मांजराला मारण्याच्या आरोपावरून कुत्र्याला झाली जन्मठेपेची ‘शिक्षा’

१९२४ साली, अमेरिकेच्या पेन्सिलवेनिया राज्याचे तत्कालीन राज्यपाल गिफर्ड पिन्चॉट यांच्या घरचं मांजर मारल्याच्या आरोपावरून, पेप नावाच्या काळ्या लॅब्रेडॉर जातीच्या कुत्र्याला चक्क जन्मठेप भोगायला ईस्टर्न स्टेट सुधारगृहात पाठवण्यात आलं.

हा काही खास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुत्र्यांसाठीचा बांधलेला तुरुंग नव्हता. हा माणसांसाठीच बांधलेला तुरुंग होता, पण राज्यपाल साहेबांची मर्जी फिरली आणि आपल्या नैसर्गिक गुणधर्मानुसार वागणाऱ्या या कुत्र्याची रवानगी कैदखान्यात झाली.

‘व्हीआयपी लोकांच्या व्हीआयपी लहरी, दुसरं काय!’ असंच वाटतं ना हे वाचून? काही उत्साही पत्रकारांनाही तेव्हा तसंच वाटलं.

झालं, स्थानिक वृत्तपत्रांनी गदारोळ माजवला. राज्यपालांना हजारो लोकांनी पत्रं धाडली. श्वानप्रेमी मंडळींनी शिव्याशाप दिले असतील, मार्जारप्रेमी मंडळींनी स्तुतीसुमनं उधळली असतील.

पण प्रत्यक्षात हे सगळं निरर्थक होतं. कारण ज्या गुन्ह्यासाठी पेप कुत्र्याला ही ‘शिक्षा’ झाली होती, तो गुन्हा मुळात त्याने केलाच नव्हता!

राज्यपाल पिन्चॉट यांना कोणा नातेवाईकाने भेट म्हणून पेप कुत्रा दिला होता. सुरुवातीला तो बरा होता, पण मग त्याला उशा फाडून टाकायची वाईट सवय लागली.

पिन्चॉट साहेबांना अनावर झाल्यावर आता या कुत्र्याचं काहीतरी करावं लागणार हे त्यांच्या लक्षात आलं. पाळलेला कुत्रा नकोसा झाला की त्याचा बंदोबस्त करायची तेव्हाची एक सर्वमान्य पद्धत म्हणजे त्याला मारून टाकणं.

पिन्चॉट साहेबांना एक वेगळा पर्याय सुचला.

ईस्टर्न स्टेट सुधारगृहाला त्यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यांनी पेपला तिथे धाडून दिला. जोडीला छानपैकी गोष्ट रचून दिली, की पेपने पिन्चॉट साहेबांचं आवडतं मांजर मारून खाल्लं म्हणून त्याला ही शिक्षा दिली जातेय.

इतर कैद्यांप्रमाणेच पेप कुत्र्याला कैद्यांना देतात तसा एक आकडा देण्यात आला – C2559. त्या आकड्याची पाटी त्याच्या गळ्यात अडकवून त्याचा फोटोही घेण्यात आला.

पेप कुत्रा । प्रतिमा : Eastern State Penitentiary

पेप साहेब या सुधारगृहात पूर्णवेळ बंदिस्त नसायचे. तुरुंगाच्या आवारात भटकायची पेपला मोकळीक होती. पेपसोबत खेळण्यात कैद्यांचाही वेळ छान जायचा. त्याच्या रूपाने, बंदिस्तपणाच्या भावनेने नैराश्यग्रस्त झालेल्या कैद्यांना एक चांगला विरंगुळा मिळाला होता.

म्हटलं तर पेप कुत्र्याला त्याच्या खट्याळपणासाठी शिक्षा मिळाली. पण आपण शिक्षा भोगतोय, याची पेपला कितपत जाणीव होती कोणास ठाऊक! तो कैदेतल्या आपल्या ‘मानवी’ मित्रांशी दोस्ती करत मस्त आयुष्य जगला.

ईस्टर्न स्टेट सुधारगृह हा म्हटलं तर त्या काळातला एक नवा प्रयोग किंवा नवा उपक्रम होता. ‘गुन्हे केलेल्या कैद्यांनी त्यांच्या वाट्याला आलेली शिक्षा भोगत सडत राहावं, कारण त्यांची तीच लायकी आहे’ या मानसिकतेला छेद देत कैद्यांचं ‘माणूसपण’ जपायचा प्रयत्न करणाऱ्या सुधारगृहांपैकी ईस्टर्न स्टेट सुधारगृह हे एक केंद्र होतं.

सुधारगृहाचा अधीक्षक पिन्चॉटचा मित्रच होता. त्यामुळे पेपला त्याने मोठ्या आनंदाने स्वीकारलं, आणि आपल्या उपक्रमात त्याला सामील करून घेतलं.

आज ईस्टर्न स्टेट सुधारगृह हा तुरुंग राहिला नसून ते एक पर्यटनकेंद्र झालं आहे. पण पेपचा वारसा अमेरिकेच्या तुरुंग यंत्रणेला मिळालाय तो कदाचित कायमचा.

त्याच्याच उदाहरणावरून की काय, पण अमेरिकेतील विविध तुरुंगांमध्ये असे कार्यक्रम सुरु झाले आहेत, ज्यांमध्ये एकट्या पडलेल्या पाळीव प्राण्यांना इच्छुक कैद्यांच्या रूपाने साथीदार मिळतो, आणि कैद्यांना या प्राण्यांच्या रूपाने एक मित्र मिळतो. या शेपटीवाल्या मित्राची देखभाल करता करता कैद्यांमधील ममतेचा भाव जिवंत राहतो, आणि त्यांची जगण्याची उमेद कायम राहते.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *