खिडकीतल्या कुंडीतलं ब्रह्मकमळ खरं ब्रह्मकमळ नव्हेच!

गेली कित्येक वर्ष प्रत्यक्षात, फेसबुकवर, व्हॉटसॲपवर लोकांना सांगून सांगून थकलो.

बरेच लोक ज्या सुंदर फुलाला सर्वसाधारणपणे ब्रह्मकमळ म्हणून ओळखतात आणि त्याची पूजा सुद्धा करतात ते वास्तविक एक प्रकारचं निवडुंग (Epiphyllum Oxypetalum) आहे.

एखादी चुकीची गोष्ट वर्षानुवर्षं कानावर पडत गेली की खरी वाटायला लागते त्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणावं.

ब्रह्मकमळ नव्हे. क्वीन ऑफ द नाईट

पगडा

खूप वर्षांपूर्वी आमच्या दारातल्या ह्या झुडुपाला पस्तीस एक फुलं लागली होती. पहिलाच बहर होता.

त्या वेळेपर्यंत शेजाऱ्यांकडे रात्रीबेरात्री जाऊन बघितलेलं कौतुक दारातच फुललं.

प्रत्येक रात्री अकराच्या सुमाराला आठ दहा फुलं फुलायची.

तीन चार दिवस हा सोहळा सुरु होता. मोठ्या कौतुकाने फोटो काढले.

कित्येक दिवस संगणकाच्या पडद्यावर पार्श्वभूमीचं चित्र म्हणून ह्या प्रतिमा वापरल्या.

त्यावेळेला आमच्या गच्चीवर एका कोपऱ्यात विविध प्रकारच्या निवडुंगांची छोटीशी बाग होती.

ह्या फुलांचं कौतुक संपलं आणि त्या निवडुंगातल्या एका लांबलचक, वेलीसारख्या पण जाडसर काटेरी झाडाला एक दोन कळ्या धरल्या.

जसे दिवस जायला लागले तसं लक्षात आलं की ह्या कळ्या रंगरुपात एकूणएक ‘ब्रह्मकमळाच्या’ कळ्यांशी मिळत्याजुळत्या होत्या.

अहो आश्चर्यम्! हे कसं काय. डोक्यात भुंगा अवतरला.

कितीही हाकलला तरी जाईना. बरं, ज्यांना विचारतोय ते छातीठोकपणे सांगत होते – “नाही हो. हे तर ब्रह्मकमळच..!!”

गूगल गुरुंचा जन्म झालेला होता पण ते फारच बाल्यावस्थेत होते. त्यांचंच शिक्षण चालू होतं.

‘याऽऽऽ हू’ साहेब माझं शब्दलेखन चुकीचं आहे हे मला पटवत होते.

बरं, मलासुद्धा ब्रह्मकमळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ह्याची कल्पना नव्हती. शोधायचं कुठे?

ज्ञानकोश (Encyclopedia) पण चाळून झाले. वनस्पतिशास्त्र शिकणाऱ्या तीन पैकी दोघा मित्रांनी “ब्रह्मकमळच रे” सांगून निराशा केली होती.

पुण्यातल्या एंप्रेस वनस्पती बागेचा माळी पण तेच सांगत होता.

गच्चीवरच्या कळ्यांनी तोपर्यंत फुलून घेतलं होतं आणि विश्वास बसणार नाही (माझाही बसला नव्हता) पण ती दोन्ही फुलं जशीच्या तशी खालच्या फुलांसारखीच होती.

वास सुद्धा तस्साच. फक्त आकार थोडा छोटा होता.

ब्रह्मकमळ की क्वीन ऑफ द नाईट

क्वीन ऑफ द नाईट

पुढची तीन चार वर्षं एक टुकार निवडुंग ब्रह्मकमळाचा भाव खात फुलत होता.

ऑरकुट नावाचं (मोकळं) सामाजिक मैदान सुरु झालं होतं, पसरलं पण होतं.

त्यावर असंच सहजपणे भटकत असताना एका वनस्पती कट्ट्याचा शोध लागला.

माझ्याकडची प्रतिमा त्यावर टाकली आणि चांगल्या पंधरा वीस दिवसांनतर एकाने त्याचं खरं नाव आणि तेही इंग्लिश मधे लिहिलं.

“क्वीन ऑफ द नाईट”. काही दिवसांनी दुसऱ्याने अजून एक नाव टाकलं, “व्हॅनिला कॅक्टस”.

गूगल आतापर्यंत बरंच विकसित झालं होतं.

‘विकी’ची सुरुवात होत होती. माहिती मिळाली. मन, आत्मा, डोकं व असं सर्व काही छान थंड झालं. बरं वाटलं.

गेली आठ वर्षं जिथे कुठे हे चित्र, फोटो यांचा उल्लेख ‘ब्रह्मकमळ’ म्हणून झालेला दिसला तिथे तिथे माहिती प्रसाराचा प्रामाणिक प्रयत्न केला.

आनंद हा वाटतो की खूप जणांनी “वाह वा” म्हटलं, “छान” म्हटलं आणि दु:ख अशाचं झालं की ह्याच लोकांनी परत पुढच्या मोसमात असेच फोटो ब्रह्मकमळ म्हणूनच छापले. पगडा. बाकी काही नाही.

खरं ब्रह्मकमळ : सौस्सुरीआ ऑबव्हॅल्लाटा
खरं ब्रह्मकमळ : सौस्सुरीआ ऑबव्हॅल्लाटा (Saussurea Obvallata)
उत्तराखंड राज्याचं राज्यपुष्प

खरं ब्रह्मकमळ हे फक्त हिमालय आणि त्याच्या आसपासच्या परिसरातच फुलतं.

तेही समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० मीटर किंवा त्याच्या आसपासच्या उंचीवरच.

आपल्या उत्तराखंड राज्याने त्याला राज्यपुष्पाचा मान दिलेला आहे. त्याचं इंग्रजी नाव आहे सौस्सुरीआ ऑबव्हॅल्लाटा (Saussurea Obvallata).

ब्रह्मकमळाचं झाड हे जुलै-ऑगस्टच्या सुमारास फुलोरा धरतं व ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत बघायला मिळतं.

हा बहर संपला की झाड मरतं आणि परत एप्रिलच्या आसपासच दृष्टीक्षेपात येतं.

श्री विष्णूच्या नाभितून उगवलेल्या कमळावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाच्या हातात हे बघायला मिळतं आणि म्हणून त्याचं नाव ब्रह्मकमळ.

तिबेटच्या औषधोपचार पद्धतींमधे ह्या संपूर्ण झाडाचा उपयोग होत असल्याने हे सर्वांगसुंदर फूल हल्ली नष्ट व्हायच्या मार्गावर आहे.

मूत्रसंस्था व जननसंस्थेमधील इंद्रिय विकारांवर ह्याचा उपयोग केला जातो.

खरं ब्रह्मकमळ

निवडुंगाचं सौंदर्य

हल्लीच मिळालेल्या अधिक माहितीनुसार आमच्या दारासमोरचं आणि गच्चीतलं हे दोघेही सेरोइड (Ceroid) प्रकारचे निवडुंग आहेत.

त्यांना नुसतं सिरीयस (Cereus) म्हणूनही ओळखतात.

आपल्या माहितीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या संपूर्ण ‘सिरीयस’ कुटुंबाला ‘व्हॅनिला कॅक्टस’ सारख्याच रंगरूपाची व वासाची फुलं येतात.

फक्त आकार थोडाफार कमी जास्त असतो.

लॅटिन शब्दावरुन आलेल्या ह्या Cereus शब्दाचा खरा अर्थ ‘निमुळती मेणबत्ती’ असा आहे. गंमतीच आहेत एकेक.

मी तर म्हणेन की हे कॅक्टसचं फूल ब्रह्मकमळापेक्षाही जास्त आकर्षक आहे.

मला सुद्धा तो फुलोरा बघून प्रसन्नच वाटतं. त्याची ती सुवासिकता मन भरुन टाकते.

पण तो आनंद कितीही ब्रह्मस्वरुप असला तरी ब्रह्मकमळामुळे झालेला नसून एका साध्या निवडुंगामुळे झालेला आहे हे सर्वांना कळावं एवढीच अपेक्षा.

निवडुंग आणि वैराणता ह्याचं जवळचं नातं आहे पण त्या वैराणतेमध्येही उत्कृष्ट सौंदर्य दडलेलं असतं हेच मला सांगायचंय.

कितीतरी कविता, कथा कादंबऱ्यांमधे ह्या रात्रीच्या राणीचा उल्लेख आहे.

काही कथा तर फक्त तिच्या भोवतीच फिरलेल्या आहेत पण ही परदेशी नाव घेऊन वावरणारी राणी म्हणजेच ते आमचं दारातलं निवडुंगी कमळ हे मज पामरास कसे उमगणार..!!

लेख आवडला ना?

हा उत्तम लेख लिहिणारे सिद्धार्थ अकोलकर यांचे असेच उत्तमोत्तम लेख वाचा :

सात या आकड्यात एवढं विशेष काय आहे?

मराठीतील पहिलं वृत्तपत्र : दर्पण

साबणाचा गुळगुळीत आणि फेसाळ इतिहास

आंब्याची रसाळ गोष्ट

कटकल्पना

रामाला बहीण होती हे माहिती होतं का?

।। देशकालोच्चारण ।।

तेरा आकड्याचा महिमा : शुभाशुभ समजुती आणि गमतीजमती

हा लेख इतरांना पाठवा

सिद्धार्थ अकोलकर

आयुष्यभर विद्यार्थीदशा जपण्याची व जोपासण्याची प्रामाणिक इच्छा मनामध्ये बाळगावी.

8 thoughts on “खिडकीतल्या कुंडीतलं ब्रह्मकमळ खरं ब्रह्मकमळ नव्हेच!

 • March 5, 2019 at 2:11 pm
  Permalink

  Wonderful. Very good information. Thanks for sharing.
  Smita Bhagwat

  Reply
  • March 5, 2019 at 6:25 pm
   Permalink

   तुमचे आशीर्वाद मिळाले की बरं वाटतं. 😊

   Reply
  • April 8, 2019 at 9:39 pm
   Permalink

   मस्त सिद्धार्थ. तुम्ही खूप छान उकल केली आहे अणि भाषाही ओघवती आहे. धन्यवाद.

   Reply
   • April 9, 2019 at 5:48 pm
    Permalink

    अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद तेजस्विता. 🙏🏼

    Reply
 • March 5, 2019 at 9:12 pm
  Permalink

  छान माहिती! खर्‍या ब्रह्मकमळाविषयी मागे एका मित्राकडून कळाले होते…. ते खूप उंचीवर हिमालयातच आढळते म्हणून.

  Reply
  • April 9, 2019 at 5:49 pm
   Permalink

   मनःपूर्वक धन्यवाद वासुदेवराव. 🙏🏼

   Reply
 • April 10, 2019 at 11:00 am
  Permalink

  Khari Kay to mahiti aaj kalali.gairsamaj dur Zara .aata yapudhehi dusaryana samjavu shakto ..

  Reply
 • July 24, 2019 at 8:04 pm
  Permalink

  धन्यवाद, ही माहिती मिळवण्यासाठी तुम्ही निश्चितच खूप प्रयत्न केले असतील आणि शोध घेतला असेल,,, तुम्हाला याचे संदर्भ कुठे कुठे मिळाले त्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल,

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *