तेरा आकड्याचा महिमा : शुभाशुभ समजुती आणि गमतीजमती

माझ्या एका मैत्रिणीने सॅन फ्रान्सिस्कोच्या एका बड्या हॉटेलमधल्या लिफ्टच्या की-बोर्डचा फोटो पाठवला होता. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं लिहिण्यासारखं. खरं आहे, पण मला वाटलेलं कुतूहल आणि गंमत म्हणजे त्या बोर्डवर तेरावा आकडाच नव्हता. म्हणजे एक, दोन, तीन असं खालपासून मोजत गेलो तर तेरावा मजला येतोच येतो पण लिफ्टमध्ये त्याचा उल्लेख नाही. बरं हे नुसतं लिफ्टमध्येच असं नाही. अनेक एअरलाईन्सच्या विमानांमध्येही तेरावी खुर्ची नसते. तेरा हा आकडा मोजणीत येतो खरा पण त्याला बोलताना म्हणतात चौदा. आपल्याला अंधश्रद्धाळू व पुराणग्रंथी म्हणणाऱ्या साहेबाच्या पुढारलेल्या देशात असं कसं काय ब्वा! काय ही एवढी भीती? शुभ वा अशुभ खरंच अशा एखाद्या आकड्यावर ठरतं की काय? म्हणजे तसं तर मी सुद्धा थोडंफार मानतो ते, पण इतकं? वर जायला, मजले चढायला, हवेतून प्रवास करायला वापरायचं काय तर आधुनिक तंत्रज्ञान आणि मग त्यात जडवून ठेवायची काय तर एक निव्वळ अंधश्रद्धा! मौज आहे नाही?

एकदा का कपाळी शिक्का बसला की तो पुसणं कठीणच. आपल्या बिचाऱ्या ‘तेरा’चं नेमकं हेच झालंय. २०१२ सालचा मायन दिनदर्शिकेप्रमाणे येणारा जगबुडीचा ‘कु-मुहूर्त’ आठवतोय का? साधारणतः ख्रि.पू. २६०० मध्ये सुरुवात झालेल्या या मायन संस्कृतीमध्ये तेरा हा वाईट आणि अशुभ आकडा होता. त्यांची दिनदर्शिका १३ बाक्तन पूर्ण झाले की संपते. एक बाक्तन म्हणजे वीस का’तन. एक का’तन म्हणजे वीस ‘तन’. तन हे मोजदाद करायचं एक मायन परिमाण आहे. ढोबळमानाने म्हणायचं तर त्या दिनदर्शिकेच्या चाकाचे चारशे फेरे, कारण हे लोक सौरवर्षाचे ४०० दिवस धरायचे. तर, इ.स.२०१२ मध्ये ते चाक ५२०० वेळा त्याच्या अक्षाभोवती फिरून एकदाचं थांबलं. आता जगबुडीच येणार मग हवंय कशाला पुढचं बाक्तुनी आवर्तन! काय डोकं म्हणायचं हे, बिनकामाची धमालच म्हणायची नाही तर दुसरं काय!

बॅबिलोनियन संस्कृती (ख्रि.पू. १७८०) मध्येसुद्धा ‘तेरा’च्या नशिबी हा अशुभतेचा शिक्का विनाकारण कायम होता. आता उत्तरोत्तर तो जास्तच ठळक होत गेलाय असं नक्की म्हणता येईल. व्हायकिंग लोकांचा तेरावा देव म्हणजे ‘लोकी’. एक नंबर पाताळयंत्री. त्याने ‘बाल्देर’च्या (प्रेम, शांती, न्याय वगैरेची देवता) खुनाचं षडयंत्र रचलं, पार पाडलं आणि त्याच्या अंत्यविधीला पोचलेल्यांमध्ये हा खुनी, लोकी, नेमका तेरावा होता म्हणे.

गंमत म्हणजे जीझसच्या काळापासून तेरा हा आकडा जास्तच दु:खद ठरवला गेलाय. जीझसच्या शेवटच्या जेवणाच्या वेळी मेजावर तो धरून एकूण तेरा जण बसलेले होते आणि त्यात जो तेरावा होता, ज्यूडास इस्कॅरियट, तो तिथून चक्क पळून गेला आणि थोड्याच वेळात जीझसला पकडून नेण्यात आलं. हा तेरावा माणूस विश्वासघातकी म्हणून ओळखला गेला. गंमत म्हणजे बायबलमध्ये मात्र असा काही उल्लेख नाहीये. बारा जणांनी बसून घेतलं आणि ज्यूडास सर्वात शेवटी स्थानापन्न झाला होता. असो, तर आज सुद्धा जेवणाच्या मेजावर तेरा माणसं नसावी म्हणतात. असलीच जर चुकून तर त्यातला नेमका तेरावा माणूस कोणाला ठरवायचं हा एक प्रश्नच आहे बुवा.

सोलोमन देवळाच्या रक्षकांना १३ तारखेला अटक करून हालहाल करून मारलं.

नेमकं १३ ऑक्टोबर, शुक्रवारच्या दिवशी फ्रान्सच्या चौथ्या फिलिपने सोलोमनच्या देवळाचं रक्षण करणारे सैनिक धरून आणले व नंतर त्यांना हालहाल करुन मारलं. सन १३०७ ची गोष्ट. आता यामध्ये फिलिप राजाने काय ठरवून तेरा तारखेलाच आज्ञा दिली का! पण नाही. झालं. परत एकदा तेराव्या आकड्यालाच ग्रहण लागलं. अगदी आजही फ्रान्समध्ये तेरा तारखेचा शुक्रवार अशुभ मानला जातो. काय म्हणायचं हे खूळ! जुन्या काळी बरं होतं. चंद्रकलांवर चालणाऱ्या दिनदर्शिकांच्या जमान्यात तेरा या आकड्याला महत्त्व होतं. तो स्त्रीत्वाचं प्रतीक वगैरे समजायचे. पण हळूहळू सौर दिनदर्शिका महत्त्वाची मानली जाऊ लागली आणि परत तेराव्याला शापित समजलं जाऊ लागलं. आज फक्त इटली हाच एक देश असा राहिलाय की तिथे तेरावा आकडा शुभ मानला जातो. पण तिथेही एक आकडा अशुभ आहेच. सतरावा आकडा इटलीमध्ये कमनशिबी होऊन बसलाय.

अनेक धर्मांमध्येही तेराव्या आकड्याचं वेगवेगळं महत्व आहे किंवा त्याचा उल्लेख तरी आला आहे. ज्यू धर्मामध्ये ‘तेरा’ला बरंच मानतात. त्यांच्या धर्माची तत्त्वच तेरा आहेत. तोराह नावाच्या त्यांच्या मूळ धर्मग्रंथात देवाच्या दयेच्या तेरा तऱ्हांचं वर्णन आहे. मुलगा तेरा वर्षांचा झाला की तो ‘बार मित्झवाह्’ होतो. म्हणजे वयात येतो व तेव्हापासून तो ज्यू धर्माचा सच्चा पाईक समजला जातो. ‘बार’चा हिब्रू अर्थ मुलगा असा होतो. उगाच गैरसमज नको. मुलीला ‘बॅट’ म्हणतात हेही नमूद करुन ठेवतो. मुलीला मात्र ‘बॅट मित्झवाह्’चा मान बाराव्या वर्षीच मिळतो. शुभशकुनी असते म्हणे ही बयो.

तोराह नावाच्या त्यांच्या मूळ धर्मग्रंथात देवाच्या दयेच्या तेरा तऱ्हांचं वर्णन आहे.

चीनच्या कन्फ्यूशियन परंपरेमध्ये तेरा प्रमुख शास्त्रं आहेत. त्यांना ‘शिसॅन जिंग’ म्हणतात. १९०५ सालापर्यंत घेतल्या जाणाऱ्या ‘नागरी सेवा परीक्षा’ याच तेरा शास्त्रांवर बेतलेल्या असायच्या. साँग राजवटीमध्ये सुरु झालेल्या या परीक्षांवरच आजच्या पूर्व आशिया खंडाची संस्कृती व एकूण विचारसरणी आधारलेली आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी या शास्त्रांमधले सुमारे सहा लाख शब्द पक्के लक्षात ठेवायला लागायचे. मोठा अवघडच प्रकार म्हणायचा हा!

शीख धर्मगुरु गुरु नानकजी सुलतानपूर लोधी गावच्या धान्य कोठारांचा सांभाळ करायचे. गोरगरीबांना धान्यवाटप करताना तेराव्या माणसावर ते थांबले. हिंदी व गुरुमुखीमध्ये ‘तेरा’ म्हणजे ‘तुझं’. त्यांना दृष्टांत झाल्यासारखं झालं. “सब तेरा है” म्हणत त्यांनी फुकट धान्यवाटप सुरु केलं. बादशहा पर्यंत बातमी गेली. पण जेव्हा तिजोरीतले पैसे मोजले गेले तेव्हा त्यात तूट न दिसता उलट वाढच दिसली. शीखांमधल्या कडव्या खालसा पंथाचा स्थापना दिन म्हणून बैसाखीचा सण साजरा करतात. बरीच वर्षं तो १३ एप्रिललाच साजरा करण्याची परंपरा पाळली जात असे. ‘तेरा’चा महिमाच मोठा!

रोमन ख्रिश्चन त्यांच्या संत अँथनीचे तेरा मंगळवार पाळतात. आपण सोळा सोमवार करतो ना तसंच. या संताचा उत्सव दिवसही १३ जून रोजी असतो. पण म्हणून काही ‘तेरा’ला शुभ मानतील तर ते नावच नाही. यावरुन एक गंमत आठवली. माझा एक अतिउच्चशिक्षित मित्र आहे. पुण्यातल्या नामवंत महाविद्यालयाचे हे साहेब विश्वस्त आहेत. ‘तेरा’च्या उल्लेखापासून सुद्धा दूर राहतो. सोडा, आपण हिंदीत विचारतो ना.. “फ़िर, क्या चल रहा है तेरा..?” संपलं. लगेच क्रूसाची खूण करुन मोकळा. नाहीतर रोझरी तरी डोळ्यांना स्पर्शते. १३ तारखेचा शुक्रवार कधी आलाच तर जणू जगबुडीचाच आविर्भाव असतो. दर महिन्यातल्या तेराव्या दिवशी त्याच्या घराचे दिवे बंद असतात. त्या दिवशी घरातले सगळे व्यवहार मुक्यानेच करतात. का? विचारलं मी. काही नाही, रोझरी परत डोळ्यांवर! २०१३ साल कसा जगला असेल त्या जीझसलाच ठावे.

इराणमध्ये तर बोलूच नका. तेरा म्हणजे काहीतरी दुष्ट व भयानक असं समजलं जातं. नोरुझ म्हणजे पारशी नववर्ष (आणि इराणी नववर्षसुद्धा) सुरू झालं की त्याचा तेरावा दिवस हा सर्वांत अशुभ. वाईट शक्ती त्या दिवशी लोकांना छळतात म्हणे. मग उपाय म्हणून घरदार सोडायचं त्या दिवशी आणि लांबवर कुठेतरी दिवस काढायचा. तिथे त्या शक्ती कशा पोचत नाहीत हे मला कोडंच आहे. इराणमधली १९७९ची इस्लाम क्रांतीसुद्धा ही प्रथा बंद करु शकली नाहीये. त्यात शिया धर्मीय जरा बरे म्हणायचे. एक नबी (prophet) आणि त्यांचे बारा इमाम म्हणजे एकूण तेरा अशी बेरीज करुन ते मोकळे झालेले आहेत.

सन १८८१ मध्ये अमेरिकेच्या नागरी युद्धातला कप्तान विल्यम फोवलेरने अशा पांचट अंधश्रद्धांविरुद्ध काहीतरी उपाय शोधायचा म्हणून एक क्लब चालू केला होता. त्याचं नावच मुळी ठेवलं होतं ‘द थर्टीन क्लब’. जानेवारी १३, १८८१ला शुक्रवारी रात्री ८:१३ ला पहिली सभा होती. तेरा लोकं जेवायला होती. त्यांचं काहीही वाईट झालं नाही. उलट पुढच्या चाळीस एक वर्षांत हे असे ‘तेराचे अड्डे’ सगळीकडे फोफावले. मजेचा भाग म्हणजे अमेरिकेचे पुढचे पाचही अध्यक्ष, आर्थर पासून ते रूझवेल्ट पर्यंत, या अड्ड्यांचे सभासद होते. काही वाईट झालंय का त्यांचं? काहीही नाही.

तेरा या आकड्याला घाबरण्यावर मानसशास्त्रात संज्ञा आहे – त्रिसकाइडेकाफोबिया. बाकी असंख्य वैद्यकीय शब्दांप्रमाणेच हा सुद्धा ग्रीक भाषेतून आलेला आहे. त्रिस् म्हणजे तीन. काइ म्हणजे आणि. डेका म्हणजे दहा. फोबोस म्हणजे भीती. तीन आणि दहा, ‘तेरा’ची भीती.

असो. तर असा हा तेरा बराच ‘नंबरी’ प्रकार आहे. मी तर आता काय, लिहून मोकळा झालोय. बाकी काय नवं म्हणणार आता…

बस्स, तू १३ देख.

हा लेख इतरांना पाठवा

सिद्धार्थ अकोलकर

आयुष्यभर विद्यार्थीदशा जपण्याची व जोपासण्याची प्रामाणिक इच्छा मनामध्ये बाळगावी.

4 thoughts on “तेरा आकड्याचा महिमा : शुभाशुभ समजुती आणि गमतीजमती

 • March 14, 2019 at 9:48 pm
  Permalink

  खूप छान आणि विस्तृत माहिती दिली आहेस सिद्धार्थ. १९९७ साली या देशात आले तेव्हा आमचं वास्तव्य १८ व्या मजल्यावर होतं. मी आम्ही सतराव्या मजल्यावर राहतो असंच म्हणत असे. कारण आकडे मोजता येत नसल्यासारखा सर्वत्र इथे १३ गाळलेला असे. ते पाहून मला प्रचंड गंमत वाटायची. कारण इथले लोक आपल्याला सर्रास ऑर्थोडॉक्स आणि बरंचकाही म्हणत असत. तरी १३ आकडा गाळणं हॅलोविन डेच्या दिवशी चेटकीणीचे आऊट फिट घालणं नि बरंच काही करत असत. तेव्हा मला दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसत, पण…. या म्हणीची आठवण व्हायची. आता हे सवयीचं झाल्यानं त्यातील गंमत संपली. पण गरीब बिचाऱ्या १३ आकड्याचा हा नशीबाचा खेळ कळणं आवडलं. बाकी मला विचारशील तर….
  आजवर वीस घरात माझं राहणं झालं. १३ रचना अपार्टमेंट, बी १३ शांतप्रभा…. अशी बरीच घरं १३ ने सुरू होणारी आणि आम्हाला सुखदठरलेली. तुलनेत तेराशी संबंध नसलेल्या घरातील अमदावादचं वास्तव्यच दुःखद होतं, याची मला गंमत वाटते. तशाच आयुष्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी अमावास्येस घडल्या याचीही. असो.
  बरणी खूप आवडते आहे, इतकंच सांगून थांबते.
  साशिर्वाद स्मिता मावशी.

  Reply
  • March 14, 2019 at 11:44 pm
   Permalink

   स्मितामावशी, तुमचे आशीर्वाद असेच नेहमी पाठीशी राहोत. 🙏🏼

   Reply
 • March 15, 2019 at 7:18 am
  Permalink

  अजब माहितीचा खजाना च उघडलास ! जय गुरुदेव 😃

  Reply
  • March 15, 2019 at 5:06 pm
   Permalink

   हाहाहा. धन्यवाद स्नेहा. 👍🏼

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *