घायाळ करणारी समुद्री आयाळ – लायन्स मेन जेलीफिश

थंडगार वातावरणात राहायला आवडणारा एक लांबलचक प्राणी आहे. साडे ७ फूट व्यासाचा आणि १२० फूट लांबीचे कितीतरी शुंडक असणारा एक जेलीफिश १८७० साली मॅसाचुसेट्स उपसागराच्या किनाऱ्याला लागला. त्याला पाहिला की सिंहाच्या आयाळीचा भास होतो म्हणून त्याला लायन्स मेन जेलीफिश असं म्हणतात. समुद्राच्या पृष्ठभागापासून साधारण ६५ फूट खोलीपर्यंत या प्राण्याचा वावर असतो, जिथे तो झूप्लँक्टन्स आणि छोट्या माशांवर ताव मारत आयुष्य मजेत घालवत असतो.

या जेलीफिशला तब्बल १२०० शुंडक असू शकतात. शुंडकांचे आठ संच असतात, आणि प्रत्येक संचात ७० ते १५० शुंडक चिकटलेले असतात. त्यात त्यांची लांबी १२० फूटांपर्यंत जाऊ शकते, म्हणजे एवढे लांबलचक शुंडक असणाऱ्या या प्राण्याने झटके दिले तर काय होईल सांगा बरं माणसाचं? माणूस लगेच मरेलच असं नाही, पण रुग्णालयात नक्की भरती व्हावं लागतं.

Largelionsmanejellyfish

१६ जून २०१० रोजी ‘न्यू इंग्लंड’च्या चौपाटीवर पोहायला गेलेल्या हौशी लोकांना अशाच एका लायन्स मेन जेलीफिशने दणका दिला. जवळपास पन्नास ते शंभर लोकांना समुद्रात पोहताना या जेलीफिशचे दंश सहन करावे लागले. ४० पौंड किलोचा हा जेलीफिश मेलेला आढळला, तेव्हा लोकांना प्रश्न पडला की एक प्राणी एवढा प्रताप कसा करू शकतो? शक्यता अशी वर्तवण्यात आली, की कदाचित या जेलीफिशच्या शरीराचे तुकडे सगळीकडे विखुरले असावेत आणि त्यामुळे एवढ्या लोकांना दंश बसला असावा. खरंच असं घडलं की मरेपर्यंत एखाद्या सिरिअल किलर सारखा हा जेलीफिश लोकांना फटकारत फिरत होता, हे कधीच आपल्या लक्षात यायचं नाही.

पण हे मात्र खरं, की जेलीफिश किनाऱ्याला लागून मरून पडलेला असला, तरी त्याच्या शुंडकांचा दंश होऊ शकतो. या शुंडकांचा वापर समुद्रात शिकारीसाठी होतो. मासे, इतर छोटे-मोठे जेलीफिश खायचे झाले की आधी त्यांना शुंडकाचा दणका द्यायचा, ज्यातून न्युरोटॉक्झिन्स म्हणजे चेताविष दिलं जातं, आणि मग खास भक्ष्य ओढून घेण्यासाठी राखीव असलेल्या शुंडकांच्या मदतीने त्यांना खाऊन टाकायचं, अशी साधारण पद्धत असते. गंमत अशी, की जिथून हा जेलीफिश खातो, तिथूनच उत्सर्जनही करतो. विचार करा, माणसांचं शरीरही असंच असतं, तर पुण्यात पत्ता शोधणं किती सोपं झालं असतं. ती खाल्ल्या आणि वरल्या अंगाची भानगडच नसती.

Lion's mane jellyfish swimming side view

लायन्स मेन जेलीफिशची लांबी एवढी मोठी असू शकते, ज्यामुळे तो ब्लु व्हेल या देवमाशापेक्षाही लांबुडका ठरतो. पण हा लहान आकाराचा असतानाही साधासुधा नसतो. साहेब स्वत:चं क्लोनिंग करू शकतात. लहान असताना अलैंगिक प्रजनन करायचं, आणि प्रौढ झाला की लैंगिक प्रजनन करायचं – आयुष्यभर अशी डबल-धमाल हा प्राणी करतो. पण एवढा लांब असला म्हणून त्याची शिकार होऊ शकत नाही असं अजिबात नाही!

हा डिस्कव्हरीवरचा व्हिडिओ पाहा.

कशाला मरायला गेला असेल कोणास ठाऊक!! मॅगी नूडल्ससारखा खाऊन टाकलाय त्याला!! युट्युबवर या व्हिडिओ खालच्या प्रतिक्रियांमध्ये अशी शक्यता वर्तवलेली आहे की त्याचं चित्रण करणाऱ्यांनीच त्याला त्या ॲनीमोनी झाडांच्या दिशेने ढकलला असावा. कारण एवढा अवाढव्य वाढलेला जेलीफिश आपणहून जीव द्यायला जाण्याची शक्यता कमीच! अर्थात, खरंखोटं ठरवणारे आपण कोण! आपण एवढंच समजून चालायचं की भलामोठा असला तरी हा प्राणी अजिंक्य मात्र नाही. समुद्री टर्टल्स, पक्षी आणि मोठे मासेसुद्धा लायन्स मेन जेलीफिशची शिकार करतात. समुद्री टर्टल्सना त्याच्या शुंडकाच्या दंशांचा फरक पडत नसावा. माणसाला नक्कीच पडतो. त्यामुळे शहाण्या माणसानं या प्राण्यापेक्षा लांबच राहावं.

संशोधनातून असं पुढे आलंय की माणसाने समुद्रात बरीच फालतूगिरी करून ठेवल्याने या जेलीफिशांचं बरंच फावलंय. त्यांना मारणाऱ्या बऱ्यांच प्राण्यांना माणसाने मासेमारी करण्याच्या फंदात घालवून लावल्याने जेलीफिशांच्या जिवाला असलेला धोका कमी होतोय आणि त्यांची संख्या वाढतेय. त्यामुळे अधिकाधिक प्रमाणात जेलीफिश आणि माणूस एकमेकांच्या संपर्कात येण्याची संभाव्यता वाढत जाणार आहे. भोगूया आपल्या कर्माची फळं!

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *