आंब्याची रसाळ गोष्ट

काय तो त्याचा तेजस्वी रंग! काय तो त्याचा सुवास!
काय ती त्याची चव! काय त्याचं किती ते कौतुक!!

कुणी काहीही म्हणो पण फळांचा राजा एकच आणि तो म्हणजे फक्त आंबाच! कुठल्यातरी एका अवस्थेतला, मग ती भले छोटुली हिरवीगर्द बाळकैरी असो किंवा छान पिवळसर केशरी, लालसर बदामी रंगाचा पिकलेला आंबा; कैरी वा आंब्यापासून बनवलेलं काही खाल्लं नसेल असा भारतीय शोधूनही सापडणार नाही. हे म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे आंबा ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे आणि आजही जगामधला निम्मा आंबा भारतच पिकवतोय. गंमतीचा भाग म्हणजे ‘पिकतं तिथे विकलं जात नाही’ हा सर्वसाधारण नियम आंब्याच्या बाबतीत मात्र खोटा ठरलेला आहे. उन्हाळी दिवसांत आंब्याच्या फळाला भारतामध्ये भरपूर मागणी आहे.

गेली कैक हजार वर्षं आंबा अस्तित्वात आहे. त्याचा उगम भारतातला हे ही नक्कीच आहे; पण का व कसा हे मात्र ठाऊक नाही. फक्त देवाजीची कृपाच म्हणायची. ख्रिस्तपूर्व पाचव्या ते चौथ्या शतकात हे फळ भारतामधून दक्षिणपूर्व आशियामध्ये पोचलं आणि अनुकूल हवामान मिळाल्याने त्या भागांमध्ये चांगलंच रुजलं. आज आंब्याच्या फळाला भारत, पाकिस्तान आणि फिलीपिन्स ह्या देशांनी राष्ट्रीय फळाचा मान दिलेला आहे तर बांग्लादेशाने आंब्याच्या झाडालाच राष्ट्रीय दर्जा दिलाय. असं भाग्य दुसऱ्या कुठल्याच फळाने मिळवलेलं नाही. ‘मान्गिफेरा इंडिका’ असं शास्त्रीय नाव असलेला हा भारतीय आंबा म्हणजे उष्णकटिबंधातील जवळजवळ सर्व देशांमध्ये सगळ्यात जास्त संख्येने पिकवलं जाणारं फळ आहे.

वनस्पती शास्त्रानुसार आंबा हे एक अश्मगर्भी म्हणजेच ‘दगड फळ’ (Drupe) आहे. काय विचित्र वर्गीकरण आहे हे! पण, फळ बाहेरुन पातळ सालीचं, आत मांसल गराचं आणि मध्यभागी टणक बीजकवच बाळगणारं असलं की त्याला त्या वर्गातलं फळ म्हणतात. कुठे तो आपला लाडका रसाळ आंबा आणि कुठे ती बाकीची ‘दगडी’ फळं – खजूर, ऑलिव्ह, जर्दाळू, पीच, अव्हाकॅडो आणि प्लम! छे!! तुलना होऊच शकत नाही. नक्कीच, आंबा कधीही न चाखलेल्या एखाद्यानेच त्याला या वर्गात नेऊन बसवलेलं असणार. असो. आंब्याला काहीही फरक पडलेला नाही, ना त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेला कधी काही बाधा पोचलीय.

आठशेहून जास्त जात-प्रकार मिरवणारं आंबा हे एकमात्र फळ असावं. या फळाला “मँगो” हे परभाषिक नाव कसं पडलं? तर, सुमारे १४९८ साली त्यावेळच्या मलबार (केरळ) बरोबर सुरु झालेल्या नव्या युगातल्या मसाल्याच्या व्यापाऱ्यांनी या फळाच्या मल्याळम भाषेतल्या “मन्ना” किंवा “मॅंग्गा” (अर्थ: सर्वोच्च फळ) या उच्चाराचा “मंगा” केला. धाडसी पोर्तुगीझ व्यापाऱ्यांनी हे नाव आणि त्याचं रसभरीत वर्णन युरोपमध्ये अलगद पोचवलं. सन १५१० मध्ये लुडोव्हिको दि व्हर्तेमा या माणसाने इटालियन भाषेत पहिल्यांदा ‘मंगा’ला स्थान दिलं. पुढे १६७७ साली मलबारच्या त्यावेळच्या डच कमांडरने एक पुस्तक लिहिलं होतं. मलबारमधल्या समस्त औषधी झाडपाल्याच्या आर्थिक लाभाची बाजू त्या पुस्तकामध्ये दिलेली होती. तर या ‘हेन्री व्हान ऱ्हिडे’ लिखित “हॉर्टुस मालाबारीकुस” नामक पुस्तकामध्ये आपला “मंगा” चांगलाच चमकला. या मंग्याला शेवटी ‘ओ’ करायला लावलं तो साहेबाने. मन्नाचा झाला मंगा आणि साहेबाने केला त्याचा “मँगो”.

या समस्त साहेबांना माहीत नसलेली एक गोष्ट तरीही होतीच. आंबा १३७३ साली आफ्रिकेमध्ये पोहोचला होता. तिथे त्याची नियमित लागवडही होत होती. चौदाव्या शतकातला प्रसिद्ध मोरोक्कन प्रवासी इब्न बट्टुटाने या फळाचं नामकरण केलं होतं “मोगादिशु”. नंतर हळूहळू प्रवास करत करत हा आफ्रिकन आंबा ब्राझील, मेक्सिको, वेस्ट इंडीज, बर्म्युडा या भागांमध्ये पोचला. लागवडीसाठी अनुकूल हवामान मिळाल्याने पिकवलाही जाऊ लागला. अर्थात, मूळचा त्याचा भारतीय गोडवा व चव तोपर्यंत पूर्णपणे हरवलेली होती. अमेरिकेत आंबा जाण्यासाठी सतरावं शतक उजाडावं लागलं आणि त्या काळी प्रशीतीकरणाची सोय नसल्याने तो लोणचं बनून तिथे गेला. मजा म्हणजे लोणची घातलेल्या सगळ्याच फळांना, ढोबळी मिरचीसारख्या फळभाज्यांना, त्या काळी तिथे “मॅंगोज्” म्हणत होते आणि अठराव्या शतकात ‘लोणचं घालणे’ याचं क्रियापदच “मॅंगो” झालेलं होतं.

आजच्या घडीला उत्तर अमेरिकेतल्या फ्लोरीडा व कॅलिफोर्नियाच्या काही भागात आंबा तयार होतो. त्याबरोबरच कॅरीबियन भाग, हवाई व मध्यवर्ती अमेरिकेमध्येही आंब्याची लागवड होते. दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, चीन व आफ्रिकेच्या मध्य, दक्षिण व पश्चिम भागांत आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. युरोपात मात्र फक्त स्पेन देशात मॅलागा भागामध्येच आंबा तयार होतो. आणि जगातला निम्मा आंबा पिकवूनही, म्हणजे जवळजवळ वीस दशलक्ष टन आंब्याचं उत्पादन करुनही, भारतातच तो इतक्या मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या आंब्याच्या वित्तीय उलाढालीत भारताचा हिस्सा केवळ १% असा नगण्य राहिलेला आहे. या आंबा फळाचा राजाधिराज, आपला कोंकणचा हापूस किंवा अलफान्सो, हा मात्र एका पोर्तुगीझाच्या नावाने ओळखला जातो. पोर्तुगीज गव्हर्नर अल्फोन्सो द अल्बुकर्क या इसमाने ही जात गोव्यामध्ये प्रथमतः पैदा केली म्हणतात.

Aavakaaya...Mango pickle and its container

भारतीय पाककृतींमध्ये आंब्याचा सररास वापर होतो. ताज्या कैरीचं लोणचं, कीस, चटणी तर पिकलेल्या आंब्याचा मुरांबा, जॅम आणि ज्यूस हे प्रकार सगळ्यांत जास्त लोकप्रिय आहेत. साधी हिरवी कैरी कापून तिखट मिठाबरोबर खायला तर अप्रतिमच. उन्हाळी पेय म्हणजे कैरीचं गुणकारी पन्हं हा देखील प्रचंड चविष्ट प्रकार. गुजराथी खाकऱ्याबरोबर तोंडी लावणं हवं ते कैरीच्या छुंद्याचंच. छान गारेगार घट्ट केशरी आमरसाशिवाय पेशवाई पुरीरसाचा थाट होऊच शकत नाही. दक्षिण भारतात गेलात तर भाजलेल्या बेसनपिठामध्ये आंब्याचा गर घालून केलेली आमटी ऊन-ऊन भाताबरोबर खायलाच हवी!

पुण्यातली ‘सुजाता’ची ‘मॅंगो मस्तानी’, आंबा हिममलाई (आईसक्रीम) जगप्रसिद्धच. चितळेंची आंबाबर्फी, ‘कैलास’ची आंबा लस्सी, कुणा दुग्धालयाचं आम्रखंड स्वादिष्टच! कोंकणातली खासियत आंबापोळी ही एकदा तरी चव घेण्यासारखीच. या एका आंबा फळापासून संपूर्ण जगभरात इतके खाद्यप्रकार तयार होतात की त्या सगळ्यांची नोंद एका लेखात घेणं केवळ अशक्य आहे. तो खरंच एका स्वतंत्र लेखमालेचा विषय आहे.

हा आंबा ‘तयार’ होण्यात अनेक नैसर्गिक रसायनांचा हातभार लागलेला असतो. एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या आंब्याची चव वा रंगरूप त्याच जातीच्या पण दुसरीकडे तयार झालेल्या आंब्याला का येत नाही? बाकी कुठेही तयार झालेल्या ‘हापूस’ला देवगड, रत्नागिरीच्या ‘हापूस’ची चव का नसते तर ती याच रासायनिक प्रक्रियेमुळे! अनेक अस्थिर रासायनिक साखळी प्रतिक्रियांमुळे आंब्याला त्याचा स्वाद प्राप्त होत असतो. एस्टर, टेरपीन, फुरानोन आणि लॅक्टोन कुळातली रसायनं आंब्याला त्याच्या रंगरूप व चवीची विशिष्ट ओळख प्रदान करतात. कोंकणातला हापूस आंबा पिकताना फुरानोन आणि लॅक्टोन त्यावर संश्लेषित कारभार करतात तर टेरेपीन व बाकीची ‘चवदार’ मंडळी कैरी अवस्थेपासूनच त्यांची प्रक्रिया सुरु करतात. इथिलीन ऑक्साईडच्या वा इतर रसायनांच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा, त्याची मूळ चव बऱ्याच प्रमाणात हरवून बसतो. असे पिकवलेले आंबे आरोग्याला अपायकारकही असू शकतात. हेच कारण पुढे करून काही वर्षांपूर्वी जागतिक बाजारपेठेने भारतीय हापूसवर बंदी घातलेली होती. हल्लीचे आंबा उत्पादक अनेक रासायनिक सर्कशी करून आंबाफळ जास्तीत जास्त उत्कृष्ट बनवण्याच्या मागे लागलेले आहेत. हे किती चांगलं किंवा वाईट हे येणारा काळच सांगू शकेल.

आयुर्वेदात आंब्याचे असंख्य उपयोग दिलेले आहेत. महागुणकारी आम्रफळ फक्त वैशाख व ज्येष्ठ महिन्यातच खावं असं आयुर्वेदाच्या अभ्यासकांचं सांगणं आहे. आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफ-पित्त दूर करणारा आहे. कैरीमध्ये आम्लता आणि क्षारांचं प्रमाण खूप आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षारांचा ऱ्हास होऊन थकवा येतो. यावर कैरीचं पन्हं हा उत्तम उतारा आहे. कैरीचा कीस फडक्यात घालून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची दमणूक आणि ताण कमी होतो. कच्च्या कैरीचा गर किंवा बाठीचं चूर्ण अंगाला लावून वा पाण्यात मिसळून अंघोळ केल्यास घामोळ्यांचा त्रास होत नाही. मूळव्याध झाल्यावर रक्त पडणं, रक्तप्रदर, अतिसार, जुलाब यावर आंब्याच्या कोयीतील बियांचं चूर्ण मधातून देतात. हे चूर्ण हिरड्यांच्या, दातांच्या तक्रारी कमी करण्यासदेखील उपयुक्त आहे.

पिकलेल्या आंब्यात अ, ब, क आणि ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतं. अ जीवनसत्व जंतुनाशक तर क जीवनसत्व त्वचारोग आटोक्यात आणण्यास मदत करणारं आहे. आंब्याच्या योग्य सेवनाने शरीराची कांती तर सुधारतेच पण जोडीला शरीराचं पोषणही होतं. अ जीवनसत्व, अल्फा व बीटा कॅरोटिनमुळे डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं. आंब्यातल्या पोटॅशियममुळे रक्तदाब संतुलित राहतो. मात्र, आंबा उष्ण असल्याने त्याचं अतिसेवन टाळावं. जास्त प्रमाणात कैरी खाण्यानेही पोटाचे विकार उद्भवतात. तसंच कैरी खाल्ल्यावर पाणी पिऊ नये असंही सांगितलं जातं. आयुर्वेदामध्ये आंबा आणि दूध एकत्र करून पिणं हे विषसमान मानलेलं आहे.

पुराणकालातही या आम्रफळाचे उल्लेख आढळतात. वेदांमध्ये कैक ठिकाणी आंब्याचे, त्याच्या झाडापानांचं महत्त्व व उपयोग दिलेले आहेत. जातककथा व इसापनितीमध्येही आंब्याचे उल्लेख आहेत. आजही काही महत्त्वाची पूजा असेल तर घरादाराला आंब्याच्या डहाळ्या लावतात. कलशपूजेमध्ये नारळाखाली आंब्याची पानं ठेवली जातात. आम्रवृक्षाला प्रजापतीचं रूप मानलं जातं तर आम्रमंजिरी म्हणजे आंब्याचा मोहोर हा कामदेव मदनाच्या पाच बाणातील एक बाण आहे असं मानतात. एलोऱ्याच्या गुहेत आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या अंबिकामातेचं शिल्प आहे. संस्कृत महाकवी कालीदासाच्या काव्यातही आंबा आहे. ज्ञानदेवांपासून ते तुकोबारायांपर्यंत व नंतरही कित्येक संतरचनांमध्ये आंब्याचा उल्लेख दिसतो.

मौर्य सम्राट अशोकाने फळ आणि सावली असा दुहेरी फायदा देणारं झाड म्हणून त्याच्या राज्यात रस्त्यांच्या कडेला आंब्याची लागवड केलेली होती. मध्ययुगीन भारतातला पर्शियन कवी अमीर खुस्रो, आंब्याचा उल्लेख “हिंदुस्थानचं स्वर्गीय फळ” असा करायचा. दिल्लीचा सुलतान अलाऊद्दीन खिलजी आंबा चवीने खायचा. बाबरने तर बाबरनाम्यातही आंब्याचा समावेश केलेला दिसतो. शेर शहा सुरी या अफगाण योद्ध्याने बाबरपुत्र हुमायुनचा पराभव केल्याची निशाणी म्हणून ‘चौसा’ नामक आंब्याची जात तयार केल्याची नोंद आहे. मोगलांच्या बागकामातून आंब्याच्या शेकडो जाती तयार केल्या गेल्या होत्या. इराणमध्ये पाठवला गेलेला पहिला आंबा, तोतापुरी, हा याच मुघल आम्रसंशोधकांची देणगी आहे. मुघल सम्राट अकबर हा सुद्धा आंब्याचा वेडा होता. बिहारच्या दरभंग्यामध्ये त्याने तब्बल एक लक्ष आम्रवृक्ष लावलेले होते असं इतिहास सांगतो. जहांगीर आणि नंतर शहाजहानने लाहोरमध्ये आंब्यांच्या बागा तयार करवल्या होत्या. पानिपतच्या रणसंग्रामाची साक्ष देणारं ते प्रसिद्ध ‘कालाआम’ झाड कुणी तरी विसरु शकेल का! गेल्याच शतकामधल्या चीनी सांस्कृतिक क्रांतीच्या वेळेला चेअरमन माओने चीनमध्ये आंबा आणला आणि त्याला चक्क लोकांप्रतीच्या त्याच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून चीनी जनतेने आपलंसं केलं होतं. असो..!

या आंब्याबद्दल ऐकावं, वाचावं तेवढं एकेक नवलंच आहे… आणि ही गोड नवलाई कितीही अनुभवली तरीही कधीच न संपणारी अशी मधुर आणि अक्षय्य आहे.

हा लेख इतरांना पाठवा

सिद्धार्थ अकोलकर

आयुष्यभर विद्यार्थीदशा जपण्याची व जोपासण्याची प्रामाणिक इच्छा मनामध्ये बाळगावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *