गल्सना गळ घालणारी चतुर डॉल्फिन मादी

डॉल्फिन मासा कसा बुद्धिमान आहे, याचे किस्से आपण नेहमी ऐकत असतो.

त्यांना पकडून आणून, लोकांची करमणूक करण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या करामती करवून घेतल्या जातात.

मध्यंतरी कचऱ्याचं प्लॅस्टिक, कागद आणि धातू असं वर्गीकरण करू शकणारा डॉल्फिनचा व्हिडिओ पाहण्यात आला.

व्हिडिओखालच्या प्रतिक्रियांमध्ये डॉल्फिन्सना हे शिकवण्यापेक्षा माणसांना शिकवा, त्यांना पकडून आणून माणसाच्या मनोरंजनापायी त्रास देणं सोडून द्या, असाच बहुतेक लोकांचा सूर दिसला.

हा व्हिडिओ इथे पाहता येईल :

बिचारा डॉल्फिन कुठल्या परिस्थितीत पकडला जातो आणि खाणं मिळवण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं, हा या लेखाचा विषय नाही.

या लेखाचा उद्देश वाचकाला डॉल्फिनच्या बुद्धिमत्तेची नेमकी कल्पना द्यावी हा आहे. यासाठी आपण एका विशिष्ट डॉल्फिनचं उदाहरण पाहणार आहोत.

मिसीसिपीमधील इन्स्टिट्युट फॉर मरीन मॅमल स्टडीज्मध्ये डॉल्फिन्सना एक विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं.

त्यांच्या हौदात कचरा पडलेला दिसला, की प्रशिक्षक येईपर्यंत ते तो कचरा धरून ठेवतात, आणि प्रशिक्षकाला तो कचरा देऊन त्याबदल्यात एक मासा मिळवतात. काय वेळ आलीये बघा माणसावर, ज्या प्राण्याच्या घरी घाण करतो ती घाण त्यालाच साफ करायला लावायची!

पण ते असो! गंमत म्हणजे केली नावाच्या डॉल्फिन मादीने गेली काही दशकं स्वत:च्या हुशारीने अधिकाधिक मासे मिळवण्याची शक्कल लढवली आहे.

कचऱ्याचा आकार किती का असेना, प्रशिक्षकाला तो दिला की त्याबदल्यात खायला मिळतं हे केलीनं हेरलं.

समजा कोणी तिच्या हौदात कचरा फेकला, तर ती तो कचरा तळाशी घेऊन जाते आणि एका दगडाखाली ठेवून देते. मग प्रशिक्षक दिसला की पटकन त्या कचऱ्याचा छोटा तुकडा करते आणि प्रशिक्षकाला आणून देते. बदल्यात तिला अख्खा मासा मिळतो.

केली एवढ्यावर थांबली नाही. एकदा एक सीगल पक्षी चुकून तिच्या हौदात आला तर तिने त्याला पकडून ठेवला. तिच्या प्रशिक्षकांना सीगल दिला तर त्यांनी तिला भरभरून मासे दिले.

मग केलीने नवी शक्कल लढवली. तिला प्रशिक्षकांनी मासा दिला, की तो ती दगडाखाली लपवायची. मग प्रशिक्षक आसपास नसले, की ती सीगल्सना गळ घालण्यासाठी तो मासा वापरायची. माशापायी सीगल तिच्या कचाट्यात सापडायचा, आणि त्याच्या बदल्यात केली प्रशिक्षकांकडून भरपूर मासे उकळायची.

आपली ही ‘कला’ केलीनं आपल्या पिलाला शिकवली, आणि त्या पिलानं बाकी पिलांना शिकवली. त्यामुळे गल्सना गळ घालणं हा इन्स्टिट्युट फॉर मरीन मॅमल स्टडीज्मधल्या डॉल्फिन्सचा नवा उद्योग होऊन बसला.

यातून ‘विलंबित समाधान’ (delayed gratification) हा गुण डॉल्फिन्समध्ये असल्याचं दिसून येतं. उत्क्रांतींच्या दृष्टीने हा गुण अतिशय महत्त्वाचा आहे.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *