कीलोर बंधू – पाकिस्तानला नमवणारे वीरचक्र विजेते

भारतमातेचं भाग्य थोर आहे! कारण तिचं रक्षण करणारे आपले सैनिक प्राण पणाला लावून नेहमीच अफाट कर्तृत्व गाजवत असतात. परिस्थिती अनुकूल असो अथवा बिकट, शत्रुची बाजू कमकुवत असो अथवा सशक्त असो, आपला जीव धोक्यात असो अथवा नसो, भारतीय सैनिक कधीच हार मानत नाहीत. आपल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून शत्रुला पराजित केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही.

या सैनिकांप्रमाणेच त्यांचं मनोबल सतत स्थिर राहील याची दक्षता घेणारे त्यांचे कुटुंबीयसुद्धा तेवढेच सन्मानास पात्र असतात. आपला मुलगा क्षणोक्षणी जीव धोक्यात घालून लढतोय याची एकीकडे कितीही काळजी वाटत असली, तरी त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान सतत त्यांचा ऊर भरून आणत असतो. अशाच एका देशप्रेमी कुटुंबांमधल्या दोन भावांची ही कथा आहे.

डेन्झिल कीलोर आणि ट्रेव्हर कीलोर, स्वातंत्र्यपूर्व भारतात एकेका वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या या भावांना भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती प्राणांची आहुती द्यावी लागली होती याची पूर्ण जाणीव होती. धाकटा भाऊ ट्रेव्हर याने वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच भारतीय वायुदलात प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ पुढच्या वर्षी डेन्झिल हा मोठा भाऊसुद्धा वयाच्या एकविसाव्या वर्षी आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत वायुदलात सामील झाला.

नसानसांत भिनलेलं देशप्रेम, उपजत असलेली धाडसी प्रवृत्ती आणि कठीण काळातही डोकं शांत ठेवून प्रसंगावधान दाखवण्याचं कसब यामुळे या दोन्ही भावांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत उत्तमोत्तम कामगिरी करून दाखवली.

मोठा विमान अपघात टाळला
फोटो श्रेय : bharat-rakshak.com

५ फेब्रुवारी १९६४ रोजी, वायुदलात अकरा वर्षांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या फ्लाइट लेफ्टनंट ट्रेव्हर कीलोर यांना पुण्यापासून दिल्लीतल्या पालम पर्यंत नॅट (Gnat) लढाऊ विमान घेऊन जायची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हा पाच विमानांचा ताफा पुण्याकडून पालमकडे शिस्तबद्ध रीतीने चालला होता. प्रवासातला शेवटचा टप्पा हवेत ४१,००० फुटांच्या उंचीवर होता. एवढ्या उंचावरून पालमच्या दिशेने विमान उतरवताना, १५,००० फुटांवर फ्ला. लेफ्ट. ट्रेव्हर कीलोर यांच्या लक्षात आलं की इंजिनचा थ्रोटलशी संपर्क तुटलेला आहे. त्यांनी ताबडतोब आपल्या वरिष्ठांना तसं कळवलं आणि ताफ्यापासून स्वत: वेगळे झाले. त्याआधी कधीही, नॅट लढाऊ विमानाची आपातकालीन उतरण (क्रॅश लँडिंग) यशस्वी ठरली नव्हती, आणि तसा करण्याचा प्रयत्न करणारे सैनिक मरण पावले होते नाहीतर त्यांना गंभीर दुखापत तरी झालेली होती. ट्रेव्हर कीलोर यांना त्याची पूर्ण जाणीव होती. पण ते हार मानण्याऱ्यातले नव्हते. विमानावरचा आपला ताबा अजिबात न ढळू देता, कमालीचं कौशल्य दाखवत त्यांनी पालमला आपलं विमान सुखरूपपणे उतरवलं. त्यांना स्वत:ला काही इजा तर झाली नाहीच, पण विमानालाही काही झालं नाही. हा अपघात टाळणं ही साधीसुधी गोष्ट नव्हती.

या पराक्रमाबद्दल फ्लाइट लेफ्टनंट ट्रेव्हर कीलोर यांना ‘वायु सेना पदक’ देऊन गौरवण्यात आलं.

भारतीय सैनिकाने हवेत घेतलेला पहिला वेध

१९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाला तोंड फुटलं. नेहमीप्रमाणेच, पाकिस्तानने जम्मु-काश्मीरमध्ये केलेली लुडबुड या युद्धास कारणीभूत होती. दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वांत मोठं रणगाड्यांचं युद्ध मानलं जाणारं हे युद्ध तीन आठवड्यांपर्यंत चालू राहिलं. भारतीय सैनिक पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून लाहोरपर्यंत पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय दबाव आल्याने हे युद्ध थांबवावं लागलं. पण जर चालू राहिलं असतं, तर पाकिस्तानचं काही खरं नव्हतं.

या युद्धात दोन्ही कीलोर भावांनी मोलाची कामगिरी बजावली.

३ सप्टेंबर १९६५ रोजी माहिती मिळाली की पाकिस्तानी लढाऊ विमानांचा एक ताफा ‘चांब’ येथे भारतीय सैन्याची अवस्था हेरण्यासाठी घिरट्या घालत होता. या घुसखोरांना घालवून लावण्यासाठी स्क्वॉड्रन लीडर ट्रेव्हर कीलोर आपल्या सेक्शनसह नॅट लढाऊ विमानं घेऊन आले. त्यांना शत्रुची एफ-८६ सेबर जेट्स दिसली आणि त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. या चकमकीत पाकिस्तानी वायुदलातील एफ-१०४ स्टारफायटर्ससुद्धा येऊन सामील झाले. पाकिस्तानी विमानांचं संख्याबळ जास्त होतं. पण त्याची परवा न करता, स्क्वॉड्रन लीडर ट्रेव्हर कीलोर यांनी एका पाकिस्तानी सेबर जेटचा पाठलाग केला आणि त्याच्यावर मारा करत राहिले. त्या विमानाला आग लागली आणि हवेतच त्या विमानाचा चक्काचूर झाला. या चकमकीत भारताचा विजय झाला. भारतीय वायु सेनेने पाकिस्तानी वायु सेनेवर मिळवलेला हा पहिला विजय होता.

या पराक्रमाबद्दल ट्रेव्हर कीलोर यांना वीरचक्र प्रदान करण्यात आलं.

या पाठोपाठ १९ सप्टेंबर १९६५ रोजी मोठे भाऊ डेन्झिल कीलोर यांनीसुद्धा एक मोठा पराक्रम करून दाखवला. त्यांची चार नॅट विमानांची तुकडी पाकिस्तानच्या चार सेबर जेट्सशी झुंज देत होती. ही लढाई जमिनीपासून अवघ्या २००० फूट उंचीवर सुरु होती. जमिनीवरून शत्रू विमान खाली पाडणाऱ्या तोफा डागत होता. स्क्वॉड्रन लीडर डेन्झिल कीलोर यांच्या सूचनांनुसार फ्लाईट लेफ्टनंट पठानिया यांनी शत्रुचं एक सेबर जेट हाणून पाडलं. लगोलग स्वत: डेन्झिल कीलोर यांनीसुद्धा दुसऱ्या सेबर जेटवर मारा सुरु करून ते नष्ट केलं. त्यांच्या या पराक्रमामुळे इतरांना प्रचंड स्फूर्ती मिळाली.

डेन्झिल कीलोर यांना त्यांच्या शौर्याबद्दल आपल्या भावाप्रमाणेच वीरचक्र देऊन गौरवण्यात आलं.
फोटो श्रेय : bharat-rakshak.com

२७ मार्च १९७८ रोजी, वीस वर्षांचा अनुभव असणारे डेन्झिल कीलोर मिग२१ यु ट्रेनर उडवत होते. विमानाच्या रचनेत बिघाड झाली आणि वरची काचच निखळून उडून गेली. यामुळे हवेचा दाब गेला विमानाचा ताबाच सुटला. अशाही परिस्थितीत धीर न खचता डेन्झिल कीलोर यांनी ते विमान सुरक्षितपणे तळावर उतरवलं. १ एप्रिल १९७८ रोजी त्यांना ग्रूप कॅप्टन म्हणून बढती देण्यात आली. यानंतर लगेच काही दिवसांनी काळाने त्यांना परत एकदा आव्हान देण्याचा निष्फळ प्रयत्न केला. १७ मे १९७८ रोजी विमानातून बॉम्ब डागण्याची चाचणी सुरु असताना एक २३ एमएम कॅनन शेल फुटलं. विमानाची प्रचंड हानी झाली. सगळी विद्युत उपकरणं निकामी झाली. आणि तरीही ग्रूप कॅप्टन डेन्झिल कीलोर यांनी पुन्हा एकदा सुरक्षित उतरण केली. बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या हिरोंनी कितीही ‘व्हीएफएक्स’ वापरले, तरीही त्यांना हमखास लाजवतील असे जीवघेणे स्टंट आहेत हे, आणि डेन्झिल कीलोर यांनी ते करून दाखवले.

डेन्झिल कीलोर यांना या धाडसाबद्दल किर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. आपल्या यशस्वी कारकीर्दीला साजेसे सन्मान आणि गौरव त्यांना पुढेही मिळतच राहिले. १९८६ साली प्रजासत्ताक दिनी अति विशिष्ट सेवा पदक, तर १९८९ सालच्या प्रजासत्ताक दिनी परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करून त्यांना गौरवण्यात आलं.

डेन्झिल कीलोर आणि ट्रेव्हर कीलोर या दोन्ही शूर भावांनी पदोपदी इतिहास रचत भारताची मान गर्वाने उंचावली आहे. आपल्या आचरणात त्यांचा आदर्श ठेवून, आणि त्यांच्या या कर्तृत्वाचं वारंवार स्मरण करून येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरित करत राहणं, किमान एवढं तरी आपण सगळे नक्कीच करू शकतो.

हा लेख इतरांना पाठवा

बरणीच्या झाकणातून

फराळ माहितीचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *