मराठी भाषेतील जोडाक्षरांच्या उच्चाराचा घोळ कसा निस्तरावा?

उच्चारानुसार लेखन करणे ही मराठीची प्रथा असेल तर मराठी लिहिताना विद्या हा शब्द विद्द्या असा लिहावा का?

मद्य हा शब्द मद्द्य असा लिहावा का?

शब्दाचा उच्चार ‘य’च्या अगोदरचे अक्षर दोनदा उच्चारल्यासारखा (द्वित्त) आहे, मग तो तसा लिहिण्यात अडचण काय?

अडचण काहीच नाही. (मुळात हल्ली मराठी वाचतो कोण?) ललित लेखनात तर पूर्ण स्वातंत्र्य आहे.

१९३७ साली प्रकाशित केलेल्या ‘छन्दोरचना’ ह्या आपल्या ग्रंथात ‘संयुक्त वर्ण दृश्य नको, श्राव्य हवा’ या शीर्षकाखाली माधवराव पटवर्धनांनी ह्या प्रश्नाचा ऊहापोह केलेला आहे.

तत्पूर्वी १९२५ मध्ये मोरो केशव दामले ह्यांचे १००० पृष्ठांचे ‘शास्त्रीय मराठी व्याकरण‘ प्रसिद्ध झाले. ह्या ग्रंथातही या प्रश्नाची चर्चा आहे ती पाहता हा प्रश्न त्या अगोदरपासून चर्चिला जात असावा असे अनुमान निघते.

शक्य तितक्या संक्षेपाने व सोप्या भाषेत काही मुद्दे विचारात घेऊया-

कोणतीही भाषा पूर्णतः उच्चारानुसार लिहिता येणार नाही.

तशी लिहायची झाल्यास लिहिलेला मजकूर पूर्णतः आंतरराष्ट्रीय उच्चारचिह्नांचा (म्हणजे डिक्शनरीमध्ये उच्चारदर्शक चिह्ने असतात त्यांचा) वापर करून लिहावा लागेल.

हे अनैसर्गिक आणि अव्यवहार्य होईल.

आघातचिह्नांचा वापर करण्याच्या पर्यायाची चर्चा दामल्यांनी केलेली आहे पण अखेरीस ते ह्याच निष्कर्षाप्रत आले आहेत (वेदांमधील मंत्र स्वरचिह्नांसह वाचताना सामान्य वाचकाला त्रास होतो).

च्, ज्, झ् ह्या दन्ततालव्य व्यंजनांसाठी नुक्ता वापरावा अशी विनोबांची सूचना होती.

गीताईच्या काही प्रती तशा मुद्रित केलेल्या आहेत.

तेथे असा नुक्ता वापरणे एकवेळ ठीक आहे कारण दर्शविलेले वर्ण स्वतंत्र वर्ण आहेत.

पण नुक्ता अथवा आघातचिह्ने कशाकशासाठी म्हणून वापरणार?

 

जोडाक्षराच्या उच्चारात कधी द्वित्त होते कधी होत नाही ह्याचा काही सर्वसाधारण नियम आहे का?

जर शब्द तत्सम (संस्कृत) असेल तर द्वित्त होईल; मराठी असेल तर होणार नाही.

उदाहरणार्थ :

‘पुण्याचा संचय’ (पुण्य = संस्कृत) पण ‘पुण्याचा महापौर’ (पुणे = मराठी ).

‘काव्याचा आस्वाद’ (काव्य = संस्कृत) पण ’गनिमी काव्याचा विजय’ (कावा = मराठी).

 

प्रश्न – शब्द मराठी आहे की संस्कृत हे कसे ओळखावे?

उत्तर – सवयीने. त्यासाठी काही ठरावीक नियम नाही.

 

वर्णविपर्यय (वर्णांचा क्रम बदलून) होऊन तयार झालेले शब्द

उदारणार्थ चिह्न – चिन्ह, ब्रह्म-ब्रम्ह, प्रह्लाद – प्रल्हाद.

मूळ शब्दात द्वित्त नाही पण विपर्यस्त शब्दात द्वित्त आहे.

 

मी सुक्ही आहे. तुम्ही आहात का?

पहिल्या वाक्यातील ‘क्ही’ ह्या अक्षरासाठी लिपीमध्ये खी हे चिह्न म्हणजे ख हे स्वतंत्र अक्षर आहे. पण ‘म्ही’ साठी स्वतंत्र चिह्न (अक्षर) नाही.

त्यामुळे ते जोडाक्षर असल्याचे समजून त्याचा उच्चार जोडाक्षरासारखा केला जातो.

म्हणजे तुम्म्ही असा ‘म’चे द्वित्त केलेला चुकीचा उच्चार.

खी सारखे म्ही साठी अक्षर असते तर तसा उच्चार केला नसता.

मराठीतील जे अंतस्थ वर्ण (diphthongs = अर्धस्वर) आहेत, त्यांच्या जोडाक्षरांबाबत हेच आढळते (य्‌, र्‌, ल्‌, व्‌ आणि ह्‌).

विद्या आणि मद्य हे अशाच प्रकारचे शब्द आहेत.

मात्र नवे संयुक्त वर्ण (उदाहरणार्थ ‘म्ह’ साठी वगैरे) तयार करण्यास दामले अनुकूल दिसत नाहीत.

कारण स्वरांची संख्या मर्यादित असल्याने संयुक्त स्वर (ऐ, औ) मर्यादित संख्येत आहेत.

परंतु संयुक्त स्वरान्त (व्यंजन) वर्ण अनेक संभवतात.

(श्री. अर्जुनवाडकर ह्यांनी सुचविल्याप्रमाणे मराठीसाठी व्यंजनसंधींचे स्वतंत्र नियम करून ही समस्या काही प्रमाणात सौम्य होऊ शकेल.

उदाहरणार्थ – देऊन + टाक = देऊण्टाक.

नंतर केवळ अंतस्थ वर्णाच्या जोडाक्षरांसाठी लिपीमध्ये स्वतंत्र वर्ण तयार करायचे).

मुळात संस्कृतमध्येच अंतस्थ वर्णांच्या समावेशाने तयार झालेल्या संयुक्त वर्णांमध्ये व्यंजनाचे द्वित्त झाल्यासारखा उच्चार करणे योग्य आहे का, अशी मला शंका आहे.

वेदमंत्रांची संथा घेताना विद्या सारखे शब्द ‘य’ चा उच्चार प्राधान्याने करून उच्चारताना मी ऐकले आहेत.

अशा उच्चारणात द् चे द्वित्त होत नाही.

मराठीसाठी संस्कृतचे व्याकरण वापरायचे किंवा मराठीचे स्वतंत्र व्याकरण तयार करायचे की दोन्हींच्या मिश्रणातून सर्वमान्य नियम करायचे, हा ह्या सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाणारा प्रश्न आहे.

संदर्भ :

१. छन्दोरचना – माधव त्रिं. पटवर्धन (१९३७), पृ. ७१-७३

२. शास्त्रीय मराठी व्याकरण – मोरो केशव दामले (१९२५), पृ. ६०-६४

हा लेख इतरांना पाठवा

अनिल पेंढारकर

मी एक शब्दमजूर आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये मी लेखन करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *