दुरावणारा चंद्र आणि लांबत जाणारे दिवस

दुसरं काही सुचत नाही तोवर ‘बाबू-शोनू-मोनू’ वगैरे लाड करून झाले, की दिवसभर एकमेकांशी फोनवर बोलून मग रात्री शांत ठिकाणी एकत्र बसलेलं जोडपं बळे-बळे काही ना काहीतरी विषय काढून गप्पा मारत राहतं. मुलीला फिल्मी स्वप्नं रंगवायची असतात आणि मुलगा तिला सारखा वास्तवात आणून तिचा हिरमोड करत असतो.

‘‘शी बाबा. तू अजिबातच रोमँटिक नाहीयेस.’’ मुलगी तोंड वाकडं करून म्हणते.

‘‘अगं खरी करू शकू अशी स्वप्नं पाहावीत माणसानं. एखादा कुत्रा ठीक आहे, पाच-पाच कुत्रे कुठून पाळणार आपण, किती खर्च येतो माहितीये?’’

‘‘पण तू आत्ता हो म्हण ना. खर्चाचा विचार आत्ता का करायचा?’’

‘‘मग स्वप्न पाहताना ते शक्य आहे की नाही याचा विचार करायचा नसेल, तर मग अशी छोटी मोठी का, काहीतरी अचाट स्वप्नं पाहूया ना!’’
‘‘म्हणजे कशी?’’

‘‘म्हणजे बघ आता इथून हा चंद्र एवढुसा दिसतोय ना, तर आपलं घर आपण एवढं उंच बांधायचं की चंद्र रोज खूप मोठा दिसेल.’’

‘‘व्वा! आणि खरेदी करायला खाली जायचं असेल तर? लिफ्ट बांधणार घरात?’’

‘‘हो मग!’’

‘‘छान! अचाटच करायचंय काहीतरी तर चंद्रावरच जाऊन राहूया ना! एलॉन मस्क नाहीतरी मंगळावर चाललेलाच आहे, त्याला म्हणू लिफ्ट दे जरा चंद्रापर्यंत!’’

‘‘त्याच्या आधी आपण पोहोचू बघ मंगळावर. इस्रोवाले भारी लोक आहेत.’’

‘‘हं. तुला माहितीये, मी परवा वाचलं की चंद्र लांब चाललाय आपल्यापासनं.’’ मुलगी खोटं खोटं रडवेलं तोंड करून म्हणते.

‘‘बघ तू एवढी घाण पादतेस की चंद्रसुद्धा लांब पळतोय.’’

इथे मुलाला दोन-तीन चापट्या आणि एखाद्-दुसरा गुद्दा खावा लागतो. मुलीला स्वत:लाही हसायला येत असतं पण रुसून बसण्यात जास्त मजा असते.

प्रतिमा : चंद्र आपल्यापासनं लांब चाललाय
                         चंद्र आपल्यापासनं लांब चाललाय

‘‘बरं पण सांग तरी तो चंद्र नेमका लांब का चाललाय ते.’’ मुलाला आता कधी नव्हे तेवढा चंद्रात रस निर्माण होतो. कारण मुलीनं त्याच्याशी बोलत राहणं महत्त्वाचं असतं. जास्त वेळ रुसू दिलं तर ती जुन्या गोष्टी उकरून भांडण काढू शकते.

‘‘पाचकळ जोक मारायचे नाहीत, तर सांगते.’’

‘‘नाही मारणार. तू सांग!’’

‘‘हं. तर ना, तो चंद्रय ना, तो जेव्हा तयार झाला ना, साडेचार अब्ज वर्षांपूर्वी वगैरे, तेव्हा तो पृथ्वीच्या खूप जवळ होता. म्हणजे ना कुठलातरी एक ग्रह आला आणि पृथ्वीला आदळला, मग दोन्ही ग्रह फुटून जो कचरा झाला ना त्याचा गोळा होऊन चंद्र तयार झाला असं म्हणतात.’’

‘‘कोणता ग्रह?’’

‘‘असेल कोणता तरी, मला काय माहिती! ते महत्त्वाचं नाहीये, मी वेगळं सांगतेय ना!’’

‘‘सॉरी, बोल बोल.’’

‘‘तर चंद्र आधी पृथ्वीच्या खूप जवळ होता हां. बावीस हजार किलोमीटर की काहीतरी. म्हणजे तेव्हा हां, साडे चार अब्ज वर्षांपूर्वी. आणि आता काहीतरी चार लाख किलोमीटर अंतरावर आहे. कारण दरवर्षी चंद्र पृथ्वीपासून दिड इंच लांब सरकतोय.’’

‘‘कशामुळे?’’

‘‘म्हणजे बघ हं… पृथ्वीचा जो भाग चंद्राजवळ असतो ना, त्याला चंद्रामुळे जास्त गुरूत्वाकर्षण जाणवतं, पृथ्वीच्या केंद्राचं आणि चंद्राचं. म्हणूनच भरती-ओहोटी वगैरे होते ना! लाटा उसळतात वर! आणि जो भाग चंद्राहून सगळ्यात लांब असतो, त्याला तेवढं गुरूत्वाकर्षण जाणवत नाही. मग काय होतं, पृथ्वीवर मधल्या भागात फुगवटे तयार होतात. कारण मधला भाग सगळ्यांत जवळचा असतो चंद्राला. काय त्यांना म्हणतात, ‘टायडल काहीतरी’… हं, ‘टायडल बल्ज’! ‘टायडल बल्ज’ म्हणतात त्यांना. आणि ना, या फुगवट्यांमुळे पृथ्वी लांबट होते जराशी.’’

‘‘म्हणजे तुझे दोन्ही गाल ओढल्यावर तू दिसशील तशी?’’

‘‘ए जा रे…’’ काही मिलीसेकंद लाजण्यात जातात. ‘‘हां तर मी काय सांगत होते, म्हणजे पृथ्वीचा जो, काय म्हणूया, ठोकळा आहे ना, त्यावर फारसा परिणाम होत नाही. थोडेसे सेंटीमीटर इकडचे तिकडे होत असले तर. पण मुख्य परिणाम म्हणजे समुद्राच्या लाटा उसळतात. ते तर माहितीये ना आपल्याला! तर आता हे जे मी फुगवटे म्हणते ना, ते सुद्धा चंद्राला खेचतात. पण पृथ्वी तर फटाफट फिरते ना स्वत:भोवती, चंद्राला पृथ्वीभोवती फिरायला जास्त वेळ लागतो.’’

‘‘२७ दिवस.’’ मुलगा काही अगदीच ढ नसतो.

‘‘हां. तर चंद्राला वेळ जास्त लागतो म्हणून त्याची एकच बाजू दिसते आपल्याला. आणि ते फुगवटे असतात ना, ते चंद्राला खेचायला बघतात. आणि चंद्रसुद्धा त्या फुगवट्यांना खेचत असतो, त्यामुळे पृथ्वीचा वेग जरा-जरा कमी होतो.’’

प्रतिमा :चंद्रामुळे भरती-ओहोटी होते
                                  चंद्रामुळे भरती-ओहोटी होते

‘‘आयला, भारी!’’ मुलाला आता खरोखरच चंद्रात रस निर्माण होतो.

‘‘ही जी खेचाखेची चालते ना, त्यातून काय होतं, की ते फुगवटे पृथ्वीची थोडी फिरण्याची शक्ती काढून चंद्राला देतात. म्हणजे चंद्राला ती आपसूक मिळते.’’

‘‘म्हणजे व्होल्डेमॉर्टची शक्ती हॅरी पॉटरला मिळते तशी?’’

‘‘ए सोड यार तुला नसेल रस तर मी नाही सांगत.’’

‘‘ए नाही नाही, बोल बोल. मला ऐकायचंय. मी आपलं एक उदाहरण म्हणून म्हटलं, मला जोक मारायचा नव्हता.’’ मुलगा सावरून घेतो. मुलगी डोळे वटारून एक दीर्घ श्वास घेते आणि पुन्हा स्वत:चं प्रवचन सुरू करते.

‘‘तर चंद्राला ही जी शक्ती मिळते ना, त्यामुळे त्याची कक्षा मोठी होते. आणि म्हणून तो आपल्याहून दूर जातो.’’

‘‘ओक्के. पण मग असा दूर दूर जात राहिला तर यामुळे भरती ओहोटीवरही परिणाम होईल ना?’’

‘‘हो ना. आणि ना, शंभर वर्षांनी पृथ्वीवरचा एक दिवस आत्तापेक्षा दोन मिलीसेकंदांनी वाढेल.’’

‘‘बास? एवढा चाळा करून फक्त दोन मिलीसेकंद? त्यालाही शंभर वर्षं लागणार? श्यॅ!’’

‘‘अरे? श्यॅ काय? असं थोडं थोडं करूनच एवढं अंतर वाढलंय ना चंद्रातलं आणि पृथ्वीतलं?’’

‘‘हो पण आपल्याला काहीतरी भारीतलं पाहायला मिळायला हवं होतं ना यार! हे काय आपल्याला कळणारही नाही.’’

‘‘हो पण तू कल्पना करून बघ ना!’’

‘‘हं. मग एक वेळ अशी येईल ना जेव्हा चंद्र पृथ्वीपासून एवढा लांब जाईल की तो तिला स्वत:जवळ ओढताच येणार नाही? तेव्हा काय होणार?’’

‘‘ते व्हायला चिक्कार वेळ लागेल अरे. चंद्राची कक्षा एकदम मोठी व्हायला अजून ५० अब्ज वर्षं तरी लागतील म्हणे! त्याआधीच सूर्य फुगून पृथ्वी आणि चंद्र गिळून टाकेल. आणि समजा तसं नाही झालं, समजा वाचलो आपण! आपण म्हणजे, पृथ्वी आणि चंद्र, तर एक वेळ अशी येईल जेव्हा चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला ४७ दिवस लागतील. आता किती २७ लागतात म्हणालास ना? आणि त्यावेळी पृथ्वीही एवढी हळू फिरत असेल, की स्वत:भोवती फिरायला तिलाही ४७ दिवस लागतील. आज चंद्राची एक बाजू कायम आपल्याकडे तोंड करून असते. दुसरी बाजू दिसतच नाही. तशी तेव्हा पृथ्वीचीही एकच बाजू चंद्राच्या दिशेने तोंड करून राहील. दुसऱ्या बाजूला चंद्र दिसणारच नाही. टायडल लॉकिंग म्हणतात याला. चंद्र तर आहेच टायडली लॉक झालेला, पृथ्वीही झाली की मग चंद्र आणखी लांब जाणार नाही पृथ्वीच्या.’’

‘‘मग ते तसंच राहणार कायम? आयला चंद्र नसलेल्या बाजूला जगायचं?’’ मुलाच्या चेहऱ्यावर कधीच चंद्र न पाहता येण्याच्या कल्पनेनेच सुरकुत्या पडतात.
‘‘एवढा आवडतो तुला चंद्र? पण आपण नसू रे तोवर. आणि जे असतील ना त्यांनाही टेन्शन घ्यायची गरज नाही. सूर्य असेल ना, तो खेचेल पृथ्वीला! त्यामुळे पृथ्वीचा वेग आणखी कमी होत राहणार. मग पृथ्वी चंद्राला परत मागे खेचेल आपल्याकडे. आणि मग आणखी काही-शे अब्ज वर्षांनी चंद्र एवढा जवळ येईल की तो आदळेल पृथ्वीला आणि फुटून जाईल. मग पृथ्वीभोवती शनीसारख्या कड्या तयार होतील. सही ना?’’

‘‘पण पृथ्वी एवढ्या हळू फिरत असल्यावर ती डुगडुगणार नाही का?’’ मुलाला आता अचाट शंका सुचतात.

‘‘डुगडुगेल? पृथ्वी का डुगडुगेल?’’

मुलगा एकदम उत्साहात आणि चढ्या आवाजात बोलायला लागतो,
‘‘प्च! डुगडुगणारच ना! बघ, तू भोवरा फिरवतेस, हं? तेव्हा जोवर तो जोरात स्वत:भोवती फिरत असतो तोवर नीट उभा असतो, जसा त्याचा वेग कमी होतो तसा तो डुगडुगायला लागतो आणि मग शेवटी पडतो. पृथ्वी तिच्या अक्षावर कललेली असते. उन्हाळ्यात पृथ्वीचा वरचा भाग सूर्याकडे कललेला असतो, म्हणून तेव्हा दिवस मोठा असतो आणि रात्र छोटी असते. हिवाळ्यात खालचा भाग सूर्याकडे कललेला असतो. म्हणून मग आपल्याकडे वरच्या भागात तेव्हा दिवस लहान असतो. जर पृथ्वीचा वेग मंदावला, तर हे सगळं बदलणार! आणि ती जेवढी जास्त डुगडुगेल तेवढे तापमानात आणि हवामानात वगैरे फटाफट बदल होत जाणार, अचानक एकदम! वाट लागेल ना तेव्हा आपली! कधीही उन्हाळा कधीही हिवाळा!’’

‘‘आपण नसू रे तोवर…’’

‘‘हा म्हणजे तेच आपल्याजागी जे असतील त्यांची किती वाट लागेल! आणि चल माणूस काहीतरी जुगाड करेल समज स्वत:पुरता, बाकी प्राण्यांचं काय होईल!’’

‘‘ते त्यांचं ते बघून घेतील. तसंही तोवर सूर्याने पृथ्वीला गिळलं नाही तरच हे सगळं होईल. ज्याची शक्यता मला तरी कमी वाटते.’’

‘‘हं. आली मोठी सायन्टिस्ट!’’

मुलगी रडवेल्या आवाजात म्हणते, ‘‘ए, मी वाचलंय म्हणून सांगतेय ना! असं काय म्हणतोस मला!’’

‘‘हो ना गं माझी बबडी!’’ असं म्हणून मुलगा मुलीचा गालगुच्चा घेतो.

यापुढे जे चालू राहतं, तो या लेखाच्या विषयाचा भाग नाही. सबब हे कल्पनारंजन इथंच संपवण्यात येत आहे.

 

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

2 thoughts on “दुरावणारा चंद्र आणि लांबत जाणारे दिवस

 • November 11, 2018 at 4:23 pm
  Permalink

  सहज म्हणून वेब साईट उघडली तर सलग 3 आर्टिकल्स वाचलीत. छान ओघवती भाषा. अभिनंदन !👌👍

  Reply
  • November 11, 2018 at 4:34 pm
   Permalink

   धन्यवाद. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. तुम्हाला आणखी कोणकोणत्या विषयांवर वाचायला आवडेल ते आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्या वाचकमित्रांनाही हा माहितीचा फराळ करायला नक्की बोलवा.

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *