तो पन्नास वर्षं तुरुंगवास भोगलेला कैदी पुन्हा खून करायचा विचार करू लागतो. अखेर तो हरतो आणि त्याने स्वत:स जिच्या स्वाधीन केलं ती परिस्थिती बदलून तो बाहेर फेकला जातो. भलत्याच परिस्थितीत येऊन पडतो. पण एव्हाना त्याचं स्वत्व त्यानं गमावलेलं असतं.

बदलाला घाबरणारा माणूस हा परिस्थितीला शरण गेलेला असतो. परिस्थितीसमोर हात टेकण्याची चूक करू नये, हा धडा मला चार लाख डॉलर्सचा तोटा सहन केलेल्या ‘सीकिंग अ फ्रेंड फॉर द एंड ऑफ द वर्ल्ड’ या अप्रतिम चित्रपटातनं मिळाला. सुरुवातीपासून विनोदी सूर असेल असं भासवणारा चित्रपट अखेरीस अतिशय नाट्यमय होतो. पण एकाग्र चित्तानं पाहणाऱ्याला हे स्थित्यंतर आक्षेपार्ह वाटू नये. आयुष्याचे सूरही असेच, अनपेक्षितपणे बदलत असतात, नाही का? स्वत:ला या चित्रपटाच्या स्वाधीन करा, आणि आयुष्यातले हे सुंदर पावणेदोन तास कायम मनापाशी साठवून ठेवा.


चित्रपटाचा दुवा

(चित्रपटातील दृश्यांच्या सर्व प्रतिमांचा वापर अभिप्राय देण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.)

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *