मुलांच्या हाती दिलं विमान, आणि झाला भीषण अपघात!!

२३ मार्च १९९४ हा रोजच्यासारखाच एक साधासुधा बुधवारचा दिवस. चाकरमानी मंडळी आपापली कामं घेऊन इच्छित स्थळी निघाली होती. एअरबस ए३१०-३०४ हे विमान माॅस्कोच्या शेरेमेट्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हाँगकाँगच्या दिशेनं नेहमीच्या मार्गानं प्रयाण करत होतं.

यारोस्लोव्ह व्लादिमिरोविच कुद्रिन्स्की नावाचा वैमानिक आज कामावर आपल्या दोन लहान मुलांना घेऊन आला होता, बारा वर्षांची याना आणि सोळा वर्षांचा एल्डार. मुलं म्हटल्यावर चुळबुळ करणारच. पण विमानाच्या चालक कक्षात केलेली मस्ती किती महागात पडू शकते, याची त्या वैमानिकाला अजिबात कल्पना नसावी. एल्डारनं अजाणपणे विमानाची ऑटोपायलट म्हणजेच स्वयंचलन स्थिती बंद करून टाकली होती. यामुळे विमानानं गटांगळी खाल्ली आणि सरळ उभ्या दिशेने ते खाली झेपावलं.

मोठ्या मुश्किलीनं विमान सरळ रेषेत आणता आलं, पण पहिल्या वैमानिकानं जरा गडबड केली. विमान वर घेताना त्याने जरा जास्त जोर लावला, ज्यामुळे विमान अडकलं आणि गोल गोल फिरत खाली कोसळू लागलं. पुन्हा वैमानिकांनी प्रयत्नांची शर्थ करून विमान सरळ रेषेत आणलं, पण तोवर विमान एवढ्या कमी उंचीवर आलं होतं, की समोर उभा ठाकलेला अपघात टाळता येणं अशक्य होऊन बसलं.

ऑटोपायलट चालू असताना, कुद्रिन्स्कीनं त्याच्या मुलीला, यानाला विमानाच्या कंट्रोलवर बसू दिलं. तसं करण्यापूर्वी, ऑटोपायलटची वळणं त्यानं आधीच लावून ठेवली. छोट्या यानाला वाटत होतं की तीच विमान चालवतेय, पण प्रत्यक्षात तिच्या हातात काहीच नव्हतं. मग थोड्या वेळाने तिच्या मोठ्या भावाची पाळी आली. सोळा वर्षांचं उत्साही रक्त ते; एल्डारनं एवढ्या जोरात कंट्रोल फिरवले की विमानाचे एलराॅन्स (विमानाच्या पंखांचा मागचा भाग) ऑटोपायलटवरून मॅन्युअल मोडवर आले. या बदलाची सूचना देणारा दिवा पेटला, पण वैमानिकांचं तिथे लक्ष गेलं नाही.

Aeroflot Airbus A310-300 F-OGQS CDG 1993

विमान उजवीकडे कलू लागल्यावर एल्डारच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. स्क्रीनवरही विमानाच्या मार्गात १८० अंशांचं वळण दिसू लागलं. वैमानिक गोंधळले, हे काय झालं?

या गोंधळात विमान आणखी कललं, एवढं की त्याची उंची राखता येणं अशक्य झालं, आणि विमान खाली कोसळू लागलं. गुरुत्वाकर्षणाचा जोर खूप वाढला त्यामुळे विमानाचा पुन्हा ताबा मिळवणं वैमानिकांसाठी कठीण होऊन बसलं. ऑटोपायलटच्या बाकी सक्रिय अंगांनी आपलं काम बजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग होईना. शेवटी ऑटोपायलटच बंद पडला. आता एक मोठ्ठा दिवा पेटला, जो एकदाचा या वैमानिकांना दिसला.

विमानाचं तोंड जमिनीच्या दिशेने कललं. विमान सरळ खाली येऊ लागलं. कुद्रिन्स्कीनं सीटवर ताबा मिळवला. पिस्काऱ्योव्ह नावाच्या दुसऱ्या वैमानिकाने विमान कोसळण्यापासून तात्पुरतं वाचवलं खरं, पण वर खेचताना गरजेहून जास्त ओढलं. त्यामुळे विमान हवेतच थांबलं आणि उभं-उभं खाली कोसळू लागलं. ते आडवं करण्यात यश येईपर्यंत विमान खूप खाली आलं होतं. दोन्ही वैमानिकांनी खूप प्रयत्न केले, पण दुर्दैवाने रशियातल्या कुझनेस्क अलटाऊ पर्वतरांजीत विमान जाऊन कोसळलं. आणि विमानातले सर्वच्या सर्व प्रवासी मरण पावले.

(प्रातिनिधिक प्रतिमा)

नंतर झालेल्या पंचनाम्यात असं लक्षात आलं, की जर वैमानिकांनी वेळीच कंट्रोल सोडून दिले असते, तर तेव्हा मात्र ऑटोपायलटने विमानाचा ताबा घेऊन अपघात टाळता आला असता.

ही किती दुर्दैवी गोष्ट आहे ना! जिची मस्ती मस्तीत सुरुवात झाली, अन् केवळ निष्काळजीपणामुळे ७५ जणांच्या जिवावर बेतली.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *