राज्यसभा खासदार कसे निवडले जातात?

लोकसभेच्या निवडणुका कशा होतात हे सर्वज्ञात आहे (असं गृहीत धरायला हरकत नसावी) परंतु राज्यसभा खासदारांची निवड कशी होते याबद्दल अनेकजण अजाण असतात.

भारतीय लोकशाहीची रचना काहीशी इंग्लंडच्या लोकशाहीसारखी आहे. इंग्लंडच्या संसदेत House of Commons आणि House of Lords अशी दोन सभागृहं आहेत; House of Commons हे कनिष्ठ सभागृह तर House of Lords हे वरिष्ठ सभागृह आहे.

भारतीय संसदेत राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे.

आज आपण राज्यसभेतले खासदार कसे निवडले जातात ते पाहूया.

राज्यसभेचे खासदार लोकसभा खासदारांसारखे निवडून येत नाहीत

राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असून इकडे खासदारांची निवड थेट जनता करत नसून लोकांनी विधानसभेवर निवडून दिलेले आमदार करतात.

प्रत्येक राज्याला जागांची संख्या ठरवून दिलेली असते.

त्या जागांसाठी कोणता खासदार निवडायचा, यासाठी त्या राज्याच्या आमदारांची मतं घेतली जातात.

कोणत्या राज्याचे किती खासदार राज्यसभेवर निवडून जाणार हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरुन ठरवलं जातं.

त्यामुळे राज्यसभेत उत्तरप्रदेश राज्यातून सर्वांत जास्त खासदार निवडून येतात आणि त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा क्रमांक लागतो.

एखाद्या राज्याच्या राज्यसभेच्या जागेवर निवडून येण्यासाठी त्या राज्याचा रहिवासी असण्याची अट नसते. त्यामुळे आपल्याला अनेकदा असं पाहायला मिळतं की एखादा दक्षिण भारतीय माणूस उत्तर भारतीय राज्यातून राज्यसभेवर पाठवला जातो, किंवा त्याच्या उलटही होतं.

या निवडणूक प्रक्रियेत आणि लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेत भरपूर फरक आहे.

लोकसभेप्रमाणे राज्यसभेत सर्व जागा एकदम रिकाम्या होत नाहीत तर दर २ वर्षांनी एक तृतीयांश जागा रिकाम्या होत असतात. तसंच राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा ६ वर्षांचा असतो. त्यामुळे या निवडणुकांची वारंवारता लोकसभेच्या निवडणुकांपेक्षा जास्त असते (म्हणजेच दर २ वर्षांनी एक तृतीयांश जागांसाठी निवडणूक होते).

मतदानाचं स्वरूप

प्रथमतः आमदारांना मतदान करताना फक्त एकाच नव्हे तर निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराला मतदान करावं लागतं. पण हे मतदान करताना प्रत्येक उमेदवाराच्या पुढे त्याच्या पसंतीचा क्रमांक द्यावा लागतो.

उदाहरणार्थ, महाराष्ट्रातून ४ उमेदवार एका जागेसाठी उभे आहेत. तर त्या चौघांमध्ये आपल्या पहिल्या पसंतीचा उमेदवार, दुसऱ्या पसंतीचा उमेदवार, तिसऱ्या पसंतीचा उमेदवार आणि चौथ्या पसंतीचा उमेदवार कोण हे प्रत्येक मतदाराला स्पष्ट करावं लागतं.

यात निकालाची प्रक्रियाही वेगळी असते. प्रत्येक आमदाराच्या मताला १०० अंकाचं मूल्य असतं. उमेदवाराला एखाद्या जागेवर निवडून येण्यासाठी एका विशिष्ट सूत्रात दिल्याप्रमाणे किमान मतं मिळणं आवश्यक असतं. ते सूत्र असं आहे

राज्यसभा खासदार निकाल

प्रत्येक राज्याच्या जागांसाठी किमान मतं वेगळी असतात.

समजा महाराष्ट्राच्या ६ जागा रिक्त झाल्या आहेत आणि त्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे. तर या निवडणुकीत उमेदवाराला राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी [(२८८ X १००)/(६ + १)] + १ = ४११५ मूल्यांची मतं लागतील.

याचा अर्थ किमान ४२ मतदारांनी त्या उमेदवाराला प्रथम पसंतीचं मत द्यावं लागतं. जर ४ पैकी एका उमेदवाराला इतकी मतं मिळाली तर तो निवडून येतो.

पण जर कोणालाही पुरेशी मतं मिळाली नाही तर काय होतं ?

जर कोणालाही किमान मतं मिळाली नाहीत तर मग मतमोजणी दुसऱ्या फेरीत जाते.

या फेरीत काय होतं?

पहिल्या फेरीत ज्या उमेदवाराला प्रथम पसंती म्हणून सर्वांत कमी मतं मिळालेली असतात, तो उमेदवार निवडणुकीतून बाद ठरवला जातो. मग त्याला ज्यांनी प्रथम पसंती दिलेली असते, त्यांची मतपत्रिका पाहिली जाते. त्यात दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला दिली आहेत हे पाहिलं जातं.

मग तेवढी मतं त्या-त्या उमेदवाराला दिली जातात. मग पुन्हा एकदा नवी मतं धरून मतमोजणी होते. यात जर कोणाची एकूण मतं सूत्रानुसार काढलेल्या किमान मतांच्यापेक्षा जास्त असतील तर तो उमेदवार निवडून येतो.

नाही तर मग दुसऱ्या फेरीप्रमाणे तिसरी फेरी काढली जाते आणि पुन्हा मतमोजणी होते. अशा प्रकारे मतांचं हस्तांतरण केलं जातं आणि मग विजेता घोषित होतो.

राष्ट्रपतींनी निवडलेले खासदार

राज्यसभेत आणखीन १२ जागा असतात त्या या प्रकारात मोडत नाहीत. त्या जागांवर राष्ट्रपतींद्वारे थेट नेमणूक केली जाते.

या व्यक्ती विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या व्यक्ती असतात. उदाहरणार्थ समाजसेवा, कला, विज्ञान इत्यादी. राज्यसभेत एकूण २४५ जागा आहेत.

त्यात २३३ आमदारांनी निवडून दिलेले खासदार तर १२ राष्ट्रपती निर्वाचित खासदार असतात.

राज्यसभेत एकूण खासदार संख्या ही कमाल २५० असू शकते.

हा लेख इतरांना पाठवा

ओमकार बर्डे

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *