कायद्यानुसार या गावात कोणी मरू शकत नाही!

१००० हून जास्त कायमस्वरूपी लोकसंख्या असलेली जगातली सर्वांत उत्तरेकडची वस्ती म्हणजे नॉर्वे देशातलं लाँगइअरब्येन नावाचं गाव. स्वालबार्ड या नॉर्वेजियन बेट समूहामध्ये हे गाव वसलेलं आहे.

बरं या गावात फक्त नॉर्वेजियन वंशाचीच माणसं राहतात असंही नाही. इथे पार थायलँडहून येऊन स्थायिक झालेला एक मोठ्ठा समूह आहे. मोठा म्हणजे, २००० या लोकसंख्येच्या मानाने मोठा.

साधारण ३०० जण नॉर्वैतर वंशाचे, आणि त्यांतलेही १२० जण थाई वंशाचे आहेत. त्यांनी अर्थातच आपली संस्कृतीही इथे आणलेली आहे. ते इथे थाई सण साजरे करतात. त्यांनी थाई उपाहारगृह सुद्धा उभारलं आहे.

08 Longyearbyen prn

 

या गावाचं आणखीन एक विचित्र वैशिष्ट्य असं की इथे मरायला बंदी आहे.

१९१८ साली स्पॅनिश फ्लु या रोगाची लाट पसरून जगभरात सुमारे १० कोटी मानवी जीव प्राणास मुकले होते. या रोगाने तेव्हा लाँगइअरब्येन गावालाही ग्रासलं होतं.

१९५० साली असं लक्षात आलं की वर्षानुवर्षं स्मशानात गाडलेली प्रेतं सडतच नव्हती. ती गोठूनच राहात होती. ज्या गावात तापमान उणे ४६.३ अंश सेल्सिअस एवढं खाली घसरू शकतं, तिथे यात काही नवल नव्हतं.

पण यामुळे एक नवीच समस्या निर्माण झाली. ज्या अर्थी प्रेतं सडून जात नव्हती, त्याअर्थी स्पॅनिश फ्लुचे विषाणूही मरत नव्हते. तूर्तास ते विषाणू त्यांनी बळी घेतलेल्या ११ प्रेतांसोबत गोठलेले असून, त्यांचा कधीही वातावरणात पुन्हा विस्तार होण्याचा धोका संभवत होता.

एकेकाळी कोळसा खाणकामावर गुजराण करणारं लाँगइअरब्येन गाव, जेमतेम २००० लोकसंख्या. आधीच ध्रुवीय अस्वलाच्या हल्ल्याचा धोका, त्यात स्पॅनिश फ्लुची भर पडली तर काही पाहायलाच नको.

आणि फक्त स्पॅनिश फ्लुच कशाला, इतरही अनेक रोगांचा संचार गोठून गेलेल्या प्रेतांमध्ये असणारच. गावाच्या हद्दीत प्रेत पुरणं म्हणजे रोगांना आयतं निमंत्रण होऊन बसायचं.

म्हणून एक अचाट निर्णय घेण्यात आला. या गावामध्ये लोकांनी मरण्यावर बंदी घालण्यात आली.

तुम्ही या गावाचे कायमस्वरूपी रहिवासी असाल, आणि आजारपणामुळे, किंवा वृद्धापकाळामुळे तुमचं मरण जवळ आलंय अशी चिन्हं असतील, तर तुम्ही मरायच्या आत तुम्हाला गावाबाहेर – नॉर्वेच्या मुख्य भूमीत पाठवण्याची सोय केली जाते.

आणि समजा चुकून, अपघाताने मेलात, तर तुमचं प्रेत बाहेर पाठवलं जातं, पण गावात कोणावरही अंत्यविधी करायची परवानगी नाही.
लाँगइअरब्येन गावाच्या या अजब समस्येमुळे इथे स्वाभाविकच शास्त्रज्ञ आणि संशोधक आकृष्ट होतात.

१९९८ साली, शास्त्रज्ञांच्या एका टीमने इथे गाडलेल्या प्रेतांच्या फुफ्फुसांमधून नमुने घेतले. हे नमुने घेतानाही विषाणूला पसरायला वाट मिळणार नाही यासाठी प्रचंड काळजी घेण्यात आली. आणि या नमुन्यांमध्ये स्पॅनिश फ्लुचे जिवंत विषाणू मिळालेसुद्धा!

कल्पना करा, जर तुम्ही मरायला टेकले असाल, तर जिथे तुम्ही तुमचं अख्खं आयुष्य काढलंत, तिथे तुम्हाला सुखाने मरूही दिलं जाऊ नये! तेवढ्यासाठी बाहेर जाऊन मरायचं.

अशी एक वदंता आहे, की कळपांत राहणारे प्राणी त्यांच्यापैकी कोणी मरायला टेकला तर त्याला एकट्याला सोडून देऊन पुढे निघून जातात, किंवा तो प्राणीच आपला कळप सोडून देतो, आणि मरण्यासाठी लांब निघून जातो.

हा प्रकार कितपत खरा आणि तो नेमका कोणकोणत्या प्राण्यांना लागू होतो, माहीत नाही. पण तो माणसांच्या एका समूहाला लागू व्हावा हे किती दुर्दैवी आहे!

त्यामुळे असेल कदाचित, किंवा इथल्या कठीण हवामानामुळे असेल, पण वयाच्या पासष्ठीपलीकडे या गावात कायमस्वरूपी राहणारं फारसं कोणीच नाही.

अर्थात, ज्यांना शाप मिळतो, त्यांना उ:शापही मिळतोच! गावाच्या वाट्याला आलेल्या या दुर्दैवामुळे असेल कदाचित, पण इथे पर्यटकांची बऱ्यापैकी ये-जा सुरु असते. त्यामुळे गावाला उत्पन्न मिळतं.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *