अवघ्या जगातील सामान्य लोकांना भंडावून सोडणारा आविष्कार, अर्थात् कटकल्पना!

काही दिवसांपूर्वी एक चलफीत पाहण्यात आली. ती मला पाठवणारे मित्रवर्य स्वतःला समाजसुधारक मानतात. त्या माहितीपटाचा दिग्दर्शकही कुठली तरी तीन चार पारितोषिकं मिळवून थोर झालेला व त्या अनुषंगाने स्वतःला महान, विद्वान, तत्त्वनिष्ठ, तत्त्ववेत्ता समजणारा मामुली ‘चंपक’च होता. सिनेजगतात असे ‘महात्मे’ व अनुयायी बरेच आढळतात. म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह याच समाजात होतो, जगतात याच जगात, फायदे याच व्यवस्थेचे उचलतात पण आपण काहीतरी फार उच्चकोटीचे व जगावेगळे असामी आहोत असा त्यांचा पक्का समज असतो. असू दे बापडा! सांगायचा मुद्दा म्हणजे तो माहितीपट एका कटकल्पनेवर (conspiracy theory) आधारित होता. ‘कोणाच्या’ हा भाग वेगळा!

Conspiracy या इंग्लिश शब्दाला मराठीत आणायचं तर त्याला कट-कारस्थान म्हणणं योग्य पण याच संज्ञेला षडयंत्र म्हटलं की त्या भोवती कसं एकदम काळ्यानिळ्या गूढतेचं वा लालभडक रक्तलांछित भयाचं लाल काळं करडं वलय निर्माण होतं. कुणी त्याला साज़िश वगैरे म्हणालं की संपलंच! आपल्याला सगळीकडे गुप्तहेर फिरताना दिसायला लागतात. आपले भयगंड जागृत होतात. अगदी किमान चार-पाच तरी हिंदी चित्रपट डोळ्यांसमोर येऊन जातात. “दया, कुछ तो गड़बड़ है” वगैरे आठवायला लागतं. खरं ना? आहेच ते सगळं तसं. आजचं जगच मुळी वेगवेगळ्या षडयंत्री विचारांच्या अधीन होऊन बसलंय.

षडयंत्र वा षड्यंत्र हा शब्द खरंतर सहा प्रकारचे कुटील विधी दर्शवतो.

जारण : म्हणजे शब्दशः जाळून मारणे. काळ्या जादूमध्ये फुंकर मारून समोरच्याला भस्म करण्याचा एक भाग आहे. त्याला म्हणतात जारण.

मारण : शत्रूचं अस्तित्वच समाप्त करण्यासाठी म्हणजेच त्याला मारून टाकण्यासाठी जो जादूटोणा होतो तो मारण.

उच्चाटन : एखादी गोष्ट उखडून फेकून देणं, अगदी निर्मूलन करणं म्हणजेच उच्चाटन करणं.

मोहन : जेव्हा या वरच्या तिघांनी काम होत नाही तेव्हा मोहिनी विद्येचा आधार घेतला जातो. काय वाट्टेल ते सांगून, करून समोरच्याला भुलवून टाकलं की आपला स्वार्थ साधायला दुष्ट मंडळी मोकळी होतात.

स्तंभन : कुठल्याही सक्रिय गोष्टीला एक वैचारिक कणा असतो. स्तंभन करून हा कणारूपी स्तंभच पाडला जातो. त्याने चालू प्रक्रियांमध्ये निष्क्रियता वाढीला लागते.

विध्वंस : याचा अर्थही सांगायची गरज नाही. आपण सगळे चांगलेच ओळखतो या शब्दाला. विध्वंस म्हणजेच सर्वनाश हेच दुष्टांचं अंतिम ध्येय असतं यात दुमत असायचं काही कारण नाही.

आता आजच्या जगात ही असली काळी जादू वगैरे वापरता येत नाही पण तुम्हाला अर्थ लक्षात आला का? या वरच्या सगळ्या गोष्टी वापरून जे कटकारस्थान केलं जातं तेच तर षडयंत्र हो! आज या सहा गोष्टी वापरायच्या तऱ्हा तेवढ्या बदललेल्या आहेत. राबवण्याच्या पद्धती गेल्या काही शतकांमध्ये सिद्धांत म्हणून तयार केल्या गेल्या आहेत. रोज नवनवीन साधनांचा वापर करत कटकल्पना व्यापक प्रमाणात पसरवून कारस्थानी मंडळी आपापला हितभाग साधायची प्रचंड धडपड करत आहेत. दुर्दैवाने याचे बळी कोण ठरतंय हे माहितीये? नीट अंदाज केलात तर कळेल… या सगळ्याला बळी पडतोय तो समाज, समाजमन, सामाजिक लोकशाही, परस्परांमधला आदर आणि बंधुभाव!

बहुतांश वेळा ही गुप्त कारस्थानं येनकेन प्रकारेण राजकीय मुद्द्यांशी निगडित असलेली वा त्यावर बेतलेली आढळतात. किंबहुना राजकारण करणं / खेळणं हीच हल्ली एक मोठी कॉन्स्पिरसी होऊन बसलेली आहे. याच्या मुळाशी विश्वास बसणार नाही अशा ताकदीची चतुराई व अनीतीची संगनमतं असतात. आज एकमेकांना मारायला उठलोय असं दाखवणारे, एकमेकांप्रती तुच्छता दर्शवणारे, उणीदुणी काढून समोरच्याला हिणवणारेच वेळ आली की एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना दिसतात, वाकून नमस्कार करताना आढळतात. या गळाभेटींमुळे ते त्यांच्या निष्ठावान, इमानदार अशा अनुयायांची संपूर्णतः गोची करताना दिसतात पण त्याचा त्यांना काहीही फरक पडत नाही.

राजकारण म्हटलं की युद्ध आणि प्रेमासारखंच तिथेही सगळं क्षम्यच असतं हे जनतेच्या पचनी पडायला मात्र तसं जडच जातं. मजा म्हणजे ज्या जनतेच्या जिवावर राजकारणी मंडळी राजकारण खेळतात त्या जनतेचं यांना काहीही पडलेलं नसतं. यांच्या राजकारणांमुळे जनता ठेच लागल्यासारखी पडते, आदळते, धोपटली जाते, एकमेकात जीव खाऊन भांडते, मार खाते पण नंतर यथायोग्य सावरते हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं. जनतेचं भलं भोपळ्याइतकंच शून्यसमान, पण नेत्यांची घरं सोन्याच्या मोहरा भरलेल्या भोपळ्यांनी व्यवस्थित व चांगलीच भरली जातात. नीट डोळसपणे बघितलंत तर या सगळ्याच्या तळाशी एखादी कटकल्पना असते हे सहज कळून जातं. साधी कटकल्पनेची मांडणी करणं हा देखील एखाद्या कटाचाच भाग असू शकतो. राजकारणातली प्रत्येक चाल ही कुठल्या ना कुठल्यातरी कॉन्स्पिरसीचाच एक भाग असते. आणि हो, हा सगळा प्रकार जागतिक स्वरुपाचा आहे. मी फक्त भारताबद्दल बोलत नाहीये.

धनदांडग्या, अतिसामर्थ्यवान देशांकडून जगातल्या छोट्या देशांत स्वतःच्या फायद्यांसाठी, मतलबांसाठी राजकारणं सुरु असतात. एखादं कारस्थान पद्धतशीरपणे तिथल्या जनतेच्या गळी उतरवलं जातं. हे काम एका रात्रीत घडत नाही तर कित्येक वर्षं वा दशकं अगदी बिनबोभाट सुरु असतं. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर माहिती प्रस्तुत केली जाते की काय खरं, काय खोटं, काही कळेनासं होत जातं. जनता गोंधळली की खरी ‘कामं’ सुरु होतात. समाजधुरीण गायब केले जातात. महत्त्वपूर्ण विषयांवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ नाहीसे होऊ लागतात. लोकप्रतिनिधींचे खून पाडले जातात. जागोजागी विस्फोटकांचे स्फोट केले जातात. दंगली घडवून आणल्या जातात. सामाजिक क्रांती होतेय असं दर्शवलं जातं पण त्या पडद्याआड नको असलेले पद्धतशीरपणे संपवले जातात. त्या खुनांच्या जबाबदाऱ्या उचलणारे, जे त्या क्षणापर्यंत कोणाच्या गावीही नव्हते, असे गट हळूच सामोरे येतात. लवकरच प्रस्थापित होतात.

अफू समान नशा असणाऱ्या धर्माचा वा धर्माधारित जातीव्यवस्थेचा वापर करून समाजात दुफळी तयार केली जाते. थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्वं जात किंवा धर्माच्या नावाने नव्याने ओळखली जाऊ लागतात. जुन्या राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमा डागाळल्या जातात. इतिहास बदलण्याचे प्रयत्न होतात. हे आमचे, ते तुमचे अशी विभागणी तयार होते. सार्वजनिक स्मारकांचा व मालमत्तेचा नाश केला जातो, त्यावरून जनतेला एकमेकांत झुंजवलं जातं. बनावट चलनाची त्या देशात व्यवस्थित पेरणी होते. समांतर अर्थव्यवस्था डोकं वर काढते, मजबूत व्हायला बघते. खरी अर्थव्यवस्था खिळखिळी केली जाते. अतिरेकी गटांना खतपाणी घातलं जातं. सत्ता उलथवून टाकल्या जातात. छोटी मोठी युद्धं केली जातात. छोटा देश अक्षरशः कंगाल करून वाऱ्यावर सोडला जातो. स्वतःचे फायदे करून सगळं ओरबाडून घेऊन झालं की हे दांडगे देश दुसरं नवं ‘गिऱ्हाईक’ शोधतात. परत हेच सगळं चक्र नव्या स्वरुपात फिरवलं जातं. जो समाज हे कारस्थान ओळखू शकत नाही त्या समाजाचं अधःपतन खात्रीने होतं. काय असतं हो या सगळ्याच्या मुळात? अहो, कटकल्पना, षडयंत्र, दुसरं काय!

आता कटकल्पना किंवा कॉन्स्पिरसी थिअरी म्हणजे नक्की काय? तर एखादी नेहमीची घटना, प्रसंग किंवा परिस्थिती याचं स्पष्टीकरण देताना एखादी महत्त्वाची व्यक्ती जेव्हा साधं सरळ बोलायच्या ऐवजी राजकीय विचारांनी प्रेरित असलेली मांडणी करताना दिसते तेव्हा ती एखाद्या सबळ कटकल्पनेचा हिस्सा असते असं धरून चालायला हरकत नाही. बऱ्याचदा त्यांचं स्पष्टीकरण हे अपुरे पुरावे व पूर्वग्रह यांवर आधारित असलेलं दिसतं. जर तुम्ही त्या व्यक्तीला उलट प्रश्न विचारलात तर मिळणारं उत्तर “मी म्हणतो म्हणून” अशा हुकूमशाही स्वरुपाचं दिसतं. हे असे सिद्धांत खोटेपणाचा अंगीकार करतात आणि गोलाकार फिरून येणारी तीच तीच उत्तरं वारंवार देऊन त्या सिद्धांताला बळकटी देण्याचा प्रयत्न होताना दिसतो. कटकल्पना आणि पुरावा म्हणून उभे केलेले बनाव ज्यावेळी सत्य पुरावा म्हणून पुनरावृत्त केले जातात तेव्हा ती कॉन्स्पिरसी सत्य म्हणून स्वीकृत होण्यापेक्षा व्यक्तीसापेक्ष विश्वासाचा मामुली विषय बनते.

थोडक्यात, कटकल्पना म्हणजे दोन किंवा जास्त व्यक्तींनी कुभांड रचून घडून गेलेला घटनाक्रम वेगळ्या पद्धतीने पार पडला असेल अशी शक्यता (बऱ्याचदा) स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण करून दाखवणं आहे. कटकल्पना नेहमीच शक्यतादर्शक असते. हे सगळं असलं तरीही प्रत्येक वेळी कटकल्पना हाच एक कट असेल असंही नाही. कर्म वा कुकर्म संयोगाने एखादी घटना घडून गेलेली असते. चांगला वा वाईट स्वस्वार्थ साधण्यासाठी ती घटना कशी कपटपूर्वक, कारस्थानं रचूनच पार पाडण्यात आली होती हे सांगणं वा तत्सम चित्र रंगवण्याचा प्रयत्न करण्याचं काम कटकल्पनावादी मंडळी (conspiracy theorist) इमानेइतबारे करत असतात.

गंमत अशी आहे की या कल्पना कधीकधी वास्तवदर्शी सुद्धा असू शकतात; म्हणजेच एखाद्या भूतकालीन घटनेवर त्या नव्याने प्रकाश टाकण्याचं काम करणाऱ्या असतात. कटकल्पनेच्या वेगवेगळ्या सिद्धांतांमुळे त्या घटनेमागची षडयंत्रं उलगडून दाखवली जाऊ शकतात. हे सगळं असलं तरी त्या कल्पनांचा स्वीकार प्रत्येक वेळी केला जाईलच याची शाश्वती शून्यवत् असते. पण एक आहे; त्यातून वैचारिक खाद्यनिर्मिती मात्र पुष्कळ होते आणि मग कटकल्पनेवर आधारलेले माहितीपट/ चित्रपट/ दूरचित्रवाणी मालिका यांच्या निर्मितीला चालना मिळते. सुरुवातीला दोन तीन जणांनी विचारबद्ध केलेली कॉन्स्पिरसी समाजात पसरली जाऊ लागते.

मनोवैज्ञानिक पातळीवर बोलायचं झालं तर असे ‘साज़िशवादी’ विचार, ध्येयवादी कटकल्पना वा तत्सम सिद्धांतांमध्ये प्रमाणाबाहेर विश्वास ठेवणं प्रकृतीला अपायकारक असतं. अशा प्रकारचा अंधविश्वास कवटाळून बसण्याचा संभ्रमविकृतीशी (Paranoia) थेट संबंध असतो. मानसशास्त्रानुसार या आजाराचे मनोरूग्ण ‘आपण भलतेच मोठे आहोत किंवा आपला व समाजाचा देशाच्या सरकारमुळे अतोनात छळ होत आहे, फसवणूक होत आहे’ अशा निराधार कल्पना सतत करत असतात. सर्वांत दुःखद बाब म्हणजे हल्लीच्या समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे व त्यावरून सतत प्रसारित होणाऱ्या विविध प्रचारकी विचारधारांमुळे हा आजार सामान्यजनांमध्ये बऱ्यापैकी बळावलेला आहे असं जगभरातल्या मनोवैज्ञानिकांचं निरीक्षण आहे.

मित्रांनो, एक लक्षात घ्या, वेळ कधीच निघून गेलेली नसते. प्रत्येक मोठ्या घटनेपाठी काय शिजलेलं असू शकेल याचा तुमच्या परीने शोध घ्यायचा प्रयत्न करा. त्यावर सांगोपसांग विचार करा. कुठलाही विचार हा तुमच्या माथी मारला जातोय का हे चाचपून बघा. सामाजिक स्तरात वावरणाऱ्या कुठल्याही मोठ्या व्यक्तीवर, अगदी नेत्यांवरही थेट विश्वास टाकू नका. विविध (म्हणजे सर्वच) धर्मांच्या प्रार्थनास्थळांचे प्रमुख नक्की काय सांगतायत यावर अनेक तऱ्हेची विचारमंथनं करा. कानांवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या डोळ्यांवर ठेवा. खरं काय, खोटं काय, कसं, कशासाठी असे प्रश्न स्वतःलाच विचारा. त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. सहजगत्या सामोऱ्या येणाऱ्या विचारधारेमुळे सर्वांत जास्त फायदा कोणाचा होणार आहे याचा शोध घ्या. जे तुम्हाला वारंवार सांगितलं जातंय त्यातल्या वारंवारतेचा उगम कशात दडलाय हे पाहा. पुरावे म्हणून ज्या गोष्टी तुमच्या समोर फेकल्या जातायत त्यांची सत्यता काय हे बाकीच्या समकालीन विचारधारांशी, साधनांशी पडताळून बघा. तुम्हाला कटकल्पनेपासून वाचवणं हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. हे व असं बरंच काही जर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही एखाद्या तरी कटकल्पनेचा अजाणतेपणी हिस्सा होणार आहात किंवा या आधीच झालेले आहात एवढंच मी अधोरेखित करू इच्छितो.

हा लेख इतरांना पाठवा

सिद्धार्थ अकोलकर

आयुष्यभर विद्यार्थीदशा जपण्याची व जोपासण्याची प्रामाणिक इच्छा मनामध्ये बाळगावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *