एक नवीन आणि लक्षवेधी ऑर्किड – पेक्टिलिस कोरीगडेन्सीस

निसर्ग आपल्याला केव्हा आणि कसा अचंबित करेल हे सांगता येत नाही. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाला सुरुवात झाल्यानंतर हळू हळू डोंगर पठारे आपले रूप बदलू लागतात. दरवर्षी आपले अस्तित्व टिकवून ठेवत अनेक फुले या डोंगरपठारांवर उमलतात. जून ते सप्टेंबर या कालावधीत अनेक प्रजातींची झुडुपे रानावनात पाहायला मिळतात. या सगळ्या झुडुपांमधील एक लक्षवेधी प्रवर्ग म्हणजे ऑर्किड!!

ऑर्किडेसी कुळातील ऑर्किडच्या सर्व जाती या अत्यंत नाजूक असतात. त्यातच प्रदूषण, तापमान वाढ यांसारख्या वातावरणातील बदलांमुळे त्यांच्या वाढीवर लगेच दुष्परिणाम होतात. म्हणूनच ऑर्किड प्रजातीचे जतन आणि संवर्धन ही गरजेची बाब आहे. बऱ्यांच जणांना ऑर्किड म्हणजे दुसऱ्या झाडांवर वाढणारी परजीवी वनस्पती म्हणून माहीत आहेत. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ऑर्किडच्या जवळ जवळ ४०० पेक्षा अधिक जाती जमिनीवर वाढतात.

या ऑर्किड कुळात नव्याने सामील झालेली जात म्हणजे ‘पेक्टिलिस कोरीगडेन्सीस’.

 

पुणे जिल्ह्यात लोणावळा-खंडाळा हे जसे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसेच ते प्रसिद्ध आहे तिथल्या जैवविविधतेसाठी!! या डोंगराळ भागात भरपूर पर्जन्यवृष्टी होते आणि याच कारणामुळे या भागात अनेक अशा वनस्पती उगवतात ज्या प्रतिवर्षी आपले जीवनचक्र (कंदापासून उगवून ते आपले बीज बनवण्यापर्यंतचा काळ) पूर्ण करतात. ‘पेक्टिलिस’ ऑर्किड अशीच एक दरवर्षी उगवणारी जात आहे. पेक्टिलिसच्या अनेक जाती महाराष्ट्रात विविध ठिकाणी आढळतात, परंतु ऑर्किडचे संशोधन कार्य करताना कोरीगड किल्ल्यावर डॉ. जीवन जलाल आणि डॉ. जयंती या भारतीय वनस्पती सर्वेक्षण (BSI), पुणे येथे कार्यरत असणाऱ्या वैज्ञानिकांना पेक्टिलिसची नवीन जात शोधण्यात यश आले आहे. उतरणीच्या जागी गवताळ प्रदेशात ऑर्किडच्या इतर जातींसोबत ही जात आढळून आली.

डॉ. जलाल म्हणाले, पहिल्यांदा जेव्हा आम्ही ही जात पाहिली तेव्हा आम्ही विचार केला की कदाचित ही प्रजात महाराष्ट्रात नवीन असावी. मात्र, सखोल अभ्यासानंतर हे लक्षात आले की ही पेक्टिलिस ऑर्किडची नवी जात आहे. हिचे नाव ही जात पहिल्यांदा जिकडे पाहिली गेली त्या कोरीगड किल्ल्यावरून ठेवले गेले. पेक्टिलिस कोरीगडेन्सीस जात इतर पेक्टिलिसपेक्षा अत्यंत वेगळी दिसते. या नव्या जातीची उंची अंदाजे अर्धा मीटर आहे, हिची फुले ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात फुलतात. ही जात पेक्टिलिसच्या इतर जातींपेक्षा उंच असून तिच्या फुलांचा आकारही मोठा आहे. फुलांखाली पाकळीची देठसदृश वाढ (spur) इतर पेक्टिलिस पेक्षा मोठी आहे. त्यामुळेच दुरून ही फुले चटकन लक्ष वेधून घेतात.

कोरीगड

दुर्दैवाने, या प्रजातीचे केवळ एक झुडूप कोरीगड येथे पाहण्यात आले. मात्र, वर्गीकरणानुसार या जातीच्या जवळ असणारे दुसरे ऑर्किड पेक्टिलिस जायजेन्सियाची अनेक रोपे त्याच स्थानी पाहण्यात आली. जीवन जलाल, यांनी हे नमूद केले, की ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात गावकरी अनेक फुले गणेश चतुर्थीला आरास म्हणून तसेच देवपूजेसाठी वापरतात. त्यामुळे ही शक्यता आहे की अनेक दुसऱ्या जातींसोबत या नव्या पेक्टिलिसची फुले देखील वापरली जात असावीत. तसेच, ज्या स्थानी नवीन जातीचा शोध लागला त्या स्थानापासून गाव तसेच शेती फारच जवळ आहे; त्यामुळे ह्या नवीन जातीचे मूळस्थान नष्ट होण्याचा धोका आहे.

वैज्ञानिकांनी नवीन जातीबद्दल बोलताना सांगितले की, अशा कित्येक जाती असतील ज्यांचा शोध अजूनही मानवाला लागलेला नाही. आजपर्यंत अशा जाती त्यांच्या नैसर्गिक मूळस्थानी टिकून राहिल्या असतील, मात्र जंगलांवरील अतिक्रमणांमुळे अनेक जातींचे मूळस्थान व त्यानंतर अख्खी जातच नष्ट होण्याचा धोका संभवतो. म्हणूनच, जैवविविधतेच्या संवर्धनावर भर देण्यात यावा असा मुद्दा डॉ. जलाल आणि डॉ. जयंती यांनी अधोरेखित केला.

२०१९ पासून कोरीगड येथे पेक्टिलिस कोरीगडेन्सीस या जातीच्या संवर्धनासाठी स्थानिकांच्या मदतीने विशेष प्रयत्न करण्याचा वैज्ञानिकद्वयीचा मानस आहे. गेली कित्येक वर्ष अनेक वैज्ञानिकांनी ऑर्किड प्रवर्गात संशोधन केले आहे. मात्र पेक्टिलिसच्या ह्या जातीचा शोध अनेक वर्षांनंतर लागल्यामुळे अनेकजण आनंद तसेच आश्चर्य व्यक्त करत आहेत.

 

(छायाचित्रांचे सर्वाधिकार वनस्पती सर्वेक्षण संस्था (BSI), पुणे यांचे अधीन)

हा लेख इतरांना पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *