ऑर्किड फुलाची गोष्ट : मोहक फुलाची रंजक माहिती । वनी वसे ते…

मंडळी तुम्ही ऑर्किडची फुलं तर बघितली असतीलच. विविध रंगांचे ऑर्किड आजकाल बऱ्याच मंगलप्रसंगी आपलं अस्तित्व दाखवून त्याची दखल घेण्यास भाग पाडतात.

काही दशकांपूर्वी ऑर्किडची फुलं या सार्वजनिक समारंभातून वापरायला सुरुवात झाली, आणि हळू हळू या फुलांनी जनमानसावर अशी काही मोहिनी घातली की विचारता सोय नाही.

 

ऑर्किडचं मुक्त अस्तित्व

समारंभांसाठी वापरण्यात येणारी जवळजवळ सगळी ऑर्किड्स कृत्रिम (हायब्रिड) पद्धतीने निर्माण केली जातात. ऑर्किड्सचा व्यावसायिक वापर भारतात काही दशकांपूर्वी सुरु झाला असला तरी आपल्या आजूबाजूला जंगलात, झाडांवर निरनिराळ्या प्रकारची ऑर्किड्स ठाण मांडून असतात असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का?

काही हौशी भटके निसर्गप्रेमी, काही वनस्पतीतज्ज्ञ आणि वनस्पतीशास्त्राचे काही विद्यार्थी सोडले तर बहुतेक माणसांना असं काही असेल याचा पत्ताही नसतो.

आपल्या आजूबाजूला ऑर्किड असतात खरी पण ती पाहायला निसर्गाची ओढ आणि वेधक नजर या दोन गोष्टी तुमच्याजवळ असतील तरच ही ऑर्किड्स तुम्हाला दर्शन देण्याची कृपा करतील.

 

ऑर्किड दर्शन म्हणजे दुर्मीळ योग

निसर्गातली प्रत्येक गोष्ट जन्मत:च निसर्गाचा लहरीपणा आपल्यासोबत घेऊन येते की काय, माहीत नाही. एखादं ऑर्किड शोधून मिळणं आणि रानात वाघ दिसणं, दोन्हीही पर्वणीच.

बरं ही ऑर्किड्स इतकी लहरी, की प्रत्येकाचा येण्याचा काळ ठरलेला! काही पावसाळ्यात उगवतात, काही हिवाळ्यात तर काही चक्क उन्हाळ्यात दर्शन देतात.

ऑर्किड्स एकाच जागी वाढत नाहीत. काही ऑर्किड्सना जमिनीवर राहणं पसंत आहे तर काही ऑर्किड्स झाडावर आश्रय घेतात.

त्यांना बघायचं तर त्यांचं वेळापत्रक सांभाळावं लागतं. थोडा जरी उशीर झाला की मग पुढच्या मोसमाची वाट बघण्याखेरीज आपल्या हातात काही उरत नाही.

ऑर्किडचे विविध प्रकार

ऑर्कडची नानाविध रूपं

जगभरात ऑर्किडच्या १००० प्रजाती असून त्यांचे २५ ते ३५ हजार प्रकार आहेत असं म्हटलं जातं.

ऑर्किड्सच्या बाबतीत आपला देश तसा सुदैवीच म्हटला पाहिजे. विशेषत: पश्चिम घाट आणि पूर्वेकडील राज्यांवर निसर्ग भलताच मेहेरबान झालेला दिसतो.

भारतात ऑर्किड्सचे जवळ जवळ १६०० प्रकार आढळतात आणि त्यातील  जवळपास ७० टक्के ऑर्किड पूर्वेकडील राज्यांत आढळतात. पश्चिम घाटात ७२ प्रजातींचे २६७ उपप्रकार नैसर्गिकरीत्या पाहायला मिळतात.

पण हे एवढंच नाही बरं! अजून काही प्रजाती अशाही असू शकतील ज्यांच्यापर्यंत माणूस अद्याप पोहोचलाही नसेल. पश्चिम घाटात मिळणाऱ्या २६७ प्रकारांपैकी ४६ टक्के प्रकार प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजेच पश्चिम घाट सोडल्यास इतरत्र हे प्रकार आढळत नाहीत.

‘ऑर्किड’ हे नाव कसं पडलं

बऱ्याच ऑर्किड्सच्या मुळाशी कंद असतात. हे कंद मानवाच्या अंडाशयाप्रमाणे दिसतात, म्हणून प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ थिओफ्रेस्टस (ई.स.पू. ३७० ते २८०) यांनी या झाडांचा ‘ऑर्चीस’ असा उल्लेख आपल्या लिखाणात केलेला आढळतो. आणि त्यावरून या फुलांना ऑर्किड्स म्हटलं जाऊ लागलं.

ऑर्किड्सना आपल्या बोली भाषांमध्येही बरीच नावं आहेत. मराठीत कोणी यांना अमरी म्हणतात. काही लोकांच्या मते जी ऑर्किड्स आंब्यावर किंवा तत्सम झाडांवर उगवतात फक्त त्यांनाच अमरी म्हणायला हवं. तरी कित्येक लोक जमिनीवर उगवणाऱ्या ऑर्किड्सनाही अमरी म्हणणंच पसंत करतात.

ऑर्किड काया, भुरळ घालते तिची माया

ऑर्किड्सची फुलं दीर्घकाळ टिकणारी फुलं म्हणून नावाजली जाता. ऑर्किड्सची फुलं त्यांचं परागीभवन पूर्ण होईपर्यंत टवटवीत राहतात. एकदा का परागीभवन झालं की ही फुलं कोमेजून जातात. ऑर्किड ही बारमाही वनस्पती आहे. फुलं मात्र वर्षातून एकदा, ठरावीक काळातच येतात. फुलं येण्याचा कालावधी येईपर्यंत ऑर्किड सुप्तावस्थेत राहतात.

वर उल्लेख केल्याप्रमाणे बऱ्याच ऑर्किड्सच्या मुळाशी कंद असतात, त्याचप्रमाणे त्यांचा खोड काही वनस्पतीवर वाढणाऱ्या ऑर्किड्समध्ये अर्धविकसित असतो. ऑर्किड्सची पानंसुद्धा स्वत:ची जिवंत राहण्याची गरज आणि पुढच्या मोसमाची बेगमी करण्याइतपतच असतात. बऱ्याच ऑर्किड्सना २-४ पानं येतात आणि त्यांची गरज संपली की गळून पडतात.

ऑर्किडचे विविध प्रकार

ऑर्किडची हुशार रचना

या वनस्पतीची फुलं मात्र एकदम रंगीबेरंगी असतात. बऱ्याच ऑर्किड्सना विविधरंगांच्या तीन प्रमुख पाकळ्या (Petals) असतात आणि तीन उप-पाकळ्या (Sepals) असतात.

प्रजननासाठी आवश्यक असणारे पुंकेसर आणि स्त्रीकेसर तर असतातच. ऑर्किड्स त्यांच्या परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कीटकांसाठी खास तयारी करतात. कीटकांना योग्य मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांचा मार्ग फुलांच्या पाकळ्यांवर आधीच अधोरेखित असतो. फुलांचं परागीभवन झालं की फळं तयार होतात आणि त्यातून निघणाऱ्या बीपासून पुढची पिढी जन्म घेते.

आत्तापर्यंतच्या वर्णनावरून तुम्हाला कळलंच असेल की ऑर्किड्स किती चतुर आणि बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेणारी असतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या माणसाचं कौतुक करायचं असेल, तर त्याला ऑर्किडची उपमा द्या.

बरीच ऑर्किड्स आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन आपला विकास करून घेतात, त्यामुळेच अतिशय दुर्गम परिस्थितीतही एखादं ऑर्किड आपल्याला आनंदाने डोलताना दिसतं. एखाद्या कडेकपारीतही ऑर्किड्स आपलं बस्तान बसवतात. पावसात बरीचशी ऑर्किड्सची फुलं डोंगरमाळावरही फुललेली दिसतात.

बहुपयोगी ऑर्किड

ऑर्किड्स वर उल्लेख केल्याप्रमाणे बऱ्याच खाजगी आणि सार्वजनिक कार्यक्रमांत वापरले जातात. पण औषध म्हणूनही त्यांचा उपयोग होतो. बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये ऑर्किड्स वापरतात. तसे उल्लेख भारताच्या वैदिक ग्रंथसंपदेत आढळतात.

खाण्यासाठी यांचा उपयोग होतो. आदिवासी त्यांना मिळणाऱ्या ऑर्किड्सचा भाजी म्हणून उपयोग करतात. आईसक्रीम मध्येही ऑर्किड्सचा वापर होतो.

भेट म्हणून बाकी काहीही देता आलं नाही तर फुललेलं एखादं ऑर्किडचं फूल बघून मन प्रसन्न तर होतंच ना? या निखळ आनंदासाठी तरी ही सुंदर फुलं वाचायला हवीत, वाचवायला हवीत.

ऑर्किड वेचावेत की वाचवावेत?

पण मग याचा अर्थ असा होत नाही, की तुम्ही एखादं ऑर्किड मुळासकट उचलून आणावं आणि घरच्या कुंडीत लावून आपण एक झाड वाचवलं म्हणून समाधानाने निश्वास सोडावा. त्यापेक्षा ते जिथे आहे तिये असू द्या. त्याला बघून समाधान माना, नवीन विकासकामे अशा दुर्मीळ वनस्पती असलेल्या प्रदेशात होणार नाहीत याची काळजी घ्या. इतकं केलंत तरी खूप होईल.

यापुढे भटकंती करताना बघा तुम्हाला एखादं ऑर्किड दिसतंय का?

हा लेख इतरांना पाठवा

धनंजय राऊळ

नमस्कार, मी धनंजय द. राऊळ. मी वनस्पती शास्त्रातून माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून मला निसर्गातील जैवविविधता अभ्यासणे आवडते. निसर्गातील विविध घटकांचे छायाचित्रण करण्याचा मला छंद आहे. त्याचप्रमाणे नवनवीन जागी भटकंती करण्याचीही आवड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *