वृत्तपत्र पेरून झाड उगवलं तर?

(प्रतिमा : ©yoshinakaono.com)

लहानपणी आपल्याला शाळेत ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या नावाखाली काहीना काही उपद्व्याप करायला सांगायचे. वर्गातली बहुतेक मुलं नारळाच्या करवंट्यांचे तबले तयार करून आणायचे. इतर अनेक वस्तू अशाच सुशोभनाच्या असत. क्वचित एखादाजण काहीतरी भन्नाट उपयुक्त वस्तू घडवून आणत असे.

जगातही हेच सुरु असतं. ‘पुनर्वापराच्या’ नावाखाली सुशोभनाच्या वस्तूंची निर्मिती करण्यावर भर देणारे बरेच उद्योग आपल्याला पाहायला मिळतात.

पण मधनंच कोणीतरी शक्कल लढवून अतिशय उपयुक्त तंत्र घेऊन येतं जे मोठ्या प्रमाणावर अंमलात आणलं तर निश्चितच आपले बहुतेक प्रश्न सोडवले जाऊ शकतात. त्यांपैकीच एक उपाय लढवलाय जपानच्या एका वृत्तपत्रानं.

प्रतिमा : ©yoshinakaono.com

‘माइनिचि शिन्बुन्श्या’ हे वृत्तपत्र एक अभिनव कल्पना राबवतंय. त्यांनी याला ‘ग्रीन न्यूजपेपर’ असं नाव दिलंय. हा पेपर वाचून झाला की तो रद्दीत नाही टाकायचा. त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते कुंडीत पेरून त्याला खतपाणी घालायचं. आणि अहो आश्चर्यम्! काही दिवसांनी तुम्हाला कुंडीमध्ये झाड उगवताना दिसू लागतं.

साहजिकच या मोहिमेचा या जपानी वृत्तपत्राला प्रचंड फायदा झाला आहे. वृत्तपत्र म्हटलं की झाडांच्या जिवावर उठणारा उद्योग! पण आपण चक्क असं वृत्तपत्र पाहतोय ज्यापासून झाडं जन्म घेऊ शकतात, कोणाला आवडणार नाही असं वृत्तपत्र विकत घ्यायला?
यामागचं नेमकं तंत्र काय आहे?

प्रतिमा : ©yoshinakaono.com

या अशा कागदाचे घटक पदार्थ आहेत पुनर्वापर केलेला कागद, पाणी आणि फुलांच्या किंवा वनौषधींच्या बिया. फक्त वृत्तपत्रच नव्हे तर निमंत्रणपत्रिका, शुभेच्छा पत्रिका, अशा कागद वापरल्या जाणाऱ्या इतर अनेक थातुर मातूर कामांसाठी हे तंत्र वापरता येऊ शकतं. मातीत कागद पेरला, की त्यामधली बी रुजते, आणि बाकी कागदाचं विघटन होऊन ते खत होतं. हा कागद घडवण्यासाठी कोणतंही झाड नव्याने कापावं लागत नाही हे विशेष.

प्रतिमा : ©yoshinakaono.com
भारतासाठी संधी

भारतात कागद निर्मितीसाठी रद्दीची मागणी प्रचंड आहे. माल गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या पुठ्ठ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रद्दीची गरज भासते. एका अभ्यासानुसार भारताचा पॅकेजिंग उद्योग २०२० पर्यंत ५१३ अब्ज रुपयांचा होईल अशी शक्यता आहे.

अमेरिका आणि युरोप खंड कागदाचा बराच कचरा पुनर्वापरासाठी भारतामध्ये पाठवतात. आधी ते चीनमध्ये पाठवायचे, पण चीनने २०१८ पासून त्यावर निर्बंध लादायला सुरुवात केली. ‘तुमचा कचरा इथे पाठवून आमचं आरोग्य आणि पर्यावरण घाण करू नका’ अशी भूमिका चीनने घेतली. त्यामुळे युरोपातून भारतात येणाऱ्या रद्दीचं प्रमाण २००% हून जास्त वाढलंय.

अर्थात, या रद्दीतही प्लॅस्टिकची, आणि पुन्हा न वापरता येणाऱ्या कागदाची भेसळ असतेच (सेल्युलोजपासून घडवलेल्या साध्या कागदाचा जास्तीत जास्त ५ ते ७ वेळा पुनर्वापर होऊ शकतो). आणि याबाबतीत भारताने नियम जास्त कडक करण्याची गरज आहेच. पण तो विषय वेगळा आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या या रद्दीचा पुनर्वापर करून भारत वह्या-पुस्तकं, मासिकं, वगैरे घडवत असतोच, पण कल्पना करा, जपानच्या या वृत्तपत्राच्या धर्तीवर भारतीय वृत्तपत्रांनीही हे तंत्र अवलंबलं, तर ते आपल्या पर्यावरणासाठी किती फायदेशीर ठरेल.
मराठी वृत्तपत्रकारांनो, आमचा हा लेख वाचत असाल, तर ही कल्पना मनावर घ्याच!

 

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *