माकडाचा सेल्फी आणि माणसांची मारामारी

डेव्हिड स्लेटर नावाचा इंग्रज फोटोग्राफर इंडोनेशियाला गेला होता. तिथल्या सेलिब्स क्रेस्टेड मकॅक्सचे फोटो काढायला!! इंडोनेशियामधल्या सुलावेसी बेटांसभोवताली आढळणाऱ्या या प्राण्याची जात गंभीर धोक्यात असल्याचं, म्हणजे ती नामशेष होण्याची भीती असल्याचं मानलं जातं. डेव्हिड स्लेटरचा कॅमेरा या माकडांच्या हातात आला, आणि भल्याभल्या सुपरमाॅडेल्सना लाजवतील असे एकेक भन्नाट सेल्फी या माकडांनी काढले.

हे फोटो जगभर पसरले. सुरुवातीला हे फोटो विकून डेव्हिड स्लेटरने २००० पौंड कमवले, ज्यातून त्याच्या प्रवासाचा खर्च निघाला. पण टेक क्रंचने आणि विकीमीडियाने हे फोटो त्याची परवानगी न घेताच आपापल्या वेबसाईटवर डकवले, आणि तिथून फोटोंच्या स्वामित्व अधिकारांचा राडा सुरु झाला.

डेव्हिडचं म्हणणं असं की विकीमीडियाने हे फोटो विनामूल्य उपलब्ध करून ठेवल्याने त्याचं उत्पन्न कमी होतंय, त्याचा धंदा बुडतोय.

विकीमीडिया म्हणालं की फोटो माकडानं काढलेत त्यामुळे त्यांवर कोणाही एका माणसाचा अधिकार राहात नाही. आणि ते सार्वजनिक वापरासाठी मुक्त आहेत.

त्यावर डेव्हिडचं प्रत्युत्तर असं की माकडांनी त्याचा कॅमेरा वापरून सेल्फी काढावा अशी व्यवस्था त्याने तिथे जाणून बुजून लावली होती. सहजासहजी माकडांनी ते फोटो काढले नसते. त्यासाठी डेव्हिडला नीट डोकं लढवावं लागलं होतं. तर हे फोटो काढले जाण्यात त्याचा सहभाग असल्यामुळे फोटोंचे स्वामित्वाधिकार त्याच्याकडे राहतात.

डेव्हिड स्लेटर, नरुटो नावाच्या माकडाच्या सेल्फीसह. फोटो त्याच्या फेसबुक पेजवरून घेतला आहे.

हा राडा सुरु झाला २०११ साली. डिसेंबर २०१४ उजाडल्यावर युनायटेड स्टेट्स काॅपीराईट कार्यालयानं असं विधान जाहीर केलं की माणसाव्यतिरिक्त इतर कोणीही घडवलेल्या आविष्काराचा काॅपीराईट काढता येत नाही.

डेव्हिड स्लेटरला याविरोधात न्यायालयात जायचं होतं. पण न्यायप्रक्रिया खर्चिक असते. ती परवडायची कशी? गंमत म्हणजे, त्याने कोणाला न्यायालयात खेचायच्या आधी तो स्वतःच न्यायालयात खेचला गेला.

एका सेल्फीवरून एवढं रान माजणं हे ऐकून आपल्याला गंमतीशीर वाटत असलं, तरी या परिस्थितीत दोन्ही पक्षांच्या बाजू एकवेळ समजून घेता येण्याजोग्या आहेत. पण याहून मोठा आणि हास्यास्पद कहर केला पेटा (PETA) या प्राण्यांच्या ‘हक्कांसाठी’ लढणाऱ्या(!) संस्थेने! पीटाचं म्हणणं असं की फोटोचा स्वामित्वाधिकार माकडाला मिळावा कारण फोटो त्याने काढलेत. आणि या फोटोच्या मिळकतीतून आलेले पैसे पीटाला देण्यात यावेत. आता माकडाचे पैसे पीटाला का बरं द्यायचे? तर ते म्हणे त्या माकडाच्या जातीच्या संवर्धनासाठी त्या पैशांचा वापर करतील. हे अचाट आणि अजब तर्कट लावत पीटाने डेव्हिड स्लेटरविरोधात सॅन फ्रान्सिस्कोच्या न्यायालयात खटला दाखल केला. स्लेटरने ज्या ब्लर्ब इन्काॅर्पोरेटेड या प्रकाशन माध्यमातून फोटोंचं पुस्तक छापलं होतं, त्याहीविरोधात पीटाने खटला दाखल केला. डेव्हिड स्लेटर राहतो इंग्लंडात, त्याला खटला लढावा लागतो अमेरिकेत. बिचाऱ्याला अमेरिकेत जाण्यायेण्याचा खर्चही भागवता येत नाही त्यामुळे तो व्हिडिओ प्रक्षेपणामार्फत खटला लढवतो. त्याला आपल्या वकिलाचे पैसेही देता येत नाहीत.

नशिबाने या प्रकरणात न्यायालयाचा विवेक जागा होता. त्याने पीटाची मागणी धुडकावून लावली. जेव्हा पीटा अपील न्यायालयात गेली, तेव्हा त्यांनी ही मागणी फेटाळून तर लावलीच, पण या खटल्यामागची पीटाची प्रेरणा प्राण्यांवरच्या ममतेतून कमी आणि स्वतःचं भलं करण्याच्या उद्देशातून जास्त आल्यासारखी वाटते असं सुनावलं.

Macaca nigra juvenile (Buffalo Zoo)

डेव्हिड स्लेटर म्हणतो एवढ्या सगळ्यांतनं एक मात्र बरं झालं. माकडाची ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर होती. स्थानिक माणसं या माकडांना मारून टाकत असत. पण हे फोटो जगभर पसरल्याने पर्यटकांचे लोंढे या प्रदेशात येऊ लागले. त्यामुळे स्थानिकांना या माकडांची प्रजाती जतन करण्याचं महत्त्व लक्षात येऊ लागलंय.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *