गोगलगाय पोटात पाय भाग २ – समुद्री गोगलगायी

ह्या अगोदरच्या लेखात आपण समुद्री गोगलगायी आणि त्यांची वैशिष्ट्ये याबद्दलची माहिती पाहिली. पण समुद्री गोगलगायींमध्ये सुद्धा कितीतरी प्रकार पडतात आणि लहानपणापासून शंख जमा करायचा छंद जोपासत असणाऱ्याला त्या शंखाचं नाव-गाव जाणून घ्यायची इच्छा झाली नाही नवलच.

भारताच्या अगदी कुठल्याही किनाऱ्यावर जा, तिकडे आपल्याला कुठला ना कुठला शंख हा नजरेस पडणारच. पाठीचा मणका नसलेल्या प्राण्यांमध्ये कीटकांच्या नंतर सर्वांत मोठा संघ जर कुठल्या प्राण्याचा येत असेल तर तो मृदुकाय प्राण्यांचा आहे (शंख शिंपले), ज्यात साधारणपणे एक लाख जातींचा शोध लागला आहे आणि आणखीन किमान लाखभर जातींचा शोध लागायचा आहे. त्यापैकी साधारण तीस हजार जाती ह्या समुद्री शंख आणि लोष्टकांच्या आहेत.

लिम्पेट प्रजातीचे शंख

जसं मृदुकाय प्राण्यांच्या सुरुवातीच्या प्रजातींमध्ये कायटनची गणना होते, त्याप्रमाणे समुद्री गोगलगायींमधली (कायटन नंतरची) सर्वात जुनी प्रजाती म्हणजे लिंपेट (Limpet), जी आजही आपल्याला आपल्या आसपासच्या समुद्र किनाऱ्यांवर आढळून येते. लिंपेट शंख तंबूच्या आकाराचा असून त्या शंखाला बंद करणारी झडप नसते. लिंपेट प्रजातीचे शंख आपल्याला दगडी किनाऱ्यांवर दगडाच्या पृष्ठभागाला चिकटलेले आढळून येतात. त्यांची गणना निशाचर प्राण्यांमध्ये होते. रात्र होताच हे जीव आजूबाजूच्या दगडावर चिकटलेलं शेवाळ चरायला बाहेर पडतात आणि पहाटे पुन्हा त्यांच्या रोजच्या दगडावर येऊन चिकटतात. नेमक्या या ठरलेल्या जागी परत यायच्या सवयीला इंग्रजीत ‘होमिंग बिहेविअर’ असं म्हणतात. लिंपेट शंख हे वर्षानुवर्षं एकाच जागी राहत असल्याने त्यांचा निवास असलेल्या दगडांची त्यांचा शंख घासून झीज होते, आणि ते वाटीसारखे दिसू लागतात. असे दगड हमखास नजरेस पडतात. धोक्याची जाणीव होताच हा लिंपेट शंख स्वतःचं शरीर सर्वशक्तीनिशी दगडाला चिकटवून ठेवतो, त्याचा शरीर आणि शंख धरून ठेवायचा जोर इतका असतो की तीन किलोचा किंवा त्याहून जास्त भार टाकूनही हा शंख आपली जागा सोडत नाही.

फेट्या शंख

आपल्याला सर्वसामान्यतः आढळून येणाऱ्या शंखांपैकी आणखी दोन शंख म्हणजे टॉप शेल आणि टरबन शेल. ह्या शंखांना मराठीत अजून तरी काहीच नावं नाहीयेत. टॉप शेलचा आकार हा भोवऱ्यासारखा असतो तर टरबन शेलचा आकार फेट्यासारखा गुंडाळलेला असतो, म्हणून त्यांना ही नावं. भोवऱ्या शंखाला असलेली झापड बारीक असते तर फेट्या शंखाला असलेली झापड भक्कम आणि बहिर्वक्र (convex) असते. खूपदा फेट्या शंखाला असलेल्या झापडीचा वापर दागिन्यांसारखा होताना दिसून येतो. फेट्या आणि भोवऱ्या, ह्या दोन्ही शंखांची खासियत म्हणजे त्यांच्यावर मोत्यासारखी चमक असते जी पेरीओस्ट्रॅकम (Periostracum) नावाच्या पातळ आवरणाखाली दडलेली असते. हे आवरण कालौघात उडून जाऊ लागतं, तसतशी त्या शंखाची चमक आपल्या नजरेस पडत जाते. आपण नियमित वापरत असलेल्या शर्टाला प्लास्टिकची बटणं येण्यापूर्वी त्यांना भोवऱ्या आणि फेट्या शंखातून कोरलेली बटणं लावण्यात येत असत.

पेरीओस्ट्रॅकमचा थर निघून गेलेला भोवऱ्या शंख

जवळपास प्रत्येक शंख आतून वेगवेगळ्या कप्प्यात विभागला गेलेला असतो, ज्याच्या सगळ्यांत बाहेरच्या कप्प्यात त्या शंखाचा मालक म्हणजेच गोगलगाय राहते. ही गोगलगाय एक सारणी (Matrix) पदार्थ सोडते, जो समुद्रात असलेले कॅल्शिअम कार्बोनेटचे आयन (ion) आणि कॅल्शिअम कार्बोनेट शंखात बांधतो. ह्याच कॅल्शिअमचा वापर करून गोगलगाय तिचा शंख भक्कम करते आणि त्याचा बाहेरचा सगळ्यांत बाहेरचा कप्पा बनवते. जसजशी ती गोगलगाय मोठी होत जाते तसतशी ती शंखात एकेका कप्प्याची भर घालत, पुढच्या कप्प्यात सरकत राहते.

समुद्री गोगलगायीच्या शंखावर असलेले वेगवगळे रंग हे तिच्या आहारावाटे कॅल्शिअम कार्बोनेटमध्ये मिसळून त्या शंखात जात असतात. जेव्हा समुद्री गोगलगाय तिच्या शंखाचा नवीन कप्पा बनवायला घेते तेव्हा आहारातून आलेले रंगांचे वर्णक (pigment) ती आपल्या खास विकसित झालेल्या पेशींमधून आपल्या शंखात पाठवते. जर ह्या पेशी गोगलगायीच्या शरीरात सर्वत्र असतील तर त्यांच्या संपूर्ण शंखाला एकसमान रंग येतो, पण जर का त्या फक्त ठरावीक भागात कायमच्या स्थित असतील तर शंखावर रंगाच्या वेगवेगळ्या रेषा उमटतात किंवा जर ह्या पेशी त्यांच्या जागा सतत बदलत असतील तर मात्र शंखावर रंगांचे वेगवेगळे डाग दिसून येतात. समुद्री शंखांना असलेले वेगवेगळे रंग हे त्यांच्या आहारानुसार बदलत जातात.

कवडी शंखावरचे रंग

ओहोटीच्या वेळी दगडी समुद्र किनाऱ्यावरून फेरफटका मारल्यास नजरेस पडणारा आणखीन एक शंख म्हणजे नेरिटा (Nerita sp). हा शंख समुद्राच्या भरतीच्या सीमेखाली अगदी कुठेही आढळून येतो. आकाराने गोल असलेला हा शंख खूपच टणक असतो. ह्या शंखाला इतर बहुतेक शंखासारखे कप्पे नसतात. त्यात असलेली गोगलगाय अस्तित्वात असलेला एकच कप्पा गोल फिरवत मोठा करत जाते. ह्या शंखाच्या झापडीला बाहेरून एक खुंटीसारखा आकार असतो जो बरोबर त्याच्या शंखाला असलेल्या खाचेत बसतो, ज्याचा वापर करून आत असलेली गोगलगाय स्वतःला बंद करून घेते. मराठीत ह्या शंखाला ‘खुबरी’ असंही म्हणतात. पूर्वी रिकाम्या खुबऱ्यांचा वापर करून खेळले जाणारे खेळ महाराष्ट्राच्या किनारी भागात प्रसिद्ध होते.

महाराष्ट्राच्या (आणि कदाचित महाराष्ट्राबाहेरही) बहुतेक देवघरांत आढळून येणारा शंख म्हणजे ‘कवडी’ (Cowry). हा शंख इतर शंखांपेक्षा बराच वेगळा आहे हे आपल्याला बघताक्षणी लक्षात येतं. इतर सामान्यतः आढळून येणाऱ्या शंखांप्रमाणे ह्या शंखाचं दार गोल नसून त्याला एक फट असते, इतकंच नव्हे तर ह्या शंखाच्या दाराला झापडही नसते. इतर गोगलगायींच्या उलट कवडीमध्ये राहणारी गोगलगाय तिच्या शरीराचा बराचसा भाग बाहेर काढून तिचा शंख झाकून घेते, त्यामुळे जिवंत कवडी शंखाला एक वेगळी लकाकी येते. त्रास दिल्यावर मात्र कवडीतून बाहेर आलेली गोगलगाय शंखाच्या फटीतून लगेच आत निघून जाते. अगदी हल्ली-हल्लीपर्यंत कवडीचा वापर भारतात चलन म्हणून व्हायचा. आजही कवडीचा वापर महिलांसाठी खास संकल्प करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये सररास आढळून येतो.

कवडी शंखाला इतर शंखांसारखी झडप किंवा गोल भगदाड नसून खाच असते.

शंख किंवा गोगलगायीबद्दल सांगायचं म्हटलं तर तो हळू चालणारा जीव म्हणून प्रसिद्ध आहे. पण समुद्रात अशीही गोगलगाय आहे जी एका काळानंतर चालायचा त्याग करते! इंग्रजीत तिला वर्म स्नेल (worm snail) असं नाव आहे. ही गोगलगाय जन्मतः अगदीच सामान्य असते, पण जशी तिची वाढ होते तशी ती स्वतःला एका दगडाला चिकटवून घेते आणि वाटेल त्या दिशेने शंख वाढवते. तिने तिच्या शंखाला दिलेल्या वळणांवरून तिच्या वेगवेगळ्या प्रजाती पडतात. जरी चालता येत नसलं तरी ही गोगलगाय काही कमी नाही बरं. इतर गोगलगायी सरपटताना ज्या पद्धतीने त्यांच्या मागे श्लेष्म सोडतात, त्याच पद्धतीने वर्म स्नेल तिच्या श्लेष्माचा वापर चिकट जाळं बनवण्यासाठी करते आणि ते जाळं स्वतःच्या तोंडातून पाण्याच्या प्रवाहात सोडते व काही काळाने परत तोंडात ओढून घेते! हे करताना जे काही सूक्ष्म जीव तिच्या जाळ्यात अडकतात त्यांना ही गोगलगाय जाळ्यासोबत फस्त करते!

वर्म स्नेलचा दगडाला चिकटलेला शंख. फोटोत गोगलगाय बाहेर डोकावताना दिसत आहे.

आपण एरव्ही विचारही नाही करू शकत अशा पद्धतीने आपल्या सभोवतालचे जीव गेली हजारो वर्षं विकसित होत आले आहेत. या दोन लेखांत आपण समुद्री गोगलगायीची काही उदाहरणं आणि माहिती पाहिली, पण अशा कित्येक समुद्री गोगलगायी / शंख आपल्या राज्याच्या किनाऱ्यावर आढळून येतात ज्यांच्याबद्दल आपल्याला पुरेशी माहितीही नाहीये आणि अशा अनेक जातींचा शोध अजूनही लागायचाय!

सर्व फोटो : गौरव पाटील

हा लेख इतरांना पाठवा

गौरव पाटील

सागरी जीव अभ्यासक, छायाचित्रकार आणि चित्रकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *