ओकिनावा बेट – इथली माणसं सहज वयाची शंभरी ओलांडतात

माणूस किती वर्षं जगू शकतो असा प्रश्न समोर आला की मनात आपोआप शंभर आकडा सुचतो.

पण प्रत्यक्षात जगातली कितीशी माणसं आयुष्याची शंभरी गाठू शकतात?

रोग, अपघात, हिंसा आणि ‘काळ’ ही माणसाला मृत्युच्या दाढेत खेचणारी अक्राळ विक्राळ कारणं सतत आपल्या अवती भोवती वावरत असतात.

कधी आपण त्यांच्या जाळ्यात अडकू आणि कधी ते आपल्याला मस्तपैकी तव्यावर परतून स्वर्गात किंवा नरकात पाठवतील याचा काही नेम नसतो.

आपला जन्म कुठे होईल, हे काही आपल्या हातात नसतं.

परिस्थिती अनुकूल नसेल, तर बऱ्याचदा खूप मेहनत घेऊनही किंवा खूप इच्छा असूनही आपण चांगल्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाऊ शकत नाही.

असंच एक आरोग्यासाठी अतिशय चांगलं ठिकाण या जगात अजून तरी अस्तित्वात आहे.

या जागेचं नाव आहेओकिनावा बेट.

नावावरून लक्षात आलंच असेल की हे एक जपानी बेट आहे.

मुळात जपान हे एक बेटांचं राष्ट्र आहे. छोटी मोठी अशी तब्बल ६८५२ बेटं मिळून एक जपान तयार होतो.

त्यातही जपानची मुख्य भूमी म्हणजे पाच मोठ्या बेटांचा समूह आहे – होक्काइदो, होनशु, क्युशु, शिकोकु आणि ओकिनावा.

यातलं ओकिनावा बेट बाकी मुख्य बेटांहून लहान आणि सर्वांत कमी लोकसंख्या असलेलं बेट आहे. साधारण बाराशे चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ असलेल्या या बेटाची लोकसंख्या अंदाजे चौदा लाखांच्या घरात आहे.

तैवान देशापासून हे अवघ्या ५०० किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे.

तर या बेटाचं वैशिष्ट्य काय बरं?

इथली बरीच माणसं सहज वयाची शंभरी पार करून जगत असतात.

उर्वरित जपानच्या तुलनेत शंभरी गाठणारी माणसं या बेटावर पाचपटीने जास्त आहेत.

इतकंच नव्हे, तर शंभरी ओलांडलेल्यांपैकी दोन तृतीयांश लोक वयाच्या ९७व्या वर्षापर्यंत स्वतंत्रपणे राहात होते.

वयाच्या नव्वदीतही ही माणसं चांगलीच सक्रीय असतात.

ओकिनावामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोगाचं, मधुमेहाचं, कर्करोगाचं आणि पक्षाघाताचं प्रमाण अतिशय कमी आढळून आलंय.

याला प्रामुख्याने या मंडळींचा आहार कारणीभूत आहे.

ओकिनावातील लोकांच्या आहारात कॅलरी कमी आणि कर्बोदके जास्त असतात, प्रथिनं मर्यादित स्वरूपात आणि पोषकद्रव्यं भरपूर प्रमाणात असतात.

त्यांच्या आहारात मुख्यत: रताळी, हिरव्या पालेभाज्या, पिवळी कंदमुळं, टोफु, आणि कारलं हे पदार्थ असतात.

इथली माणसं बरीच फळं, मांसाहारी पदार्थ आणि सागरी अन्न खातात.

ओकिनावात राहणाऱ्या माणसांच्या जेवणात साखर, दुग्धपदार्थ, आणि प्रक्रिया केलेली धान्यं अतिशय कमी प्रमाणात असतात. त्यांना अखंड धान्य खाणं जास्त पसंत आहे.

आहारतज्ज्ञांच्या मते ओकिनावा बेटामधील लोकांची आहारशैली आदर्श आहारशैलीशी सुसंगत असते.

 

ओकिनावा बेटाचा इतिहास

इथे बाराव्या शतकात शेतीला सुरुवात झाली असावी. लोक किनाऱ्याकडून उंचसखल प्रदेशात जाऊ लागले.

गुसुकू

त्यासुमारास इथे राहणाऱ्या लोकांनी जे दगडी भिंतींच्या वास्तू बांधल्या. त्या वास्तूंना गुसुकू म्हणतात.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये असे अनेक गुसुकू समाविष्ट आहेत.

हे गुसुकू तीन प्रकारचे असायचे – एक म्हणजे धार्मिक स्थळ, दुसरं म्हणजे दगडी कुंपण असलेली लोकांची घरं, आणि तिसरा प्रकार म्हणजे समुदायाच्या शासकाचा किल्ला.

ओकिनावा बेटाचा इतर राज्यांशी चिनी मातीचा व्यापार चालायचा. व्यापार उदीम वाढीस लागल्यावर ओकिनावा बेट हे पूर्व आशियातलं एक महत्त्वाचं व्यापार केंद्र म्हणून उदयास आलं.

साहजिकच, विदेशी सत्तांचा या केंद्रावर डोळा आला. मंगोलियानं ओकिनावावर १२९१ मध्ये आक्रमण केलं, पण त्यांची स्वारी अपयशी ठरली.

ऱ्युक्यू संस्कृती

१४व्या शतकात, ओकिनावा बेटावर तीन राज्यांची विभागून सत्ता होती.

चुझान या मुख्य राज्यातून फुटून निघालेली होकुझान आणि नानझान ही दोन राज्यं उदयाला आली होती.

तिघांच्याही आपापसांत कुरघोडी चालत, आणि चीनशी व्यापारासाठी एकमेकांशी स्पर्धा होत असत.

१५व्या शतकात, शो हाशी नावाच्या राजाने ही तीनही राज्यं एकत्रित केली, आणि ओकिनावामध्ये ऱ्युक्यू राजघराण्याची स्थापना केली.

ऱ्युक्यू संस्कृतीच्या राजांनी इतर बेटांवर आक्रमणं केली. अमामी बेटं आणि साकिशिमा बेटं त्यांनी काबीज केली, आणि स्वत:ची एककेंद्री सत्ता स्थापन केली.

१७व्या शतकाच्या सुरुवातीला जपानी आक्रमणानंतर ऱ्युक्यू संस्कृती सात्सुमा प्रांतातील शासकांची आणि चीनची मांडलिक झाली.

१८व्या शतकात जपानने ओकिनावा बेटांचा पूर्णपणे ताबा घेऊन ती आपल्या राज्याला जोडून टाकली.

तिथली मूळ ऱ्युक्यू भाषा (उचीनागुची – काय मस्त नाव आहे!), संस्कृती आणि संप्रदाय नष्ट करून जपानी संस्कृती लादण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. याला स्थानिकांकडून मोठा विरोधही झाला.

दुसरं महायुद्ध

दुसऱ्या महायुद्धात ओकिनावा बेट ही एक उल्लेखनीय रणभूमी ठरली. महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात, तब्बल ८२ दिवस इथे युद्ध सुरु होतं, ज्यामध्ये सुमारे ९५ हजार जपानी राजसत्तेचे सैनिक आणि २० हजार अमेरिकन सैनिक मारले गेले.

ओकिनावातल्या सुमारे दीड लाख व्यक्ती महायुद्धात एकतर मारल्या गेल्या किंवा त्यांनी आत्महत्या केली. ही संख्या स्थानिक लोकसंख्येच्या एक चतुर्थांश एवढी होती.

याचं कारण जपानी लोक युद्धकैदी होण्यापेक्षा मरण पत्करणं पसंत करत.

महायुद्ध संपल्यावर ओकिनावाच्या रक्षणाची जबाबदारी अमेरिकेवर आली.

 

सद्यस्थिती

ओकिनावा बेटाची अर्थव्यवस्था मुख्यत: पर्यटनावर अवलंबून आहे. इथल्या स्थानिक लोकसंख्येपेक्षा इथे वर्षभरात येणारे पर्यटक संख्येने कितीतरी पटींनी जास्त असतात.

जपान आणि अमेरिकेत १९५१ साली झालेल्या करारानुसार आजही ओकिनावा बेटांवर अमेरिकन सैन्याचे तब्बल ३२ लष्करी तळ आहेत.

आज बकासुरासारखा हावरट झालेला विस्तारवादी चीन ओकिनावा बेटं घशात घालायला टपून बसलाय.

२०१३ सालापासून चीन ओकिनावा बेटांवर हक्क सांगतोय.

भविष्यात यदा कदाचित चीनने खरोखर ही बेटं गिळंकृत करायला सुरुवात करायच्या अगोदर, शक्य होईल तेव्हा या बेटांना भेट देऊन यायला हवी.

आणि लीलया शंभरी ओलांडण्याचं या ओकिनावाजनांचं गुपितही जाणून घ्यावं!

 


पिंगेलाप बेटावरची अनेक माणसं रंगांधळी असतात.  का ते वाचण्यासाठी इथे क्लिक करा


 

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *