रामाला एक बहीण होती हे अनेकांना माहिती नसतं

माहितीये का ही कोण? अनेकांना विचारलंय मी…

बहुसंख्यांना अशी कोणी रामाची बहीण आहे हे माहीत सुद्धा नाही. उत्तरं मिळत नाहीतच पण त्या उलट प्रश्न तर खूप सारे विचारले जातात…

“ती कोण ब्वा, कुठे गेली मग”?
“काहीच कसं मिळत नाही तिच्यासंबंधी वाचायला”?
“छे.. नव्हतीच, तुझं आपलं काहीतरीच”.
“कुठून तरी काही तरी मिळवतोस आणि आम्हाला सगळं जगावेगळं सांगतोस”.
“कायप्पण हां अकोलकर..”
“रामाची सीता कोण असं म्हणायचंय का तुला”?
“हाहा हाहाहाहा.. रामाची बहीण? ठीक आहेस ना.. हाहाहा”.

एका ओळखीच्या डॉक्टरांनी रामनवमीच्या मुहूर्तावर दोन सिझेरियन्स केली आणि एक ‘काळा राम’ तर दुसरा ‘गोरा राम’ या जगामध्ये आले. प्रश्न हा होता की जर त्यातल्या कुणी एखाद्या स्त्रीने मुलाऐवजी मुलीला जन्म दिला असता तर… तर त्या मुलीचं नाव काय ठेवलं असतं? असो… गंमतीचा भाग बाजूला ठेवूया!

दशरथ-पुत्र, रघुकुल-तिलक मर्यादापुरुषोत्तम श्रीराम हे एक साधं सरळ सोपं प्रकरण नाही. ‘राम’ समजून घेण्यासाठी “राम” म्हणेपर्यंत मेंदू झिजवला तरी त्यामधला फारच अल्पसा भाग कळेल. मुळात रामायण ही कल्पित कथा नाही वा पुराणातली वानगी नाही किंवा एखादं ठोक सत्य असंही नाही. रामायण म्हणजे आयुष्य कसं जगावं हे सांगणारं एक मार्गदर्शनपर महाकाव्य आहे. आपल्या जीवन जगण्याच्या संकल्पनांना विचारला गेलेला एक प्रश्नसंच आहे… जर मानलात तर! भक्तांना भक्ती करण्यासाठी, टीकाकारांना टीकेसाठी, संशोधकांना उपकहाण्या शोधण्यासाठी, संतमंडळींना, लेखकांना गद्य-पद्यरचना करण्यासाठी, संगीतकारांना चाली लावण्यासाठी, राजकारण्यांना भांडणांसाठी, खूप जणांना स्वतःच्या वेगळ्या ओळखी निर्माण करण्यासाठी आणि हो, बालगोपाळांना रामरक्षा म्हणण्यासाठी सुद्धा या रामचरित्राने खूप काही देऊ केलंय. हे सगळं तुम्हाला माहितीये तेच परत सांगतोय, नाही का? आता तुम्हीही विचारणार – रामाची बहीण कोण?

तर सांगायचं म्हणजे, ती होती. पण वाल्मिकी रामायणात तिचा उल्लेख मिळत नाही. पण तसं म्हणायचं तर आजच्या रामायणामधल्या म्हणून प्रचलित अशा कित्येक गोष्टी वाल्मिकी रामायणामध्ये नाहीत. उदा. लक्ष्मणरेषा (हो, नाहीये!), शबरीची बोरं, अहिल्येची शीळा या खऱ्या तर प्रादेशिक लोककथा असून नंतर मूळ रामायणामध्ये त्यांचा समावेश केला गेलेला आहे. रामायणाच्या बालकाण्डात बऱ्याच ठिकाणी या राम भगिनीचा उल्लेख आहे. बालकाण्ड हा भाग रामायणात बऱ्याच नंतर समाविष्ट केला गेला आहे असा विद्वानांचा एक मतप्रवाह आहे. पण बाकीच्या अनेक हिंदू ग्रंथांप्रमाणे रामायण हा सुद्धा एक मुखग्रंथ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे छान छान व पटणारं आहे ते अनेक पिढ्यांनी त्यात भर घालून पुढच्या पिढीकडे सोपवलेलं आहे.

या रामभगिनीचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही तर श्री व्यासमुनींच्या महाभारतात सापडतो. त्या उल्लेखानुसार अंगदेशाच्या लोम्पाद (रोमपाद/ चित्ररथ?) नामक राजाने म्हणजेच कौसल्येच्या बहिणीच्या, वर्षिणीच्या नवऱ्याने, दशरथाची ही कन्या दत्तक घेतलेली होती. काही रामकथांमधे हा उल्लेख नेमका उलटा आढळतो. म्हणजे ती लोम्पादाची कन्या होती आणि दशरथाने तिला दत्तक घेतलं होतं. म्हणजेच अशी नाही तर तशी ती रामाची बहीण नक्कीच होती म्हणायची! तर, महाभारतानंतरच्या साहित्यांमध्ये अनेक वर्षांनंतर या कन्येचा उल्लेख श्रीरामाची ज्येष्ठ बहीण असा आढळतो. अरे हो, तिचं नाव सांगायचं राहूनच जातंय. तर तिचं नाव होतं – शांता! शांता म्हणजे शांत मुलगी. गंमत म्हणजे जुन्या तेलगू लोकगीतांमध्ये ही शांत शांता सीता त्यागाच्या वेळी श्रीरामावर खूप भडकली होती अशा अर्थाची गाणी आहेत. साध्या धोब्याच्या शब्दावर विश्वास ठेवून पत्नी त्याग करणारा आपला भाऊ तिला अजिबात आवडलेला नव्हता. श्रीरामाची व्यथा आणि त्या मागची कारणं समजून घेणारे त्या काळीही नव्हते हेच खरं!

पंधराव्या शतकात कवी बलराम दास यांनी लिहिलेल्या दांडी रामायण म्हणजेच उड़िया भाषेमधल्या रामायणामध्ये त्या दत्तकविधींनंतर शांताचं लग्न करुन देण्यात आलं असा उल्लेख सापडतो. ऋष्यश्रृंग नामक ऋषी तिचे पती होते. या ऋषींच्या तीव्र ब्रह्मचर्यामुळे लोम्पादाच्या साम्राज्यात प्रचंड दुष्काळ पडलेला होता. प्रजेचे हाल सुरु होते. त्यांचं ब्रह्मचर्य संपवणं हा एकमात्र ‘उपाय’ शिल्लक होता. तर या शांताने ती जबाबदारी स्वीकारली. लग्न लागलं आणि पाऊस पडला बाबा एकदाचा! तिकडे दशरथाचेही असेच काहीसे हाल सुरु होते. शांतेचा सांभाळ त्याने व कौसल्येने व्यवस्थित केलेला होता पण खूप प्रयत्न करुनही दोघांना मुलगा काही होत नव्हता आणि दस्तुरखुद्द ब्रह्मदेवांनी त्यांच्या मनात भरवलं होतं की मुलगा नाही तर वंशवृद्धी नाही, प्रजेचा तारणकर्ता नाही, सिंहासनाला वारस नाही, वगैरे, वगैरे.

राजा दशरथाने अस्वस्थ होऊन सुमित्रेबरोबर दुसरं, त्या पाठोपाठ कैकेयीशी तिसरं लग्नही केलं. ऊं हूं. आता तर त्याच्या राण्यांना गर्भधारणाही होत नव्हती. सरतेशेवटी सगळे उपाय संपल्यावर त्याने देवांना खूष करण्यासाठी पुत्रकामेष्टी महायज्ञाचं आयोजन केलं आणि मुख्य पुरोहित म्हणून जावयाच्या हाती कार्यधुरा दिली. या ऋषींचं ब्रह्मचर्य संपल्याने जसा लोम्पादाला, त्याच्या अंगदेशाला फायदा झाला, त्या साम्राज्याची धरा सुजलाम् सुफलाम् झाली तशी त्याच्या राण्यांचीही कूस उजवेल असा दशरथाला कुठेतरी विश्वास वाटत असावा. तो खराही ठरला हे महत्त्वाचं. यज्ञदेव प्रसन्न झाले. दशरथाला ‘पायसदान’ मिळालं आणि त्रेतायुगाच्या इक्ष्वाकु रघुकुळातलं हे सूर्यवंशी राजघराणं एक दोन नाही तर चांगलं चार सुकुमारांनी भरुन गेलं. राम, भरत, लक्ष्मण व शत्रुघ्न यांचा जन्म झाला म्हणजेच ब्रह्मदेवाच्या चाळिसाव्या पिढीचा जन्म झाला. “चाळीस पिढ्यांत कुणी हे केलं नसेल” हा वाक्प्रचारही त्याचबरोबर जन्माला आला असेल का?

मात्र या शांताचं व्यक्तिचित्रण श्रीरामासारखं नाहीये. राम जसा मर्यादा प्रतिपालक, सत्पुरुष वगैरे आहे त्याच्या उलट त्याची ही बहीण एक अद्वितीय सुंदरी पण तरीही कामुक म्हणून रंगवलेली आहे. ऋष्यश्रृंग ऋषींना तिने काय काय क्लृप्त्या लढवून फशी पाडलं ते वर्णन अत्यंत वैषयिक आणि कामप्रचुर आहे. ऋष्यश्रृंगाचे पिता म्हणजे थोर कश्यप (विभण्डक) ऋषी. कश्यपांना स्वर्गातल्या उर्वशीने ‘फसवलेलं’ होतं आणि हा मुलगा एका हरिणीच्या पोटी डोईवर मृगशिंग घेऊन जन्माला आला होता. आपली फसगत झाली तशी या मुलाची होऊ नये यासाठी कश्यप ऋषींनी त्याला समाजापासून व स्त्रीपासून कायमचं दूर ठेवलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या या बालब्रह्मचारी मुलाला स्त्री म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. असा कसा हा ‘वेगळा माणूस’ अशा कुतूहलाने शांताच्या कोमल सर्वांगाकडे बघताना त्याला ती ‘बाईमाणूस’ असल्याचा ‘शोध’ लावायला शांताने भाग पाडलं. असो… अंऽहंम्.. आपण हे सगळं न बघता शुद्ध सात्विक भाव मनी बाळगून फक्त एका अजरामर महाकाव्याचा एक दुर्लक्षित भाग म्हणूनच या गोष्टीकडे बघावं हे उत्तम..!!

हे सगळं वाचून कुणी असंही म्हणेल की हे तर वाल्मिकी ऋषींनी नाही सांगितलेलं मग खरं कशावरुन!? खरंय पण विचार करा, मूळ रामायणात नसलेल्या बाकीच्या कथा जर आपण स्वीकारु शकतो तर मग ही का नाही स्वीकारायची? नाही का? रामायण हे मूलतः व्यक्ति/ नाते संबंधांवर आधारलेलं महाकाव्य आहे आणि म्हणूनच ते जनतेला अधिक जवळचं वाटतं. वडील मुलगा, पती पत्नी, भाऊ-भावंडं, राजा-प्रजा, इत्यादी गोष्टींच्या भोवती ते कायम फिरत राहतं. भारतीय जनता आधीच फार भावनात्मक बंध सांभाळून जगणारी प्रजा म्हणून जगभरात ओळखली जाते. कुणाला असंही वाटलं असेल की अरे, ती एक शूर्पणखा सोडली तर या रामायणात बहीण हा मूलभूत भावानुबंध कसा नाही!!? म्हणूनच शांता या लोम्पादाच्या दत्तकपुत्रीचा दशरथाची कन्या, श्रीरामाची बहीण म्हणून रामायणामध्ये जर शिरकाव झाला असेल तर असू दे की बापडा. त्यात विवादास्पद व वाईट असं काय आहे? जे चांगलं आहे ते स्वीकारण्याची उदारमतवादी दृष्टी कधीही चांगलीच की!

फोटो श्रेय : himachal.nic.in

वाल्मिकी ऋषी ‘विसरले’ पण ऋष्यश्रृंगाच्या प्रदेशामधली प्रजा त्याला व त्याच्या पत्नीला विसरली नाही. नेपाळच्या ललितपूर जिल्ह्यात व आपल्या हिमाचलमध्ये कुल्लू जवळ ऋष्यश्रृंग व शांतादेवीची प्राचीन मंदिरं आजही आहेत. त्याच भागातल्या श्रृंगेरी गुहांमध्ये त्याचा जन्म झाला होता म्हणतात. गर्भवृद्धिशास्त्रामधे त्याकाळी त्याने प्रचंड संशोधन केलेलं होतं व त्याकाळच्या संपूर्ण ज्ञात जगामध्ये त्या विषयामधला तो एकमेव प्रमाण तज्ज्ञ मानला जात असे. महामुनी वसिष्ठांनी त्याची माहिती व महती सर्वदूर पसरवली होती असेही उल्लेख आहेत. बुंदेलखंडामधले सेंगर राजपूत म्हणजे या दोघांची कुलोत्पत्ती आहे आणि ही एकमेव राजपूत जमात ऋषीकुलोत्पन्न वा ऋषीवंशी आहे हे ही जाता जाता सांगतो.

तर, एक होती – शांता..!!

आणि ती होती म्हणून तर रामजन्म शक्य जाहला.

राम राम!!

(राम आणि शांतेचं चित्र इथून घेतलेलं आहे)

हा लेख इतरांना पाठवा

सिद्धार्थ अकोलकर

आयुष्यभर विद्यार्थीदशा जपण्याची व जोपासण्याची प्रामाणिक इच्छा मनामध्ये बाळगावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *