कथा कूका आंदोलनाची । पुसट झालेल्या पानांतून…

आधी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर स्वत:चा ताबा मिळवला, आणि १८५७ च्या देशव्यापी उठावानंतर १ नोव्हेंबर १८५८ रोजी अखंड भारताचं नियंत्रण इंग्लंडच्या राणीच्या हातात आलं. तेव्हापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत अनेक वीर स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा आपण ऐकल्या असतील, पण काही कथा कधीकधी ऐकायच्या राहून जातात. कदाचित त्यामागचं कारण हे, की या कथांचा परिणाम काळाच्या भव्य पडद्याशी तुलना करता क्षुल्लक वाटू शकतो. पण जसे आपण विश्वाच्या या अतिभव्य आणि अमर्याद पटलावर असलेल्या निळ्या ठिपक्यावर राहणारे य:कश्चित मनुष्यप्राणी असूनही स्वत:ला कमी लेखण्याची चूक करत नाही, तशीच आपल्या पूर्वजांनी इतिहासाच्या दृष्टीने अनामिक राहून गाजवलेल्या पराक्रमांची नोंद न घेण्याची चूकही आपण करू नये.

वर्ष १८२४. लुधियाना जिल्ह्यातल्या भैणी गावामध्ये रामसिंहाचा जन्म झाला. रामसिंह साधासुधा इसम नव्हता. महाराज रणजितसिंहाच्या सेनेतला तो एक शूर सैनिक होता. रणजितसिंहांच्या मृत्युनंतर शीख साम्राज्यात आंतरिक सत्तासंघर्षामुळे डळमळीत होऊ लागलं. याचा फायदा घेऊन ब्रिटीशांनी आक्रमकपणे आणि आक्षेपार्हपणे, शीख साम्राज्याच्या सीमाप्रांतांवर आपल्या सैन्याची मोर्चेबांधणी सुरु केली होती. १८ डिसेंबर १८४५ रोजी मुडकीला झालेल्या चकमकीत रामसिंह ब्रिटीशांविरुद्ध लढला होता. पण शीख साम्राज्याचा त्यावेळचा वजीर लाल सिंह आणि सेनापती तेज सिंह हेच ब्रिटीशांना फितूर झालेले असल्यामुळे शीख आणि इंग्रजांच्या या युद्धात शिखांचा पाडाव झाला. याच युद्धामुळे जम्मु-काश्मीरला वेगळ्या संस्थानाचं रूप प्राप्त झालं. यानंतर शिखांशी पुन्हा एकदा युद्ध केल्यानंतर ब्रिटीशांनी १८४९ साली संपूर्ण पंजाब राज्य हस्तगत केलं. त्यावेळी पराभव स्वीकारण्याची नामुष्की अंगावर आलेला रामसिंह प्रचंड अस्वस्थ होता. परकीय राजवटीत गुलामीचं, स्वाभिमानहीन जगणं त्याला पटणारं नव्हतं. रामसिंहानं नोकरी सोडली.

रामसिंह

कोणताही धर्म किंवा पंथ प्रस्थापित होतो ठरावीक तत्त्वांच्या आधारे. मग तो ज्या संस्कृतीत प्रसार पावतो, त्या संस्कृतीच्या वृक्षाभोवती एखाद्या वेलीसारखे वेटोळे घेत जातो. कालौघात, त्या धर्माची मूळ तत्त्वं आणि स्थापनकाळातील संस्कृतीचं स्वरूप ही त्या धर्माची अविभाज्य अंगं होऊ लागतात. काळ बदलतो, संस्कृतीचं स्वरूप बदलतं, आणि जुन्या रुढी परंपरासोबतच, धर्माची मूळ तत्त्वंही विस्मरणात जाऊ लागतात. शीख धर्माच्या मूलतत्त्वांपासून समाज दुरावत चाललेला रामसिंहांना आवडत नव्हता. त्यांनी कूका नावाच्या शीख संप्रदायाची दीक्षा घेतली. ‘कूका’, किंवा ‘नामधारी’ या शीख संप्रदायाची स्थापना बालकसिंहांनी केली होती. नामधारी पंथाचे अनुयायी गुरूवाणी (किंवा गुरबाणी) म्हणताना ती उच्च स्वरमानात (चित्कारत) म्हणत असत. अशा चित्कारण्यास ‘कूक’ म्हणत. म्हणून त्यांना ‘कूका’ असं नाव मिळालं.

१८६२ साली गुरू बालक सिंहांच्या मृत्युनंतर रामसिंहांकडे कूका संप्रदायाचं नेतृत्व आलं. आपल्या भैणी गावात परतलेल्या रामसिंहांनी कूका संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार जोमाने करायला घेतला. शीख समाजात शिरलेल्या आणि रुळलेल्या काही रुढी परंपरांवर आक्षेप घेत रामसिंहांनी कूका संप्रदायाकडे अनेकांना आकर्षित करून घेतलं. त्यांनी स्वशासनावर भर दिला. पंजाब प्रांताची बावीस जिल्ह्यांमध्ये विभागणी केली, आणि प्रत्येक जिल्ह्यात ब्रिटीश शासनाला समांतर आपली स्वत:ची शासन व्यवस्था वसवली. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपापले राज्यपाल नेमले. याव्यतिरिक्त त्यांनी ठीकठिकाणी शाळा, रुग्णालयं आणि टपालघरंसुद्धा सुरु केली. ब्रिटीशांना अर्थातच याची जाणीव होती. त्यांनी १८६३ साली रामसिंहांना हुकूम सोडला की त्यांनी सांप्रदायिक संमेलनं घेऊ नये, आणि आपलं गाव सोडून कुठे जाऊ नये. पण एवढ्याने कूका संप्रदाय थांबणारा नव्हता.

कूका संप्रदायाची आख्यायिका अशी, की शीख समुदायाचे दहावे गुरू गोविंद सिंह यांनी आपल्या मृत्युला हुलकावणी दिली आणि ते भूमीगतपणे वयाची १४६ वर्षं जगले. त्यानंतर गुरू बालक सिंहांकडे त्यांनी गुरूपद सोपवलं. कूका शुद्ध शाकाहारी असतात. ते दारु पीत नाहीत, धूम्रपान करत नाहीत. त्यांचे फेटे गोल आणि पांढरे असतात. त्यांच्या लग्नांत अग्निप्रदक्षिणासुद्धा होते. ते फक्त स्वत:च्या हातचं अन्न खावं असंही मानतात. ते गाईला पवित्र मानतात आणि भक्षणासाठी तिला मारणं गैर मानतात. यामुळेच कसायांशी त्यांच्या सतत चकमकी होत असत.

१८७१ साली काही कूका अनुयायांनी अमृतसरजवळ चार कसायांची हत्या केली. त्यांपैकी आठजणांना पकडून ब्रिटीशांनी फाशी ठोठावली. १३ जानेवारी १८७२ रोजी माघी सणासाठी भैणीला जाणाऱ्या गुरमुख सिंह या कूका अनुयायाचं मलेरकोटला या ठिकाणी एका बैलाला निर्दयीपणे वागवणाऱ्या माणसाशी भांडण झालं. ते भांडण न्यायालयापर्यंत गेलं, आणि एका मुस्लीम न्यायाधीशाने गुरमुख सिंहासमोर बैलाला जीवे मारण्याची आज्ञा दिली. झाला प्रकार गुरमुख सिंहानं भैणीला जाऊन सगळ्यांना सांगितला. (अभय वसंत मराठे यांच्या ‘ओ! उठो क्रान्तिवीरो’ या पुस्तकात काही कसायांनी एका कूका अनुयायाला पकडून चोपला आणि त्याच्या देखत एका गायीचा जीव घेतला असा या घटनेचा उल्लेख आहे.) ही बातमी भैणीत जमलेल्या कूकांमध्ये वणव्यासारखी पसरली. जवळपास दीडशे कूका अनुयायांनी मलौधच्या किल्ल्यावर जाऊन तिथले घोडे आणि तोफा मिळवल्या. ते घेऊन त्यांनी मलेरकोटलाकडे कूच केली. मलेरकोटलातले ब्रिटीश अधिकारी आणि कूका अनुयायी यांच्यात लढाई झाली. अपुऱ्या नियोजनामुळे कूकांना शरण यावं लागलं.

त्यानंतर लुधियानाचा तेव्हाचा डेप्युटी कमिशनर कॉवन तिथे अवतरला. त्याने मलेरकोटलाची सूत्रं आपल्या हाती घेतली. १७ जानेवारी १८७२ रोजी, त्याने दिलेल्या आदेशानुसार कैद केलेल्या ४९ कूकांना तोफेच्या तोंडी दिलं गेलं. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १८ जानेवारी रोजी आणखी १६ कूकांच्या तोफेच्या तोंडी चिंधड्या उडवल्या गेल्या.

हुतात्मा कूकांचं ६६ फूट उंच आणि ६६ छिद्रं असणारं स्मारक.

कैद केलेल्यांमध्ये बिशन सिंह नावाचा एक बारा वर्षाचा उत्साही मुलगा होता. त्याची आई आणि कॉवनची स्वत:ची बायको यांनी या मुलाच्या आयुष्यासाठी कॉवनकडे खूप विनवण्या केल्या. तेव्हा कॉवनने बिशन सिंहला ‘तुझा संप्रदाय सोडून दे, तर तुला जिवंत सोडतो,’ असा पर्याय दिला. बिशन सिंहने चवताळून कॉवनवर झेप घेतली, त्याला जमिनीवर लोळवून त्याची दाढी धरली आणि त्याचं तोंड तो जमिनीवर सारखा आपटू लागला. असं म्हणतात, की त्याची पकड एवढी घट्ट होती की कॉवनच्या सैनिकांनी त्याला मागे ओढला तरी तो कॉवनची दाढी सोडेना. शेवटी तशा अवस्थेत त्याचे हातपाय छाटले तेव्हा कॉवनची सुटका झाली. बिशन सिंह व्हिवळत व्हिवळत मेला. १७ जानेवारीला धारातीर्थी पडलेला तो ५०वा हुतात्मा होता.

या प्रसंगाचं निमित्त साधून रामसिंहांना ब्रिटीशांनी अटक केली. मार्च महिन्यात त्यांची रवानगी रंगूनला झाली. तिथून त्यांना ब्रह्मदेशात म्हणजे आजच्या म्यानमारमध्ये दक्षिणेला पाठवण्यात आलं. तुरुंगवासातच १८८५ साली त्यांचा मृत्यु झाला.

 

रामसिंहांना ब्रिटीशांनी अटक केली. चित्र स्रोत : NRI Affairs Department, Govt of Punjab.

 

५ रुपयाच्या नाण्यावर कूका आंदोलनाचं चित्रण. चित्र स्रोत : colnect.com

वरकरणी पाहता हा उठाव आणि एकूणच ही ब्रिटीशविरोधी कूका चळवळ फक्त सांप्रदायिक प्रेरणेने भारलेली वाटते. पण रामसिंहांच्या काही कृती पाहिल्यास त्यामागची त्यांची राष्ट्रवादी भूमिकाही स्पष्ट होते. ब्रिटीशांना समांतर असणारं स्वशासन प्रस्थापित करणं हा एक भाग झालाच, पण ब्रिटीशांशी असहकार पुकारून ब्रिटीशांच्या वस्तूंवर बहिष्कार घालणारे ते पहिले स्वातंत्र्यसैनिक होते. या कृतींतून रामसिंहांनी आपल्या राष्ट्रवादी वंशजांसाठी एक महत्त्वाचा प्रघात पाडला होता. म्हणूनच, रामसिंहांचं आणि ब्रिटीशांविरुद्ध उठाव करणाऱ्या व धैर्याने मृत्युला सामोरं जाणाऱ्या त्यांच्या शूर दीडशे अनुयायांचं स्मरण करताना आपला ऊर गर्वानं भरून यायला हवा! जय हिंद!

मुख्य प्रतिमा स्रोत

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

One thought on “कथा कूका आंदोलनाची । पुसट झालेल्या पानांतून…

  • November 1, 2019 at 2:03 pm
    Permalink

    रामसिंह आणि कूका यांच्या लढ्याची चांगली, नवी माहिती. अश्या किती वीरांचा बळी मिळाल्यावर स्वातंत्र्य देवी प्रसन्न झाली याची मोजदाद नाही. चांगला विषय निवडला आहे, यावर लिहीत राहा.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *