गुरु आणि शनी : पृथ्वीच्या जीवसृष्टीचं रक्षण करणारे ‘दादा’ ग्रह

अनेक धूमकेतू सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला दोनशे वर्षांहून जास्त काळ घेतात. अशा धोंड्यांना आपण दीर्घकक्षा धूमकेतू म्हणू शकतो.

जॅन हेन्ड्रिक ऊर्ट नावाचा खगोलशास्त्रज्ञ अशा धूमकेतूंचा अभ्यास करत होता.

त्यांचं निरीक्षण करताना त्याला जाणवलं की बहुतेक धूमकेतूंची कक्षा पाहिल्यास लक्षात येतं की ते बाहेरच्या अवकाशजगतातून येऊन सूर्यमालेत स्थिरावलेले दिसत नाहीत.

ते सूर्यमालेचाच अविभाज्य घटक होते.

आणि या धूमकेतूंना निश्चित अशी दिशा नाही.

प्रत्येक धूमकेतूची कक्षा कोणत्याही उलट सुलट दिशेने सुरु होते.

मुख्य म्हणजे, बहुतेक दीर्घकक्षा धूमकेतूंचं सूर्यापासून सर्वांत दूर असलेलं अंतर साधारण ५०,००० ॲस्ट्रोनॉमिकल युनिटच्या जवळपास असतं (१ ॲस्ट्रोनॉमिकल युनिट = १५ कोटी किलोमीटर = सूर्य आणि पृथ्वीमधलं सरासरी अंतर).

यावरून १९५० साली ऊर्टने असा अंदाज बांधला होता की सूर्यमालेच्या पार टोकाच्या परिसरात अब्जावधी दगडधोंडे गोठलेल्या अवस्थेत फिरत असावेत.

सूर्यमालेतले ग्रह साधारणपणे एका प्रतलात राहून सूर्याला प्रदक्षिणा घालतात.

मात्र ऊर्टच्या कल्पनेतले हे धोंडे गोलाकार व्यूहात सूर्याभोवती पसरलेले असावेत.

धूमकेतूंच्या या समूहाला ऊर्ट क्लाऊड म्हणतात.

ऊर्ट क्लाऊडमधले सूर्याला सर्वांत जवळचे धूमकेतू २००० ते ५००० ॲस्ट्रोनॉमिकल युनिटमध्ये असावेत असा अंदाज आहे (तुलनेने, प्लुटोचं सूर्यापासूनचं अंतर ३० ते ५० ॲस्ट्रोनॉमिकल युनिट पर्यंत असतं.

यावरून ऊर्ट क्लाऊड किती दूर आहे याचा अंदाज बांधता येईल).

ऊर्ट क्लाऊडच्या बाह्य परिघातले धूमकेतू सूर्यापासून १०,००० ते १,००,००० ॲस्ट्रोनॉमिकल युनिट एवढ्या अंतरापर्यंत विखुरलेले असू शकतात.

PIA17046 - Voyager 1 Goes Interstellar
संख्यारेषेवरचं अंतर ॲस्ट्रोनॉमिकल युनिट्समध्ये आहे. प्रत्येक टप्प्यावर दर्शवलेलं अंतर आधीच्या टप्प्याहून दहापटींनी जास्त आहे.
 ऊर्ट क्लाऊड ही अद्याप गणिती आकडेमोडीच्या साहाय्याने मांडलेली एक परिकल्पना आहे.

अजून हा धूमकेतूंचा समूह शास्त्रज्ञांच्या दुर्बिणीने वेधलेला नाही.

 

ऊर्ट क्लाऊडमधले धूमकेतू तयार कसे झाले?

सूर्यमालेतले ग्रह तयार झाले तेव्हा बरेचसे दगडधोंडे अजूनही एकेकटेच तरंगत सूर्याजवळून फिरत होते.

त्यांना सूर्यापासून दूर लोटण्यात आधीच तयार झालेल्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाने पुढाकार घेतला.

यामध्ये गुरुने प्रमुख भूमिका बजावली. यातले बरेचसे धोंडे सूर्यमालेतून पूर्णपणे बाहेर फेकले गेले.

पण सूर्यमालेबाहेर सगळीकडे आपली आकाशगंगा पसरलेली आहे.

तिच्याही गुरुत्वकर्षणाचा परिणाम झाला आणि हे सूर्यापासून लांब जात असलेले दगड धोंडे मध्येच अडवले गेले.


जाहिरात

Sterlomax

कोणताही देश घ्यायला तयार नसलेल्या निर्वासितांसारखी त्यांची अवस्था झाली.

आता ते अशा अवस्थेत होते, जिथे त्यांच्यावर सूर्यमालेतल्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत नव्हता.

सूर्याचं नावापुरतं राहिलेलं गुरुत्वाकर्षण बळ आणि बाहेर आकाशगंगेचं बळ, या दोघांनी मिळून या धोंड्यांना ते सध्या आहेत त्याच जागी खिळवून ठेवलं.

थोडक्यात, जर गुरु आणि शनि नसते, तर ऊर्ट क्लाऊड सूर्यमालेत पृथ्वीच्या अगदी अवतीभोवती असता.

आणि या धूमकेतूंनी येताजाता पृथ्वीवर आदळून चान्स मारून घेतला असता, ज्यामुळे पृथ्वीवर वातावरण टिकून राहणं, आणि जीवसृष्टी निर्माण होणं शक्यच झालं नसतं.

मात्र, अजूनही कधीकधी असं होतं की एखादा धूमकेतू बाहेरच्या थंडीला कंटाळतो आणि थोडं शेकून घ्यायला सूर्याच्या दिशेने झेपावतो.

थोडक्यात, अवकाशातल्या एखाद्या घटनेमुळे अशा एखाद्या धूमकेतूची कक्षा बदलते आणि तो सूर्यमालेच्या आत शिरतो.

त्यातला एखादा धूमकेतू पृथ्वीजवळून जात असला की आपल्याला दिसतो.

पण एकदा तो पृथ्वीजवळून गेला, की परत तोच धूमकेतू आपल्याला आपण जिवंत असेपर्यंत दिसण्याची शक्यता खूपच कमी असते.

कारण कक्षा बदललेली असली, तरीही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायचा कालावधी फारसा बदललेला नसतो.

आणि हा कालावधी शेकडो वर्षांचा असतो.

पण हे लोचट धूमकेतू सूर्यमालेतल्या ग्रहांशी खूपच लगट करायला लागले, की गुरु दादा आणि शनि दादा आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने अशा दीर्घकक्षा धूमकेतूंना दूर भिरकावून लावतात.

आधी शास्त्रज्ञांना असं वाटायचं, की हे महत्त्वाचं काम करायला एकटा गुरु ग्रह समर्थ आहे.

पण नव्या संशोधनातून असं लक्षात येतं की हे काम गुरु आणि शनि दोघं मिळून करत असतात.

जर एखादा धूमकेतू फक्त गुरुच्या किंवा फक्त शनिच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली आला, तर तो सूर्यमालेपासून पूर्णपणे बाहेर भिरकावला जाईलच असं नाही.

उलट कधीकधी, गुरुच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे असे धूमकेतू आणि इतर छोटेमोठे धोंडे नेमके ग्रहांच्याच दिशेने भिरकावले जातात.

मुळात पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी हेच कारण ठरलेलं असू शकतं.

उत्कलन बिंदू (पदार्थ उकळण्याचा बिंदू) कमी असलेली मूलद्रव्यं (उदा. पाणी) घेऊन फिरणाऱ्या एखाद्या धोंड्याला आपल्या शक्तिनिशी पृथ्वीसारख्या ग्रहावर पाठवण्याचं काम गुरु ग्रहाचंच.

पृथ्वीवर पाणी धूमकेतू किंवा तारकाभांनीच (ॲस्टेरॉइड) आणलं असण्याची शक्यता जास्त असल्याने, आपल्या ग्रहावर जीवसृष्टी आहे याबद्दल एका अर्थी गुरुचेच आभार मानायला हवेत.

आणि आपण शनिची साडेसाती, शनिचा कोप वगैरे म्हणत असतो, पण याच शनिमुळे आपण आज जिवंत आहोत हे विसरून चालणार नाही.

हा लेख इतरांना पाठवा

कौस्तुभ पेंढारकर

संपादक, बरणी.इन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *